नवीन लेखन...

एका बोटांचे कौशल्य

आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन‌ अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.

मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची‌ पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.
जन्मत:च बहुविकलांगता किंवा सेरीब्रल पाल्सी ही शारीरिक अवस्था घेऊन १९६६ मध्ये जन्माला आलेल्या मालिनीमध्ये वयानुसार विकासाचे टप्पे दिसत नसल्याने आईबाबांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. अनेक प्रकारच्या चिकित्सा केल्यावर शेवटी ती पाच महिन्याची असताना ती स्पॅस्टिक आहे हे निदान डॉक्टरांनी केले. मात्र त्याबरोबरच तिची बौद्धिक वाढ खुंटलेलीच राहील असेही सांगितले. मेंदूमधील काही पेशींना धक्का बसल्यामुळे तिला तोल सावरणे, चालणे, बोलणे, गिळणे या सर्व क्रियांना भयंकर त्रास व्हायचा.

सुदैवाने मालिनीच्या पालकांची सांपत्तीक स्थिती मजबूत होती. तसेच सर्व नातेवाईक सुशिक्षित असल्याने मालिनीच्या पालकांना त्यांच्याकडून भक्कम आधार मिळाला. भारतातील सर्व डॉक्टरांनी यावर कोणताही इलाज नाही व हिची ही स्थिती कायम राहील हे ठामपणे सांगितले. मात्र तिच्या आईवडिलांनी यावर विश्वास न ठेवता या विकृतीबद्दल जमेल तेवढी माहिती मिळवायला सुरुवात केली. तोल सांभाळण्यासाठी, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्यासाठी व्यायाम करून घ्यायला सुरुवात केली. मालिनीची शारीरिक क्षमता कमी असली तरी बौद्धिक क्षमता मात्र सर्वसामान्य किंवा सर्वसामान्यांपेक्षा जास्त असल्याने आजूबाजूला काय चालले आहे याचे भान तिला असे. आई वडील तिला गोष्टी वाचून दाखवीत.

त्याकाळी वैद्यकीय शिक्षण व उपचार याबाबतीत इंग्लंड भारतापेक्षा खूपच आघाडीवर होता. मालिनीच्या भवितव्याच्या दृष्टीनी तिच्या पालकांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा केलेल्या मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये असे दिसून आले की तिचा बुद्ध्यांक १२० म्हणजे सरासरीपेक्षा बराच जास्त होता. (१०० बुद्ध्यांक हा सरासरी बुद्ध्यांक मानला जातो.) म्हणजेच मालिनीचे केवळ शरीर साथ देत नव्हते. रॉजर व पुढे चेने शाळेमध्ये तिला उत्तम शिक्षण मिळाले. त्याचबरोबर फिजिओथेरपिमुळे तिच्यामध्ये बरीच शारीरिक प्रगती झाली. बसणे, रांगणे यासारख्या शारीरिक क्रिया तिला आता करता येऊ लागल्या. तिची स्मरणशक्ती चांगली आहे हे लक्षात आल्यावर वडील तिच्याशी स्मरणशक्तीला चालना देणारे खेळ खेळू लागले. कित्येक वेळा ती वडिलांनासुद्धा पराजीत करत असे.

इथे ती भारताप्रमाणे इतर मुलांबरोबर खेळू शकत नसल्याने एकटी पडत नव्हती की लोकं तिच्याकडे विचित्र दृष्टीने बघत नव्हते, कुजबुजत नव्हते, अनाहूत सल्ले देत नव्हते. भारताप्रमाणे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही सतत कुरतडणारी जाणीव इथे नव्हती.

