नवीन लेखन...

एका पुतळ्याची ‘कर्म कथा’

१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला.

आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्‍यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्‍या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली. परंतु आर्थिक किंवा सामाजिक दृष्टीने आम्ही फारच लहान पडलो. त्यामुळे शरद पवार यांना भेटायचे आम्ही ठरवले. काही दिवसानंतर त्यांची भेट झाली. त्यावेळी आम्ही त्यांना अत्रे यांचे लहानसे स्मारक उभारण्याची कल्पना सांगितली. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या पुरूषाचे स्मारक लहान असावे हे मला पटत नाही त्यांचे भव्य स्मारकच उभे राहिले पाहिजे. असे सांगून त्यांनी बँकेत खाते उघण्यासाठी आम्हाला पाच हजार रूपयांचा चेक दिला. त्यानुसार आम्ही दादर जनता सहकारी बँकेत खाते उघडले आणि स्मारकाचे काम सूरू होण्यापूर्वीच ती बँक बंद पडली.

नंतर शरद पवार दिल्लीला गेल्यानंतर त्यांची आणि आमची गाठ पडली नाही. आमच्याकडून स्मारक उभारले जात नाही हे समजल्यानंतर त्यांनी सासवडच्या आ. अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्षपद स्वीकारले. काही काळ मीही या संस्थेचा उपाध्यक्ष होतो.

अखेर जागा मिळाली

परंतु मुंबईतील स्मारकासाठी आमची धडपड सूरू होतीच. आमच्या सुदैवाने पत्रकार माधवराव गडकरी ‘गोमंतक‘ चा राजीनामा देऊन ‘मुंबई सकाळ‘ चे संपादक म्हणून आले. नंतर देान ते तीन महिन्यानी आम्ही त्यांना भेटलो. ज्या प्रचंड व्यक्तीमत्वाने महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली त्यांचा पुतळा मबईतील मध्यवर्ती ठिकाणी उभारला तर अत्रे यांचे यथोचित स्मारक होईल असे त्यांनी सांगितले आणि लगेच ‘साहित्य संघाचे‘ बाबा कलगुटकर, प्रकाश मोहाडीकर, प्रकाश कॉटन मिलचे जालान, राधाकृष्ण नार्वेकर आणि मी यांची समिती नेमली. मुंबईचे त्यावेळचे महापौर बाबुराव शेटे हे या समितीचे अध्यक्ष असावेत असे ठरले. त्यानंतर आम्ही पुतळ्याच्या जागेचा शोधात निघालो. वरळीच्या जागेवर सध्या जिथे पुतळा उभा आहे ती जागा आम्ही महानगरपालिकेकडे मागितली. परंतु त्यावेळचे आयुक्त बापूसाहेब चौगुले यांनी सदर जागेवरून उड्डाणपूल होणार असल्याचे सागितले. हवे असेल तर त्यापुलाला आ. अत्रे यांचे नाव देऊ असे ते म्हणाले परंतु, माधवराव गडकरी यांनी ते अमान्य केले. मग पुन्हा जागेचा शोध सूरू झाला.

त्यावेळचे भटक्या व विमुक्त जमातीचे नेते आ. दौलतराव भोसले यांनी सी-फेस वरील पेट्रोल पंपाच्या नाक्यावर जागा रिकामी असल्याचे सांगितले त्या जागेची मालकीण कोणी इराणीबाई असून ती शिवशक्तीच्या समोरच्या इमारतील रहाते असे त्यांनी सांगितले. आम्ही लगेच सर्वजण त्या बाईंच्या घरी गेलो, बेल वाजवल्यावर त्या बाईनी कपाळावर आठ्या घालत दार उघडले, ‘क्या है? असे रागाने विचारले, मग माधवरावांनी बाबुराव शेटेंकडे बोट करून सांगितले की, ‘हे मुंबईचे महापौर आहेत‘ त्यावर ती बाई म्हणाली, ‘तो क्या हुआ ? मग त्या बाईंना मी सांगितले की, ‘आ. अत्रे यांचा पुतळा आम्हाला पेट्रोल पंपाच्या रिकाम्या जागेवर उभा करायचा आहे.‘ त्या बाई म्हणाल्या, वो पेपरवाला अत्रे वो तो मर गयाः अभी उसके नाम पर जगह लेगा और वडापाव का गाडी लगाएगा.‘ तुम घाटी लोगोंका कुछ भरोसा नही,‘ असे म्हणून तिने दाणकन दार आपटले आणि जिन्यातूनच आम्हाला हाकलून दिले. मग मी माधवरावांना सांगितले की, मी आणि बाबुराव शेटे बॅ. रजनी पटेल यांच्याकडे जातो आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने काही होते का ते पहातो.

बॅ. पटेल यांचे सहकार्य

कफ परेडपर असलेल्या ‘कैफे कॅसल‘ या इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर बॅ. पटेल रहात होते, त्यांना भेटलो. आ. अत्रे यांचे स्मारक होते आहे. हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. मग आम्ही जागेची अडचण आणि इराणी बाईचा किस्सा त्यांना ऐकवला. मुंबईच्या महापौरांना आणि गडकरींसारख्या ज्येष्ठ पत्रकाराला त्या बाईने हाकलून द्यावे याचा बॅ. पटेल यांना राग आला. त्यांनी लगेच त्या इराणी बाईला फोन लावून गुजराती मधून फायर केले व मी पाठवतो त्या कागदपत्रावर सही करून ताबडतोब ते कागद मेयरच्या हातात दे असे सांगितले. बॅ. पटेल यांनी ताबडतोब ‘गिफ्ट डिड‘ तयार केले आणि तो कागद सही करून माझ्याकडे आणा असे सांगितले, आम्ही परत त्या बाईकडे गेलोच नाही. बाबुरावानी आपला कुणी कार्यकर्ता पाठवला आणि त्या कागदावर सह्या घेऊन तो कागद बॅ. पटेल यांच्याकडे पाठवला. अशा रितीने जागेचा प्रश्न तर सुटला. आता पुतळ्यासाठी लागणारी रक्कम जमा करण्याची मोहीम आम्ही उघडली. त्या निमित्ताने बर्‍याच मोठ्या माणसांना भेटण्याचा योग आला. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, मोठी माणसे लांबूनच पहावीत त्यांच्या जवळ गेले की, ती किती क्षुद्र आहेत हे आपल्या लक्षात येते, अशा मोठ्या माणसांनी आ. अत्रे यांच्या पुतळ्यासाठी पाच-पाच रूपये दिले तर लालबाग, परळ आणि गिरणगावातील मंडळींनी कोणी पाचशे तर कोणी पाच हजार रूपये ऐपत नसतानाही आ. अत्रे यांच्या पुतळ्यासाठी दिले. ‘साहेबांचे आमच्यावर फार उपकार आहेत, असे डोळ्यात पाणी आणून सांगणारी मंडळी भेटली, पुतळ्यापुरते तर पैसे जमले. परंतु त्याच्या खालचा चबुतरा बांधण्यासाठी साठ हजार रूपये काही जमले नाहीत. १३ ऑगस्टला तर पुतळ्याचे अनावरण व्हायचे होते आणि २९ जुलैपर्यंत पैसे जमण्याची चिन्हे दिसेनात.

