दोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे नव्हे तर दिसण्याचेही विजयचे एक तंत्र आहे…तो घरात जसा वागतो- बोलतो तसा बाहेर वागत नाही कारण घरा बाहेरच्या जगात त्याचं नाव आहे ! हजारो लोक त्याला ओळखतात म्हणूनच प्रत्येकाला घरात भेटलेला विजय आणि घराबाहेर भेटलेला विजय वेगळा वाटतो…त्याला कारण तसेच आहे. विजयच्या घरात त्याच्या कलागुणांची स्तुती करणारा कोणी नाही…त्याचा मानसन्मान करणारा कोणी नाही…बाहेरच्या जगात लोक त्याच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात…त्याचा सल्ला घेण्यासाठी आतुर असतात…विजयच्या अचाट बुद्धीवर सर्वांचाच विश्वास आहे पण फक्त आपली कामे करून घेण्यापूरताच ! हे विजयच्या ज्या दिवशी लक्षात आले त्या दिवसापासून तो सावध झाला आणि सल्ला समोरच्याची लायकी आणि नियत पाहून देऊ लागला…विजयने दिलेला सल्ला आजपर्यत कुचकामी ठरलेला नाही.
विजयाच्या मामाच्या मुलाच्या हळदीच्या दिवशी विजयाचा पायच नव्हे तर संपूर्ण अंगातील सर्व सांदे अचानक खूपच दुखू लागले. विजयला आराम करावासा वाटत होता पण झोपल्यावरही या कुशीवरून त्या कुशीवर होतानाही प्रचंड वेदना होत होत्या. विजयला काय करू आणि काय करू नको ! असे होत होते. तरीही नाईलाजाने म्हणा किंवा आपली सामाजिक जबाबदारी म्हणूंन विजय रात्री उशिरा हळदीला गेला. थोडी हळद लावून घेतली आणि थोडी व्हेज बिर्याणी खाऊन झाल्यावर घरी येऊन झोपला. झोपला कसला रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर लग्नाला जाण्यासाठी सर्वांची लगबग सुरु झाली. तरीही विजय अंधरूणातच होता. त्याला अंधरूणातून उठूच वाटत नव्हते. त्यामुळे पहिल्या गाडीतून तो लग्नाला गेला नाही. खरं तर लग्नाला जाण्याचा त्याचा अजिबात मुड नव्हता. पण जावं तर लागणार होतच ! त्याला पर्याय नव्हता. कसातरी विजय अंथरुणावरून उठला , थंड पाण्याने अंघोळ केली, चहा तयार केला, दोन चार बिस्किटे खाल्ली आणि त्यानंतर डॉक्टरने दिलेले औषध घेऊन विजय कपड्यानं इस्त्री करून कशीबशी ती अंगावर चढवून दुसऱ्या गाडीने लग्नमंडपात पोहचला. दरवाज्यात त्याचा मामा त्याला भेटला तेव्हाच त्याला विजय थकलेले वाटला. लग्नाच्या हॉलमध्ये पोहचला तर त्याचे सर्व गाववाले अगोदरच पोहचले होते. सर्वाना हात मिळवून तो गप्पा मारू लागला. थोड्या वेळाने त्याचे चुलत भाऊ – मित्र आल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्यात रंगून गेला. त्यांच्याशी गप्पा गप्पा मारता – मारता तो त्याच्या वेदना तात्पुरत्या का होईना कधी विसरला ते त्याला कळलेच नाही. जेवण वगैरे झाल्यावर विजय लगेच नवरा नवरी सोबत फोटो काढून विजय घरी निघाला. घरी आल्यावर बिछान्यावर आडवा झाला. त्यानंतर तो वारातीलाही गेला नाही. उठला ते रात्री पुन्हा झोपण्यापूर्वी जेवायला.
