या काळातच विजयच राहत घर एस आर ए मध्ये गेल्यामुळे विजयला कधी नव्हे ती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आणि भाड्याने जी घरे मिळाली त्या घरात वास्तू दोष होता. याच काळात विजयने आपल्या हातातील काम सोडून उद्योग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याला अपयश आले. त्याला त्याच्या उद्योगात त्याला अपेक्षित असणाऱ्या एकाचीही साथ मिळाली नाही. हातातील सर्व पैसे खर्चून बसल्यावर कधी नव्हे ती त्याच्यावरही घरच्यांकडे पैशासाठी हात पसरण्याची वेळ आली. त्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आणि त्या मानसिक त्रासाची परिणीती म्हणजे त्याच्या शरीरात कोठेतरी दडलेला सोरायसिस हा त्वचाविकार उफाळून बाहेर आला. त्यावर कोणतेही औषध परिणामकारक ठरत नव्हते. सोरायसिसने विजयचा संपूर्ण चेहरा काळा पडला. केसात भयंकर कोंडा झाला, नखे संवेदनशील झाली, आणि अंगावर मोठमोठे चट्टे दिसून त्यातून त्वचेचे पापुद्रे बाहेर पडू लागले. त्यामुळे तर विजय अधिक त्रासला आणि काही नवीन करण्याची उमेदच नाहीशी झाली दोन वर्षे तर विजयला सोरायसिस हा नक्की काय प्रकार आहे हेच माहीत नव्हते. त्यामुळे विजयने लग्नाचा विचार पूर्णपणे डोक्यातून काढून टाकला. अगदी अनामिकाही त्याला आता त्याच्या आयुष्यात नको होती.
त्या आजारामुळे विजयने लोकांना भेटणे बंद केले. कोणाकडे कोणत्याही कार्यक्रमाला जाणे बंद केले. तो शक्यतो लोकांना टाळू लागला. कारण जर कोणी विचारले हे तुला काय झाले आहे तर त्याचे समर्पक उत्तर नव्हते. आणि जे उत्तर होते ते लोकांच्या खोपडीत उतरण्यासारखे नव्हते. सोरायसिसवर सुरुवातीला जे उपचार समोर आले ते भयंकर होते. कोणीतरी सांगितले रोज लिंबाचा रस घ्यायचा, कोणी सांगितले कारल्याचा रस, कोणी सांगितले खोबरेल तेल घायचे, कोणी सांगितले अजिबात मीठ खायचे नाही, कोणी सांगितले रोज पाण्यातून हळद प्यायची, कोणी सांगितले कोरफड लावायची कोणी सांगितले केळीची साल लावायची, कोणी सांगितले कोवळ्या उन्हात बसायचे. विजयला तर कधी कधी वाटायचे त्याच्या उगड्या रेखीव शरीराला कोणाचीतरी नजरच लागली. याच काळात विजयची आजी म्हणजे विजयच्या आईची आई वारली आणि त्यामुळे घरातील वातावरण अधिकच दूषित झालेले होते. तो अडीच वर्षाचा काळ म्हणजे विजयच्या आयुष्यातील भयंकर काळ होता. विजयच्या आजीचीही एक कथा होती ती कथा आपण या कथेच्या प्रवासात पुढे नक्की सांगू.
विजयची शनीची अंतर्दशा आणि साडेसाती संपताच विजयच्या कुटुंबाला एस आर ए च्या इमारतीत नवीन घर मिळाले. विजयच्या पूर्वीच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला होता आणि या घराचाही ! या नवीन घरात येताच विजय सकारात्मक विचार करू लागला एका मोठ्या त्वचेच्या डॉक्टरची भेट घेतली त्याने हजारो रुपयाची औषधे लिहून दिली. त्याने फार फरक पडला नाही पण विजयचा काळा पडलेला चेहरा पुन्हा सुंदर झाला पण अंगावरील काही चट्टे बरे होत नव्हते. या नवीन घरात येताच विजयच्या पुतण्याचा आणि भाच्याचा जन्म झाला. त्या नंतर बरेच डॉक्टर बरेच उपाय होत राहिले पण कायमस्वरूपी उपाय काही भेटला नाही. पण विजय आता सावरला होता कारण या रोगाचा संपूर्ण अभ्यास त्याचा झाला होता. त्यामुळे त्याने सोरायसिस सोबत आनंदाने जगण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जे काही होईल ते आपले नशीब म्हणून मोकळा झाला. या दरम्यान विजयने आपली पूर्वीची कामे पुन्हा सुरू केली आणि त्याला सरात्मक परिणाम मिळू लागले त्याच्या हातात पुन्हा पैसे खेळू लागले. म्हणजे त्याचे हात पुन्हा देणारे झाले.
पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता. म्हणजे विजय आता पूर्वीसारखा डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवत नव्हता. त्याच्या आयुष्यात कोणी कोणी त्याची कशी कशी फसवणूक केली आहे हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळेच यापुढे तो कोणाच्या मनाचा विचार करून वागणार नव्हता. विजयने त्याच्या आयुष्यातील पूर्वीच्या कित्येक चांगल्या चांगल्या म्हणजे प्रतिष्टीत लोकांवरही पुली मारली. आणि तो स्वतःचे असे स्वतःपुरते वेगळे आयुष्य जगू लागला. या सगळ्या प्रवासात त्याला कळले की माणूस किती स्वार्थी असतो आणि तो किती स्वार्थी होऊ शकतो. आणि एखादी व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी एखाद्याच किती नुकसान करू शकते. त्यामुळे पूर्वी माणसात गुंतणारा विजय आता माणसात फार गुंतत नाही. अनामिकावर त्याचे खूप प्रेम आहे पण ते ही सहज त्याच्या आयुष्यात आले तरच त्याला हवे आहे. आणि नाही आले तरी त्याला काही फरक पडणार नव्हता कारण यापूर्वी त्याच्या आयुष्यात अशा किती आल्या आणि गेल्या. आता तर त्यातील कित्येकींची नावेही त्याला आठवत नाहीत की त्यातील एकही त्याची फेसबुक फ्रेंड नाही .
— निलेश बामणे.
Leave a Reply