दुसरी गोष्ट जी त्याच्या वर्गशिक्षकांनी सांगितली होती ती अशी होती…एका राज्यात मागील कित्येक वर्षे पाऊसच पडलेला नसतो. राज्यातील पाण्याच्या सर्व विहिरी, तलाव , नद्या कोरड्या झालेल्या असतात…त्या राज्यात पाण्याला सोन्याचं मूल्य आलेलं असतं…एक दिवस एक तपस्वी साधू त्या राज्यात येतो. त्याला खूप तहान लागलेली असते…खूप फिरल्यानंतरही त्याला कोठेच पाणी दिसत नाही…कित्येक घरासमोर जाऊन तो पाणी मागतो पण कोणीही त्याला पाणी देत नाही…त्या साधूला प्रश्न पडतो या राज्यात कोणी पाण्याचाही धर्म का करत नाही. साधूला प्रचंड राग येतो आणि तो एका माणसाला राजाचा राजवाडा कोठे आहे म्हणून विचारणा करतो. त्याने रस्ता दाखवल्यावर तो साधू राजवाड्यात जातो आणि राजाची भेट घेऊन त्याला विचारतो तुझ्या राज्यात कोणी साधा पाण्याचाही धर्म का करत नाही ? ते ऐकून राज्यावर डोळ्यात अश्रू येतात आणि तो सांगतो,” मागील कित्येक वर्षांपासून आमच्या राज्यात एक थेंबही पाऊस पडला नाही, त्यामुळे आमच्या राज्यातील सर्व विहिरी नद्या तलाव आठले…आता तुम्हीच या समस्येवर उपाय सांगा ! साधू आपल्या योग साधनेने भूतकाळात प्रवेश करून हे असं होण्याचे कारण जाणून घेतो… आणि राजाला म्हणतो…या राज्यात एक पापी माणूस आहे, तो जो पर्यत या राज्यात आहे तोपर्यत या राज्यात पाऊस पडणार नाही…त्यावर राजा म्हणतो,” कोण आहे तो पापी ? त्यावर साधू म्हणतो राजा ! तो पापी दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस…
ते ऐकल्यावर राजा म्हणाला,” मी असं कोणतं महापाप केले की माझ्या राज्यात पाऊस पडत नाही…तेंव्हा साधू राजाला सांगतो,” तुझ्या पूर्वी या राज्याचा जो राजा होता त्याची बायको गरोदर असताना एका साधूने राजाचे भविष्य कथन करताना राजाला सांगितले की तुझा मुलगा तुझा वध करेल. राणीची प्रसूती होताच राजाने सैनिकांना त्या मुलाला जंगलात नेऊन मारून टाकण्याचा आदेश दिला. आदेशानुसार सैनिक त्या मुलाला जंगलात घेऊन गेले पण त्यांची त्या मुलाला मारण्याची हिंमत झाली नाही. ते त्या मुलाला त्या जंगलात सोडून माघारी आले आणि राजाला खोटेच सांगितले की त्यांनी त्या मुलाला मारले…त्यानंतर राजा निश्चिनंत झाला… तिकडे त्या जंगलात शत्रू राज्याचा सेनापती शिकारीला आला असता त्याला तो मुलगा दिसला. त्या मुलाला तो आपल्या सोबत घेऊन गेला…आणि त्याच्याकडे तो मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला तो शस्त्रविद्येत पारंगत झाल्यावर सैन्याची जमवाजमव करून त्याने या राज्यावर हल्ला केला आणि त्या लढाईत त्याच्या हातून राजाचा वध झाला आणि हे राज्य जिंकल्यामुळे तो या राज्याचा राजा झाला…
त्या राजाची पत्नी दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे त्याने तिच्यासोबत विवाह केला आणि त्यानंतर त्यांना मुलंही झाली…राजा तुला लक्षात येतंय ना तो मुलगा तूच होतास. तू स्वतःच्या आईशी विवाह करून तिच्याशी संग करून अपत्ये जन्माला घातलीस… स्वतःच्या आईशी विवाह केल्यामुळे तू महापापाचा धनी ठरलास …हे सारे ऐकताना राज्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले…क्षणात त्याने सन्यास घेऊन राज्य त्यागण्याचा निर्णय घेतला आणि तो राज्या बाहेर जाताच राज्यात पाऊस पडायला सुरुवात झाली…राज्यातील विहिरी, नद्या आणि तलाव पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले…त्या राज्यातील प्रजा सुखी आणि समृद्ध झाली…
