एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हासू
माणूस हा समाजप्रिय आहे, तो समूहाशिवाय राहू शकत नाही एकदा का एका समूहात रमला की समूह सोडतांना त्याला दुःख होतं ,किंबहुना तो सूमह सोडायला तयार होत नाही ,एकदा एका वातावरणात जर आपण रमलो तर तेथून जावेसे वाटत नाही हे जरी खरे असले तरी परंतु माणसाला काही तरी कारणास्तव ते वातावरण बदलणे भाग असते किंवा तो समूह सोडणे क्रमप्राप्त असते. एकदा वातावरण सोडले की पुन्हा नवीन वातावरण तयार करायला वेळ लागतो .पुन्हा नवीन समूहात स्वतःला सामावून घ्यावे लागते.नवीन समूह त्याला सहजा सहजी स्वीकृत करत नाही. त्यातल्या त्यात काही माणसांना तर समूह सोडायचा किंवा समूहात रहायचा फार छंद असतो. कधीही अशी माणसं एका सूमहात जास्त काळ राहत नाहीत.सतत समूह किंवा वातावरण बदलण्याची यांना सवय झालेली असते.परंतु काही माणसांना मात्र सूमह बदलणे अतिशय आवघड वाटत असते.
काही माणसांवर फार मोठा परिणाम या घटनेमुळे होत असतो त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींचे वय कमी आहे अन् असा आघात जर त्याच्यावर झाला तर मग मात्र त्याचे परिणाम दिसून येतात असेच माझ्या बाबतीत घडले मला वयाच्या अगदी आठराव्या वर्षीच डी.एड झाल्याबरोबर नोकरी लागली.त्यावेळी मी अगदी वयाने जसा लहान वाटत असे तसाच अंगकाठीने सुध्दा अतिशय लहान होतो.त्यात माझी शिक्षकाची नोकरी, अगदी सातवीच्या वर्गातील विद्याथ्यांमध्ये बसलो तर शिक्षक म्हणून ओळखू येत नसे.डी.एड म्हणजे शिक्षण शास्त्र पदविका झाल्यानंतर लगेचच सहा महिण्यात नोकरीचा आदेश आला. माझ्या मनाला अगोदर या गोष्टीचा खूप आनंद वाटला.वाटले बरे झाले आपल्याला नोकरी लागली. कारण घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती.पण गाव कोणते मिळेल? याची मात्र फार मोठी उत्सुकता होती. माझी कल्पना होती आपल्या आसपासचे कोणतेही गाव मिळेल. जेव्हा नोकरीचा आदेश आला. गावाचे नाव वाचले तेव्हा अगदीच निराशा झाली. गावाचे नाव होते गारगोटी तांडा या गावाचे मी कधीच नाव सुध्दा ऐकलेले नव्हते.तांडा असतो एवढे माहित होते परंतु कधी जवळ जाऊन पाहिलेले नव्हते.माझ्या सर्व जवळच्या मित्रांना मात्र चांगली चांगली गावं मिळालेली होती मला मात्र असे गाव मिळालेले होते. ठिक आहे म्हटलं आपण आजून हे गावंच पाहिलेले नाही मग अत्ताच कशाला ह्या गावाविषयी आपण काही बोलावे.माझ्या मनात कल्पना होती की निदान ज्या गावात सातवी पर्यंत शाळा आहे असे तरी गाव मिळावे परंतु तालुक्याला विचारपूस केली तर कळलं
की या गावात फक्त दुसरी पर्यंतच शाळा आहे नवीन डिपीईपी अंतर्गत निर्माण झालेली ती शाळा होती.गंगाखेडला माझे एक काका रहात होते त्यांच्या कडे रात्री मुक्कामाला थांबलो.सकाळी त्या गावाला जायचे ठरवले. सोबत वडील येणार होते.सकाळी लवकर उठून सारे आवरून घेऊन तयार झालो. आगोदर केंद्र खडका येथे उपस्थित हायचे होते.सध्या जरी हे गाव सोनपेठ तालुक्यात असले तरी पूर्वीचा मात्र जंगाखेड तालुकाच होता.सोनपेठ गाडी ने निघालो सोबत काही अप-डाऊन वाले शिक्षक होतेच. त्याच्याशी चर्चा केली त्यावरून असं वाटत होतं की आपल्याला मिळालेलं हे गाव अतिशय गैरसोईच असून कोणत्याही मार्गानं गेलं तरी पाच किमी पायी चालत गेल्याशिवाय पर्याय नाही .डोळ्यासमोर अगदी धुकं जमा व्हायला लागलं .कशाला नोकरी लागली अन हे गाव काय मिळालेलं आहे ? आपल्याच वाट्याला हे असं का? आपण काय केलेलं आहे ?असे अनेक असंख्य प्रश्न विचाराच्या माध्यमातून डोक्यातून थैमान घालू लागले .पण आलेल्या गोष्टीला तर सामोरं जावंच लागणार होतं ;सुरुवातीला थोडा गाव बदलण्याचा विचार केला परंतु त्या गोष्टीला खूप उशीर झाला असे सांगण्यात आले आता काही होत नाही असे ही कळले.शेवटी कसे बसे मी आणि माझे वडील खडका या गावी आलो तिथे उपस्थित झालो. पुढे त्या तांडयाचा रस्ता विचारत विचारत आम्ही निघालो रस्त्यात कान्हेगाव लागते असे कळले.सगळा प्रवास पायीच पावसाळयाचे दिवस सगळे रस्ते चिखलाने दल दल झालेले.सोबत ज्यानी आत्तापर्यंत त्या तांडयावर प्रतिनियुक्तीने काम केलेलं होतं ते शिक्षक होते.सगळी माहिती त्याच्याकडून घेता घेता असं कळलं की त्या शाळेवर फक्त एकच शिक्षक असून तो ही प्रतिनियुक्त आहे त्यामुळे यापुढे मी रूजू झालो की मी एकटाच त्या शाळेवर मुख्याध्यापक मीच अन सहशिक्षक मीच.सोबतच्या शिक्षकाला अत्यंत आनंद झाला की आपली सुटका झाली यापुढे आपली प्रतिनियुक्ती रदद् कधी कधी पदभार देऊन आपण मोकळे होऊ असे त्याला वाटत होते. अजूनही गावं अशी आहेत की जिथे साधा चांगला रस्ता नाही बाकीच्या सोई तर विचारणेच नको.परंतु या गोष्टीचे तेथील व्यक्तीवर काहीच परिणाम नाही. सगळं कसं गुण्या गोविंदाने चाललेले दिसते. पुढे हळू हळू आमचा प्रवास सुरू झाला त्या तांडयाकडे रस्ता अतिशय दलदलीचा चप्पल तर हातातच घेऊन चालावे लागत होते. रस्त्यात एक ओढा लागला सोबत आलेले सर म्हणाले सर आता पॅंट काढावी लागेल. मांडयाएवढे पाणी आहे तसे सर्वांनी आपली पँट काढून पाण्यातून कसा बसा ओढा पार केला.गावातल्या नदीतून असे ब-याच वेळेस जाण्याची सवय होती.तरीही नवीन जागा असल्यामुळे अतिशय भिती वाटत होती.वातावरणात गारवा पसरलेला होता.पुन्हा काठावर येऊन कपडे घातले पुन्हा चालू लागलो. असा माझा शाळेचा पहिला दिवस पार पडला. आठवले तर आजही अंगावर शहारे येतात. त्या वेळी वाटत होते की मला नोकरी कशाला लागली असेल एवढ्या लवकर ? सारा परिसर अनोळखी.पुढे तिथून आम्ही चालत चालत कधी रस्ता लक्षात ठेवत ठेवत निघालो कारण पुन्हा याच रस्त्याने मला नेहमीच एकटे यावे लागणार .कसे बसे आम्ही त्या तांडयाजवळ आलो .अगदी वीस पंचवीस घरं,घरं कसली निव्वळ झोपडयाच.आम्हाला लांबूनच पाहून दोन तीन कुत्रे धावून आले.आम्ही भितीने जागेवरच थांबलो.सोबतच्या सरांनी जरा धिर दिला.शाळेच्या पहिल्याच दिवशी भू भू करून कुत्र्यांनी केलेलं स्वागत मला चांगलंच स्मरणात राहिलं आहे.
