विजयचे बाबा त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. मुंबईतील इंग्रजी बोर्ड वाचून- वाचून ते इंग्रजी वाचायला शिकले. कारण ते सातवी मराठी शिकले होते. त्यावेळी इंग्रजी सातवी नंतर शिकवत.गरिबीतही विजयच्या बाबांनी वर्तमानपत्र वाचणं सोडलं नव्हते. म्हणूनच विजयला वाचनाची गोडी लागली होती. ती आजही कायम आहे. एकदा तर विजय वत्सायन कामसूत्र हे पुस्तकही विकत घेणार होता. पण ठेवायचं कोठे ? वाचायचं कोठे ? ह्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे त्याने ते नाही घेतले. पण तरीही वत्सायन यांची कथा त्याने कोठेतरी वाचली होतीच.त्यातूनही त्याने बोध घेतला माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. म्हणूनच विजयने नेहमीच कर्माला महत्व दिले त्याच्या फळाला नाही. पण कलियुगात दुर्दैवाने कर्मापेक्षा फळाला अधिक महत्व दिलं जातं. त्यात त्यांचा दोष नाही हा कलियुगाचाच प्रभाव आहे. त्यावर कोठेतरी वाचलेली एक गोष्ट विजयला नेहमी समरणात असते ती अशी. महाभारताचे युद्ध संपल्यावर द्वापार युग संपायला आले होते. त्यामुळे द्रौपदी आणि आणि तीन पांडव श्रीकृष्णासोबत बसलेले असताना द्रौपदीने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की कलियुग कसे असेल ? त्यावर श्रीकृष्ण तीन पांडवांना म्हणजे धर्म, भीम आणि अर्जुन यांना आणि द्रौपदीला म्हणाले,” तुम्ही चौघे चार दिशेला जा! आणि जेंव्हा तुम्हाला काही विचित्र दिसेल तेंव्हा माघारी या! थोड्या वेळाने चौघे चारी दिशेला जाऊन माघारी आले. श्रीकृष्णाने चौघांनाही विचारले तुम्ही काय विचित्र पाहिले ते सांगा! तर पहिल्यांदा भीम म्हणाला,” मी ज्या दिशेला गेलो होतो त्या दिशेला समुद्र किनारा होता. समुद्र किनाऱ्यावर एक मोठं मडकं पाण्याने भरलेले होते. मी त्या मोठ्या मडक्यातील पाण्याने तीन मडकी भरली तर ती बरोबर भरली. पण नंतर जेंव्हा ती तिन्ही मडकी मी मोठ्या मडक्यात रिकामी केली तर ते मोठं मडकं भरलंच नाही. हे मला विचित्र वाटलं म्हणून मी माघारी आलो. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले,” कलियुग हे असेच असेल या युगात एक बाप आपल्या तीन मुलांना सांभाळेल त्यांचं पालन पोषण करेल पण ती मुलं मिळून त्या एका म्हाताऱ्या बापाचा संभाळ करू शकणार नाहीत, त्याच पालन पोषण करू शकणार नाहीत.
मग! अर्जुनाला विचारले असता तो म्हणाला,” मी ज्या दिशेला गेलो होतो त्या दिशेला मी एका डोंगरातून निघणारे तीन झरे पाहिले पहिल्या झऱ्यात खूप पाणी होते, दुसऱ्यात थोडे कमी आणि तिसऱ्यात त्याहून थोडे जास्त होते. तर पहिल्या झऱ्यातील पाणी उडून दुसऱ्या झऱ्यात जाण्या ऐवजी तिसऱ्या झऱ्यात जात होते. ते मला विचित्र वाटले म्हणून मी माघारी आलो. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले,” कलियुगात लोकांना स्वतःच्या सख्या नातळगांपेक्षा परके जवळचे वाटतील त्यांचा ओढा परक्यांकडे जास्त असेल.
