नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ३१ )

आज जगात राजकारणी, विचारवंत, अभ्यासक, बुवा, बाबा, बापू आणि महाराज त्यासोबत लेखक कवी आणि पत्रकार. विचार तर खूप मांडतात पण प्रत्यक्ष जीवनात तेच त्याच्या विचारांची होळी करताना दिसतात. त्याला हातावर मोजण्याइतके अपवाद असतात. पण जे अपवाद असतात त्यांच्याच वाट्याला खडतर आयुष्य येते. लहानपणापासून शाळेच्या फळ्यावर रोज लिहिला जाणार सुविचार “नेहमी खरें बोलावे!” तो सुविचार वर्षानुवर्षे लिहिणारे शिक्षक तरी नेहमी खरे बोलतात का? हा प्रश्न विजयला नेहमी पडायचा. त्यामुळेच विजयने ठरवले होते तो जे – जे विचार कवितेतून, कथेतून अथवा लेखातून मांडेल  त्या विचारांचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनात फक्त अनुकरण करेल नव्हे  तर त्याने मांडलेले विचार तो जगताना दिसेल. विजयचा लग्न कार्यात केल्या जाणाऱ्या खर्चाला, खासकरून कर्ज काढून केल्या जाणाऱ्या! विरोध होता. विजयच असं म्हणणं होतं की जर धार्मिक पद्धतीने विवाह करून लग्नाचं प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जर कोर्टाचीच पायरी चढावी लागते मग सरकार कोर्ट मॅरेज कायदाने सक्तीचं का करत नाही? विजयला हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांचाही प्रचंड राग आहे. पण तो राग त्याच्या मनात वर्तमानपत्रातील बातम्या वाचून निर्माण झालेला आहे. विजयचा जन्म कोकणात झालेला असल्यामुळे कोकणातील लोक हुंड्यापासून चार हात लांबच राहतात आणि लग्नाचा खर्च ही मुला मुलीकडचे निम्मा निम्मा करतात. तशीही विजयच्या वाचनात असे आले होते की पूर्वीच्या काळी कोकणात मुलाच्या नातेवाईकांना मुलीच्या घरच्यांना काही तरी म्हणजे, बैल वगैरे द्यावा लागत असे. स्त्री भ्रूण हत्या त्याचेही तसेच होते. कोकणातल्या लोकांचा मुलापेक्षा मुलीवर फार प्रेम. हे कोकणात साजरे होणारे सण – उत्सव पाहिल्यावर लक्षात येते. कोकणात आजही गावातील कित्येक महत्वाच्या कार्यक्रमांना माहेरवाशीणींना आमंत्रण दिले जाते. कोकणातील शेतकरी आत्महत्या करताना दिसत नाहीत. कारण ते साधे भोळे तर आहेत. पण ते थोडक्यात समाधानी आहेत. याचं आणखी एक महत्वाच कारण आहे निसर्ग देवता त्यांच्यावर सदैव प्रसन्न असते. कोकणातील लोक देवभोळे आहेत आजही कोकणात नारळ – कोंबडे न चुकता दिली जातात, पण परंपरा म्हणून. जमिनीवरून खून मारामाऱ्या तेथे होत नाहीत. पण आता कोकणात शहरीकरण वाढू लागल्यामुळे ते भविष्यात तसेच राहील असे सांगता येत नाही कारण.. मूळचे कोकणातील नसलेले आर्थिक नफ्यासाठी आता कोकणात हातपाय पसरू लागले आहेत. अगदी युपी बिहारचे भैयेही तेथे जमिनी विकत घेऊन आपले हातपाय पसरू लागले आहेत आणि कोकणातील लोक आपल्या जमिनी विकून मुंबईत खुराडे विकत घेत आहेत.