तशी संधी त्याला मिळाली आणि त्याने ऑनलाईन ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विजयने वेळोवेळी स्वतःचीच जन्मकुंडली डोळ्यासमोर ठेवली. त्यामुळे त्याला त्याच स्वतःच भविष्य उलगडत गेलं. पण कोणाचं कटू भविष्य समजून घ्यायला कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आपलं भविष्य सुखद असावं असंच वाटत राहतं. आणि आपल्याला जे कटू कळलेलं आहे ते चुकीचेही असू शकत असं तो स्वतःलाच समजवत असतो. आणि भविष्य बदलण्याचा काही उपाय आहे का ? याच्या सतत शोधात असतो.
विजय हे सत्य जाणून होता की भविष्य कोणालाही बदलता येत नाही. पण मनुष्य वर्षानुवर्षे तो बदलण्याचा प्रयत्न करू पाहत आला आहे. विजय आज वयाच्या बेचाळीसव्या वर्षीही अविवाहित आहे. अनेक स्त्रिया आयुष्यात येऊनही त्याचा विवाह होऊ शकला नाही. वर वर पाहता त्याची जन्मकुंडली साधी सोप्पी वाटते पण त्यात भयंकर गुंतागुंत आहे. इतकी गुंतागुंत की चांगल्या चांगल्या ज्योतिष्याना त्याच अचूक भविष्यकथन करणं अवघड जातं.
विजयच्या ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आता त्याच्या आयुष्यात आता खूप गोष्टी बदलणार होत्या. त्या गोष्टींचा फक्त साक्षीदार होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. म्हणूनच आता तो स्थिर झाला होता. राग, लोभ, मोह आणि माया त्याच्या अधीन झाल्या होत्या. प्रत्येक घटनेकडे तो ही घटना निश्चितच होती. या दृष्टीने तो पाहू लागला होता. . म्हणूनच तो समाधानी आनंदी असतो. लोकांना कळत नाही हा याच्याकडे काहीच नसताना इतका आनंदी सुखी समाधानी आणि शांत कसा राहू शकतो. पैसे कमावण्यासाठी धडपड नाही, हक्काचे पैसेही कोणी देत नाही म्हणून राग नाही. कोणाच्याही आनंदात आणि दुःखातही तटस्थ भूमिका तो घ्यायला शिकला आहे. कोणी सल्ला मागितला तर योग्य सल्ला देतो पण फक्त नम्रपणे मागणाऱ्याला… ज्याने ज्याने त्याचा सल्ला मानला त्याच कल्याण झालं आणि ज्याने नाही मानला त्याचंही कल्याण झालं.
खूप लोकांना वाटतं त्यांनी त्याला फसवलं किंवा ते त्याला फसवत आहेत . पण वास्तवात तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण त्या सगळ्यांच भविष्य त्याला स्पष्ट दिसत आहे. विजयला माहीत आहे की अन्न , वस्त्र आणि निवारा याची कमतरता त्याला कधीच भासणार नाही कारण हाच तर त्याला मिळालेला शाप आहे…त्याबदल्यात त्याला इतर सुखांचा त्याग करावा लागला आहे.
विजयचा जन्म रत्नागिरीतील एका छोट्याश्या गावात झाला होता. तो जन्माला आला तेव्हा खुपच लहान होता अगदी एखाद्या मांजराच्या पिल्लासारखा ! तो फार काही जगणार नाही, असेच तेंव्हा त्याला पाहणाऱ्यां प्रत्येकाला वाटले होते. फक्त एक गोष्ट दखल घेण्यासारखी होती ती म्हणजे जन्मताच त्याच्या अंगावर दाट केस होते एखाद्या माकडाच्या पिल्लासारखे ! त्या केसांचं रहस्य काही विजयला अजून उलगडले नाही. त्याच्या आईने त्याला चण्याचे पिट लावून लावून ते दाट केस कमी केले आताही त्याच्या अंगावर बऱ्यापैकी केस आहेत पण दाट म्हणता यावेत इतके नाहीत. विजय जन्मानंतर काही वर्षेच गावी राहिला. त्यातही एकदा तो नदीतून वाहून जाता जाता वाचला त्यावेळी त्याला वाचविणाऱ्या तेव्हा तरुणी होत्या . म्हणूनच की काय विजयला आजही पाण्याची भीती वाटते. त्याला आणखी एक कारण आहे विजय आयुष्यात बरंच काही शिकला पण पोहायला शिकला नाही.
