नवीन लेखन...

एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही. तिने रोज रात्री येऊन पाठपुरावा करण्याचे ठरविले. पण तिला आवाजाचे नेमके उगमस्थान सापडेना. अखेर दोन आठवड्यानंतर तो आवाज करणारा प्राणी त्या पठ्ठीने शोधून काढला. ती होती वटवाघळे. आवाज म्हणजे होते नर-मादीचे प्रणयाकुल चित्कार. त्यानंतरच्या बऱ्याच खटाटोपीनंतर मर्लीनने प्रणयात दंग झालेल्या एका जोडप्याला आपल्या कॅमेऱ्यात पकडले. वटवाघळे जवळून दिसल्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या वटवाघळांना चक्क कोल्ह्याचा चेहरा होता. त्यांना हवेत पण स्वैरपणे उडता येत होते. म्हणून वटवाघळाचे नामकरण केले, ‘हवेत उडणारा कोल्हा’.

मर्लीनच्या सुरूवातीच्या अन्वेषणानंतर जगभरच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला वेग आला व उडणाऱ्या कोल्ह्याचा तपशील नियतकालिकांतून सादर होऊ लागला. प्रसिध्द होणारा तपशील मनोरंजक होता. हा अत्यंत लाजरा प्राणी असल्याचे आढळले. प्रियाराधन चालू झाल्यावर जवळपास कुणी फिरकल्याचे त्याला अजिबात खपत नसे. त्याच्या सगळ्या हालचाली कशा खाजगी व पार गुपचूपपणे चालायच्या. तो आपल्याच मस्तीत गायला लागल्यावर केसाळ पंखांची मोठ्या खुशीत फडफड करत असे. प्रिया जवळपासच असायची. पण फांदीवरच्याच प्रियेला मस्त साद घालायला त्याला आवडे. प्रेमाच्या धुंदीत नसला की तो केसाळ पंख मिटून घेई व गालावरचे केसाळ गोब्रे कप्पे मस्तपैकी फुगवत असे. त्यावेळी शरीरातल्या गाठीतून एक सुवासिक स्त्राव बाहेर येई. या गंधामुळे प्रिया बेभान होऊन जाई. ती त्याच्यावर प्रचंड लुब्ध होई! मग प्रणयचेष्टांना रात्रभर नुसता ऊत येत असे. मदनमस्तीत त्यांची प्रणय साद इतकी जबरदस्त असे की दोनशे मीटरवरही ती ऐकू येई. एवढ्या आर्त प्रणयानंतर प्रेयसी एकदाची भर पहाटे त्याच्याजवळ येई. तेही प्रणयगान आळवून आळवून तिला प्रचंड खूश केल्यावर. कधी कधी तर आपल्या लगटीने तिला पार भंडावून टाकल्यावर. मग त्यांच्या प्रणयाचा पारा बराच वर जाई. त्याने आळवलेल्या  वटवाघळी प्रणय गीताचे जणू बोल असावेत.

‘‘येशील येशील येशील राणी, पहाटे पहाटे येशील?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील, देशील ?’’

नराचे प्रियाराधन रात्रभर चालू राही, रंगात आल्यावर साडे पाच फुटाचे विशाल पंख सताड पसरून तो तिच्याभोवती नुस्ता पिंगा घाले. बऱ्याच वेळानंतर त्याची भ्रमंती थांबे. तोपर्यंत पहाट उजाडलेली असे. मात्र मादीला त्याची लगट  व  मर्दानी जोश अजिबात पसंत नसे. पण त्याची आपली प्रियेची मनधरणी आणि तिला लाडीक साद घालणे चालूच.

“आम्ही लावण्यसुंदर जिंकायला द्वंद्व करतो. तू काय करतोस?” असा मनुष्यप्राण्याने उर्मट प्रश्र्न विचारला तर उडणाऱ्या कोल्ह्याला लगेच समजेल आणि त्याला  अचानक मनुष्य वाचा फुटली तर तो गर्वाने उद्गारेल, ‘फुस्. त्यात काय एवढं फुशारकी? तुम्ही केव्हातरी एखाद्या किंवा फार तर दोन सुंदरींसाठी लढता आणि मग बाईवर नुसती गाणी खरडत बसता. ‘तुझी चाल तुरूतुरू-जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात-नागीण सळसळली’ – किंवा बाईवर अगदी लट्टूच झाला तर खरडता, ‘तूने काजल लगाया तो दिनमे रात हो गयी’. अरे, हे काय  पागलपणाने नुसतं खरडत बसायचं? आम्ही बघा कसे देखण्या बाईसाठी दर रात्री व्दंव्दाला तय्यार आणि रक्तबंबाळ होऊन तिला जिंकून पटकावतच’’!

