पण ज्यावेळी तिची आणि विजयची पहिल्यांदा फक्त नजरानजर झाली.त्या दिवसापासून विजयचे जीवन वाळवंट झाले. त्यापूर्वी असे कधीही झाले नव्हते की विजयच्या आयुष्यात त्याच्या आजूबाजूला त्याच्यावर प्रेम करणारी एकही स्त्री नव्हती. ती हुशार नव्हती . अतिशय रेखीव नव्हती, सुंदर होती पण विजयच्या आयुष्यात ज्या पूर्वी होत्या त्यांच्या इतकी सुंदर नव्हती. ती त्याच्या आयुष्यात येताच विजयच्या आयुष्यातून त्याच्यावर प्रेम करणारी एक एक स्त्री चमत्कारिक रित्या कमी झाली. आणि अचानक विजयच्या मनातही वैराग्याची भावना निर्माण होऊ लागली…विजयच्या त्या जगाला अपरिचित असलेल्या त्याच्या प्रेयसीला म्हणजे एकतर्फी प्रेमाला आपण अनामिका असे नाव देऊया…
आता लवकरच सारं जग एका नवीन वर्षात प्रवेश करणार आहे. नवीन वर्ष येणार म्हंटल की प्रत्येकाच्या मनात एक नवीन संकल्प आकार घेतोच ! विजयचा मागच्या काही वर्षातील संकल्प होता तसा तो बहुसंख्य पुरुषांचा संकल्प असतो. पोट कमी करण्याचा !
विजय वीस एक वर्षांचा होईपर्यत त्याला सुकड्या म्हणणारी लोक अस्तित्वात होती. पण त्यानंतर त्याच्या शरीराचा आकार वाढत गेला. चार वर्षांपूर्वी विजयने त्याच्या चुलत भावाच्या लग्नात एक महागडा शर्ट विकत घेतला होता. तो त्याने त्या लग्नात घातलाही पण तेव्हाच तो त्याला इतका घट्ट झाला की त्याचे वाढलेले पोट स्पष्ट दिसत होते. त्यांनतर तो शर्ट घालण्याची त्याला हिंमत झाली नाही. पोटं कमी करण्याचे संकल्प झाले पण पोट काही कमी झाले नाही. त्यात कोरोना आला आणि घरी बसून प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या नादात त्याच्या पोटाचा घेर अधिकच वाढला आणि एक दिवस त्याचा व्हायचा तो त्रास झाला. कोलेस्ट्रॉल वाढलं ! डॉक्टरने रोज एक तास चालायला सांगितले…
त्याप्रमाणे सकाळी चालायला सुरुवात झाली. विजयला प्रचंड राग येतो तो कुत्र्यांना पाळणाऱ्यांचा आणि त्याहून राग येतो तो त्यांना सोन्या बाबू आणि बावा म्हणणाऱ्यांचा !
सकाळी चालताना त्या कुत्र्यांसोबत चालणाऱ्या त्या सुंदर म्हणजे रेखीव तरुणींना पाहून त्याचे डोळे तृप्त होत होते पण त्याच्यासोबत चालणारे कुत्रे जेंव्हा टांग वृर करून रस्त्यावर घाण करायचे ते पाहून त्या उत्साहावर पातेर फिरायचं ! पण सायकल चालवणाऱ्या तरुणी पहिल्या की पुन्हा उत्साह वाटायचा…मग त्याच्याही मनात विचार यायचा आपल्यालाही एक सायकल घ्यायला हवी ! हा विचार मनात येताच त्याला आठवण येते ती त्याने त्याच्या लहानपणी सायकल चालवायला शिकण्यासाठी काय काय उद्योग केले होते याची .
