एका लयीत बद्ध
प्रणय धुंद गारवा,
चांदण टिपूर नभी
छेडतो हलकेच मारवा..
स्पर्श तुझा मोहक
लाडिक तुझी अदा,
ये प्रिये जवळ तू
छेडतो मज चांदवा..
मलमली मिठी तुझी
नयन कटाक्ष मदनबाण हा,
घायाळ करी तू अशी
जीव वेडा होई असा..
लाजते तू अशी मधुर
चंद्र ही पाहतो तुला,
रोमांच उठे हलकेच
मिठीत तू घट्ट येता..
गात्र अशी सैलावली
प्रिये जवळ तू ये जरा,
मिठीत घेता अलवार
स्पर्श लाजरा बावरा..
ओठ हलकेच टिपता
आरक्त होशी तू जरा,
नजरेत खुणावे मग
प्रीतीचा सुखद सोहळा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply