लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला.
थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला.
हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.
देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या अतुलनीय धैर्यवान जवानांच्या मुखातील ते शब्द थेंबानं ऐकले.
आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला.
स्वर्गप्राप्तीपेक्षा लाखमोलाचे होते जणू ते शब्द .
आयुष्याच्या इतिकर्तव्यतेवर त्या शब्दांनी सुवर्णमोहर उमटवली होती.
थेंब धन्य झाला होता .
मनोमन कृतकृत्य झाला होता .
लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणाले होते :
” कारगील क्षेत्रात अवघड पहाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना सलग तीन दिवस अन्नपाण्याशिवाय काढावे लागले होते, शरीर जवळपास कोमात गेल्यासारखे वाटत होते, पण निर्धार कायम होता, पाकड्याना ठेचण्याची जिद्द कायम होती, पण पाण्याचा थेंबही कुठे दृष्टीला पडत नव्हता, हवामान खराब होतं, परिसर भयाण आणि भयावह होता, गरज होती ती पाण्याच्या एका थेंबाची, आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्यातल्या एकाला थोडं पाणी दिसलं, सगळ्यांच्या जिवंत जीव आला, आम्ही पुरवून पुरवून थेंब थेंब पाणी प्यालो,आणि त्या पाण्याच्या थेंबाच्या जीवावर पाकड्याना कंठस्नान घातलं !”
बस !
आपलं जीवन सार्थकी लागलं , देशरक्षणाच्या कामी आलं , याचा त्याला विलक्षण अभिमान वाटला .
ही भावना त्यावेळी सुद्धा झाली होती , जेव्हा शेतकरी ग्रीष्माच्या उन्हात आभाळाकडे डोळे लावून बसला होता आणि अनपेक्षितपणे पावसाच्या पाण्यानं त्याच्यावर, त्याच्या लाल,काळ्या मातीवर धुवांधार वर्षाव केला होता, आणि त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात , मनात कृतज्ञतेची आसवं उभी राहिली होती.
तेव्हाही तो पाण्याचा थेंब अंतर्बाह्य थरारला होता.
रोमांचित झाला होता.
थेंबाचा अणुरेणू उत्तेजीत झाला होता.
कृतज्ञता , कृतार्थता आणि असं बरंच काही त्याच्या अंगोपांगावरून निथळत होतं.
विश्वातलं स्वर्गीय सौंदर्य, अभिजात काव्य , प्रतिभाशक्तीचं अलौकिकत्व… हे सगळं क:पदार्थ वाटलं होतं त्याला त्यावेळी.
नेमकी तशीच भावना आत्ताही दाटली होती मनात .
तरीही आपल्या दातृत्वापेक्षा सैनिकांचं कर्तृत्व परमश्रेष्ठ वाटलं होतं.
पृथ्वीवर , आपल्या समर्पणापेक्षा शेतकऱ्याच्या मनातली समाधानाची भावना त्या थेंबाला अपूर्वाईची वाटली होती.
देशभक्तीचं दुसरं नाव म्हणजे शत्रूशी लढणारे सैनिक आणि कष्टप्रद परिस्थितीत शेती पिकावणारे शेतकरी !
थेंब नम्र झाला . विनयानं त्याची मान खाली झुकली , आणि तो हादरला.
मुळापासून हादरला , भयकंपित झाला . आणि संतापला.
सहस्र सूर्य एकाचवेळी पेटून उठावेत तसं त्याचं मन पेटून उठलं.
त्यानं पाहिलं ते महाभयंकर होतं.
त्यानं पाहिलं ती कृतघ्नतेची परिसीमा होती.
शेतकऱ्यांशी, सैनिकांशी आणि खऱ्याखुऱ्या देशभक्तांशी केलेला तो द्रोह होता.
द्रोह ! राष्ट्रद्रोह !! निसर्गद्रोह !!!
पाण्याच्या निर्मळ ,पारदर्शी प्रवृत्तीला ते सारं अकल्पनीय वाटलं. अविश्वसनीय वाटलं.
कारण ;
मनुष्य पाण्याचा प्रचंड उपसा करीत होता,
पाणी अशुद्ध करीत होता,
बेजबाबदारपणे वापर करीत होता,
भविष्यकाळाची चिंता न करता पाण्याचा सर्वनाश करीत होता,
झरे उद्ध्वस्त करीत होता,
पाण्याशी द्रोह करीत होता,
पाण्यावरून भांडत होता, रक्तरंजित संघर्ष करीत होता,
जलचरांचा , निरागसांचा , वृद्धांचा , प्राणिसृष्टीचा विचार न करता केवळ आणि केवळ क्षुद्र स्वार्थापोटी पाणी संपवीत होता.
पाण्याचा तो थेंब खजील झाला.
हे सारं पाहण्यापेक्षा विरून जावसं वाटलं त्याला .
क्षणभर तो थांबला.
त्याच्या लक्षात आलं , आपणही तहानलेले आहोत.
माणसानं सर्व काही लक्षात घेऊन थेंब थेंब जपायला हवा.
अगदी प्राणाच्याही पलीकडे.
हीच तहान लागली त्याला .
आणि आशेनं तो पाहू लागला;
एकदा सैनिकाकडे , एकदा शेतकऱ्याकडे आणि…
…एकदा कृतघ्न असणाऱ्या माणसाकडे तो पाहत राहिला …
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
Leave a Reply