जयेशच्या डायटीशनने त्याला आता मांसाहार बंद करायला सांगितला होता आणि जयेशने तो बंद करून पाहिला तर ज्याला जाणवले की तो मांसाहार करून जितका व्यायाम करत होता तितकाच व्यायाम शाकाहार करूनही करतोय. पण जीभ ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मधे – मधे त्याच्या मनात मांसाहार करण्याचा विचार येतोच ! पण विजय मात्र पूर्णपणे शाकाहारी आणि निर्व्यसनी होता. जयेशही इतका श्रीमंत असताना निर्व्यसनी होतो. म्हणूनच तो विजयचा मित्र होता. विजयही काही जन्माने शाकाहारी नव्हता.पूर्वी विजय पक्का मांसाहारी होता. म्हणजे आठवडाभर तो मांसाहार करायचा ! कसा ते सांगतो ” रविवारी उरलेली मच्छी तो सोमवारी खायचा, बुधवारी उरलेली गुरुवारी खायचा, शुक्रवारी उरलेली शनिवारी खायचा आणि मंगळवारी काहीच नाही तर कोंबडीची अंडी असायचीच !
हे त्याच्या वयाच्या तेवीस वर्षापर्यत चालले. पण नंतर तो काही स्वाध्याही मित्रांच्या संपर्कात आला. त्याच्या ज्या मित्रामुळे तो त्यांच्या संपर्कात आला तो मित्र मात्र आजही सर्व व्यसनांना जवळ करून आहे. पण काही महिने त्यांच्या संपर्कात आलेला विजय मात्र बदलला. त्यांना भेटण्यापूर्वी विजय नास्तिक होता म्हणजे पक्का नास्तिक होता. तोपर्यत विजयने कधीही देवाची पूजा केली नव्हती. कोणत्या देवळात तो देवाच्या दर्शनालाही गेला नव्हता. स्वाध्याय परिवाराच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो पहिल्यांदा एका स्वाध्याय परिवारात एक रात्र एक दिवस राहिला होता. एखाद्या परक्याच्या घरात राहण्याची ती त्याची पहिलीच वेळ होती. त्याला सतत भेटायला येणारे एक स्वध्यायी मित्र जे रसायन शास्त्रात डॉक्टर होते. ते डॉक्टर विजयच्या बहिणीच्या लग्नात विजयच्या गावीही आले होते. ते स्वतः त्यावेळी विजयच्या झोपडीत येऊन त्याला भेटत. विजयला याचे प्रचंड कौतुक वाटे !
त्यांनी विजयला वाचायला दिलेले देवतुल्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचे आत्मचरित्र “देह झाला चंदनाचा ” हे पुस्तक विजयने एका दिवसात सलग वाचून काढले होते. विजयने स्वाध्याय परिवारातील गीतेच्या अभ्यासवरील एक परीक्षाही फक्त एक दिवस अभ्यास करून उत्तीर्ण केली होती. खरं तर विजयला या सगळ्यामुळे अध्यात्म ! पण डोळस अध्यात्माची गोडी लागली. त्यांनतर विजय काही महिने कामासाठी दिल्लीला गेला. विजयच लहानपणापासून आपल्या देशाची राजधानी असलेली दिल्ली आपल्या आयुष्यात एकदातरी पहावी अशी इच्छा होती. पण या कामाच्या निमित्ताने विजयची ही इच्छा खूप लवकरच पूर्ण झाली. विजयला संपूर्ण दिल्ली पाहता आली ती ही सरकारी गाडीतून.. कारण विजय जे काम करायला गेला होता ते काम होत दिल्ली सरकारच्या वजनमाप कार्यालयातील सर्व शाखांतील तराजूनची दुरुस्ती करण्याचे !
त्याकाळात श्रावण महिना सुरू होता. त्यामुळे दिल्लीतील वास्तव्यात विजयचा आहार म्हणजे छोले – पुऱ्या , मस्त मलई लावलेली रोटी आणि पनीरचे वेगवेगळे पदार्थ ! दिल्लीला गेल्यावर विजयने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा पनीर खाल्ले होते. आणि त्यावर भलामोठा लस्सीचा ग्लास ! तो ठरलेला असायचाच. दिल्लीला जेथे त्यांची राहण्याची सोय केली होती ते घर म्हणजे सरकारी कार्यालयाचाच भाग होता. समोर प्रशस्थ मोकळी जागा होती. त्या जागेत अनेक प्राणी आणि पक्षांचा वावर होता. त्या जागेत एक मांजर आणि कुत्रा होता. आश्चर्य म्हणजे ते कुत्रा आणि मांजर एकमेकांशी खुपच प्रेमाने खेळत. त्याकाळात विजयने श्रावण असल्यामुळे अजिबात मांसाहार केला नव्हताच ! आणि तो मांसाहार सोडण्याच्या मानसिक तयारीत होता पण ते काही जमत नव्हते. पण आता त्याला खात्री पटली होती की तो मांसाहाराशिवाय राहू शकतो. त्यात एक शुल्लक घटना घडली. संध्याकाळची वेळ होती. कुत्रा मांजर एकमेकांशी खेळत होते इतक्यात एक जखमी कबुतर त्यांच्या समोर पडले ते पाहून ते कुत्रा मांजर खेळायचे थांबले आणि एक टक त्याच्याकडे पाहात राहिले पण त्यांनी त्याला जराही स्पर्श केला नाही थोड्यावेळाने ते कबुतर सावरले चालत चालत दुसरीकडे गेले. पुढे काय झाले माहीत नाही पण त्या जखमी कबुतरला पाहून विजयच्या मनात अचानक करुणा जागृत झाली. आणि त्याला त्या कबुतराबद्दलची करुणा त्या कुत्र्या मांजराच्या डोळ्यातही दिसली. त्याक्षणी त्याने आयुष्यात पुन्हा मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला.
विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही. पण विजय दिल्ली वरून माघारी आला आणि त्याच्या कामात गुंतला. यादरम्यान काही कारणाने तो स्वाध्यायी मित्रांपासून दुरावला पण त्याने स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणले होते.
— निलेश बामणे.
Leave a Reply