तिसरी कथा जी विजयच्या मित्राने सांगितली होती ती अशी होती त्या कथेचं गुरू – शिष्य असे ठेवू…एक राजा असतो…त्याच्या राज्यातील प्रजा सुखी असते, राज्यात सगळीकडे सुख आणि समृद्धी असते…राजाला आणि प्रजेला एकच दुःख असते ते म्हणजे राजाला मुलबाळ नसते…खूप उपासतापास आणि नवस बोलल्यावर शेवटी राजा राणीला एक मुलगा होतो… पण तो मुलगा मंदबुद्धी असतो राज्यातील सर्व प्रजा म्हणत असते राजाचा मुलगा बुद्धू आहे.. ते ऐकून ऐकून राजाच्या मुलाला एक दिवस भयंकर राग येतो. आणि तो बुद्धिमान होण्याचा विचार करून राजवाड्या बाहेर पडतो आणि एखाद्या विद्वान गुरूला शोधत तो चाललेला असतो. चालून चालून तो खूप थकतो. थकून तो एका झाडाखाली बसतो तर समोरच त्याला एक सात माळ्याची माडी दिसते.. ती पाहून तो खुश होतो…एका माणसाला तो तिकडे जाण्याचा मार्ग विचारतो तर लोक म्हणतात. लोक त्याला समजवतात ती त्या माडीत भूत आहे…त्याला काही त्यांचे बोलणे लक्षात येत नाही…
तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो…
पाया पडल्यावर साधू महाराज त्याची चौकशी करतात आणि विचारतात तू इकडे कसा आणि का आलास ? त्यावर राजकुमार सांगतो माझ्या राज्यात सर्व मला बुद्धू म्हणून चिडवतात मला खूप बुद्धिमान व्हायचे आहे…त्यावर साधू महाराज म्हणतात” मी तुला सर्व गोष्टीचे ज्ञान देऊन तुला बुद्धिमान करेन पण तुला सात वर्षे माझ्यासोबत राहावे लागेल, माझी सेवा करावी लागेल, या सात वर्षात तुला एकदाही या माडीबाहेर जाता येणार नाही तुला खरोखर विद्वान व्हायचे असेल तर हे करावेच लागेल, तुझी तयारी असेल तर थांब नाहीतर येथून निघून जा ! ते ऐकल्यावर राजकुमार म्हणाला,” मी विद्वान होण्यासाठी काहीही करायला तयार आहे… त्यावर साधू महाराज म्हणाले ठीक आहे ! आपण उद्यापासून शिकायला सुरुवात करूया. त्या दिवसापासून माडीची स्वच्छता, स्वयंपाक राजकुमार करू लागला आणि साधुमहाराजांकडून विद्यार्जन करू लागला…
तो वेगवेगळ्या विषयात पारंगत होऊ लागला. बघता बघता सात वर्षे पूर्ण होत आली. राजकुमार विद्वान पंडित झाला होता. एक दिवस स्वयंपाक करताना त्याच्या लक्षात आले की आपल्या स्वयंपाक घरातील तूप संपलेले आहे…पण इतक्या वर्षात त्याला न पडलेला प्रश्न ! त्याला पडलाच की मी आणि साधू महाराज गेल्या सात वर्षात एकदाही या माडीच्या बाहेर गेलो नाही मग हे साहित्य येते कोठून आणि कसे ? तो सातव्या मजल्यावर असलेल्या साधू महाराजांकडे गेला आणि त्याने सांगितले की आपल्याकडील तूप संपलेले आहे …त्यावर अचानक साधू महाराजांचा एक हात लांब होत होत तो खिडकीतून बाहेर गेला आणि पुन्हा लहान होत पूर्ववत झाला तर तेंव्हा त्यांच्या हातात तूप होते. ते पाहून राजकुमाराच्या लक्षात आले की इतके दिवस आपण ज्या साधु महाराज्यांसोबत रहात होतो ते शापित आहेत.
