चौथी कथा जी विजयच्या आईने सांगितली होती ती अशी…त्या कथेला आपण एका तळ्यात असे नाव देऊया.. फार फार वर्षांपूर्वी एक राजा असतो त्याला दोन राण्या असतात एक असते आवडती आणि दुसरी असते नावडती…राजाला मुलबाळ नसते…दैवी योगाने नावडती राणी गरोदर राहते…नावडती राणी गरोदर राहिल्यामुळे आवडत्या राणीला तिच्या भविष्याची चिंता सतावू लागते…त्यामुळे आवडती राणी नावडत्या राणीची प्रसूती होताच तिला झालेल्या जुळ्या मुलांना जन्मताच जंगलात नेऊन टाकते आणि त्या मुलांच्या जागी मांजराची पिल्ले ठेवते…राणीला शुद्ध आल्यावर पाहते तर तिच्या शेजारी मांजराची पिल्ले असतात…आपल्या राणीने मांजराच्या पिल्लांना जन्म दिला म्हणून राजा नावडत्या राणीला राजवाड्यातून हाकलून देतो…मग राणी ह्याच्या त्याच्या दारात हात पसरून कसातरी आपला उदरनिर्वाह करु लागते…तिकडे त्या मुलांना एक साधू आपल्या कुटीत घेऊन जातो…आणि त्याला जे काही भिक्षेत मिळेल त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो…मुलं थोडी मोठी झाल्यावर ते ही भिक्षा मागायला सुरुवात करतात…एक दिवस ते भिक्षा मागत राजवाड्यात जातात…आवडती राणी त्यांना भिक्षा देते आणि त्यांची विचारपूस करते…त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून तिला कळते की ही आपल्या राजाचीच मुले असणार .. आता तिच्या डोक्यात सैतानी विचार सुरू होतात…ती त्या मुलांना दुसऱ्या दिवशीही भिक्षा घ्यायला बोलावते…त्याप्रमाणे त्यांना ती भिक्षेत लाडू देते पण ते लाडू विषाचे असतात…मुलं लाडू घेऊन कुटीत जातात आणि साधुसह ते आनंदाने खातात पण थोड्यावेळातच त्या लाडूतील विषामुळे त्यांचा मृत्यू होतो…त्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणी काही वर्षात एक तळं निर्माण होत आणि त्या तळ्याचा शेजारी सूंदर फुले उगवतात…एक दिवस राजा त्याच्या सैनिक आणि सेनापतीसह त्याच जंगलात शिकारीला जातो…शिकारीच्या मागे धावून राजा खूप थकतो…त्याला खूप तहान लागते पण जवळ पाणी नसते…राजा सैनिकांना पाणी आणण्याचा आदेश देतो…सैनिक आजूबाजूला पाहतात तर कोठेच पाणी दिसत नाही. शेवटी पाणी शोधता – शोधता ते त्या तळ्याजवळ पोहचतात.. सैनिक पाण्यात लोटा बुडवणार इतक्यात तळ्यातून आवाज येतो…जन्म दिलेल्या बापाचे सैनिक आले आहेत पाणी घ्यायला त्यांना पाणी देऊ का ? तर तळ्यातून आवाज येतो नको ! नंतर ते सैनिक फुलं खुंटण्यास जातात…तर पुन्हा तळ्यातून आवाज येतो. जन्म दिलेल्या बापाचे सैनिक फुलं घ्यायला आले आहेत त्यांना फुलं घ्यायला देऊ का ? तर तळ्यातून पुन्हा आवाज येतो नको ! हे पाहून सैनिक माघारी जातात आणि झाला प्रकार राजाला सांगतात….मग राजा सेनापतीला सांगतो तू जाऊन बघ…सेनापती तळ्यात लोटा बुडवणार इतक्यात तळ्यातून आवाज येतो… जन्म दिलेल्या बापाचा सेनापती आला आहे त्याला पाणी घेऊन देऊ का ? तल्यातून आवाज येतो नको ! मग सेनापती फुल घ्यायला जातो तर आवाज येतो जन्म दिलेल्या बापाचा सेनापती आला आहे .. त्याला फुल घेऊन देऊ का ? तर तल्यातून आवाज येतो नको ! सेनापती झाला प्रकार राजाला जाऊन सांगतो मग स्वतः राजा येतो…आणि तळ्यात लोटा बुडवणार इतक्यात आवाज येतो…जन्म दिलेला बाप पाणी घ्यायला आला आहे त्याला पाणी घेऊन देऊ का ? तर तळ्यातून आवाज येतो नको ! मग राजा फुल घ्यायला जातो इतक्यात तल्यातून आवाज येतो…जन्म दिलेल्या बापाला फुलं घेऊन देऊ का ? तर तल्यातून आवाज येतो नको ! मग ती आवडती राणी येते…. ती तळ्याच्या पाण्यात लोटा बुडवणार इतक्यात आवाज येतो…विषाचे लाडू देणारी आई आली आहे तिला पाणी घेऊन देऊ का ? तळ्यातून आवाज येतो नको ? मग ती फुल घ्यायला जाते तेंव्हा पुन्हा आवाज येतो विषाचे लाडू देणारी आई आली आहे तिला फुलं घ्यायला देऊ का ? पुन्हा तळ्यातून आवाज येतो नको ! मग राजा सैनिकांना नावडत्या राणीला शोधून आणण्याचा आदेश देतो … सैनिक नावडत्या राणीला शोधून घेऊन येतात…राणी तळ्याच्या पाण्यात लोटा बुडवणार इतक्यात आवाज येतो…जन्म दिलेली आई पाणी घ्यायला आली आहे तिला पाणी घेऊन देऊ का ? तर तळ्यातून आवाज येतो दे ! राणी तळ्यातून लोटा भरून पाणी काढते आणि फुलं घ्यायला जाते तर तळ्यातून पुन्हा आवाज येतो…जन्म दिलेल्या आईला फुलं घेऊन देऊ का ? पुन्हा तळ्यातून आवाज येतो दे ! राणी फुले खुंटताच तेथील फुले आणि तळे अदृश्य होते आणि तेथे तो साधू आणि मुले प्रकट होताच आकाशवाणी होते…राजा ही दोन तुझीच मुले आहे ते जन्मताच तुझ्या आवडत्या राणीने त्यांना जंगलात टाकले आणि ते भिक्षा मागत राजवाड्यात आल्यावर तिने त्यांना ओळखले आणि तिने त्यांना खायला विषाचे लाडू दिले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला…आणि येथे हे तळे आणि फुलं निर्माण झाली…पण ईश्वरी कृपेने ते आता पुन्हा जिवंत झाले आहेत. हे ऐकल्यावर राजाला भयंकर राग येतो आणि तो आवडत्या राणीला राज्यातून हाकलून देतो. पुढे आपल्या नावडत्या राणी आणि मुलांसह सुखाने राज्य करू लागतो.