विजयच्या पत्रिकेत पाण्यापासून धोका आहेच पण विजयचे वास्तव्य गावी न होता मुंबईला झाले कारण विजयच्या कुंडलीप्रमाणे तो जिथे जिथे वास्तव्यास असेल तेथे जवळ देऊळ असेलच ! विजय पूर्वी जिथे झोपडीत राहायचा तेथे संतोषी मातेचं मंदिर होत. तो जेथे नोकरीला आहे तेथे जवळ गणपतीचं देऊळ आहे. मधल्या काळात तो भाड्याने जेथे राहात होता तेथे शंकराचे मंदिर होते आणि आता ज्या इमारतीत राहतो त्याच्याजवळ गणपतीचे मंदिर आहे. पण त्याच्या गावच्या घराजवळ एकही मंदिर नाही. त्यामुळेच विजय कित्येक वर्षे त्याच्या जन्मगावी गेला नाही. कित्येक वर्षांनंतर तो पहिल्यांदा गावाला गेला ते त्याच्या बहिणीच्या म्हणजे विजयाच्या लग्नाला…विजयाचा प्रेमविवाह झाला हे आपण मागेच पाहिले होते पण तिच्याही लग्नाची एक कथा आहे. तिच्या लग्नामागेही एक रहस्य आहे. ते उलगडले पुढे हळू हळू…
मागे विजयच्या आई-वडिलांनी विजयच लग्न होत नाही ! म्हणजे तो लग्न करत नाही म्हणून त्याची पत्रिका गावच्या भटजींना दाखवली त्यांनी ती आणखी कोणा गुरुजींना दाखवली आणि त्यांनी त्यात एक अशुभ योग शोधून काढला तो म्हणजे व्यतिपात योग ! या योगाबद्दल विजयने कधीच कोठे वाचले नव्हते. त्याचा जन्म तर सिद्धी योगावर झाला होता. त्या दिवशी त्याच्या जन्मानंतर काही तासांनी व्यतिपात योग होता. असे त्याला अभ्यास केल्यावर कळले. या योगावर जन्म झालेल्या मुलांना म्हणे जन्मताच गाईकडून चाटवून वगैरे घ्यायचे असते म्हणजे हा दोष दूर होतो. हा दोष दूर करण्यासाठी त्यांनी बऱ्याच ग्रहांच्या, पितरांच्या शांत्या केल्या , सर्व देव देवतांना आमंत्रीत वगैरे केले. या पूजेचा त्या गुरुजींनी घेतलेली दक्षिणा मात्र अत्यल्प होती. हीच पूजा मुंबईत करणं खूपच महागात पडल असतं . तरीही या पूजेच्या निमित्ताने गावी वास्तव झाले ते ही तीन आठवडे ! त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान त्याचा विचार करून जमणार नाही कारण त्या निमित्ताने कोकणातील गणेशोत्सव विजयला अनुभवता आला. आणि पावसाळ्यातील कोकण, आजूबाजूची हिरवळ, शेती, शेतात काम करणारे शेतकरी, तुडुंब भरून वाहणारे नदी नाले, जंगलातील फक्त पावसात उगवणारी फुले आणि भाज्या ! त्या भाज्यांची चवही चाखता आली त्याला या निमित्ताने !
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! कोणाच्या हे एक गूढ रहस्य होतं. तो जिच्या प्रेमात पडला होता तिचं आणि त्याचं मागच्या जन्मातील नातं आहे असं फक्त विजयला वाटत होतं. ती मात्र या सगळ्यांपासून अपरिचित होती. ती तीच सामान्य आयुष्य आनंदात जगत होती असं नाही म्हणता येणार ! पण तीच ती जगत होती. तीच विजयवर प्रेम नव्हतं… आणि ती त्याच्या प्रेमात पडण्याला तस काही कारणही नव्हतं. कारण ते दोघे पृथ्वीच्या दोन ध्रुवासारखे होते.
— निलेश बामणे.
Leave a Reply