राजकुमार साधुमहाराजांना म्हणाला , आता माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी विद्वान झालो आहे आता मला माझ्या राज्यात परत जाण्याची परवानगी द्यावी…त्यावर साधुमहाराज म्हणाले,” आता तू येथून जाऊ शकत नाहीस या माडीच्या बाहेर जरी पाऊल ठेवलस तर तुझ्या डोक्यात विस्फोट होऊन तुझा क्षणात मृत्यू होईल…ते ऐकून राजकुमार खूप घाबरतो आणि साधू महाराजांना म्हणतो,” निदान मला एकदा माझ्या आई वडिलांना तर भेटून येउद्या…त्यावर साधूमहाराज म्हणतत, ” तू जर एक महिन्याच्या आत तुझ्या आईवडिलांना भेटून येथे माघारी येण्याचे वचन दिलेस तर मी तुला जाण्याची परवानगी देईन…राजकुमाराने त्यांची अट मान्य करून त्यांना वचन देतो आणि तो आपल्या राज्यात निघून जातो. राजकुमाराला पाहून राजा राणीला खूप आनंद होतो … राजकुमार परत आल्याची बातमी ऐकून राज्यात आनंद पसरतो …राजकुमाराने आपल्या विद्वतेने अनेक विद्वानांना वादविवाद स्पर्धेत हरवतो आणि आपली विद्ववत्ता सिद्ध करतो … सर्व जनतेला राजकुमाराच्या विद्वत्तेचे कौतुक वाटू लागते. राजा राणी खूप खुश असतात . राजकुमारासोबतचे त्यांचे दिवस आनंदात सरकत असतात …हा ! हा ! म्हणता एक महिना संपत येतो राजकुमार राजा राणीला म्हणतो आता मला माझ्या गुरूंकडे परत जावे लागेल तसे मी त्यांना वचन दिले आहे…राजा – राणी खूप दुःखी होतात पण शेवटी त्यांना राजकुमाराचा निरोप घ्यावाच लागतो . राजकुमाराला माघारी आलेलं पाहून साधू महाराज खूप खुश होतात …ते राजकुमाराला म्हणतात ,” एक दिवस मी ही तुझ्यासारखाच ज्ञानाच्या शोधात या माडीत आलो होतो आणि येथेच अडकून पडलो…या माडीत एक खूप विद्वान व्यक्ती राहत होती…एकदा त्या विद्वान व्यक्तीने एका साधूला अपमान केला त्या साधूने त्याला शाप दिला तू या माडीतच अडकून पडशील. ज्या दिवशी तुझ्याकडून तुझे सर्व ज्ञान एखादा तुझा शिष्य होऊन आत्मसात करेल .. तेव्हाच तुला मुक्ती मिळेल…त्यानंतर ही शापित परंपरा सुरू झाली…आता तू माझ्याकडून सर्व ज्ञान आत्मसात करून घेतलंस ! आता माझ्या ऐवजी तू येथे अडकून पडला आहेस तुझ्या शिष्याची वाट पाहण्यासाठी ! इतके बोलून ते गुरुमहाराज त्या शापातून मुक्त होऊन अदृश्य होतात … राजकुमार मात्र आजही त्या हवेलीत त्याच्या शिष्याची वाट पाहत आहे ….
— निलेश बामणे.
Leave a Reply