नेमक्या याच विषयाचा ध्यास घेऊन मर्लीनने संशोधन चालू ठेवले. ती लिहिते, ‘‘संध्याकाळ झाली आणि अरण्यातल्या झाडांवर उडत्या कोल्ह्यांची गर्दी जमायला लागली. प्रत्येक कोल्हा-वटवाघूळ आपला प्रदेश व सरहद्दी आखायला लागतो. नव्याने आलेले जुने भिडू प्रदेश बळकावण्यासाठी हमरीतुमरी करतात. पण अखेर समझौता होतो व प्रकरण थोडक्यात संपते. रात्रीचे अकरा वाजले की एकेक मादी यायला सुरूवात होते’’. साहजिक आहे पुरूषांपेक्षा तिला नट्टपट्टा करायला वेळ लागतो ना? मग नराच्या प्रणयगीताचा स्वर वर चढायला लागतो. त्याचा पिंगा चालू होतो. मादी ते डोळे भरून पाहत असते व ऐकतेही. मात्र तिला लगेच नराला बिलगण्याची घिसाडघाई करण्याची अजिबात गरज वाटत नाही. ती फांदीवरून हलकेच उडून जमलेल्या पुरूष मंडळीचा आढावा घेते. खरं तर मग स्वयंवराच्या ऐटबाज सोहळ्याला प्रारंभ होतो! त्यावेळी अखिल पुरूष मंडळी अक्षरशः पेटतात. तिने आपल्याकडे पहावे म्हणून स्वतःच्या  प्रणयगीतांचा स्वर उंचावतात. कारण कसेही करून  अखेर सुंदरी पटकावयची असते ना? आणि शर्यतही जिंकायची असते.

एकदा का पुरूष जमातीचा सर्वव्यापी आढावा संपला की मादी हळूच आवडत्या नराच्या जवळच्या फांदीवर येऊन बसते. मग रावसाहेब कसले खूष होतात!

नराचा मग मादीभोवती नव्याने पिंगा चालू होतो. पण समजा, दुर्दैवाने एक सुंदरी दोघांना आवडली की मग साक्षात समरप्रसंग खडा होतो! झुंझीची ठिणगी पडते. तडाखेबंद द्वंद्वाला प्रारंभ होतो. मादी मुकाटपणे दोन्ही पराक्रमी योध्ध्यांचे शौर्य डोळ्यात साठवत असते. मात्र वेडपट मानव प्राण्यांसारखी जिंकणाऱ्याच्या गळ्यात धावत धावत जाऊन एकदाची माळ घालण्याची घिसाडघाई करत नाही. ती तिच्या आवडत्या मर्दाला नजरेने खुणावते. तो सपशेल घायाळ होतो आणि तिच्या जवळ येतो. मग जे घडते ते गद्यात कशाला खरडायचचं? त्यातलं कवित्वच संपून जाईल! सारं प्रकरण रंगत जातं, ‘हम बने तुम बने एक दूजेके लिये-आय् डोन्ट नो व्हॉट यू से’.

साधारणतः मर्द नंतर मादीच्या जवळपासच रेंगाळतो. अगदी लाडीक बाचाबाची झालीच तर ते हाताने एकमेकाला ढकलतात. ते किती सुरेख रूसणे फुगणे! ती सारखी अगदी नराला खूष ठेवायच्या प्रयत्नात असते. नर मादीच्या मिठीत जवळजवळ पहाटे तीनपर्यंत राहतो. दोघे दमल्यावर दूर होतात. त्यांच्या बर्‍याच तासांच्या पहिल्या मीलन प्रसंगी नर 26,000 वेळा मादीला साद घालतो व निदान एक लाख वेळा पंखांचा आवाज करतो. पण खरं तर ते असते, प्रियेची आळवणी करतांना कळवळून गायलेले एक मंगल गीत आणि माणसांच्या  भाषेत त्याचे बोल असतात,

“मेरे मनकी गंगा तेरे  मनकी जमना, बोल राधा, बोल संगम होगा के नही”

आणि तिला अखेर एकच म्हणण्याचा पर्याय उरतो……

“होगा, होगा, होगा !!”

कालांतराने मादी बाळंतीण होते. बाळ आईला सतत बिलगून असते. मात्र एकेवेळच्या  तिच्या प्रियकराचा त्यावेळी कुठेच पत्ता नसतो. मादीला वर्षभरात केव्हाही पिले होतात. पण पावसाळा जवळ आला की जन्माचे प्रमाण वाढते. बाळ जन्मल्यानंतर इतरांच्या नजरेस पडू नये म्हणून आई त्याला उराशीच कवटाळून ठेवते. फार कशाला, उडतांना पण बाळाला उराशीच घेऊन निघते. त्यावेळी खरं म्हणजे बाळाचे वजन आईच्या वजनाच्या दोन तृतियांश म्हणजे चांगलेच जड असते. पण आई बाळाच्या संगोपनात बिलकूल हलगर्जीपणा करत नाही.