चेने या संस्थेमध्ये सेरेब्रल पाल्सी वरचे सर्वांगीण ज्ञान दिले जाऊन सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास प्रोत्साहन दिले जात असे. अनेक व्याख्यानांमध्ये मालिनीचे प्रत्यक्ष उदाहरण देउन विषय समजून दिला जात असे. शिक्षक, फिजिओथेरपिस्ट तसेच डॉक्टरस् यांच्याबरोबरच मालिनीचे पालक आणि नातेवाईक यांनी सक्रीयपणे केलेल्या संगोपनामुळे तिचा बौद्धिक विकास इतर मुलांप्रमाणेच होत गेला. ते तिला मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचे, विविध गोष्टी दाखवायचे, शैक्षणिक खेळ खेळायचे. सर्वजण तिला सर्वसामान्य मुलाप्रमाणेच वागणूक देत असत. यामुळे भावनिक पातळीवरही मालिनीचा विकास होऊ लागला. इंग्लंडमधील अनुभवाच्या आधारे दिव्यांग व्यक्तींना शिक्षण देणारी संस्था उभारण्याचे ठरवले. त्यांनी समविचारी व्यक्तींच्या मदतीने सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन ही संस्था स्थापन केली.

मध्यंतरीच्या काळात आईवडिलांचा घटस्फोट, त्यांचा पुनर्विवाह यासारख्या काही कौटुंबिक घडामोडींना मालिनीला सामोरे जावे लागले. नवीन संस्थेमध्ये जरी विकलांग मुलांना शिक्षण देण्याची सोय असली तरी कोणताही योजनाबद्ध अभ्यासक्रम नसल्यामुळे तसेच मूल्यमापनाची सोय नसल्यामुळे मालिनीची बौद्धिक वाढ खुंटल्यासारखी झाली. मालिनीला वाचादोष असल्यामुळे इतरांना तिचे बोलणे समजण्यास कष्ट पडत असत. त्यामुळे तिला तिचे विचार व्यक्त करणे अवघड जायचे. त्यामुळे तिच्याबरोबर संभाषण करणारी व्यक्ती तिला बालबुद्धीची समजायची. तिच्या वयाच्या १३व्या वर्षांपर्यंत हे असेच चालू राहिले. नंतर कॅनन कम्युनिकेटर या साधनाच्या सहाय्याने ती इतरांबरोबर संभाषण करू लागली. . उच्च दर्जाची बुद्धीमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘थोमास देलारू’ या इंग्लंडमधील संस्थेत शिक्षण घेण्याची संधी तिला १९८१ मध्ये मिळाली. इथे तिने पहिल्यांदा व्हील चेअर वापरायला सुरुवात केली. या संस्थेत सर्व ठिकाणी व्हील चेअरवरून फिरता येईल अशी सोय होती. तिला तिथल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे वसतिगृहामध्ये राहणे हा एक नवा अनुभव होता. त्यामुळे सुरुवातीला जरी घरच्यांची आठवण येऊन बेचैन व्हायला झाले तरी स्वत:चे अंथरूण घालण्यापासून ते स्वत:चे कपडे स्वत: घालणे यांसारख्या अनेक गोष्टी ती इतरांच्या मदतीशिवाय करायला शिकली.

आता पुढे भारतात येऊन महाविद्यालयीन जीवनाचे शिखर सर करायचे होते. तिला मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला.

कॉलेजमध्ये लेखनिकाच्या सहाय्याने ती परीक्षेचे पेपर लिहित असे. बारावीला तिला पहिला वर्ग मिळाला.

मुंबईत आल्यावर फिरोजच्या मदतीने तिने ADAPT म्हणजे Able Disabled All People Together हे दिव्यांग व सामान्य व्यक्तींना एकत्र आणणारे एक करमणूक केंद्रं सुरू केलं.

ईमेल आणि इंटरनेट वापरायला शिकल्यामुळे तिला इतरांशी संपर्क साधणे सोपे झाले. या नव्याने कमावलेल्या नवीन आत्मनिर्भरतेच्या बळावर तिने लिंगभाव या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व तिला सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मुलाखत देऊन प्रवेशही मिळाला. विद्यापीठानी तिला हा एक वर्षाचा अभ्यासक्रम चार वर्षात पूर्ण करण्याची सवलत दिली.