विजयच्या मामाच्या मुलाच्या लग्नात जिकडे तिकडे फक्त विवाहित स्त्रिया दिसत होत्या. फक्त एक – दोन तरुण मुली दिसत होत्या पण त्या विजयच्या काही कामाच्या नव्हत्या म्हणजे ! त्या दिसायला सुंदर म्हणजे रंगाने गोऱ्या नव्हे ! त्याला चेहऱ्यावर सतत हसू असणाऱ्या मुली आवडतात…हल्लीच्या बहुसंख्य मुलींच्या चेहऱ्यावर सतत बारा वाजलेले असतात…पायाच्या दुखण्यामुळे विजयचा मुड अगोदरच खराब होता…त्यात त्या लग्नात आलेले नतेवाईक समोर भेटला म्हणून उगाच त्याची म्हणजे त्याच्या लग्नाची चौकशी करत होते…म्हणजे ! सर्वाना असेच वाटत होते की विजयच्या आयुष्यात कोणी तरुणी कधी आलीच नव्हती ! काहींना तर असही वाटत होतं की तो आर्थिक परिस्थितीमुळे लग्न करत नाही. म्हणजे ! नोकरी उत्तम नसणे वगैरे ! त्यातील काहींनी तर त्याला गावच्या मुलीसोबत विवाह करण्याचा सल्ला दिला ! त्यांच्या मते गावच्या मुली जशा काय रस्त्यावरच पडलेल्या आहेत. विजयला कळत नाही ! या जगात लग्नाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करण्यासारखी नसतेच का ? खास करून भारतात ! अविवाहित स्त्री – पुरुषांना आपल्या देशात सुखाने का जगू देत नाहीत ? विजय आता विचार करू लागला होता, या वयात अनोळखी जिच्यावर त्याचे प्रेमच नाही आशा स्त्री सोबत विवाह करून काय उपयोग ? ती स्त्री मुलांना जन्म देईल का ? याबद्दल चिंता, आणि जन्माला घातले तर जन्माला येणाऱ्या त्या मुलांच्या भविष्याची चिंता आणि जिच्यावर आपले प्रेमच नाही तिच्यासोबत आपल्या मनाविरुद्ध आयुष्य काढण्याची शिक्षा…ती वेगळीच ! विजयला त्याच्या आयुष्यात बायको नको होती त्याच्यावर प्रेम करणारी हवी होती. त्याच्यावर प्रेम करणारीला तो बायकोही करायला तयार होता…त्याच्या जन्मकुंडलीत षष्ठात शुक्र होता…त्याची भविष्यवानी साधारणतः स्त्रियांचा उत्तम सहवास लाभत नाही.अशी असते …म्हणूनच विजयच्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊनही त्याला एकाही स्त्रीचा सहवास लाभला नाही…
विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. त्यामुळे त्याने त्याचा पूर्वीचा डॉकटर बदलला कारण तो फक्त गोळ्या आणि इंजेक्शनच देत होता. त्या घेतल्यावर एक दोन दिवस बरे वाटे म्हणजे चालताना फार त्रास होत नसे .. विजयला आपल्या पाय दुखण्याचे जे कारण वाटत होते तेच कारण आहे की दुसरं काही कारण आहे का ? ते शोधायचं होतं आणि या दुखण्यातून पूर्णपणे बरं व्हायला किती महिने लागतील की आता हे आयुष्यभराचे दुखणे ठरणार आहे का ? हे जानुन घ्यायचे होते.. हल्ली डॉक्टर फक्त गोळ्या इंजेक्शन देत राहतात… इतर उपायांचा विचार करतच नाही म्हणजे व्यायाम खाण्यापिण्यात पथ्य इ.विजयला हे आता पाय ओढत चलण्याचा खूपच कंटाळा आला होता कारण जो भेटतो तो त्याला हेच विचारतो की आता पाय कसा आहे ? आता काय सांगावं हा विजयला प्रश्न पडतो कारण मध्ये मध्ये विजयचा पाय बारा झाल्यासारखा त्याला वाटतो पण जरा जास्त चालल्यावर पुन्हा दुखू लागतो. त्यामुळे जरा लांबचा प्रवास करणेही त्याला शक्य होत नाही. त्यामुळे विजयच्या उदर्निर्वाहाचाही प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो… आता विजय पायाच्या सर्व चाचण्या करून घेऊन नक्की पायाला काय समस्या आहे ? त्यावरील ठोस उपाय आणि उपायांनी पाय बरा होण्यास लागणारा कालावधी ? हे जाणून घेण्यास उत्सुक होता. कारण त्यावर आता भविष्यातील त्याचा प्रवास अवलंबुन होता… बसून कितीही काम करताना विजयला फार त्रास होत पण उभ्याने अथवा फार उचलाउचल करून काम करताना मात्र त्याला त्रास होतो. पण आता होणाऱ्या त्रासाबद्दल कोणाला सांगायची सोय नाही कारण विजयला होणार त्रास त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि रोज घरपासून काही अंतरावर असलेल्या त्याच्या भावाच्या ऑफिसात जाऊन तो संगणकावर बरेच तास काम करतो… म्हणून विजयने आता एक होमिओपॅथी डॉकटर पकडला त्याने आहारविषयक उत्तम सल्ला दिला आणि हे दुखणे औषधांनी ताबडतोब थांबणार नसल्याचे त्याने स्पष्ट सांगितले, काही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपायही त्याने सुचवले ते उपाय आमलात आणण्याचा विजयने निर्णय घेतला… त्या उपायात एक आयुर्वेदिक तेल अर्धा चमचा काळ्या चहा सोबत घायला सांगितले होत. त्यासोबत काही होमिओपॅथी गोळ्याही दिल्या होत्या. ती सर्व औषधे घेतल्यानंतर विजयला थोडा गुण वाटत होता पण विजय आता अर्ध्या हळकुंडाने पिवळा व्हायला तयार नव्हता. आता विजयला तो त्याच्या पायांनी धावेल तेव्हाच बरं वाटणार होत.. . आपण आपल्या पायाच्या दुखण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं याचा विजयला पश्चाताप होत होता. काही वर्षांपूर्वी विजय कपाटावरील सामान काढताना पडला होता तेव्हा त्याला मुका मार लागला होता. तो मारही आता उचल खात असावा ! पण नक्की कशी ? याचा काही अजून थांग पत्ता लागत नव्हता….
— निलेश बामणे.
Leave a Reply