हे दुर्दैवी आहे असे विजयला सतत वाटत असते. कोकणात जाऊन उद्योग करावा हे विजयच फार पूर्वीपासूनच स्वप्न आहे. पण नशिबाने त्याला म्हणावी तशी साथ न दिल्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले नाही. विजयने प्रत्यक्षात शेती कशी करतात ते पहिले नव्हते पण गेल्या वर्षी त्याला तो योग आलाच त्याने कोकणातील धो – धो कोसळणारा पाऊस धो- धो वाहणाऱ्या  नद्या, ओढे आणि हिरव्यागार शेतात काम करणारे शेतकरी सारे डोळे भरून पाहिले. कोकणातील नैसर्गिक साधन संपत्ती विजयला नेहमीच आकर्षित करते. त्यामुळे कोकणच्या शहरिकरणाला त्याचा विरोध आहे पण सुख सुविधांना नाही. कोकणातील निसर्गच कोकणासाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत ठरू शकतो असे असतानाही! दुर्दैवाने त्याकडे द्यायला हवं होतं तितकं लक्ष दिलं गेलेलं नाही. कोकणात आजही प्रचंड हिरवळ आहे.. कोकणातील प्रत्येक गावात काहींना काही पाहण्यासारखे आहेच काहीच नाही तर प्रत्येक गावातील मंदिर पाहण्यासारखे असतेच. विजयचा जन्म कोकणात झाला पण लहानाचा मोठा तो मुंबईतच झाला. पूर्वी गावावरून मुंबईला येणाऱ्या भेटी विजयला आजही आठवतात. पण आजही कोकणातून मुंबईला भेटी येतात. विजयला कोकणातील करवंदे खायला खूप आवडतात ती ही हिरवी.. त्याची चटणीही खूप आवडते.आंब्या फणसाचे साठ, सुकलेले करवंद, बोरे आवळे चिंच  खायला खूप आवडतात. आता विजयला कोकणात जाण्याचे वेध लागलेले आहेत. लवकरच विजय होळीला कोकणात जाणार आहे. कोकणातील होळी म्हणजे मौज, मजा आणि मस्ती सोबत परमानंद असतो. विजयचा पाय अजूनही पुरेसा बरा झालेला नाही अति पौष्टिक अन्न खाल्ल्यानेही माणूस आजारी पडू शकतो हे विजयला नव्याने कळले. आणि आता विजय कांदा भाकरी खाऊ लागला. विजयला पूर्वीचे ते दिवस आठवले जेंव्हा विजय चवळीच्या शेंगेसारखा सडपातळ आणि चंचल होता. उत्साही होता. कांदा भाकर खाऊनही तेंव्हा त्यांना तीच खायला परवडायची! तेंव्हा नाईलाज म्हणून खाल्लेली कांदा भाकर विजय कालही चवीने खात होता आणि आजही खात होता कारण परिस्थिती बदलली तरी विजयचे पाय जमिनीवरच आहेत. पण विजय हल्ली काहीसा आळशी झाला आहे. आरामदायी जीवन जगत आहे. पायपीट फारशी करत नाही, अंग मेहनतीची कामे करत नाही.त्यामुळे त्याचे वजन वाढून नवनवीन आजार त्याला भेडसावत आहेत.त्यावर सध्यातरी त्याला एकच उत्तम उपाय दिसत आहे तो म्हणजे नियमित व्यायाम करणे. त्याला आता काही पर्याय दिसत नाही. आता विजयला वाटतंय पूर्वी मला लोक सुकड्या म्हणायचे तेच उत्तम होते. आता पोटल्या म्हणाले नाही म्हणजे मिळवली! विजय सुकड्या होता तेव्हा नियमित व्यायाम करायचा. पण हल्ली गरज असताना त्याला ते करणे जमत नव्हते. पूर्वी विजयचे अंग किती लवचिक होते आणि आता सर्व सांधे आकडले आहेत इतके की त्याला अजून नीट चालायलाही होत नाही. एक वेळ होती विजय वेगात धावत असे. त्याला ते धावणे आठवते आणि दहा – दहा फुटवरून खड्ड्यात उड्या मारणे आठवते. खरंच आयुष्यात कोणत्याही गोष्टीत सातत्य असणे खूप गरजेचे असते हे विजयला नव्याने कळले होते. पूर्वी विजयला शंभर रस्सी उड्या आणि बैठका सहज मारत असे आणि आज एक बैठक मारताना त्याला त्रास होत आहे. त्या कामाच्या नादात विजयने शरीराची वाट लावून घेतली होती. त्या कामामुळे याच्या हातात तेथे काटोराच आला होता. म्हणूनच विजयने ते काम कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला त्याची तब्बेत सर्वात महत्वाची वाटत होती आणि ती प्रत्येकालाच वाटायला हवी! कारण सर सलामत तो पगडी पचास! विशिष्ट वयानंतर तब्बेत सांभाळणं खूपच महत्वाचं ठरत असतं. हे विजयला आता पटलं होतं .