साधारणतः विजय वयाच्या बाराव्या वर्षीच सायकल चालवायला शिकला होता. तेंव्हा सायकल विकत वैगरे घेण्याची ताकद त्याच्या कुटुंबात नव्हती. तेव्हा एक रुपया भाड्याने एक तास सायकल चालवायला मिळत असे. नवीन नवीन सायकल चालवायला शिकला तेव्हा हा सायकल चालविण्याचा कार्यक्रम दुपारी भर उन्हात चालत असे…एकदा एका पेरुवाल्याचा गाडीला सायकलने ठोकले म्हणून वाचला नाहीतर ! रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या नाल्यात पडून हातपाय मोडून घेण्याचा प्रसंग ओढावला असता. त्यानंतर सायकल चालविणे कमी झाले. कधी हुक्की आलीच तर काही वर्षांनी मित्रांची सायकल घेऊन एखादा राउंड व्हायचा ! पण ते फार काळ चाललं नाही ! आता तर कोणाला विजयला सायकल चालवता येते हे ही माहीत नाही. अगदी तसच जसं की विजयला पत्ते खेळता येतात, गोट्या खेळता येतात, पतंग उडवता येते, भवरा हातावर झेलता येतो, छान छान चित्रे काढता येतात…
तर एक महिना नित्यनियमाने धावल्यानंतर विजयच वजन थोडं कमी झालं . पण काही महिन्यांपूर्वी विजयने अचानक वजन नियंत्रणात आणायचं मनावर घेतले म्हणजे त्याने गोड खाणे बंद केले, बाहेरचे खाणे बंद केले, रात्रीचे जेवण थोडे कमी केले आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याच वजन पाच किलोने कमी झाले. आणि आता काही दिवसांपूर्वीच त्याने तो शर्ट अंगावर चढवला आणि तो त्याला ढिल्ला झाला. नवीन वर्ष येण्यापूर्वीच संकल्प न करता त्याचा संकल्प एकदाचा पूर्ण झाला….
ती व्यतिपात योगाच्या शांतीची पूजा केली होती त्याचा परिणाम खरोखरच काही झाला की नाही हे विजयला आता तपासून पहायचे होते. कारण त्या पूजेला होऊन आता तीन महिने पूर्ण झाले होते आणि विजयने नित्य नियमाने अंगाराही लावला होता. त्या पूजेत शेवटी विजयने मागणी मागताना अनामिका त्याच्या आयुष्यात यावी हेच मागणं मागितलं होतं.
विजयच्या जन्म कुंडलीत सध्या शुक्राची अंतर्दशा सुरू होती आणि त्या फळस्वरूप आता त्याच्या आयुष्यात स्त्रिया अचानक पुन्हा डोकावू लागल्या होत्या. पण प्रत्येक वेळी पाऊल पुढे टाकताना का कोणास जाणे त्याच्या डोळ्यासमोर सारखी अनामिका येत होती. बऱ्याच वर्षांपासून तो एका सन्याशाच जीवन जगत होता पण आता तो पुन्हा नव्याने उत्साही झाला होता. कदाचित हा त्या पूजेचा परिणाम तर नसावा ? इतकेच नव्हे तर तरुणी पुन्हा त्याच्याकडे वळून वळून पाहू लागल्या होत्या.
आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती ! विजय सातवीच्या वर्गात असतानाच त्याचे केस बऱ्यापैकी पिकले होते आणि त्यामुळे वर्गातील मुले त्याला म्हातारा म्हणून चिडवत त्यामुळे तेव्हापासून तो केस काळे करत आला आहे. त्याचे केस पांढरे असताना त्यांच्या वयाची मूर्ख माणसेही त्याला काका म्हणतात कारण आपल्या देशात कोणाच्याही वयाचे अनुमान त्याच्या केसाच्या रंगावरून काढला जातो. त्यातील कित्येक लोक तर तो केस काळे करू चांगला नटून समोर आला की कधी – कधी त्याला अनोळख्या ठिकाणी ओळ्खतही नाहीत . खरं तर विजयला त्याचे केस पांढरे झाले आहेत याने काहीच फरक पडत नाही पण लोकांसाठी त्याला केस काळे करावे लागतात.
— निलेश बामणे.
Leave a Reply