आज विजयने एक कीर्तन ऐकले त्यातील किर्तनकारने एक गोष्ट सांगितली ती विजयला खूप आवडली साधारणतः गोष्ट अशी होती. एक गुरू आपल्या एका शिष्याला आपल्या सोबत यात्रेला येण्याची विनंती करतात. तर तो शिष्य म्हणतो. मी आलो असतो पण मी आलो तर माझ्या बायका मुलांचे आणि आई-वडिलांचे खूप आवडेल. त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. ते मला तुमच्यासोबत यात्रेला येण्याची परवानगी देणार नाहीत. त्यावर ते गुरू त्या शिष्याला म्हणाले,”या जगात कोणी कोणाचं नसतं! कोणाचे कोणावाचून काही आडत नाही. पण तो शिष्य ते मान्य करायला तयार नव्हता म्हणून गुरूंनी ग्लासभर दूध घेऊन त्यात एक औषधी पावडर टाकली. आणि त्याला म्हणाले,” हे दूध प्यायल्या नंतर तुझे शरीर मृत झाल्या समान होईल पण तू सर्वकाही पाहू ऐकू शकशील. तो शिष्य ते दूध पिऊन घरी गेला तर त्याच्या बायकोने तिच्या खूप आवडता पदार्थ तयार केला होता. तो शिष्य त्याच्या बायको समोर जाताच कोसळला, बायकोने विचार केले आता हे गेले आता मला माझा आवडता पदार्थ खायला मिळणार नाही. मग तिने काय केले अगोदर तो पदार्थ पोटभर खाल्ला आणि मग त्याच्याजवळ येऊन रडायला सुरुवात केली.थोड्या वेळाने त्याचे आई वडील, मुलं, बहीण भाऊ सर्व गोळा झाले. सर्व गोळा झाल्यावर ते साधू तेथे आले. तर सर्व साधूंना पाहून सर्वांनी त्या शिष्याला जिवंत करण्याची विनंती केली त्यावर साधू म्हणाले ठीक आहे ! त्यांनी एक ग्लास दूध मागविले आणि त्या ग्लासात एक औषधी टाकून ते म्हणाले,” मी ह्याला जिवंत करेन पण त्यासाठी तुमच्या पैकी एकाला हे दूध पिऊन मरावे लागेल. प्रथम त्या शिष्याच्या पत्नीला विचारले तर ती म्हणाली,” मी प्यायले असते पण मुलांना एक वेळ बाप नसेल तरी चालतो पण आई लागतेच. मग त्याच्या म्हाताऱ्या आईला विचारले असता ती म्हणाली, ” मी प्यायले असते पण माझ्याशिवाय माझ्या म्हताऱ्याला जमणार नाही. म्हाताऱ्याला विचारले असता तो म्हणाला,” माझ्या शिवाय माझ्या म्हातारील जमणार नाही. सर्व नातेवाईकांनी अशीच उडवा उडवीची कारणे दिल्यावर साधू।म्हणाले,” ठीक आहे तुम्ही कोणीच पिणार नसाल तर मी पितो. असं म्हणताच सर्व खुश झाले आणि म्हणाले , ” हे उत्तम होईल तसेही तुमच्या मागेपुढे कोणी नाही आणि जगाला तुमचा उपयोगही नाही. साधू ते दूध प्यायले पण त्यांना काहीच झाले नाही. हा सर्व प्रकार ऐकणारा पाहणारा शिष्य उठून उभा राहिला आणि गुरूंच्या पाया पडत म्हणाला,” गुरुजी तुम्ही बरोबर म्हणाला होतात या जगात कोणीच कोणाचा नसतो, या जगात कोणावाचून कोणाचे काहीही आडत नाही.मी येतो तुमच्यासोबत यात्रेला.या गोष्टीतील शिष्याला जो अनुभव आला तसाच काहीसा अनुभव विजयला त्याच्या आयुष्यात येत होता.
विजयचा पाय ज्या दिवशी जास्त दुखायला लागला त्या दिवशी विजय त्याच्या वडिलांची चप्पल घालून एका ठिकाणी गेला होता तेथे तो ज्या कामासाठी गेला होता ते कामही झाले नाही. दुसऱ्याची चप्पल कधी पायात घालू नये.हे विजयला पक्के ठाऊक होते. पण नाईलाज को क्या इलाज ? म्हणून त्याने ती घातली आणि त्याचा पाय जास्त दुखायला लागला. त्या चपलात नकारात्मकता असावी कारण कामाच्या निमित्ताने विजयचे वडील खूप लोकांच्या घरी जातात. यापुढे दुसऱ्याची चप्पल वापरायची नाही हे विजयने मनाशी पक्के केले.
या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.त्याचे डोके सतत नाविण्याच्या शोधात असते.आज जर विजय पूर्वीसारखी चित्र काढत असता तर नक्कीच त्याने एखादे सुंदर चित्र काढले असते. हल्ली विजयला पूर्वीसारख्या कविता सुचत नाहीत कारण त्याच्या हृदयात आता पूर्वीसारखे प्रेम राहिलेले नाही. पूर्वी कशा उठता बसताना त्याला कविता सुचायच्या. अगदी तो कवितांचा पाऊस पाडायचा. पण हल्ली त्याच्या कवितांना खाद्य लागत. आता फार फार तर विजय वाईनवर एखादी कविता लिहू शकेल.विजयला वाटत होते की अनामिकेचे त्याच्या कवितांवर प्रेम आहे म्हणूनच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण अनामिका ही एकमेव मुलगी होती जी त्याला कळली नाही. कदाचित अनामिकाला वाटले होते की विजय आयुष्यात लौकिक अर्थाने श्रीमंत होईल पण तसे काही झाले नाही आणि तिला तिच्या आयुष्यात बऱ्याच भौतिक सुखांची अपेक्षा होती म्हणूनच कदाचित ती विजयच्या प्रेमाला भिक घालत नव्हती.विजयने लक्ष्मीसाठी त्याच्या बुद्धिचा वापर कधी केला नव्हता पण आता तो फक्त आणि फक्त लक्ष्मीसाठी त्याच्या बुद्धिचा वापर करणार होता. विजय पाय धरून त्याचाच तर विचार करतोय की पाय बरा झाल्यावर त्याला काय काय करायचे आहे आणि कोठून सुरुवात करायची आहे.
— निलेश बामणे.