हल्ली विजय अस्वस्थ होता ते वेगळ्याच कारणामुळे. ज्या कारणामुळे संपूर्ण जग अस्वस्थ आहे ते म्हणजे युक्रेन – रशिया युद्ध! विजय जेंव्हा गोव्याला गेला होता तेंव्हा गोव्याच्या एका  बिचवर एका युक्रेनच्या तरुणीसोबत त्याने फोटो काढला होता. तिला इंग्रजी भाषाही येत नव्हती. ती तरुणी दिसायला खूपच सुंदर होती. किती सहजतेने तिने  बिकिनीत असतानाही विजय सोबत छान  अगदी जवळ  उभं  राहून फोटो काढला होता. आता त्या गोष्टीला सात – आठ वर्षे झाली असतील तरी विजयला आजही तिचा चेहरा आठवतो. युक्रेनच्या तरुणी खरोखरच खूप सुंदर असतात. तिच्या मैत्रिणीनेही विजयचा तिच्या सोबत फोटो काढला होता. कोणा तरुणीसोबत काढलेला तो विजयचा पहिलाच फोटो होता. पण हल्ली बरीच शोधाशोध करूनही त्याला तो फोटो सापडला नाही. विजयने गोव्यावर लिहिलेल्या एका लेखात तो फोटो प्रकाशित केला होता. पूर्वीच्याकाळी समोरासमोरच्या युद्धात लोक तलवारीने एकमेकांची मुंडकी उडवत होते, ही कल्पनाही त्याला करवत नाही. पूर्वी म्हणजे विजयच्या लहानपणी विजयाचे बाबा जेंव्हा कोंबडी कापायचे ते ही त्याला पाहवत नसे.. तेंव्हापासूनच त्याची मांसाहारावरची वासना खऱ्या अर्थाने उडाली होती आणि आयुष्याच्या एका वळणावर तो शुद्ध शाकाहारी झाला होता. एक माणूस म्हणून कोणत्याही परिस्थितीत युद्धाचे समर्थन करणे योग्य होणार नाही. कारण अजूनतरी कोणत्याही युद्धाने काहीही साध्य झाले नाही. या जगातून जाताना कोणीही काहीही घेऊन जात नाही.  हे सत्य जगजेत्या सिकंदारालाही उमगले पण आयुष्याच्या शेवटच्या काळात. युद्धाचे समर्थन करणे सोप्पे असते पण प्रत्यक्ष युद्धात होरपळणे वेगळे असते. रशियाच्या हल्ल्यात  युक्रेनची जी नासधूस झाली आहे ती भरून निघायला किती वर्षे लागतील? एखादा प्राणी दुसऱ्या हिंस्त्र प्राण्याला घाबरतो हे ठिक आहे पण एक माणूस दुसऱ्या माणसाला मारून काय मिळते? युद्ध म्हंटल की माणसे मरणारच. सामान्य जनताही मारली जाणार. त्यामुळे हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित होते पण सध्याचे चित्र पाहता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंगावताना दिसत आहे. या युद्धात भारताची भूमिका संयमाची आहे हे उत्तम. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी शिकायला गेले होते तो आकडा काही  हजारांचा आहे. त्यातील एक विद्यार्थी म्हणे त्याच्या कुत्र्याला घेतल्या खेरीज युक्रेनमधून बाहेर पडणार नाही म्हणतोय. विजयला खरं तर या संदर्भातील बातमी वाचून हसू कमी राग जास्त आला होता. मुळातच विजयला कुत्रा! हा प्राणी फार आवडत नाही आणि त्यांना गोंजारणारे तर अजिबातच आवडत नाहीत. तेथे युक्रेनचे लाखो नागरिक निर्वासित झालेत आणि ह्याला कुत्र्याची पडलेली आहे. मुळात इतक्या संख्येने भारतीय विद्यार्थ्याना परदेशात शिकायला जाण्याची गरजच का पडावी. आता त्यांच्या जीविताची समस्या निर्माण झाली ना? त्यांना तेथे मारझोड झाल्याच्याही बातम्या येत  आहेत. रशिया आपला मित्र राष्ट्र आहे म्हणून ठिक!  नसता तर? कल्पनाही करवत नाही. रशिया युक्रेनला  जिंकेलही पण तो युक्रेनला पुन्हा उभं करू शकेल? तर नाही. युक्रेनची भूमिका माघार न घेण्याची राहिली तर जगाला तिसऱ्या महायुद्धाला समोर जावं लागेल. त्या बाबतच्या  बऱ्याच भविष्यवाण्याही वर्तवल्या गेल्या आहेत. त्यात जगातील एका मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याची शक्यताही काही ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. थोडक्यात जर रशियाने संयमाने नाही घेतले तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या भस्मासुराच्या मुखात अलगद जाणार हे निश्चित. जगाचा इतिहास पाहता युद्धाने काहीही साध्य होत नसताना युद्धे का लढली जातात हे एक कोडेच आहे. हे युद्ध भविष्यातील आपल्या काही गरजा आणि त्याचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन लढले जात आहे हे सत्य असले तरी युद्ध लढल्यामुळे होणारे नुकसान त्याचा विचार नको का करायला? काही अतिशहाने भारताला पाकव्याप्त काश्मीरवर या निमित्ताने हल्ला करण्याचे फुकटचे सल्ले देत आहेत.. शांतीचा मार्ग अवलंबल्यास सर्वांना सुखाने जगता येते. मानवी युद्धात कोणीही जिंकत नाही पण हरते ती मानवता. मानवाने मानवाला मारण्यासाठी केलेला अट्टहास तो कशासाठी अशा गोष्टी मिळविण्यासाठी ज्याचा मालक तो कधीच नव्हता. निसर्गाने मनात आणले तर एका क्षणात ही संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते.. त्याची एक चुणूक म्हणजे कोरोना आहे.कोरोनासारख्या संकटातूनही जग अजून सावरले नसताना हे तिसऱ्या महायुद्धाचे संकट जगावर घोंगावयाला लागले आहे. विजयने त्याच्या आयुष्यात कधी कोणाशी दोन हात केले नव्हते. तो निर्बल होता म्हणून नाही तर जे विषय फक्त चर्चेने सोडविले जाऊ शकतात ते हाणामारीने सोडविण्याचा प्रयत्नच का करावा या मताचा विजय होता. पण विजयला कोणावरीलही अन्याय मात्र सहन होत नाही. त्यामुळेच विजय प्रचंड रागीट असतानाही लोकांसमोर त्याची प्रतिमा शांत,संयमी आणि सरळ मार्गी अशीच आहे.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..