सुनिल हा विजयचा दुसरा शालेय जिवलग मित्र… तोच ज्याच्यामुळे विजय स्वाध्यायी मित्रांच्या संपर्कात आला होता. नंतर कळले त्या स्वाध्याय परिवाराशी संबंधित एका मुलीवर सुनिलचे एकतर्फी प्रेम होते. म्हणजे त्यालाही त्याचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करण्याची कधी हिंमत झाली नाही. काळाच्या ओघात विजय त्याच्या आयुष्यात काही काळासाठी आलेल्या बऱ्याच तरुणी विसरलाही होता. त्याच स्वाध्याय परिवारातील एक तरुणी विजयलाही आवडू लागली होती. पण स्वाध्याय परिवारातील तरुण – तरुणी एकमेकांना भाऊ बहीण मानतात. त्यामुळे विजयला तेंव्हा माघार घ्यावी लागली होती. त्या तरुणीशी म्हणजे सुनिल ज्या तरुणीच्या प्रेमात होता तिच्याशी त्याची चांगली मैत्री झाली होती. जाता – येता प्रवासात भेटली तर त्याच्याशी खूप बोलात असे ! विजय सुनिलला म्हणालाही होता , ” मी विचारू का तिला तुझ्याबद्दल ? त्यावर सुनिल नको ! म्हणाला,” पुढे तिचं लग्न झालं आणि तो विषय मागे पडला.
मग ! सुनिल एका नाट्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला जोडला गेला. सुनिलला शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळेच एकदा शर्मिला आणि त्याची भेट झाली असता तिने त्याला विजयचा संदर्भ दिला होता पण तेंव्हा तिला माहीत नव्हते की विजय त्याचा मित्र आहे. विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते. त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते. नाटक सकाळी होते बारा वाजता संपले. विजयला एक सवय होती तो कोणत्याही कार्यक्रमासाठी कोठेही गेला आणि तेथे जवळपास एखाद पर्यटनस्थळ असेल तर त्याला आवर्जून भेट देतो. त्याप्रमाणे सर्वांनी जवळच असणाऱ्या नॅशनलपार्कला जाण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे सर्व नॅशनलपार्क मध्ये गेले. थोडावेळ नॅशनल पार्क मध्ये फेरफटका मारून झाल्यावर कोणाला तरी आठवलं की कान्हेरी गुंफा येथून जवळच आहेत. कोणाला तरी विचारल ! तर तो म्हणाला ,”चालत एक तास लागेल . कान्हेरी गुंफेकडे जाणाऱ्या जंगलातील रस्त्याने त्यांचा प्रवास सुरु झाला. चालताना रस्त्यात जे कोणी जे काही विकताना दिसेल ते विकत घेऊन ते खात चालले होते आणि वेळ घालवावा म्हणून चावट विनोद सांगणे सुरू होते. त्यावेळी विजयकडे चावट विनोदाचा तर संग्रह होता कारण विजयला तशा विनोदाचे एक इंग्रजी पुस्तकच सापडले होते. ते पुस्तक विजयने बरीच वर्षे सांभाळून ठेवले होते.
कान्हेरी गुंफेत पोहचायला दुपारचे तीन वाजले तेंव्हा कान्हेरी गुंफेत प्रवेश करण्याची तिकीट पाच रुपये होती. कान्हेरी गुंफेत गेल्यावर तिथलं ते भव्य दिव्य शिल्प पाहण्यात आणि जंगलात जोडीने शिरणारे तरुण – तरुणी पाहण्यात सगळे गुंग झाले आणि गुंफा बंद करण्याची वेळही झाली म्हणजे साधारणतः सहा वाजले. गुंफेतून खाली आल्यावर सर्व भानावर आले आणि त्यांना प्रश्न पडला की आता आपण माघारी कसं जायचं ? कारण जे आले होते ते वाहनाने आले होते. आता आपण चालत जायचं म्हटलं तर जंगलात रात्रीचे नऊ वाजतील ? मग ! शोधाशोध केल्यावर काही लोक एक मोठा टेम्पो घेऊन आले होते. टेम्पोवाल्याला विचारले असता तो म्हणाला,” टेम्पोत जागा नाही… टेम्पोला लटकून यावे लागेल. आणि दहा का वीस रुपये द्यावे लागतील… शेवटी नाईलाज होऊन ते सर्व त्या टेम्पोला अक्षरशः लटकून नॅशनल पार्कला आले. तेंव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
त्याच सुनिलच्या लग्नाला विजय आणि त्याचे तेच मित्र गेले असता ते महाकाली गुंफा बघायला गेले होते. सुनिलचे लग्न त्यामानाने लवकर झाले कारण सुनिलचे दोनाचे चार केल्या खेरीज तो नाटकाच्या व्यसनातून बाहेर पडणार नाही ! असे त्याच्या आईला वाटत होते. त्याच्या नाट्य निर्मात्याची बहीण आणि नाटकातील त्याची हिरोईन त्याच्या प्रेमात होती. पण का कोणास जाणे ती त्याला आवडली नव्हती. विजयने त्याला समजवण्याचा निरर्थक प्रयत्न करून पाहिला होता. सुनिलचे जिच्याशी लग्न झाले होते तिला नाटकातील न ! आणि अभिनयातील अ ! ही माहीत नव्हता. पुढे तो संसारी झाला आणि संसारात रमला. आता एका मोठ्या फायनान्स कंपनीत मॅनेजर आहे. विदेश वारीही करून आला. निलिमाला तेंव्हा तो दारू आणि सिगारेट प्यायला लागला आहे याचा राग येत असे. त्यावरून ती विजयला नेहमी सूनवत असे.
