“अनिरुद्धजी, इंडियन आयडॉल सुरू होणार आहे. त्यांचा ‘कास्टिंग प्रोड्यूसर’ या पदासाठी शोध सुरू आहे. या संदर्भात मुलाखतीसाठी ताबडतोब अंधेरीला येऊ शकाल का?”
“मी येतो. पण माझे नक्की काम काय असणार आहे ते समजू शकेल का?” मी विचारले.
“सगळी माहिती तुम्हाला देते. तुम्ही लगेच अंधेरीला या.” माधवी उत्तरली. या मुलाखतीसाठी मी व्हिजक्राफ्ट या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझी प्रदीर्घ मुलाखत झाली. इंडियन आयडॉलसाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या विभागात मला ऑडिशन्स घ्यायच्या होत्या. या विभागातील ऑडिशन्स गझल गायकाने कराव्या असा आग्रह या स्पर्धेचे पॅनल परीक्षक सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केल्याने एक गजल गायक म्हणून मला बोलावण्यात आले होते. हे काम तीन महिने चालणार होते. त्यासाठी अनेक वेळा प्रवास करावा लागणार होता. मला हे काम अत्यंत आव्हानात्मक वाटले. यामुळे भारतातील या प्रांतातील उत्तम तरुण गायक-गायिकांची गाणी ऐकण्याची संधी मला मिळणार होती. माझी संमती मी कळवली. पण ते माझ्याबरोबरच इतरही काही जणांशी बोलत होते. त्यामुळे मुलाखतीच्या अनेक फेऱ्या झाल्या. कधी सोनी चॅनलच्या लोकांबरोबर, तर कधी फ्रीमेंटलच्या टीमबरोबर तर कधी व्हिजक्राफ्टच्या टीमबरोबर माझे भेटणे सुरूच होते.
अशा अनेक मुलाखतींनंतर २१ जानेवारी २०१० ला संध्याकाळी सात वाजता मी व्हिजक्राफ्टबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि २२ जानेवारी २०१० रोजी सकाळी दहाच्या विमानाने मी दिल्लीला रवाना झालो. घटना अत्यंत वेगाने घडत गेल्या. माझ्या अनुपस्थितीत स्वर-मंच ॲकॅडमी प्रियांका आणि माझी विद्यार्थिनी अश्विनी चव्हाण यांनी सांभाळली. इंजिनियर झाल्यानंतर मी कुठेच नोकरी केली नव्हती. स्वतःचेच काम केले होते. ‘इंडियन आयडॉल’ ही पन्नास कोटी बजेटची मोठी स्पर्धा होती. त्यात सोनीबरोबर अजून दोन मोठ्या कंपन्या काम करत होत्या. त्यामुळे कॉर्पोरेट पद्धतीच्या कामाचा अनुभव मला मिळत होता. या तीन महिन्यात मी ५२ वेळा विमानप्रवास केला. दिल्ली, चंदीगड, कलकत्ता, लखनौ, अलाहाबाद या ठिकाणी अनेक वेळा गेलो. माधवी, पार्थ, पुनीत, परम आणि कॅमेरामन अमोल अशी आमची टीम होती. या काळात सहा हजार गायक-गायिकांच्या ऑडिशन्स मी केल्या. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक, ख्यातनाम गायिका सुनिधी चौहान यांची अनेकदा भेट झाली. चर्चा झाल्या. आघाडीचा गायक सोनू निगम याच्याबरोबर ऑडिशन घेण्याची संधी दिल्लीला मिळाली. रिऍलिटी शोची नवी दुनिया पहायला मिळाली. बरेच काही नवीन शिकायला मिळाले. आम्ही निवडलेले शंभर कलाकार मुंबईला आले आणि माझे काम संपले. या सर्व मंडळींबरोबरचे ऋणानुबंध मात्र अजूनही टिकून आहेत.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply