मतदार, मतपेटी आणि आपली लोकशाही; एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!!
जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता. एकाच देशात असलेल्या या लहान लहान राज्यांत एकमेकांत मित्रत्वापेक्षा शत्रुत्वच जास्त होतं. त्याचाच फायदा उठवून ब्रिटीशांसारख्या सर्वार्थाने परक्या देशाला आपल्यावर इतका दीर्घकाळ राज्य करता आलं. देशाच्या देश म्हणून ज्या चतु:सीमा सध्या दिसतात त्या बांधण्यातं काम केलं ते ब्रिटीशांनीच. ब्रिटीशांनी आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या, त्यात ‘लोकशाही’चा नंबर सर्वात वरचा लागतो असं मी मानतो. ब्रिटीश राजवटीपूर्वीच्या सवतासुभा, भेदभाव व शेकडो वर्षांची गुलामगीरी रक्तात मुरलेल्या राजवटींच्या आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष लोकशाही जिवंत राहीली हाच चमत्कार आहे.
मी वर लोकशाही जिवंत राहीलीय असं म्हटलंय. परंतू ती केवळ जिवंतच राहीली, सुदृढ झालेली नाही. देशातील कोणत्याही अदिवासी पाड्यावर दिसणाऱ्या कुपोषित बाळासारखी तिची अवस्था झालीय असं मला वाटतं. तिनं बाळसं धरलेलं मला काही दिसलेलं नाही. बाळसं धरण्यासाठी आहार पौष्टीक लागतो. लोकशाहीची सुदृढता तिला मतपेटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असते. ‘मतपेटी’ जेवढी पौष्टीक, तेवढी लोकशाही सुदृढ येवढं साध गणित आहे हे..!
मतपेटीची पौष्टीकता तिचे माता-पिता (म्हणजे आपण मतदार, मतदान म्हणजे त्या मतपेटीचा आहार), तिला किती आणि कोणता चौरस देतात त्यावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षातल्या निवडणूका पाहिल्या तर दर निवडणूकीला मतदानाची टक्रेवारी घटताना दिसते. देश पातळीवरची मतदानाची सरासरी काढली, तर ती पन्नास टक्क्याच्या फार पुढे जाते असं दिसत नाही. म्हणजे मतपेटीला ‘मतां’चा केवळ पन्नास टक्रेच आहार मिळतो असं म्हटलं तर चुकणार नाही. याचाचय अर्थ मतपेटी अर्धपोटी राहाते व अशा अर्धपोटी मतपेटी नामक मातेच्या पोटी जन्म घेणारं लोकशाही नामक बाळ कुपोषित निघणं अगदी सहाजिकच आहे नाही का?
आता मतपेटीला हा जो अर्धवट आहार मिळतो त्यात पोषक द्रव्य किती आणि निकृष्ट घटक किती हा पुन्हा अभ्यासाचाच विषय. अर्धवट आहार म्हणजे पोट भरल्यासारखं वाटणं परंतू भरलेलं नसणं..! हे काहीसं फास्ट फुडसारखं असतं. फास्ट फुडमधे जशी पोषण मुल्य असलेले घटक नसतात, तसेच ते अर्धपोटी मतपेटीतही नसतात. आता मतपेटीला मिळणाऱ्या अर्धवट आणि तो ही हिणकस आहारात कोणते निकृष्ट घटक असतात? तर जात-पात, धर्म-पंथ, प्रांत-भाषा यांचा अंतर्भाव असलेल्या घटकांचाच आहार त्या मतपेटीला मिळणार असेल तर तिच्या पोटी जन्मणारी लोकशाही धष्टपुष्ट होईल ही अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे.
अशा कुपोषित लोकशाहीच्या कुपोषित शरीर मग वेळोवेळी निकृष्ट खाद्याचीच मागणी करतं कारण त्या शरीराला तशी सवयत लागलेली असते. हे अयोग्य खाणं मग वेळोवेळी आलेल्या वा आणवल्या गेलेल्या वाटा, विचारांचा संबंध नसलेल्या भावना, जाती-धर्मिय देगली, अनधिकृत व बेकायदेशीर कामाना दिलेलं संरक्षण यातून त्या मतपेटीला मिळत राहातं आणि मग हे कुपोषण वाढतच राहात. वर हे खाणं काही ठराविक ‘घराण्यां’नी चालवलेल्या दुकानातानूच घ्यावं लागतं. दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो व ठेवला जात नाही. त्यानं होतं काय, की लोकशाही जिवंत राहाते पण ती विकृत स्वरूपात, तिची प्रकृती बिघडत जाते आणि मग कधीतरी रुग्णशय्येवर पडून आपल्या नैसर्गिक(?) मरणाची वाट पाहात पडून राहाते. आणि आपण मात्र जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्याकडे अजून जिवंत आहे म्हणून दर पाच वर्षांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानतो..
हा लेख आपली लोकशाही, जी आपल्याला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य देते, ती धष्टपुष्ट आणि दिर्घायू होवो या सदिच्छेने लिहीला आहे. लेकशाहीची ‘माता’ असलेल्या ‘मत’पेटीला पोट भरेल येवढं आणि मतरुपी सकस अन्न देणं ही मतदार म्हणून आपली जबाबदारी आहे हे आपल्या मनावर ठसवण्यासाठीची ही कळकळ आहे..मी आणि आपण सारे आपल्या लोकशाहीच्या सुदृढतेसाठी येवढं नक्की करू शकतो.
जयहिन्द..!!
-नितीन साळुंखे
9321811091
(‘मतपेटी’ याचा अर्थ सध्याची ‘वोटींग मशिन’ असा घ्यावा ही विनंती. मशिन असली तरी बोलताना ‘मतपेटी’ असाच शब्दप्रयोग केला जातो.)
Leave a Reply