आज विजयने फेसबुकवर तूळ राशींचे २०२२ चे राशी भविष्य वाचले. त्यात लिहिले होते की २०२२ हे येणारे वर्ष तूळ राशीच्या लोकांना खूप यशाचे जाणार आहे पण ते यश मिळविण्यासाठी भरपूर मेहनतही करावी लागणार आहे. विजयला हे भविष्य संगणाऱ्यांवर कधी – कधी खूप हसायला येत कारण मेहनत खूप होणार म्हणजे यश मिळणारच ! यात काही नवीन नाही. नवीन काही तेंव्हा असेल जेंव्हा मेहनत न करता फळ मिळणार असेल. हा झाला विनोदाचा भाग पण प्रत्येकाचे नशीब इतके चांगले नसते कारण प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही सध्याच्या भौतिक जगात तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला मिळालेल्या मानसन्मानापेक्षाही तुम्हाला त्या परिश्रमाच्या बदल्यात तुम्हाला मिळालेल्या पैशावर तुमच्या यशाची मोजणी होते.
विजयने आयुष्यात खूप मेहनत केली होती. त्याबदल्यात त्याला खूप मानसन्मान कालही मिळत होता आणि आजही मिळतोय तरीही तो जगाच्या दृष्टीने यशस्वी नाही. कारण त्याला त्याच्या मेहनतीच्या बदल्यात पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्याच्या सोबतचे मित्र लग्न करून, स्वतःची घरे- गाड्या विकत घेऊन , दोन चार पोरांना जन्माला घालून मौज मजेत जीवन आनंदात जगत आहेत. पण विजयचे हात आजही रिकामे ते रिकामेच आहेत. ते का ? हा प्रश्न विजयला आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना आजही सतावतो. विजयच्या हातात लक्ष्मी टिकत नाही टिकते ती फक्त सरस्वती…ते म्हणतात ना सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही. बहुतेक तेच खरं असावं ! विजय आयुष्यात यशस्वी झाली नाही पण त्याच्या पायगुणाने त्याची भावंडे यशस्वी झाली. हो ! हे सत्य होत. विजय जेथे पाऊल ठेवतो तेथे यश त्याच्या मागून येतं. पण तो तेथून निघून जाताच यशही निघून जातं.
विजयच्या आयुष्यात त्याच्या संपर्कात येणारी माणसे सुखी होतात पण ती त्याच्या आयुष्यातून त्याच्या संपर्कातून दूर जाताच पुन्हा भौतिक दुःखात बुडून जातात. विजयला त्याच्या आयुष्यात कोण आले आणि कोण गेले याने काहीच फरक पडत नाही कारण तो सामान्य नाही…सामान्य जीवन जगणे विजयला कधीच मान्य नव्हते. तो नेहमीच जगापेक्षा वेगळा विचार करत आला. याला कारणीभूत आहेत विजयच्या जन्मकुंडळीत लग्न स्थानी असलेले चंद्र आणि हर्षल, असे म्हणतात एखाद्या जन्म पत्रिकेत कोठेही जर चंद्र आणि हर्षल एकत्र असतील तर त्या जातकाचे लग्न होत नाही. पण ही परिस्थिती सप्तमात असेल तर असे होण्याची शक्यता खूप जास्त असते असेही काही ज्योतिषांचे मत आहे. काहींचे असेही मत आहे की हर्षल या ग्रहाचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. पण लग्नात असलेल्या या दोन ग्रहांमुळेच विजय विक्षिप्त झालेला आहे. त्याला स्वतःशी बोलण्याची सवय आहे आणि त्याला अचाट कल्पनाशक्तीचा देणगी लाभलेली आहे. त्यापुढे जाऊन काही ज्योतिषी असे म्हणतात की त्याला आयुष्यात एकदातरी एखाद्या मनाच्या डॉक्टरची भेट घ्यावी लागेल…