आताची मकरसंक्रांत आणि तिच्याशी जोडलेल्या विजयच्या आठवणी या संमिश्र आहेत. विजय सहावीला जाईपर्यत विजयच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यामुळे शाळेत साजऱ्या होणाऱ्या हळदी – कुंकुला विजय फक्त सहावीच्या वर्गात असताना उपस्थित होता. त्यानंतर तो शाळेतील अथवा शाळेबाहेरील कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नव्हता कारण एकच त्याच्याकडे नवीन कपडे नव्हते. पायात नवीन बूट नव्हते. पायात स्लीपर होती ती ही झिजलेले. सातवीत असताना फक्त पायात चप्पल नव्हती म्हणून विजय दहा दिवस शाळेत गेला नव्हता . शिक्षकांनी विचारले असता ” आजारी होतो हे खोटे कारण त्याला पुढे करावे लागले होते. तो दहावीला असताना एक दिवस शाळेत गेला असता शाळेचा शिपाई त्याला म्हणाला , ” आता तरी चप्पल नवीन घे ! इतकी त्याच्या चपलेची झीज झाली होती. तेंव्हा विजय काहीच बोलला नाही. पण मनात खूप रडला होता. दहावीच्या परीक्षेला जाण्यासाठी त्याने फारच आग्रह केला म्हणून त्याच्या वडिलांनी एक नवीन पॅन्ट – शर्ट नाईलाज म्हणून विकत घेतला… त्याच एका पॅन्ट शर्टवर विजयने दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे विजय नोकरीला राहिला ! मिळणारा सर्व पगार घरी द्यायचा तरी बारावीची परीक्षा फी देताना विजयच्या बाबांनी त्याला रडवले… त्याक्षणी विजयने ठरवले हे माझ्या आयुष्यातील शेवटचे रडणे ! आणि तेथूनच त्याने स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगायला सुरुवात केली. कोणत्याच नात्यात गुंतून न पडण्याचा त्याने निर्णय घेतला. तेंव्हा पासून तो सामान्य जगापासून अलिप्त झाला. जग काय म्हणेल ? हा प्रश्न त्याला कधीच पडत नाही. कोणासाठीही तो त्याचे निर्णय बदलत नाही. मग घेतलेल्या निर्णयाची कितीही मोठी किंमत चुकवावी लागली. तरी तो मागे हटत नसे !
मकर संक्रातीच्या दरम्यान तिळगुळ विकण्याचा धंदाही विजय करून झाला होता. मकरसंक्रात म्हटली की आठवते ती पतंग! विजयला पतंग उडवायला खूप आवडत असे ! आणि गुल झालेली पतंग पकडायला कोठे कोठे तो धावला होता. घराच्या घरी मांज्या बनविण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्याने केला होता. पतंग तर त्याने घरच्याघरी बऱ्याच बनविल्या होत्या आणि त्या उडविल्याही होत्या. एकदा समुद्र किनाऱ्यावर पतंग उडविण्याचे विजयचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही कारण विजय अकाली प्रौढ झाला होता. त्याच्यातील आल्हाद , उत्साह , उमेद संपली होती. आता तो फक्त जगत होता. त्याच्या स्वप्नाची राखरांगोळी कधीच झाली होती. म्हणूनच त्याच्या आयुष्यात इतक्या आल्या आणि गेल्या एकीसाठीही त्याच्या डोळ्यात एकही अश्रू कधी आला नाही. कारण जगातील शाश्वत सत्य त्याला कळले होते.
— निलेश बामणे.
Leave a Reply