मनस्वी ‘मुन्नी’स…
आज तुला आमच्यातून जाऊन सात वर्षे झाली.. सहज मागे वळून पाहिलं तर ते मनाला पटतही नाही.. असं वाटतं तू अजूनही आमच्यातच आहेस..
तुझा जन्म १९५५ मधील ‘शिक्षक दिना’चा! आणि शेवटपर्यंत तूही तशीच वागलीस.. एखाद्या कडक शिक्षिकेसारखी! तू हुजूरपागेत शिक्षण घेतलंस.. नंतर मानसशास्त्र विषय घेऊन बीए झालीस आणि जर्नालिझमचा कोर्स केल्यानंतर १९७२ पासून १७ वर्षे दूरदर्शनवर वृत्त निवेदिकेचं काम केलंस.. त्यावेळी तुला पाहण्यासाठी आम्ही सर्वजण बातम्या ऐकायचो..
१९८३ पासून तू रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. ‘तू फक्त हो म्हण’ नाटकाच्या निमित्ताने जाहिरातीसाठी मी तुझे फोटो काढले होते. १९८६ पासून मराठी चित्रपटांतून तू दिसू लागलीस. ‘गडबड घोटाळा’, ‘धाकटी सून’, ‘तू सौभाग्यवती हो’ अशा चित्रपटांतून भूमिका करीत असतानाच तू स्वतः चित्रपट निर्माती होण्याची स्वप्नं पहात होतीस…
‘कळत नकळत’ या चित्रपटाची निर्मिती करुन तू पदार्पणातच अनेक पुरस्कार प्राप्त केलेस!! या निर्मितीपासूनच तुला चित्रपटाच्या यशाचं ‘गमक’ कळलं.. आणि तुझा नंतरचा प्रत्येक चित्रपट लोकमान्य आणि राजमान्य ठरला!
‘चौकट राजा’ या वेगळ्या विषयावरील चित्रपटाने तुझ्यातील संवेदनशीलपणा कळला.. मतिमंद नायकावरचा, हा चित्रपट तू ‘बोन्साय’ या कथेवरुन केलास. त्यातील नंदूच्या बालमैत्रीणीची, मुन्नीची भूमिका तू उत्तम साकारलीस.. नंदूच्या अपघाताला स्वतःच दोषी असल्याचं शल्य, तुझ्या चेहऱ्यावर चित्रपटभर जाणवत राहिलं…
त्यानंतर तू ‘सवत माझी लाडकी’चं दिग्दर्शन आत्मविश्वासानं स्वतः केलंस.. या चित्रपटाच्या पुण्यातल्या प्रदर्शनाच्या निमित्तानं तू आमच्या ऑफिसवर आलीस.. संध्याकाळची वेळ होती.. लाईट गेलेले.. मेणबत्तीच्या उजेडात तू जाहिरातीचा मजकूर लिहून दिलास व म्हणालीस, ‘नावडकर, आता चित्रपट मी तुमच्या ताब्यात दिला आहे, त्याची जाहिरात कशी करायची ते तुम्हीच ठरवा.. अवधूत साने तुमच्या मदतीला राहील..’ आम्ही मन लावून, कल्पक जाहिराती केल्या. चित्रपट सलग ‘हाऊसफुल्ल’ होऊन रौप्यमहोत्सवी ठरला…
‘तू तिथं मी’च्या निर्मिती प्रसंगी स्थिरचित्रण व जाहिरातीची तू आम्हा बंधूंना संधी दिली. पुण्यातील दोन महिने चाललेल्या शुटींगसाठी मी युनिटसोबत होतो.. त्यावेळी तू मालिका, नाटकांच्या प्रयोगातून धावपळ करीत शुटींगला हजर रहायचीस.. रात्रीची जागरणं, प्रवास, अवेळी खाणं, झोपणं अशा कष्टांतून तयार झालेला हा चित्रपट सुवर्ण महोत्सवी झाला. त्याला राज्य पुरस्कारही मिळाले..
त्यानंतर ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रणाच्या निमित्ताने तुझ्याशी पुन्हा संपर्क आला. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे व मुंबई दोन्ही ठिकाणी झाले. चित्रपटाचा विषय चाकोरीबाहेरचा होता. चित्रपटातील भाषा ही हिंदी मराठी अशी मिक्स होती. या चित्रपटातील तुझी भूमिका क्लायमॅक्सच्या कोर्टसीनमधील वकिलाची होती..
‘आनंदाचं झाड’ हा अस्मिता चित्रचा शेवटचा चित्रपट! त्यानंतर तू काही मोजकेच चित्रपट केलेस..’प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा तूझी भूमिका असलेला शेवटचा चित्रपट..
रंगभूमी, चित्रपट व मालिका या तिन्ही क्षेत्रांत तू नाव कमावलंस.. त्या योगदानाबद्दल तुला वेळोवेळी उदंड राष्ट्रीय व राज्य पुरस्कारही मिळाले.. एका मराठी मुलीने मिळविलेले हे नेत्रदीपक यश खरंच कौतुकास्पद आहे!!
२०१४ साली कॅन्सरशी लढा देता देता शेवटी ६ ऑगस्टला, तुला हार मानावीच लागली.. त्या घटनेला आज सात वर्षे झाली..
एक झोका ऽऽ एक झोका ऽऽ
‘चुकला’ काळजाचा ठोका….
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-८-२१.
Leave a Reply