जयेशच्या वडिलांची म्हणजे जयराम शेठची कथा जी आपण नंतर सांगणार होतो…ती सांगतो…. जयेशच्या वडिलांचे वडील एक सामान्य मिल कामगार होते. जयेशच्या वडिलांना अभ्यासात रस नव्हता म्हणण्यापेक्षा शिक्षणाला महत्व देणार वातावरण त्यांच्या कुटुंबात नव्हते असेही म्हणता येतील. आणि त्या काळात शिक्षण नसलं तरी फार काही आडत नाही म्हणून पालक शिकण्याचा आग्रही करत नसत. साधारणतः चौदा- पंधरा वर्षाचे असतानाच ते एका कारखान्यात पाणी भरायचं काम करायचे पण ते दिसायला फारच सुंदर, गुबगुबीत आणि घाऱ्या डोळ्याचे होते. त्या कारखान्याच्या मालकाचा त्याच्यावर जीव होता म्हणा किंवा सर्वात लहान म्हणून प्रेम होते. पुढे जयेशचे वडील थोडे मोठे झाल्यावर वेगवेगळ्या मशीनवर काम करू लागले. त्यात ते कामात पटाईत झाले. काही वर्षांनी त्या कारखान्याचा मालक परदेशात गेला. त्याने काही मशीन आणि काम देणाऱ्या पार्टी त्यांना देऊ केल्या. त्याच काळात त्याच्या वडिलांनी मिल मधील नोकरीचा राजीनामा दिला. त्यातून त्यांनी एक जागा विकत घेतली आणि त्यांचा कारखाना सुरू झाला. आणि दिवसेन दिवस त्या कारखान्याची भरभराट होऊ लागली. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर त्यांना एक मुलगीही झाली. पण त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले होते. या दरम्यान त्यांच्या आयुष्यात जयेशची आई आली आणि ते त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या सोबत दुसरा विवाह केला. जो त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मान्य नव्हता.
त्यानंतर जयेशचा जन्म झाला. पण तो जयराम शेठचा दुसऱ्या पत्नीपासून झालेला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातून त्याला प्रेमळ वागणूक कधीच मिळाली नाही. तर नेहमीच त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना त्यांच्या या प्रयत्नात शेजारी पाजारीही हातभार लावत होते. त्यामुळे आज जयेशचा जो काही स्वभाव आहे तो होण्यास ते सगळे कारणीभूत आहेत. जयराम शेठचे दोन लग्न झालेले असल्यामुळे कित्येकदा जयेशच्या लग्नात बऱ्याचदा अडचणी निर्माण झाल्या. काही वेळा जयेशचा स्वभावही बऱ्याचदा त्याच्या लग्नाच्या आड आला होता. दिड वर्षांपूर्वी कोरोनात जयराम शेठचा मृत्यू झाला. सर्वांना वाटले आता जयेश कोलमडून पडेल पण तो माडासारखा सरळ उभा राहिला. जयराम शेठचे विजयवर खूप प्रेम होते. त्यांच्या पाचष्टीच्या पार्टीला त्यांनी विजयला आग्रहाने बोलावले होते. विजयच्या हुशारीची त्यांना कल्पना होती. म्हणूनच त्यांनी विजयला त्यांची कंपनी जॉईन करण्याचे कित्येकदा आमंत्रण दिले होते. पण फक्त गाढवपणामुळे विजयने ती ऑफर स्वीकारली नाही. असे नाही ! विजयला त्यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध तसेच ठेवायचे होते. विजय सोबत ते रोज त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल चर्चा करत असतं. त्यांचे निधन होण्यापूर्वीच काही महिने अगोदर त्यांचा पहिल्या पत्नीसोबतचा घटस्फोट कोर्टाने मान्य केल्यामुळे ते थोडे आनंदात होते. पण कदाचित नियतीला त्यांचा आनंद मान्यच नव्हता. आणि त्यांचा कोरोनात मृत्यू झाला.
विजयला कधी – कधी प्रश्न पडतो त्यांच्या आयुष्याची रेषा पहिल्या पत्नीच्या भाग्याशी तर जोडली गेलेली नव्हती ना ?
कित्येक वर्षानंतर मुंबईतही खूप कडाक्याची थंडी पडली आहे. ही थंडी अनुभवताना विजयला पूर्वीचे ते थंडीचे दिवस आठवत होते. तेंव्हा विजय आणि त्याचे मित्र चाळीतील एकमेव मोकळ्या जागेत…लाकडं आणि कागद गोळा करून शेकोटी पेटवत आणि त्या शेकोटीत बटाटे भाजून खात… त्या मोकळ्या जागेचे विजयच्याच नव्हे तर विजय सोबतच्या सर्वांच्याच आयुष्यात आणि आता आठवणीत एक वेगळेच स्थान होते. त्याच मोकळ्या जागेत विजय आणि त्याचे मित्र दिवसभर गोट्या खेळायचे, भवरा फिरवायचे, पतंग उडवायचे, रात्री कबड्डी खेळायचे, कधी – कधी वर्गणी काढून भाड्याने टी.व्ही आणि व्ही.सी.आर आणून त्यावर चित्रपट पाहत असत.एकदा तर विजय सहावीला असताना तीन चित्रपट पाहून सकाळी वार्षिक परीक्षेला इंग्रजीचा पेपर लिहायला गेला होता. त्या वर्षी वर्गात त्याचा तिसरा क्रमांक आला होता. त्याकाळी विजयला चित्रपट पाहण्याचं प्रचंड वेड होतं. महाभारत पाहण्यासाठी विजय दर रविवारी तेंव्हा ५० पैसे देत असे आणि त्यापूर्वी रामायण पाहण्यासाठी २५ पैसे देत असे, चित्रपट पाहण्यासाठी ५० पैसे देत असे. तेव्हा तो जाहिरातीही कौतुकाने पाहात असे. पण हल्ली तो चित्रपट पाहतच नाही. कोणत्याही माध्यमावर, चित्रपट गृहात फक्त मराठी चित्रपट पाहतो ते ही तो चित्रपट खूपच वेगळा असेल तर… पूर्वी विजय इतका चित्रपट वेडा होता हे कोणाला खरंही वाटणार नाही. पण तेंव्हा विजय पुस्तक वेडा नव्हता. विजय पुस्तक वेडा तेंव्हा झाला जेंव्हा त्याला परिस्थितीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्याला ज्ञानाची भूक लागली असेही म्हणता येईल पण त्या भुकेने त्याला त्याच्या सामान्य आयुष्यापासून खूप दूर नेले कारण आज आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याचा त्याला साक्षात्कार झाला. सामान्य माणसे जे विचार वाचतात अथवा शिकतात ते विचार प्रत्यक्ष जीवनात अवलंबायला ते तयार नसतात. पण विजयच तसं नव्हतं तो जो विचार वाचतो आणि त्याला तो पटतो तो विचार तो प्रत्यक्ष जीवनात जगतो. विचार मग तो कोणीही मांडलेला का असेना त्याला आपल्या बुद्धीवर घसल्याखेरीज तो स्वीकारत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी त्याला अंधश्रद्धा आणि थोतांड वाटायच्या पण आता तो त्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या बुद्धीवर घासून पाहतोय…
— निलेश बामणे
Leave a Reply