ह्या सगळ्या कथा राजा – राणीच्या काल्पनिक कथा होत्या. तसा या कथांमधून बोध फक्त एकच घेता येतो…प्रत्येक कथेतून काहीतरी शिकता येते…विजयनेही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला…विजयने लिहिलेली पहिलीच कथा समाजमनावर भाष्य करणारी होती..ती कथा एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती…त्या नंतर त्याने पहिली प्रेम कथा लिहिली…तो बसमधून प्रवास करताना एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला होता… तसही कोणी विद्रुप मुलीच्या प्रेमात पडत नाही…ह्या बसच्या प्रवासात त्याला भेटलेल्या, त्याच्या प्रेमात पडलेल्या आणि तो ज्यांच्या प्रेमात पडला होता अशा इतक्या होत्या की आता विजयला त्या आठवायच्या म्हटल्या तरी एक दिवस अपुरा पडेल… सुरुवातीच्या दहा एक कथा तर त्याने बस आणि बस स्टॉप वरच लिहिल्या होत्या. त्याच्या सुरुवातीच्या प्रेम कथा कोणीही वाचल्यावर प्रेमात पडावं अशाच होत्या…त्याच्या प्रेमकथा वाचून आजही त्याला कित्येक तरुणी कथा आवडल्याचा फोन करतात तेव्हां त्याचा आंनद गगनात मावेनासा होतो … विजयच्या प्रत्येक कथेची नायिका प्रणाली होती…म्हणजे त्याच्या प्रत्येक कथेतील नायिकेचे नाव प्रणाली होते… एकदा तर एका डेंटिस्ट ने विजयला फोन केला आणि तीच नाव प्रणाली असल्याचे सांगताच विजयला खूप हसू आलं ! त्यामुळे ती तरुणी जवळ – जवळ त्याच्यावर चिडलीच…तिने विजयला सतत विचारला जाणारा प्रश्न विचारला की प्रणाली खरोखर तुमच्या आयुष्यात होती का ? त्यावर विजयने दिलेलं उत्तर खोटं होतं तो म्हणाला, प्रणाली हे काल्पनिक पात्र आहे…पण प्रत्यक्षात विजयच्या कथेतील प्रत्येक नायिका वास्तवात होती….फक्त ती प्रणाली नव्ह्ती…विजयच्या कथा आवडतात सांगणाऱ्या बऱ्याच मुलींचे फोन त्याला यायचे ! पण त्यांना तो मोठ्या लेखकासारखाच प्रतिसाद द्यायचा कारण आता तो पूर्वीचा विजय राहिला नव्हता जो मुलींचा फक्त गोड आवाज ऐकूण त्यांच्या प्रेमात पडायचा…विजयची एक खासियत होती त्याने एकदा ऐकलेला फोन वरील आवाज पुन्हा कधीही ओळखतो…आता विजय प्रेमकथा लिहीत नाही… म्हणजे तश्या प्रेमकथा लिहिणे त्याला आता जमत नाही कारण आता तो कोणाच्याही नव्याने प्रेमात पडत नाही…जी स्त्री विजयशी मनमोकळ्या गप्पा मारते ती त्याच्या प्रेमात पडतेच…त्याच कारण हे आहे की विजयशी बोलल्यावरच लोकांना कळतं की तो किती पाण्यात आहे…त्याच्याशी बोलल्यावर भले भले त्याच्यासमोर मान तुकवतात. विजय असा व्यक्ती आहे जो कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्ती सोबत निदान तासभर गप्पा मारू शकतो…पण विजय सामान्य माणसांसमोर आपली हुषारी कधीच दाखवत नाही… विजयला फक्त आपल्या तुल्यबळ व्यक्तींशी चर्चा करायला आवडते…विजय कोणालाही न मागता सल्ला देत नाही… आता विजय वास्तवादी कथा लिहितो…कथेतील प्रेम आणि वास्तवातील प्रेम यात आता खूप अंतर निर्माण झाले आहे.. पूर्वी विजय जसा एखादीच्या प्रेमात पडायचा तसं आता कोणी प्रेमात पडत नाही…विजयच्या प्रेमात शारीरिक आकर्षण होतं… पण प्रेमाची भूक नव्हती…
— निलेश बामणे.
Leave a Reply