युरोपात आणि युरोपला लागून असलेल्या आशियाई प्रदेशांत अनेक लहान-मोठे जलाशय वसले आहेत. उदाहरणार्थ, काळा समुद्र, कॅस्पिअन समुद्र, अरल समुद्र, उर्मिआ तलाव, इत्यादी. या सर्व जलाशयांचं एकमेकांशी अत्यंत जवळचं नातं आहे. हे सर्व जलाशय एकमेकांची भावंडं आहेत. कारण प्राचीन काळातल्या एका प्रचंड तलावाचेच मागे राहिलेले हे अवशेष आहेत. ज्या तलावापासून या जलाशयांची निर्मिती झाली, त्याला संशोधकांनी नाव दिलं आहे – पॅराटेथिस तलाव! या प्रचंड तलावाचा मधला भाग हा आजच्या काळ्या समुद्राच्या जागी होता. आजच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्याला चिकटून असलेला बराचसा डोंगराळ भाग हा एके काळी पॅराटेथिस तलावाचाच भाग होता. पॅराटेथिस तलावाचं अस्तित्व संशोधकांना पूर्वीच माहित झालं होतं. इथल्या प्रदेशातल्या भूपृष्ठाचा अभ्यासही झाला होता. परंतु या तलावाच्या जडणघडणीबद्दलची आणि जीवनक्रमाबद्दलची उपलब्ध असलेली माहिती अगदीच विस्कळीत आणि त्रोटक होती. परंतु आता ब्राझिलमधील साव पाऊलो विद्यापीठातील डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी पॅराटेथिससंबंधीच्या सर्व उपलब्ध माहितीची कालानुरूप मांडणी करून, या प्राचीन तलावाच्या जीवनक्रमाचा शोध घेतला आहे. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले. त्यानंतर त्यांनी या नमुन्यांच्या चुंबकीय गुणधर्मांचे मापन केलं. पृथ्वीच्या ध्रुवांची दिशा ही काळानुसार बदलत असते. (काही काळानंतर या ध्रुवांची अदलाबदलही होते.) या बदलांना अनुसरून खडकांतल्या चुंबकत्वाच्या दिशेतही बदल घडून येतात. पृथ्वीच्या प्राचीन चुंबकत्वाची वेगवेगळ्या काळातली दिशा आणि या खडकांच्या नमुन्यांतील चुंबकत्वाची दिशा, यांची तुलना करून त्या-त्या खडकाचं वय समजू शकतं. विविध थरांतील खडकांची वयं काढण्यासाठी या संशोधकांनी याच पद्धतीचा वापर केला. त्यानंतर या खडकांचे प्रकार, त्यांच्या रचना, त्यांचं रासायनिक स्वरूप, तसंच त्यांत सापडलेले जीवाश्म, इत्यादींची या खडकांच्या वयांशी काळजीपूर्वक सांगड घातली. आणि अखेर यातूनच उभं राहिलं ते, आजच्या विविध जलाशयांना जन्माला घालणाऱ्या या प्रचंड तलावाचं चरित्र!
हा समुद्रसदृश प्रचंड तलाव सुमारे साडेतीन कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्राचा भाग होता. हा टेथिस समुद्र आजच्या युरोप आणि आशियाच्या खालच्या बाजूस पसरला होता. कालांतरानं भूपृष्ठाच्या हालचालींमुळे आजच्या युरोपातील दक्षिणेकडची जमीन उचलली जाऊ लागली आणि टेथिस समुद्राचा हा भाग मुख्य टेसिथ समुद्रापासून वेगळा होऊ लागला. या भूपृष्ठीय हालाचालींमुळे, सुमारे सव्वा कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्राचा हा भाग सर्व बाजूंनी जमिनीनं वेढला गेला आणि त्याला प्रचंड तलावाचं स्वरूप आलं. हा तलाव आकारानं भूमध्य समुद्रापेक्षाही काहीसा मोठा होता. आपल्या भारतापेक्षा थोडासाच छोटा! पृथ्वीवरच्या आजच्या सर्व तलावांतील पाणी एकत्र केलं तर जितकं पाणी गोळा होईल, त्याच्या दहापट पाणी या तलावात सामावलं होतं. या तलावाच्या पाण्यातील क्षारांचं प्रमाण बारा ते चौदा टक्क्यांदरम्यान होतं. या तलावातील जैवविविधता वैशिष्ट्यपूर्ण होती. पृथ्वीवर कुठेही न आढळणारे विविध वैशिष्ट्यपूर्ण मृदुकाय तसंच कवचधारी प्राणी या तलावात वावरत होते. त्याचबरोबर इथे छोट्या आकाराचे डॉल्फिन आणि व्हेल हे जलचरसुद्धा आढळत होते. या छोटेखानी व्हेलचा आकार तर तीन मीटर इतकाच होता. आश्चर्य म्हणजे आज आफ्रिकेत आढळणाऱ्या जिराफ किंवा हत्ती यासारख्या प्राण्यांचे पूर्वजही या परिसरात राहात होते.
