राजकारण हा विजयच्या कुतूहलाचा विषय नव्हें तर आवडीचा विषय ! विजयला तो लहान असल्यापासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे ! या राजकीय व्यक्तीचे प्रचंड आकर्षण होते… त्याच्या कुटुंबात आजूबाजूला फक्त आणि फक्त शिवसैनिकच होते. पण राजसहेबांनी मनसेची स्थापना केली आणि सुरुवातीला त्यातील काही मनसैनिक झाले. विजयला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सर्वात आवडलेली कोण राजकीय व्यक्ती असेल तर ती व्यक्ती म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे … पत्रकारितेत आल्यामुळे विजयची एकदा आदरणीय उध्दवसाहेब ठाकरे यांच्याशी काही मिनिटाची प्रत्यक्ष भेट झाली होती त्यामुळे त्यांच्याबाबतीत विजयच जे मत पहिल्या भेटीत झालं होतं तेच मत आजही आहे उद्धवसाहेब इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत…राजकारण त्यांच्या नसानसात भिनले आहे पण ते हाडाचे राजकारणी नाहीत …त्यामुळेच कदाचित ! त्यांना या सध्याच्या एकनाथ शिंदें आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांच्या बंडाला समोर जावं लागत आहे…या बंडामुळे राजकारणात कधीच कोणी कोणाचा नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध होताना प्रथमदर्शनी तरी दिसते आहे…कोरोना काळात आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बजावलेली भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.. त्याबाबत काहीच वाद नाही. शिवसेनाप्रमुख म्हणून विजय नेहमीच उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदरच करत आला करत आहे आणि करत राहील. एक सामान्य माणूस म्हणून विचार करताना त्याला नेहमीच वाटते कि मुंबई आणि महाराष्टात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना टिकली पाहिजे पण ती हिंदुत्वासाठी नाही तर मराठी माणसासाठी… विजय हिंदू असला तरी तो इतर धर्माना कमी लेखणार हिंदुत्व मानत नाही. त्याला सर्व धर्मांबाबत सारखच प्रेम आणि आदर आहे इतर धर्मातीलही जे जे उत्तम आहे ते त्याला स्वीकारायला आवडते. विजयला सर्वांचे होऊन राहायला आवडते. प्रत्येक कलाकाराने साहित्यिकाने स्वतःला जाती धर्मात गुंतवून घेऊन विशिष्ठ जाती – धर्माचे समर्थन करणे हे विजयला पटत नाही. शिवसेनेची स्थापना हि धर्माच्या मुद्यावर नाही तर मराठी माणसाच्या मुद्यावर झाली होती हे लक्षत घ्यायला हवे असे विजयला नेहमीच वाटते. म्हणून विजय एक लेखक म्हणून स्वतःची ओळख करून देताना त्याच्या जातीचा उल्लेख करत नाही आणि फक्त आपल्या जातीसाठी कार्य करणे त्याच्या मनाला पटत नाही, त्याच्या मते तो ज्या देशात जन्माला आला त्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा त्याच्यावर हक्क आहे मग तो कोणत्याही जाती धर्मातील का असेना !
विजयची आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती पण ती इच्छा काही अजून पूर्ण झालेली नाही. त्यासाठी विजयने कधी काही खास प्रयत्न केले नाही कारण त्याला भेटी घडवून आणणे आवडत नाही. योगायोगाने तो आजपर्यत बऱ्याच राजकारणी लोकांना भेटला आहे. त्यातील बऱ्याच लोकांनी त्याच्या कवितांचे कौतुक केलेले आहे. पण त्या सर्व राजकारण्यांना भेटल्यावर त्याच्या एक गॊष्ट लक्षात आली कि नाकापेक्षा मोती जड आहेत. विजयने मतदान केंद्रावर ते अगदी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे… आतापर्यत विजयने मतदान करायला लागल्यापासून एकदाही मतदान चुकवलेले नाही आणि फक्त दोनदा शिवसेनेला मत दिले नाही कारण त्यावेळी त्याची मावशी नगरसेवकाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभी होती…इतके वर्षे विजय सातत्याने शिवसेनेला मतदान कारतोय ! पण त्याने शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराची पार्श्वभूमी कधीही पहिली नाही. कोणताही शिवसैनिक ती पाहत नाही हा विजयचा अभ्यास आहे त्यामुळेच विजय खात्रीने सांगू शकतो कि शिवसेना हा निवडून आलेल्या आमदार खासदारांचा पक्ष नाही तर शिवसैनिकांचा पक्ष आहे. त्यामुळे कोणीही कितीही बंड केली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. अनेक राजकीय पक्षात विजयचे बरेच मित्र आहेत पण ते ज्यांची त्यांना खरोखरच साहेब ! म्हणावं इतकी त्यांची लायकी आहे…फक्त राजकारणी आहेत म्हणून कोणालाही साहेब म्हणणं विजयच्या तत्वात बसत नाही…म्हणूनच तो राजकारणी होण्यापासून लांब राहिला. आजच्या घडीला प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षात त्याचे मित्र म्हणजे अगदी वर्गमित्र ही आहेत…राजकारणासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ देणे विजयला कधीच जमणारच नाही…कारण तो त्याचा स्वभावच नाही. म्हणून विजय राजकारणाचा अथवा राजकारण्यांचा तिरस्कार करत नाही…त्याला मोठमोठ्या राजकारण्यांना भेटायला आवडते कारण हे मोठे राजकारणी सामान्य कार्यकर्त्यांपेक्षाही अधिक नम्र आणि उच्च अभिरुची असणारे असतात असा विजयाचा आतापर्यंतचा अनुभव आहे . फक्त प्रसिद्धी आणि स्वार्थासाठी जे राजकारणात येतात आणि फक्त समाजसेवेचे ढोंग करतात त्यांच्याबद्दल विजयला आदर कधीच वाटला नाही आणि यापुढेही वाटणार नाही…
विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही… म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे. त्याला देशातील समस्यांबाबत विचार करायला आवडते… गल्लीतील समस्या या न मिटणाऱ्या असतात… त्या समस्याच अनेक राजकारण्यांना जन्माला घालत असतात… पण ते प्रगल्भ राजकारणी होतातच असे नाही… आपल्या देशात मुळात राजकारणाचा पाया जाती – धर्मावर आधारलेला आहे हे खरं तर आपल्या देशाचे दुर्दैव आहे… आपल्या देशाच्या राजकारणाचा पाया जर प्रगतीवर आधारलेला असता तर आपल्या देशाने खूप जास्त प्रगती केली असती. असे विजयचे व्यक्तिगत मत आहे. आपल्या देशात बऱ्याचदा राजकीय मंडळींची त्यांच्या बाबतीतील बातम्या देताना बऱ्याचदा त्यांच्या जाती – धर्माचा उल्लेख होताना दिसतो हे कोठेतरी थांबायला हवे ! वेग वेगळ्या राजकीय पक्षतील लोक धर्माच्या व धार्मिक उत्सवांच्या नावाखाली लोकांकडून जबरदस्ती मनमानी वर्गणी गोळा करतात हे विजयला नेहमीच खटकते कारण ते वर्गणी मागायला जातात तेव्हा खरोखरच एखाद्याकडे पैसे नसतील तर तो बिचारा काय करेल ? या वर्गणी मागणाऱ्यांना कोणाच्याही आर्थिक परिस्थितीशी काहीही देणं घेणं नसते. राजकारणी मंडळी हि लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी असतात लोकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करण्यासाठी नाही. निदान लोक जे काही देतील ते स्वीकारायला हवे आणि नाही दिले तरी ते खेळकर वृत्तीने घ्यायला हवे ! देशातील बहुसंख्य लोकांना देशातील समस्यांशी काहीही देणे घेणे नसते… पण सरकारने त्यांच्या सर्व समस्या सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते.. कोरोना काळातील आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब यांची रेशनिंगवर धान्य मोफत देण्याची योजना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवथाळी भोजन यॊजना या आदर्शच आहेत यात शंकाच नाही. पण त्याच काळात आपणही या देशाचे काही देणं लागतो म्हणून ज्यांनी ज्यांनी प्राणपणाने कार्य केले त्यांचे उपकार कोणालाही कधीही विसरून चालणार नाही…कोरोनाकाळात एकट्या – एकट्या राहणाऱ्या कित्येक गरीब वृद्धांना कोणतीच मदत मिळाली नसल्याचेही लक्षात येत होते… मदत करणाऱ्या सर्वाना सर्वांजवळ पोहचणे शक्य नव्हते पण माणुसकीच्या नात्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मदत करणे अपेक्षित होते पण ते झाले नसल्याचेही विजयच्या लक्षात येत होते पण त्याचवेळी रस्त्यावरील कुत्र्यांना मात्र न चुकता खिचडी मिळत होती… हे खूपच दुर्दैवी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर विसंबून राहणे योग्य नाही देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने इतरांना जी मदत करता येईल ती करायला हवी ! आपल्या देशात धार्मिक लोक मंदिरांना भरमसाठ देणगी देतात पण तेच लोक शाळांना, अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमात देणगी देताना हात आखडता घेतात हे दुर्दैवी नाही का ? असा प्रश्न विजयला पडतो. विजय म्हणतो जर मला देणगी दयायची असेल आणि शाळा आणि मंदिर यात एक निवडायचे असेल तर मी शाळा निवडेन…प्रत्येक माणसाला कळायला हवं कि कोणत्या परिस्थितीत आपण कोणत्या गोष्टीला अधिक महत्व दिले पाहिजे. फक्त देवळात दान धर्म करून पुण्य कमावता येत नाही.. कधी कधी लोकांना मदत करून त्यांच्या आशीर्वादाच्या रूपातही पुण्य कमवावे लागते… त्यावरून विजयने हल्लीच स्वामी समर्थांच्या मालिकेत एक दृश्यात पहिले कि त्यांचा एक श्रीमंत भक्त स्वामींना म्हणतो , मला माझ्या मृत्य नंतर माझी सर्व संपत्ती सोबत घेऊन जायची आहे ती घेऊन जाता येईल अशी सोय करा.. त्यावर स्वामी त्याला म्हणतात आपल्याकडे जसे पैशाचे चलन चालते तसे स्वर्गात पुण्याचे चलन चालते त्यामुळे तू तुझ्या गरजेपुरती संपत्ती जवळ ठेव आणि बाकीची गरिबांना दान कर आणि त्यामुळे मिळालेले पुण्य तुला मृत्यू नंतरही तुझ्या सोबत घेऊन जाता येईल…
— निलेश बामणे.
Leave a Reply