विजयला प्रवासात कोणत्याही वाहनात प्रवास संपेपर्यंत झोप येत नाही. यावेळी डुलकी येत होती कारण त्याने उलटी न होण्याची गोळी अगोदरच घेतली होती. विजय प्रवासादरम्यान शक्यतो काही खात नाही पण यावेळी मात्र प्रचंड भूक लागल्यामुळे त्याने चहा बिस्कीट खाल्ला. विजयला व्यक्तीश: रात्रीचा प्रवास आवडत नाही कारण रात्रीच्या प्रवासात बाहेरचे नजरे पाहायला मिळत नाही. विजयला कोकणातील निसर्ग पाहायला खूप आवडतो. विजय कोकणातील निसर्गाच्या प्रेमात पडतो पण मनात असूनही त्याचा पाय कोकणात फार दिवस टिकत नाही कारण एक जगण्याचा वेग! मुंबईतील जगण्याचा प्रचंड वेग देशात दुसरीकडे कोठेही जाणवत नाही. कोकणातील दिवस अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असतो. म्हणजे एका दिवसात बरच काही केलं असं वाटून जात.
विजय त्याच्या कोकणातील गावी शिमगोत्सवातील होमाच्या आदल्या दिवशी सकाळी पोहचला. म्हणजे त्या दिवशी कोकणात दहावी होळी जळणार होती. कोकणातील शिमगोत्सव फाकपंचमीला सुरु होतो म्हणजे फाकपंचीमीपासून छोट्या होळ्या पेटवायला सुरुवात होते त्या दहा होळ्या पेटवल्या जातात आणि अकराव्या दिवशी मोठा होम असतो. हा होमही प्रत्येक वाडीचा वेगळा आणि गावाचा वेगळा असतो. प्रत्येक मोठ्या होमाच्या बाजूला एक छोटा होमही असतो. त्यामुळे तो पहिला दिवस गावच्या घराच्या साफसफाईत आणि सामानाची आवराआवर करण्यात गेला. गावाला एक गोष्ट छान असते ती म्हणजे अंगण जे मुंबईत हद्दपार झालेले आहे. अंगणात खुर्ची टाकून आरामात पाय पसरून बसायचं आणि गरमागरम चहा ढोसायची मजा काही औरच असते. ती मजा मुंबईत अनुभवता येत नाही. मग अंगणात बसलेलो असताना कोणी गावातील आलं कि चहा पिता पिता गप्पा रंगतात. मुंबईत राहूनही कधी एकमेकांना न भेटणार सारे कोकणात होळीला हमखास भेटतात आणि वर्षभराच्या गप्पा एकदम रंगतात त्या गप्पा ऐकतानाही खूप आनंद मिळतो. दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता वाडीची होळी पेटविण्यात आली त्या होळीच्या भोवती एक पारंपरिक गाणं म्हणत लोक पाच प्रदक्षिणा घालतात. या वेळी विजयचा पाय दुखत असल्यामुळे विजयने इच्छा असूनही विजयने त्या प्रदक्षिणा घालणे टाळले. विजयचा पाय जरी दुखत असला तरी गावाचा होमाला जाणे टाळणे शक्य नव्हते. त्यामळे विजय त्याच्या काकांच्या मुलाच्या गाडीने होमाच्या ठिकाणी गेला. सर्व सोपस्कार पूर्ण करून होम दहन करायला रात्रीचे तीन वाजले. त्यानंतर नवीन लग्न झालेले पुरुष त्या होमाला पाच प्रदक्षिणा घालून त्या होमात नारळ टाकतात. या होमाला एक कोंबडाही लटकवलेले असतो. तो सोडला जातो. तो जाला सापडेल तो त्याचा सांभाळ करतो. त्या कोंबड्यामुळे घरात सौख्य नांदते असा समज आहे. हा होम कोकणात सानेजवळ तयार केलेला असतो कारण कोकणात सान म्हणजे अशी जागा असते कि देव देवळातून पालखीत बसून निघाल्यावर या सानेवर रात्री वास्तव्य करतो. त्यामुळे पालखी जोपर्यत सानेवर असते तोपर्यत लोकांना रात्री जागून तेथे पहारा द्यावा लागतो. होमाच्या दुसऱ्या दिवशी लोक सानेवर देवाचे दर्शन घेऊन नवस वगैरे बोलतात. सानेवर कोकणातील लोक खूप नटून थटून येतात. तेथे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तेथे गेल्यावर विजयला कलिंगड विकत घेऊन खायला खूपच मजा येते. तो कार्यक्रम आटपल्यावर पालकी गावातील घरे घ्यायला सुरुवात करते. त्याच्या दुसरया दिवशी विजयच्या गावातील पालकी टेकडीवरच्या स्वयंभू शंकराच्या मंदिरात भेटीला जाते. यावेळी मात्र मनात असूनही पायांमुळे विजयला त्या मंदिरात जाता आले नाही. विजयला त्या मंदिराचे का कोणास जाणे विशेष आकर्षण आहे. विजय जेव्हा जेव्हा गावी जातो त्याला त्या मंदिरात जावेसे वाटते. त्याच्या दुसऱ्या दिवशी विजयच्या वाडीत पालखी येते आणि ती पालखी सर्वात पहिली विजयच्या घरी येते. पालखी