या तलावाचं आयुष्य होतं सुमारे पन्नास लाख वर्षांचं. आपल्या या पन्नास लाख वर्षांच्या आयुष्यात या तलावानं अनेक चढ-उतार पाहिले. यापैकी, या तलावाच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील चार मोठ्या घटनांदरम्यान या तलावाच्या स्वरूपात खूपच मोठे बदल घडून आले. या काळांत युरोपात तीव्र हवामानबदल घडून आले होते व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तलावातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन, त्यातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. यातील चवथ्या घटनेच्या काळात तर या तलावातलं पाणी सुमारे एक-तृतियांशानं कमी झालं आणि तलावातील पाण्याच्या पातळीत अडीचशे मीटरपेक्षाही अधिक घट झाली. यावेळी या तलावाचा सुमारे सत्तर टक्के पृष्ठभाग कोरडा झाला होता. तसंच या तलावातील क्षारांचं प्रमाण सुमारे तीस टक्क्यांपर्यंत वाढलं होतं. या तलावात वास्तव्याला असणाऱ्या सजीवांवर या सर्व बदलांचा अर्थातच मोठा परिणाम झाला. यातल्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या तर, वाचू शकलेल्या प्रजाती या शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाल्या. या सर्व चढ-उतारांच्या दरम्यान, इथली जमीन आलटूनपालटून पाण्याखाली जात होती. त्यामुळे या तलावाभोवती मोठी झाडं फार काळ तग धरू शकली नाहीत. परिणामी, या तलावाच्या उत्तरेकडील जमिनीच्या, सुमारे तीन हजार किलोमीटरच्या लांबलचक पट्ट्यात फक्त गवताची वाढ होऊ शकल्याचं दिसून येतं.
या तलावाचा शेवट होण्यामागचं कारण मात्र हवामानाशी संबंधित नसून, ते या तलावाच्या निर्मितीमागील कारणाप्रमाणेच भूपृष्ठाच्या हालचालींशी संबंधित आहे. भूपृष्ठाच्या हालचालींमुळे भूमध्य समुद्र आणि हा तलाव, या दरम्यानच्या जमिनीच्या पृष्ठभागाची उंची हळूहळू कमी होऊ लागली. त्यामुळे एक नैसर्गिक मार्ग तयार होऊन, या तलावातलं पाणी थेट भूमध्य समुद्रात वाहून जायला लागलं. हे पाणी तलावातून बाहेर पडताना, तिथे दीर्घ काळ टिकलेला एखादा मोठा धबधबा निर्माण झाला असल्याची शक्यताही हे संशोधक व्यक्त करतात. या तलावाच्या नष्ट होण्यामुळे, या परिसरातील प्राणिजीवनावरही मोठा परिणाम झाला. इथली परिस्थिती इतकी बदलली की, इथले जिराफाचे आणि हत्तीचे पूर्वज हा परिसर सोडून आफ्रिकेत वास्तव्याला गेले. तिथेच पुढच्या काळात त्यांची उत्क्रांती होऊन, आजचे जिराफ आणि हत्ती निर्माण झाले.
पॅराटेथिस तलाव आटला… परंतु मागे राहिले ते या आटलेल्या तलावाचे – कॅस्पिअन समुद्र, अरल समुद्र, उर्मिआ तलाव – यासारखे काही अवशेष. आणि त्याचबरोबर या तलावाचा मधला भाग. हा भागही कालांतरानं पाण्यानं भरला आणि आज सुमारे दीड किलोमीटर खोल असणाऱ्या काळ्या समुद्राची निर्मिती झाली…!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: D.V. Palcu & Utrecht University.
Leave a Reply