दोन पदव्युत्त अभ्यासक्रम केल्यावर आपल्याला सहज नोकरी मिळेल या तिच्या भ्रमाला मात्र सतत मिळणाऱ्या नकारांनी टाचणी लागली. मग भावाच्या सल्ल्याने ती ‘लिहिती’ झाली. २००५ पासून तिला परदेशातील आणि भारतातील अनेक प्रतिष्ठीत शिक्षण संस्थांमध्ये व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे यायला सुरुवात झाली. जगाचा दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे याची जाणीव तिला या व्याख्यानांच्या निमित्ताने होउ लागली.

तेवढ्यात तिच्या करता आणखी एक दार उघडले. तिला मुंबईला ऑक्सफर्ड बुकशॉपमध्ये सिनिअर इव्हेंट्स मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. पुस्तकांची विक्री वाढवण्याचे जवाबदारी तिच्यावर टाकण्यात आली आणि थोड्याच कालावधीमध्ये तिने आपली निवड सार्थ असल्याचे पटवून दिले. अभिजन वर्गात तिने तिची स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. तिने पुन्हा ADAPT च्या कामामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. भारतामध्येही हळूहळू दिव्यांगांचे प्रश्न, त्यांचे अधिकार याबाबत जागृती व्हायला सुरुवात झाली होती. मालिनीने तिच्या इतर सहकाऱ्यांच्या सहाय्याने ‘दिव्यांगांना नागरीकत्वामध्ये येणारे अडथळे’ या विषयावर एक परिषद यशस्वीरीत्या आयोजित केली. या परिषदेमध्ये देशविदेशातून अनेक नामवंत सहभागी झाले. इतरही अनेक उपक्रम मालिनी राबवू लागली. दिव्यांगां जनहित याचिका दाखल केल्या, सार्वजनिक ठिकाणी त्यांना वावरणे सुकर व्हावे म्हणून आंदोलने केली. ‘मुंबई मॅरेथॉन’ मध्ये सहभागी होण्यास दिव्यांगांना परवानगी मिळावी म्हणून चळवळ केली.

भारतातील अपंगत्व हक्कांच्या अग्रगण्य वकिलांनी तिच्या असाधारण जीवनाबद्दल प्रकाशित केल्या आहेत .किंबहुना, तिची ‘एक बोट हे तिची जीवनरेखा आहे, तिचे ‘शक्तीचे केंद्र’ आहे. ती प्रथम टाइपरायटरवर, नंतर संगणकावर आणि नंतर, मजकूर संदेश पाठवण्यासाठी मोबाईल फोनवर टाइप करण्यासाठी वापरते. मालिनी चिब, 1966 मध्ये जन्मलेल्या, एक भारतीय अपंगत्व हक्क कार्यकर्त्या आणि लेखक आहेत ज्यांना सेरेब्रल पाल्सी आहे. तिने दोन वर्षांच्या कालावधीत फक्त एका बोटाने टाइप करून “वन लिटिल फिंगर” हे पुस्तक लिहिले. तिच्या जन्मानंतर, तिचे पालक तिची चांगली काळजी घेण्यासाठी इंग्लंडला गेले. सेरेब्रल पाल्सी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक बोर्डिंग स्कूल, थॉमस डेलारू स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ती नंतर इंग्लंडला परतली. तिने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बीए आणि लंडन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये जेंडर स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

डिसेंबर २०१० मध्ये, चिबने सेज पब्लिशिंगने प्रकाशित केलेले तिचे पहिले पुस्तक आणि आत्मचरित्र “वन लिटिल फिंगर” लिहिले.

अनेक दिव्यांग लोकांनी भव्य दिव्य काम करून

धडधाकट लोकांना प्रेरणेची पायवाट दाखवली आहे.

डॉ.अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..