झोपडीजवळ एका ओटयावर आम्ही येऊन बसलो.एक शेंदराचा देव करुन वर ठेवल्यावरून लक्षात आलं हा मारोतीचा पार आहे.शाळेची इमारत नसल्यामुळे शाळेसाठी एक झोपडी तयार करण्यात आलेली होती.बाजूला तूराटयाचे कुड घेतलेले होते.खाली शेणानं सारवलेलं होतं समोर एक लिंबाचं झाड एक मोडकी खुर्ची एक बोर्ड झालं एवढंच ! शाळेचं फर्निचर. सोबतच्या सरांनी एका मुलाला शाळेचं दप्तर बाजूच्याघरून आणायला सांगितले दप्तर सुध्दा त्या शाळेत ठेवायला जागा सुरक्षित नव्हती म्हणून ते बाजूच्या घरीच ठेवावे लागत होते दोन-तीन हज-या प्रवेश निर्गम, प्रवेश फॉरम झालं एवढंच शाळेचं दप्तर.आम्ही आल्यामुळं तांडयातील एक दोन माणसं जवळ आली त्यांनी चहा केला.काळा चहा मला पिणे नको वाटत होते. परंतु सर म्हणाले हा चहा इथे प्यावाच लागतो.शाळतील पोरं पाहिली अगदी शेंम्बड़ी काही उघडी काही झाडाखाली बसलेली होती.काही जण मास्तर आवगो,मास्तर आवगो असं म्हणतांना मी ऐकलं होतं त्यावरून मी मनोमन हसलो होतो.तांडयावरची भाषा मी पहिल्यांदाच एवढया बारकाईने ऐकत होतो.कसा बसा पहिला दिवस सर्वजण सोबत असल्यामुळं गेला चांगला.रात्री मात्रं माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.शाळा अशी भेटेल अशी कल्पना सुध्दा नव्हती.सर्व मित्र विचारणार तुझी शाळा कशी? मी त्यांना काय सांगणार माझी शाळाच कुठे होती? त्याना सांगायला.कोणीही सहकारी नाही
आपले आपणच या सा-या प्रकराने आणि दिवसभर चालून चालून अन पावसात राहून अंग ओले झाल्यामुळे मला सनसनाटी ताप आला रात्री मी विचार करू लागलो.ही नोकरी सोडून द्यावी.पण चांगली नोकरी सोडणे म्हणजे केवढा मूर्खपणा.असे विचार थैमान चालू झाले?.काय करावे ?या विचारात एक दिवसाची केंद्रांवर रजा घेऊन गावाकडे आलो.जे आलो ते मग मात्र एवढा बिमार पडलो मला टायफाइड नंतर मलेरिया असे आजार सुरू झाले.माहिती नसल्यामुळे नोकरी जाण्याची भिती ही वाटत होती पण नाईलाज होता त्या आवस्थेत मी शाळेला जाणे शक्य नव्हते.जवळपास एक महिना मी दवाखान्यात होतो.नोकरीच्या आनंदापेक्षा ही असे गाव मिळाले यांचे दुःख कितीतरी पट जास्त होते.अशी आवस्था की एका डोळ्यात आसू तर दुस-या डोळ्यात हासू अर्थात ही गोष्ट आज सांगतांना मात्र अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की एवढया दुर्गम भागात आपण सुरूवातीचे दिवस काढले पुढे मग शाळेवर गेल्यावर याचे काहीच वाटले नाही. अतिशय आनंदाने शाळेत जात असे मी उलट घरी आल्यावरच करमत नसे अशी माझी पहिली नोकरीतील शाळा. आज ही माझ्या तेवढीच चांगल्या रितीने स्मरणात राहिली आहे.
संतोष सेलूकर, परभणी
७७०९५१५११०
Leave a Reply