विजयला दोन्ही प्रकारचे जीवन जगत असतो. तो अतिशय साधे जीवनही जगतो आणि एखाद्या श्रीमंत माणसाचे जीवनही जगतो. तो ज्या माणसात जातो त्यांच्यासारखा होतो. म्हणूच माणसे तो समोर येताच पोपट होतात. त्यांच्या आयुष्यातील सर्व गुपिते त्याला सांगून बसतात पण त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील एकही गुपित तो कधी कोणाला कळू देत नाही.
सध्या विजयच्या आयुष्यात खास म्हणावा असा एक मित्र आहे त्याचे नाव जयेश…जयेश विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे आणि तो विजयला मोठया भावासारखा मानतो. दोघात फक्त एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे दोघेही अविवाहित आहेत. आणि दोघांचेही विवाहाबाबतची मते सारखी आहेत. ते दोघे दिवसभर कोणत्याही अगदी फालतू विषयावरही तासन तास चर्चा करू शकतात अगदी कोणा अभिनेत्रींच्या लग्नापासून ते घटस्फोटापर्यत…ते दोघे काय बोलत असतील याचे कुतूहल साऱ्या जगाला असते.
असो ! पण विजय एक सामान्य माणूस आणि जयेश कोट्याधीश ! विजय एका कारखान्यात काम करणारा एक सामान्य कामगार आणि जयेश तीन कारखान्यांचा मालक !! दोघांच्या आवडीचा विषय ज्योतिष ! जयेशच एक वैशिष्ट्य आहे त्याला काही तासांनी जर एखादा माणूस भेटणार असेल तर ते त्याला अगोदरच कळतं. जयेश त्याच्या आयुष्यातील सारी गुपिते विजयला सांगतो पण विजयने मात्र ती त्याला सांगितली नाहीत.
मग ! प्रश्न हा निर्माण होतो की जयेश विजयला इतका का मानतो ? जयेशच्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री विजयला माहीत आहे. पण विजयच्या आयुष्यातील एकही स्त्री जयेशला माहीत नाही कारण विजय जेंव्हा त्याच्या आयुष्यात आला तेंव्हा विजयच आयुष्य वाळवंट झालं होतं आणि तो अविवाहित राहण्यापर्यतच्या निर्णयापर्यत पोहचला होता.
जयेश दिसायला किती सुंदर असेल याची कल्पना त्याने लग्नासाठी सहा हवाईसुंदरींना नकार दिला यावरूनच येते. पूर्वी तो अंगाने जरा जाडजूड होता पण व्यायाम करून करून आता त्याने बलदंड शरीरही कमावले आहे. तरीही तीन मुलींनी प्रेमात त्याला धोका दिला. विजयला प्रेमात धोका मिळाला असं नाही म्हणता येणार कारण कोणी त्याला धोका द्यावा इतकं प्रेम त्याने कधी कोणावर केलंच नाही म्हणून ज्या त्याच्या आयुष्यात आल्या काही दिवस रुरल्या, त्या त्याच्या हृदयाशी खेळल्या आणि तो त्यांच्या हृदयाशी खेळला ! खेळ संपल्यावर त्या त्यांच्या वाटेने गेल्या विजय त्याच्या वाटेने पण त्यातील एकीचाही नव्याने शोध घ्यावा असा साधा विचारही विजयच्या मनात आला नाही कारण मागे वळून पाहणं त्याच्या रक्तातच नाही. माणसे जोडत पुढे जायचं पण मागे वळून पाहायचं नाही फक्त सोबत जे असतील ते घेऊन पुढे चालत राहायचं त्याच्या या प्रवासात कित्येक मोठी माणसे त्याला भेटली आणि ती मागेही पडली त्याच्या आयुष्यात. विजय थांबला तो फक्त अनमिकासाठी !…
जयेश आणि विजयची मैत्री होण्यापूर्वी विजयची जयेशच्या वडिलांशी म्हणजे जयराम शेटशी मैत्री होती. जयेश सारखेच जयराम शेठही विजयशी मोकळेपणाने बोलत. त्यांच्या आयुष्यातील जगाला माहीत नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी विजयला माहित होत्या. ते दिवसातून एकदातरी विजयला भेटून त्याच्याशी बोलत. जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता. विजयच्या हुशारीवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं कारण ते स्वतः फक्त चौथी शकलेले होते. पण दिसायला एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. एका सामान्य मिल कामगाराचा मुलगा ते एक यशस्वी कोठ्याधीश उद्योगपती असा त्यांचा प्रवास कसा झाला. हा प्रवास खरंच बोध घेण्यासारखा तर आहेच पण या जगात नशीब नावाची एक गोष्ट असते हे अधोरेखित करणारा ही आहे. ती गोष्ट आपण आपल्या या गोष्टीचा प्रवासात पुढे सांगूच…
— निलेश बामणे.
Leave a Reply