त्या उद्योगातील त्याची पहिली कमाई फार नाही पण थोडीफार त्याच्या हातात पडली होती. म्हणजे! त्याची त्या व्यवसायातील बहोनी झाली होती. विजयच्या जुन्या मालकाने त्याला फोन केला असता तो त्याने उचलला नाही. कारण विजयकडे आता त्याच्यासोबत बोलण्यासारखे काहीच शिल्लक नव्हते. त्याला आता कामात काही तरी अडचण आली असेल म्हणून त्याने फोन केला असेल अशा विचारात विजय असताना थोड्या वेळाने त्याचा व्हाट्स अँपवर मेसेज आला की मला माहित आहे तुला पगार पुरत नाही! कोरोनामुळे दोन वर्षे पगार वाढवता आला नाही वगैरे वगैरे. पुढे मी दोन हजार वाढवून देतो इ. त्यावर विजय मनात विचार करत होता कोरोना दोन वर्षे होता त्यापूर्वी चार वर्षे कोठे पगार वाढवला होता? कमी पैशात जास्त काम केल्यामुळे आता जे मला शारीरिक त्रास होता आहेत त्यांची जबाबदारी कोणाला घ्यावी लागली? मला आणि माझ्या कुटुंबालाच ना? कमी पैशात काम करून मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केला होता.असा गाढवपणा कोणीच करायला नको? आपण कमी पैशात अती श्रम करायचे आणि मग शारीरिक त्रास झाल्यास तेच पैसे डॉक्टरला घालायचे! ते पैसे तरी तेंव्हा कोठे हातात असणार आहेत? मग तो आपला आर्थिक भार आपल्या कुटुंबावर! अति कष्टाचे काम करताना आपली शारीरिक होणारी झीज आणि त्यामुळे भविष्यात उद्भवणारे आजार यांचा विचार अगोदरच करायला हवा! मालकाला काही फरक पडत नाही कारण तो खूप माया गोळा करून बसलेला असतो. कामगार काय कमावतो तेवढे खर्च करून बसतो. त्यामुळे भविष्यात जर आपण आजारी पडलो तर काय? याच्या तरतुदीचा विचार प्रत्येक अंगमेहनत करणाऱ्या कामगाराने करून ठेवायलाच हवा! विजयच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता ठीक होती म्हणून ठीक होत. नाहीतर? ही कल्पनाही विजयला करवत नव्हती. विजयला खरं तर कोणाला दुखवायला आवडत नाही पण यावेळी विजयचा नाईलाज होता कारण त्याच्यामुळे त्या मालकाला वाईट सवय लागली होती. ती इतर कामगारांना भोवली होती आणि भविष्यातही भोवू शकणार होती. म्हणूनच बऱ्याच महिन्यापासून विजय हे काम सोडण्याच्या विचारात होता. पाय दुखण्याचे फक्त एक निमित्त झाले. खरं तर विजयला कोणावरही कोणी केलेला अन्याय सहन होत नाही. विजयने मालकाच्या मेसेजला लगेच उत्तर दिले नाही कारण कोणताही निर्णय विजय रागाच्या भरात घेत नाही. विजयने पुढे सहा – सात तास नव्याने विचार केला आणि पाय अजूनही दुखत असल्यामुळे मी काय आता कामाला येणार नाही असा मेसेज टाकला. आणि मोकळा झाला. यावेळी तो अजिबात व्यतीत नव्हता उलट आंनदी होता कारण. त्याच्या आयुष्यातील एक अध्याय संपून नव्या अध्यायाला सुरुवात झाली होती.
विजयला आता त्याच्या आयुष्यात त्याच्या मर्जीने त्याच्या मर्जीचे असे काहीतरी करायचे होते कारण आता पर्यत विजय त्याच्या आयुष्यात जे काही करत आला ते इतरांसाठी. पण त्या इतरांनी त्याच्यासाठी कधीच काही केले नव्हते आणि भविष्यात करतील अशी त्याला आशाही नव्हती. विजयच्या मनात त्या मालकाविषयी काही राग वगैरे नव्हता कारण तो आयुष्यभर व्यवहारानेच वागत आला पण विजयला व्यवहार जमला नाही. ना त्याच्या कारखान्यात, ना कुटुंबात आणि ना त्याच्या आयुष्यात. तो देत राहिला आणि फक्त आले तेवढेच घेत राहिला. प्रेमातही तेच झाले तो प्रेम देत राहिला पण त्याला बदल्यात प्रेम मिळाले नाही कोणाकडूनच. नाही म्हणायला आदर मोठेपणा मिळाला तो आजही मिळतोय. पण तो प्रेमाची जागा घेऊ शकत नाही ना? विजयला भविष्यात त्याच्या कुटुंबावरील ओझं व्हायचं नव्हतं. अविवाहित राहण्याचा म्हणजे कोणत्याही कारणाने विवाह टाळण्याचा निर्णय हा विजयचा स्वतःचा होता. त्याला त्याचे कुटुंब किंवा कोणीही जबाबदार नव्हते. त्यामुळे आपल्या भविष्याची तरतूद करण्याची जबादारी विजयच्या स्वतःच्या खांद्यावर येऊन पडते पण ती जबाबदारी पार पाडत असताना त्याला त्याचे कौटुंबिक कर्तव्यही दुर्लक्षित करून चालणार नव्हते. त्यामुळे त्याला यापुढील आयुष्य खूपच जबाबदारीने वागणे आवश्यक होते, त्याला त्याचे भविष्य जरी माहीत असले तरी त्यावर विसंबून राहून तो जीवन जगू शकत नव्हता. जगाच्या दृष्टीने तो एक सामान्य माणूस होता, त्यामुळे सामान्य माणसासारखा आपल्या भविष्यातील तरतुदीचा विचार करणे त्याला गरजेचे वाटत होते. आता या