ठेवण्यासाठी अंगणात रांगोळी काढून छान चादर अंथरली जाते ज्यावर पालखी ठेवण्यापूर्वी पालकीचे चारही पाय पाण्याने धुतले जातात. त्यानंतर घरातील उपस्थित आणि अनुउपस्थित विवाहित स्त्रियांच्या ओठया भरल्या जातात. पालकीला हार फुले आणि नारळ, नारळाची माल अर्पण केली जाते. त्यानंतर कुटूंबातील सर्व स्त्री पुरुष पालकीचे दर्शन घेतात आणि पालखी वाडीतील प्रत्येक घरासमोर जाते. वाडीतील सर्व घर घेऊन झाल्यावर पालखी नाचवून पुन्हा सानेवर नेली जाते. अशी पालकी गावातील सर्व घरे घेऊन झाल्यावर जेव्हा पुन्हा देवळात येते तेव्हा जो उत्सव केला जातो तो धुळवट या दिवशी लोक गुलाल वगैरे उधळून आनंद साजरा करतात. कोकणातील काही मोठ्या गावात ही धुळवट गुढीपाडव्याला साजरी केली जाते. विजय कधीही धुळवटीपर्यत गावी न थांबल्यामुळे त्याला ती प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता आली नव्हती.ता दरम्यान विजयने कोकणातील हिरव्या काजूच्या बियांची आणि फणसाच्या भाजीची चव चाखली पण मागे पाऊस पडल्यामुळे त्याला करवंद आणि कच्च्या कैऱ्यांची चव काही चाखता आली नाही. पण विजयचा पाय दुखत असतानाही त्याची पायपीट मात्र भरपूर झाली. पाय दुखायचा थोडा कमी झाला. पण देवाजवळ विजयने त्याचा पाय बरा व्हावा हे मागणं न मागता अनामिका आणि त्याची भेट व्हावी हे मागणं मागितलं! विजय आणि अनामिकाची फक्त नजरानजर झाली पण त्या नजरानजरेतही ती त्याला आनंदी दिसली नाही. कोकणात गावी गेल्यावर फक्त विजयला एक गोष्ट प्रचंड खटकते ती म्हणजे तिथे कोणताही विषय लग्नावर येऊन संपतो. त्या गोष्टीचा विजयला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप होतो. विजयच सर्व काही ठीक असताना लग्न का होत नाही? या प्रश्नाच उत्तर कोणाकडे नाही. विजयकडे ते उत्तर आहे पण तो ते देऊ शकत नाही. जो येतो तो हेच बोलत असतो आता माझ्या मुलांची लग्ने झाली मी सुटलो. काही बोलतात माझ्या मुलांची लग्ने झाली कि मी सुटलो. कोकणातील लोकांचा लग्न हा खूपच जिव्हाळ्याचा विषय कारण त्याच्याभोवती त्याच्या बऱ्याच रीतीभाती गुंफल्या गेल्या आहेत. विजयचा त्याला विरोध नाही पण त्यासाठी तो लग्न करू शकत नाही ना? आता विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न ठरल्यामुळे येणारे जाणारे पै पाहुणे पुन्हा पुन्हा विजयाच्या लग्नाचा विषय छेडणारच! कधी कधी विजयला इतका प्रचंड राग येतो आणि तो स्वतःशीच म्हणतो. मी तेव्हाच लग्न करायला हवं होत. आता ती मुलींची रांगही नाही. माझ्यातील तो रसिकही नाही आणि आता प्रेमावर विश्वास उरला नाही विश्वास उरला आहे तो फक्त नशिबावर. आता फक्त नशीब वाढेल ते विजय निमूटपणे स्वीकारतो आहे कारण आता त्याच्या हातात करण्यासारखे काही उरलेच नाही. तो एक कटी पतंग झाला आहे नियतीच्या हातातील.
विजय त्याच्या आयुष्यात फक्त एका गोष्टीला भितो ती गोष्ट म्हणजे कुत्र्याच्या चावण्याला. विजय लहान असताना एका मोकळ्या जागेत खेळायला जायचा. त्या मोकळ्या जागेला लागूनच एक घर होतं. त्या घरात एक काळी कुत्री होती. बाहेरचा कोणताही माणूस त्या घराजवळ गेल्यास ती चावायची! एकदा खेळता खेळता विजयचा चेंडू त्या घराच्या अंगणात गेला. त्याने पाहिले तर जवळपास ती कुत्री त्याला दिसली नाही म्हणून तो चेंडू घ्यायला गेला. अचानक ती कोठून आली देव जाणे आणि तिने विजयची हाफ चड्डीच पकडली. नशीब ती चड्डी जीन्सची होती म्हणून विजयला तिचे दात लागले नाही.
त्याकाळी कुत्रा चावल्यास पोटावर इंजेक्शन घ्यावे लागायचे ते ही खूप जास्त आणि त्या कुत्र्यावरही लक्ष ठेवायला लागायचं! एक वेळ विजय वाघाला घाबरणार नाही पण कुत्र्याला घाबरतो. ती कुत्री मरेपर्यत विजय पुन्हा कधी त्या मैदानात खेळायला गेला नाही. आजही विजय गल्ली गल्लीतल्या रस्त्याने कधीच जात नाही.
— निलेश बामणे.
Leave a Reply