मर्लीनच्या संशोधनातून बरेच महत्त्वाचे निष्कर्ष सादर झाले. कोल्हा-वटवाघळांना पिकलेली फळे खायला फार आवडतात. शेतकऱ्यालाही पिकलेले फळ नको असते. त्यामुळे एका अर्थाने ते शेतकऱ्याचे दोस्त बनतात. डॉ. थॉमस या शास्त्रज्ञाच्या मते, फळधारणा व बीज प्रसारण या वटवाघळामुळे जलद होतात. जंगल पुनुरूज्जीवन कार्यात कोल्हा-वटवाघळांचा मोलाचा हातभार ठरतो. कोल्हा-वटवाघूळ स्वतःच्या वजनाच्या अडीचपट फळे खातात व पंधरा मिनिटात पचवून टाकतात. त्यांच्या विष्टातल्या बिया रानभर पसरतात व वनस्पती,  उत्पादनाचा वेग वाढवतात. काही ठिकाणी तर सुमारे 95 टक्के वनस्पती वाढीला त्यांची मदत होण्याचे आढळले. पूर्व आफ्रिकेतल्या पेम्बा बेटावर असा जंगल विस्तार मोठ्या प्रमाणात होतो. तर पश्र्चिम आफ्रिकेतल्या महत्त्वाच्या झाडांचे बीजारोपण वटवाघळांमुळे झाल्याचे आढळले.

मर्लिन लिहीते, वटवाघळाच्या या अधाशीपणामुळे त्याचे नाव पडले, ‘फळांवर तुटून  पडणारे खादाड वटवाघूळ’. त्याच्या पखांचा विस्तार तब्बल साडे पाच फूट असतो. म्हणजे झाली सर्वसाधारण बाईची उंची. वजन असते अर्ध्या किलोपेक्षा जास्त. निसर्गवृध्दीच्या आणि आर्थिक दृष्टीने हे वटवाघूळ महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्य वनस्पतीच्या जोमाने वाढीला याची मदत होते. उडणाऱ्या कोल्ह्यासारख्याच वेगवेगळ्या 167 वंशपेशी आहेत व हे जगातले सर्वात लठ्ठ वटवाघूळ समजले जाते. त्याच्या वर्दळीपासून दूर राहण्याच्या एकलकोंड्या स्वभावधर्मामुळे या वटवाघळाचा वंश नष्ट होण्याची वेळ आली होती. पण ते भय आता टळले आहे.

नव्वदच्या दशकापर्यंत शिकाऱ्यानी वटवाघळे बंदुकीने ठार मारण्याचा सपाटा लावला होता. दररोज वीस ते साठ उडते कोल्हे मारले जायचे. कारण ते स्वादिष्ट असतात. मात्र आता यावर कायद्याने प्रतिबंध आणला आहे. पेम्बा बेट उडणाऱ्या कोल्ह्यासाठी आता कमालीचे लोकप्रिय झाले आहे. हल्ली केवळ उडते कोल्हे पाहण्यासाठी पर्यटकांची या बेटावर गर्दी होते. वीस वर्षापूर्वी उडणाऱ्या कोल्ह्यांची संख्या काही शेकड्यावर होती. सध्या ती 35,000 वर येऊन पोहोचली. याचे यश मुख्यतः सरकारी मोहिमेला  व स्थानिक जनतने दिलेल्या उदंड पाठिंब्याला जाते. नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या वंशाचे पुनरूज्जीवन कार्याची मोहिम हाती घेतलेल्या देशांना हे उदाहरण स्फूर्तीदायक ठरले आहे.

कोल्हा वटवाघळे लहान मोठ्या आकाराची असतात. पेम्बा बेटावरचा  राक्षसी आकाराचा असा उडणारा कोल्हा. पण मोठ्या आकाराची अशी वटवाघळे आता निर्वंश झाली.

प्रथम प्रथम ही कोल्हा-वटवाघळे फक्त पेम्बा बेटावरच आढळतात असा समज होता. मात्र आता आशियाई देशात पण अशी वटवाघळे आढळली आहेत – अगदी भारतात सुध्दा.

एके काळी हिंदुस्तान उपखंडात उडणाऱ्या कोल्ह्याचे आढळलेले हे पुरातन चित्र. अशी वटवाघळे लाखो वर्षापूर्वी उपखंडात होती असा या चित्रावरून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला.

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.

त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..