क्षणाला भौतिकदृष्टया विजयचे हात रिकामे होते पण पुढच्या तीन वर्षात ते भरून ओसंडणार होते. हे विजयला माहीत होते. पण ते कसे होणार हे पाहण्याची मात्र विजयला उत्सुकता होती. म्हणून विजय आपल्या डॉक्टर मित्राकडे गेला आणि त्याच्याकडून महागातील औषधे लिहून घेतली. कारण आता त्याला बरं होण्याचे वेध लागले होते. ती औषधे घेतल्यावर विजयला आता थोडा गुण वाटू लागला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मागच्या काही महिन्यांपासून जे बारा वाजले होते होते. ते चित्र आता बदलत होते. विजयने कोठेतरी वाचले होते प्रत्येक माणसाचे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असायला हवे! हे आता विजयला पटले होते. त्यामुळे तो वेगवेगळ्या मार्गाने थोडे थोडे पैसे कसे कमावता येतील याचाच विचार करत होता. त्यासाठी तो त्याच्या आयुष्यात ज्याकाही अनेक गोष्टी शिकल्या होता त्यांचा उपयोग करणार होता. त्याच्यात पहिली गोष्ट ही होती की तो संगणकावर डीटीपी करायला शिकला होता. त्याने तो आपल्या नवीन कामाची सुरुवात करू शकत होता. त्यानंतर त्याला इंजिनिअरींग कारखान्यातील बहुसंख्य यंत्रांवरील कामाचा अनुभव होता. त्यात त्याला लिखाणाचा अनुभव होता. बऱ्याच क्षेत्रात त्याचे मित्र असल्यामुळे तो त्या त्या क्षेत्रातील मित्रांची मदत घेऊ शकतो. फक्त आता त्याला त्याच्यातील कलागुण योग्य मूल्य घेऊन विकायला शिकायचं होतं. विजयला त्याची किंमत माहीत होती पण त्याने ती कधीच वसूल केली नाही. आता विजय सावध आणि सावधान झाला होता. विजय व्यवहारी झाला की प्रचंड व्यवहारी होतो. मग लोक त्याच्यात तो भोळा माणूस शोधू लागतात. व्यावसायिक म्हणून विजय कधीच भोळ्यासारखा वागत नाही कारण व्यवसाय हा त्याच्या रक्तात आहे. अगदी लहानपणापासून तो व्यवसाय करत आला आहे. कोणती गोष्ट कशी विकायची याची त्याला अचूक माहिती आहे. फक्त लेखक होण्याच्या नादात त्याने व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे विजयला आता वाटू लागले होते. त्यामुळे ती चूक आता विजय सुधारणार होता. विजय त्याच्या आयुष्याचे गणित आता नव्याने मांडणार होता. विजय आता त्याच्या प्रत्येक मिनिटाची किंमत वसूल करणार होता. कोणतेही काम आता योग्य मोहबदला घेतल्याखेरीज करायचे नाही हे आता पक्के ठरले होते.
काळ विजयचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्ती त्यांच्या गुरूंच्या म्हणजे आध्यत्मिक गुरूंच्या कार्यक्रमाला गेले होते. विजय त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे नाही गेला. त्या कार्यक्रमाला या नगरसेवक आमदार वगैरेही आले होते. विजय त्या कार्यक्रमाला न गेल्यामुळे त्याला दोन शब्द ऐकून घ्यावे लागले. ते ऐकताना खरं तर विजयला खूप राग आला होता पण विजयने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवलं कारण पाय दुखत असल्यामुळे तो तर लंगडा झाला होताच पण त्याची आर्थिक बाजूही लंगडी झाली होती, म्हणून विजयने गप्प राहून बुक्क्याचा मार सहन केला. विजय स्वतः आध्यात्मिक आहे पण त्याचे अध्यात्म डोळस आहे. दिवसभर गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जाप करत टाळ कुठने त्याला मान्य नव्हते. आध्यत्म ही काही उपाशीपोटी करण्याची गोष्ट नाही त्यासाठी पोट हे भरलेलेच असावे लागते. जेंव्हा विजयाच्या आई- वडिलांची पोटे रिकामी होती तेंव्हा त्यांना आध्यात्म सुचत नव्हते. आता पोट भरलेले आहे म्हणून आध्यत्म सुचत आहे. विजयचे तसे नाही! विजयची भूमिका भरल्या पोटी आणि रिकाम्या पोटी वेगळी नसते. विजय त्याच्या विचारांवर कालही ठाम होता आणि आजही ठाम आहे. एखाद्या स्थितप्रज्ञ साधूसारखा. त्यामुळे त्याच्याबद्दल कोण काय विचार करतो याने त्याला काहीच फरक पडत नाही. विजयला एक कळते माणसाला आध्यात्मापेक्षाही उत्तम अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची जास्त गरज आहे. फक्त नाम जप करून काहीही होत नाही! भक्तीला कृतीची जोड असणे आवश्यक असते. कोणाचीही भक्ती मानवकल्याणाच्या कामी आली तर ती भक्ती कामाची अन्यथा नुसतेच आध्यात्माचे हवेतील बुडबुडे. आध्यात्म हे डोळस असायला हवे! आपले आध्यत्म म्हणा अथवा भक्ती ही नेहमी दुसऱ्याला मार्गदर्शक ठरायला हवी! त्रासदायक ठरायला नको!
— निलेश बामणे.
Leave a Reply