नवीन लेखन...

एक सफर ऑस्ट्रेलियाची



अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्‍या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीने प्रथम हाच प्रश्न केला – अमेरिका आवडली की ऑस्ट्रेलिया ? प्रश्नाचं उत्तर तसं सोपं

नव्हतं. दोन्ही देशांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांची तुलना होऊ शकत नाही. अमेरिका ती अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ती ऑस्ट्रेलिया. आर्थिक सुबत्ता हा समान गुण आपल्या नजरेत लगेचच भरतो. पण अन्य वैशिष्ट्येही लगेचच ध्यानात येतात.

ऑस्ट्रेलियातील सार्वजनिक दळणवळणातील सुविधा सर्वप्रथम डोळ्यात भरतात. अमेरिकेतही मोठ्या शहरांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र बहुसंख्य जनतेची भिस्त असते स्वत:च्या खाजगी वाहनावर. अमेरिकेत प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे किमान एक गाडी असतेच. कधी कधी दोन किंवा तीन गाड्याही मंडळी बाळगून असतात. स्वत:ची गाडी असल्याने दळणवळणासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर सहसा कुणी करत नाही. या उलट ऑस्ट्रेलियामध्ये अगदी सुखवस्तू मंडळीही ट्रामने अथवा ट्रेनने प्रवास करताना आढळतात. बहुसंख्य लोक सार्वजनिक वाहनांचा वापर करीत असल्याने ही सेवा उत्कृष्ट दर्जाची राखली जाते. प्रवाशांना सर्व प्रकारची माहिती पुरविणे, वेळेचं बंधन चोखरित्या पाळणे आणि माफक दरात दिवसभर फिरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे ही पथ्ये वाहतुकदार कंपन्या उत्तमरित्या बजावत असतात.

शाळाकॉलेजातील विद्यार्थ्यांचं आवडतं वाहन म्हणजे सायकल. रस्त्यावर वाहनांची संख्या तुलनेने अल्प ठरल्याने वाहतुकीची कोंडी ही डोकेदुखी आटोक्यात येते. मेलबर्नसारख्या शहरामध्ये टूरिस्ट मंडळीही सार्वजनिक वाहनातून यथेच्छ भटकंती करताना आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या वारीमध्ये आम्हीही ही सार्वजनिक वाहनांची सफर मनसोक्त अनुभवली. कुणावर अवलंबून न राहता मनमुराद भटकून घेतले आणि अनेक प्रेक्षणीय स्थळे पालथी घातली.

स्वस्थ आणि तंदुरुस्त राहणं ही ऑस्ट्रेलियन जनतेची आणखी एक खासियत. यात

युवा पिढीपासून वृद्धापर्यंत सर्वजण येतात. ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्ये ओबेसिटीचा शाप अभावानेच आढळतो. सायकलिंग करणं, नियमितपणे जिमनॅशियममध्ये जाणं आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये रस घेणं हे ऑस्ट्रेलियन नागरिकांचे आवडीचे छंद.

या छंदामुळे सर्वजण तब्येतीनं खुटखुटीत आणि स्वभावानं उत्साही आढळतात. ऑस्ट्रेलियन भ्रमंती करताना तिथली वेगवेगळी मैदानं पाहून थक्क व्हायला होतं. क्रिकेटच्या खेळातील ऑस्ट्रेलियनांचं वर्चस्व सर्वपरिचित आहे. याशिवाय फुटबॉल, सॉकर या खेळांमध्येही ऑस्ट्रेलियनांना प्रचंड रस असतो. या खेळांच्या स्पर्धांच्या वेळी रस्त्यांवर प्रेक्षकांचे जथेच्या जथे हिंडताना दिसतात. आपल्या आवडत्या टीमचे युनिफॉर्मस घालून पाठिंबा दर्शविण्यात या उत्साही प्रेक्षकांची अहमहमिका लागलेली असते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑस्ट्रेलियन सरकारनेही प्रमुख शहरांचा कायापालट घडविण्याचे धोरण आखले आहे. जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा कायापालट वरदानच ठरला आहे. मेलबर्नशहरातील यारा नदीनजीकचा परिसर आणि सिडनी शहरातील डार्लिंग हार्बरचा परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरले आहेत. सिनेमॅक्स, झू, अॅक्वेरियम, कॅसिनो, हॉटेल्स, बोटिंग अशा विविध सुविधा पर्यटकांच्या दिमतीला दिमाखात सज्ज झाल्या आहेत. मेलबर्न येथील युरेका स्काय डेक टॉवर हा नव्वद मजल्यांचा. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन सार्‍या मेलबर्न शहरचं दर्शन घडतं. विशेष म्हणजे या नव्वदाव्या मजल्यावर आपण पोहोचतो अवघ्या पन्नास सेकंदात ! मुख्य म्हणजे लिफ्टमध्ये या भयावह वेगाची आपल्याला जाणीवही होत नाही ! सिडनी शहरातील ऑपेरा हाऊस इमारत पाहूनही नजर थक्क होऊन जाते. विशेष म्हणजे शहरांमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी विनामूल्य सेवा उपलब्ध असतात. पर्यटकांसाठी असलेल्या खास ट्राममधून अथवा बसेसमधून आपण दिवसभरात कोठेही हिंडू शकतो, फिरु शकतो. मध्येच एखाद्या स्टॉपवर उतरुन शॉपिंग करु शकतो व पुन्हा पुढच्या भटकंतीसाठी सहभागीही होऊ शकतो ! पर्यटकांच्या मार्गदर्शनाखाली मोक्याच्या स्टॉप्सवर माहिती केंद्रे उभारून ऑस्ट्रेलियाने पर्यटन व्यवसायाचा आदर्शच घालून दिला आहे.

ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या वंशांचे रहिवासी उदा. युरोपियन्स, चायनीज, जापनीज, आफ्रिकन रहिवासी मोठ्या प्रमाणावर आढळतात. साहजिकच खाण्यापिण्याच्या बाबतीत विविधतेची चंगळच चाखता येते. रस्त्याच्या कडेला फुटपाथावर टेबल खुर्ची मांडून ग्राहकांच्या जीभेचे चोचले पुरविणे हे ऑस्ट्रेलियातील सर्वच हॉटेल्सचे वैशिष्ट्. अगदी ऐन थंडीतही या फुटपाथवरील आस्वाद मोहिमेत खंड पडू नये म्हणून गॅसचे हिटर्सही सज्ज असतात !

समुद्रकिनारी बार्बेक्यू ची विनामूल्य सेवाही उपलब्ध असते. सुट्टीच्या दिवशी उत्साही नागरिकांचे तांडे आपापली खाणी घेऊन किनार्‍यावर जातात. तिथे आवडीचे पदार्थ शिजवून पोटपूजा करतात आणि मौजमजेचं आयुष्य आनंदानं जगतात !

जीवनाचा आनंद लुटण्यासाठी आदर्श ठिकाण असंच ऑस्ट्रेलियाचं वर्णन करावं लागेल. मात्र या सुखाला भारतीयांवरील हल्ल्याचं गालबोट लागावं याचं खरोखरच दु:ख होतं. ही अपशकुनी वावटळ अल्पवधीतच विरुन जावी एवढीच अपेक्षा !

— सुनिल रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..