नवीन लेखन...

एक स्पर्श

संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले. एक वयोवृद्ध आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे कि समोरून भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे राहायचे. असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच होता.

नकळत त्यांच्याकडे बघून मला माझ्या आईवडिलांची आठवण आली. तेही असेच दोघे एकटेच राहतात. आणि एक विचार मनाला चाटून गेला की ते दोघेपण असेच करत असतील का? आणि काही समजण्यापूर्वीच मी त्या आजी आजोबांच्या जवळ पोहचले होते. दोघांच्या मध्ये उभे राहून दोघांचेही हात धरले.
दोघांनीही माझे हात इतके घट्ट धरून ठेवले होते कि लहानपणी एखादे मूल आपल्या आईचा हात रस्त्यातून चालताना आपण चुकू नये म्हणून जितका घट्ट धरत असेल ना तितके घट्ट माझे हात त्यांनी धरले होते. आम्ही रस्ता क्रॉस केला. त्यांच्या नजरेतून मला अगदी धन्यवाद देण्याची त्यांची इच्छा दिसून येत होती. त्यांना मी टाटा केला आणि परत दोघेही एकमेकाला आधार देत निघून गेले.

पण त्यांच्या त्या हाताच्या स्पर्शाने मला किती तरी छोट्या मोठ्या स्पर्शाची आठवण करून दिली. असे वाटले की आपण या जगात जेंव्हा जन्माला आलो असू तेंव्हा आपल्या आईने केलेला ‘तो’ स्पर्श कसा असेल? या अथांग मोठ्या जगात येताना तिच्या त्या स्पर्शाने तू इथे एकटी नाही याची जाणीव करून दिली असेल. त्या स्पर्शात किती माया, प्रेम आणि आत्मविश्वास वाढवणारी ताकद असेल नाही? तिला पण आपल्याला केलेल्या पहिल्या स्पर्शाने तिच्या पूर्णत्वाची कदाचित जाणीव झाली असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता माझ्याकडे नाहीत. पण असाच काहीसा अनुभव आपल्या मुलाला जन्म दिल्यावर मला झाला असावा असे वाटते.

मुलाला त्याने पडू नये म्हणून आईवडील त्याचा हात धरून चालवतात. एवढेच काय कितीतरी गोष्टी अगदी लिहायला, वाचयला सगळेच त्यांनी हात धरून शिकवलेले असते. त्या त्यांच्या स्पर्शातला ओलावा, प्रेम त्या मुलाला त्या वेळी कळतही नसेल. मला सुद्धा तो तेंव्हा कळला नव्हता किंवा आजपर्यंत त्याची कधी आठवणही आली नव्हती. पण त्या आजी आजोबांनी इतक्या विश्वासाने माझा हात धरला की, या सगळ्याची आठवण करून दिली. हाताच्या स्पर्शात किती ताकद आहे, किती भावना आहेत, किती विलक्षण अद्भुत शक्ती आहे याची जाणीव करून दिली.

एक साधी गोष्ट आहे की मूल आजारी पडल्यावर त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत त्याला दुखण्याची जाणीव कमी होईल असा प्रयत्न आईवडील करत असतात. दिवस आहे का रात्र आहे याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसतो. त्यांच्या त्या हाताच्या स्पर्शात त्या मुलाबद्दल वाटणारी काळजी, प्रेम, माया ओथंबून वाहत असते. पण त्या मुलाने कधीतरी काहीतरी एखादी चूक केली आणि शब्दाने समजावूनही जर तो सुधारला नाही तर तोच प्रेमळ मायाळू हात एखादा फटका मारायला चुकत नाही. पण त्या कठोर स्पर्शातही त्या मुलाबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेमच असते. पण तेही आपल्याला त्या वेळेस समजत नाही.

जीवनाच्या या वाटचालीतून खूप स्पर्श असे वेगळे वेगळे सुखद, दु:खद अनुभव, आठवणी देऊन जात असतात. मुलगी लग्न होऊन सासरी जाताना आईवडिलांच्या मिठीत होणारा तो स्पर्श किंवा अनुभव जो मी स्वत: अनुभवला आहे, त्यात अपार प्रेम, अपार काळजी आणि अपार आनंद या तिन्ही गोष्टींचा संगम असतो. तर सासरी गेल्याबरोबर हात धरून घरात नेणाऱ्या नवऱ्याच्या हाताच्या स्पर्शात या पेक्षा अगदी वेगळ्या भावना असतात ’घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आहे’ असे मनोबळ वाढणारी अनुभूती असते.

अशा कित्येक सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात पण आयुष्याच्या आणि कर्तव्याच्या रहाटगाडग्यात आपण इतके अडकलेले असतो की या गोष्टींचा विचार करायला आणि त्यातील सौंदर्य टिपायला आपल्याला वेळच नसतो. पण आज या आजी आजोबांच्या हाताच्या स्पर्शाने सगळ्या आठवणी जाग्या करून दिल्या आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला हात धरून मोठे करून या जगातल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यांना त्यांच्या उतारवयातल्या वाटचालीत आपल्या हाताच्या स्पर्शाची खूप जरुरी आहे याचीही आठवण करून दिली.

सौ. वैजयंती गुप्ते.
9638393779.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..