विजयच्या जन्मकुंडळीत सप्तमात मंगळ होता. म्हणजे त्याची पत्रिका मंगळाची होती. पण तो मंगळ मेषेचा होता. त्यामुळे सप्तमातील मेषेचा मंगळ प्रेमविवाह घडवून आणतो असा काही ज्योतिष्यांचा अनुभव आहे. विजयच्या आयुष्यात प्रेमाने चोर पावलाने अनेकदा प्रवेश केला पण त्याचा प्रेमविवाह काही झाला नाही. विजयला स्वतःलाही प्रेम विवाहच करायचा होता. ठरवून जर विवाह करायचा असता तर तो विजयच्या बाबतीत केव्हांही झाला असता पण या गोष्टीला त्याच मन तयार होत नव्हतं आणि नाईलाज होऊन मन तयार झालंच तर अचानक काही शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या उभ्या राहात होत्या. कधी कधी तर तो ठरवून लग्न करण्याचा ठाम निर्णय करायचा आणि नेमकी तेंव्हा अनामिका त्याच्या समोर येऊन उभी राहायची आणि त्याच अवसान गळायचं ! खरं तर विजयचा आता धोबीका कुत्ता झाला होता न घरका न घटका ! त्याला अनामिकासोबत प्रेमविवाह करणे शक्य नव्हतं आणि तिला विसरून ठरवून लग्न करणंही शक्य नव्हतं. त्यात एक अनामिक भीती होतीच अनामिकाच लग्न झालं तर ? तर सगळेच प्रश्न मिटणार होते. विजय एक भ्रमातून बाहेर येणार होता. ज्योतिष वगैरे असं काही नसतं याची त्याला खात्री पटणार होती. आणि मग तो सर्व सामान्य लोकांसारखं भोगवादी जीवन जगायला मोकळा होणार होता.
खरं तर विजयला जगण्याचा भरभरून आनंद हा कधी घेताच आला नव्हता. तो आनंद त्याने सात आठ वर्षापूर्वी घेतला होता. जेव्हा तो एका कामाच्या निमित्ताने गोव्याला गेला होता. तेव्हा गोव्याला काढलेली छायाचित्रे पाहून विजयला आजही गुदगुल्या होतात. पिकनिक आणि विजयच्या आठवणी फार बऱ्या नव्हत्या. विजय त्याच्या शालेय जीवनात एकदाही शाळेच्या पिकनिकला गेला नव्हता. त्याला कारण त्यावेळची त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ! ती परिस्थिती सुधारावी म्हणून त्याने अट्टहास केला. ती परिस्थिती सुधारली पण त्याचे श्रेयही विजयला मिळाले नाही उलट तो कसा आयुष्यात अयशस्वी ठरलेला आहे हेच ऐकायला मिळाले.
असो ! विजयच्या अनेक स्वप्नांपैकी गोव्याला जाणे हे ही एक स्वप्नच होते. पण त्याहून मोठे म्हणता येईल असे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे विमानप्रवास ! यावेळी विजय गोव्याला जाताना विमानाने गेला होता. कारण गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम फक्त तीन दिवसांचा होता. विजय गोव्याला गेला तो दिवस होता २६ जानेवारी २०१३ ! विजय सकाळी लवकर उठून रिक्षाने विमानतळावर गेला. तेथे त्याला त्यांचा टूर मॅनेजर भेटला. विजयने स्वतःसोबत मोजकेच कपडे आणि कॅमेरा घेतला होता. त्याच्यासोबत या पिकनिकला आणखी वीस लोकं होती. विमानतळावरील सगळे सोपस्कार पूर्ण करून विजय इंडिगोच्या विमानाच्या दरवाज्यापर्यत पोहचला. तर दरवाज्यात स्वागत करायला पृथ्वीवरील अप्सरा म्हणजे हवाई सुंदरी उभ्या होत्या. विजय विमानात बसल्यावर त्यांना नीट निरखून पाहत होता. म्हणजे त्या खरोखरच आपण जितकी कल्पना केली होती तितक्या सुंदर आहेत का ? तर त्या खरोखरच खूप सुंदर होत्या. या प्रवासा दरम्यान विजयच्या शेजारी जी व्यक्ती बसली होती. ती व्यक्ती तीनही दिवस त्याच्या सोबत होती. कारण हे दोघेच सिंगल आले होते.
— निलेश बामणे.