त्यानंतर श्रीकृष्णाने धर्माला विचारले,” तू काय पाहिलंस.त्यावर धर्म म्हणाला, ” मी पाहिले की समुद्र किनाऱ्यावर राजहंस जो मोती टिपतो तो किडे टिपत होता. आणि कावळे जे किडे टिपतात ते मोती टिपत होते.हे मला विचित्र वाटले म्हणून मी माघारी आलो, त्यावर श्रीकृष्ण म्हणाले,” कलियुगात असेच होईल ,” जे खरोखरच बुद्धिजीवी आहेत त्याची अवस्था खूपच दयनीय होईल आणि मूर्ख निर्बुद्धी राजसत्ता उपभोगतील.
मग श्रीकृष्णाने द्रौपदीला विचारले तू काय पाहिलेस ? त्यावर द्रौपदी म्हणाली,” मी ज्या दिशेला चालले होते त्या दिशेने समोरून डोंगरावरून एक भलामोठा दगड माझ्या दिशेने घरंगळत येताना दिसला, त्यापासून वाचण्यासाठी मी पळू लागले थोड्यावेळाने मी मागे वळून पाहिले ते एका छोट्याश्या झाडाच्या फांदीने तो दगड थांबला होता. ते मला विचित्र वाटले म्हणून मी माघारी आले.त्यावर श्रीकृष्ण म्हणाले ,” कलियुगात हे असेच होईल बहुसंख्य लोक नास्तिक , अधर्मी होतील! तेंव्हा ज्याच्या मनात देवावर कसुभरही विश्वास असेल तो मोठ्यात मोठ्या संकटातून तरला जाईल.
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो. सामान्य माणसांसारखा विचलित होत नाही. विजय एखाद्या गोष्टीसाठीची त्याची भूमिका कोणासाठीही बदलत नाही. त्याच्या आयुष्यात इतक्या स्त्रिया आल्या आणि गेल्या पण त्या विजयच्या आयुष्यात काडीचाही बदल करू शकल्या नाहीत. विजय दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना कधीच करत नाही. म्हणूनच तो सदा आनंदी असतो. लोकं त्याच्या आंनदी असण्याचा अर्थ त्यांना हवा तसा लावतात. पण विजयला चांगलं माहीत आहे की मनुष्याच्या दुःखाला दुसरा कोणीही जबाबदार नसतो. ज्याचं दुःख व्हावं अशी गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. कालच विजयने एक बातमी वाचली की आर्थिक संकटात सापडल्यामुळे नवऱ्याने आपल्या पत्नीची आणि दोन मुलाची हत्याकरून स्वतः आत्महत्या केली. त्यावर चर्चा करताना विजय म्हणाला,” म्हणजे अशा बातम्या वाचून तो नेहमी म्हणतो,” त्या नवऱ्याला मरायचं होतं तर मरायचं! त्याला त्याच्या बायका पोरांना मारायचा नैतिक अधिकार कोणी दिला ? इतकं टोकाचं पाऊल उचलायची काय गरज होती ? फार फार काय झालं असतं ? तुरुंगात जावं लागलं असतं! आणि खायचे वांदे वगैरे कोणाचे होत नाहीत. मिळेल ते काम करायची लोकांची तयारी नसते. विजयला आयुष्यात ती चिंता नाही कारण विजय नेहमी म्हणतो. काहीच नाही तर मी निदान झाडू मारून माझं पोट भरू शकतो. त्यासाठी काहीच लागत नाही. ज्यासाठी आत्महत्या करावी असं कोणतंही कारण या जगात अस्तित्वात नाही. श्रीमंत लोक आर्थिक भ्रष्टाचार करून तुरुंगात जातात ते किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी आत्महत्या करतात ? तर नाही करत. आत्महत्या सामान्य माणसं करतात कारण ते गुंतून पडलेले असतात अस्तित्वातच नसलेल्या प्रश्नांमुळे.
— निलेश बामणे.
Leave a Reply