बाबुराव शेटे यांचे धाडस

शेवटी बाबुराव शेटे म्हणाले की, ‘मी साठ हजार रूपये देतो आणि नंतर सर्वसाधारण सभेत त्याला मंजूरी घेतो‘ त्या प्रमाणे बाबुरावांनी साठ हजार रूपये दिले. मी बाबुरावांना म्हणालो, ‘की सर्वसाधारण सभेत हे पैसे मंजूर झाले नाहीत तर काय करणार ? त्यावर ते म्हणाले, ‘त्याची काळजी नको, मुंबईत माझे साठ हजार माथाडी कामगार आहेत त्या प्रत्येकाकडून मी एक एक रूपाया घेईन आणि महापालिकेला परत करीन.‘ सुदैवाने सर्वसाधारणसभेत साठ हजार रूपयंाना मंजूरी मिळाली. चबुतर्‍यासह पुतळा अकरा ऑगस्टला रात्री उभा राहिला. त्याचे अनावरण कोणी करायचे असा प्रश्न पडला. माधवराव गडकरींना तर कोणी मंत्री किंवा पुढारी नको होता. मग त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे नाव सूचवले. मी म्हणालो, ‘ लक्ष्मणशास्त्री येणार नाहीत कारण, ‘तर्कतीर्थ की नर्कतीर्थ ? असा अग्रलेख मराठामध्ये आ.अत्रे यांनी छापला होता.‘ आमचे बोलणे झाल्यावर माधवरावांनी लक्ष्मणशास्त्री जोशींना वाईला ट्रंककॉल लावला. आश्चर्य म्हणजे तर्कशास्त्रींनी कसलेही आढे वेढे न घेता आनंदाने आमंत्रणाचा स्वीकार केला, मग लगेच आमंत्रण पत्रिका वाटण्यास सूरूवात झाली. या कामी मनोहर जोशी व सुधीर जोशी यांनी मदत तर केलीच शिवाय समारंभालाही ते उपस्थित राहिले. एवढ्या भगीरथ प्रयत्नानंतर आ. अत्रे यांचा लहान का होईना पण आम्ही पुतळा उभारू शकलो. नंतर बाबुराव शेटे गेले, माधवराव गेले आणि ते काम १९८८ सालापासून माझ्या गळ्यात पडते. कोणाकडूनही एक पैसा न घेता सुमारे आठ वर्ष मी आ.अत्रे यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत होतो. त्यावेळी आमचे सध्याचे सरचिटणीस आत्माराम कामथे, सयाजी झेंडे, जगन्नाथ जगताप आणि नारायण आठवले असे तिघे चौघे जमत असू.

प्रमोद नवलकरांचे प्रयत्न

पुढे युतीचे राज्य आले आणि प्रमोद नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री झाले. महाराष्ट्राच्या महापुरूषाचा पुतळा एका कोपर्‍यातल्या पेट्रोल पंपावर उभा आहे हे त्यांना पटले नाही. आ.अत्रे यांचे व्यक्तीमत्व, साहित्य वक्तृत्व, कर्त्वृत्व यांनी ते पार भारावून गेले होते. एक दिवस त्यांनी मला मंत्रालयात बोलावले आणि आ. अत्रे यांचा पुतळा आ.अत्रे चौकात आणण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. मला अत्यंत आनंद झाला कारण पूर्वीपासूनच त्या जागी पुतळा व्हावा असे मला वाटत होते. त्यामुळे मी ताबडतोब संमती दिली. नंतर माझ्या लक्षात आले की, येथे पुतळा उभारायचा तर वाहतूक पोलीस, फायर ब्रिगेड, पर्यावरण, बेस्ट, एमटीएनएल, मुंबई महानगरपालिका इ. वीस ना-हरकत प्रमाणपत्रे गोळा करावी लागतील. नवलकरांना मी तसे कळवले त्यांनी मला आठ दिवसानी मंत्रालयात बोलावले. मी गेलो आणि काय आश्चर्य ! वीसच्या वीस खात्यांचे प्रमुख ना-हरकत प्रमाणपत्रे घेऊन नवलकरांना देण्यासाठी आले होते. आठ दिवसात नवलकरांनी एवढी ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवून दिली याचे मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘एखादे काम करायचे असे मी ठरवले तर त्या कामावर मी वाघासारखा तुटून पडतो.‘

शिवसेना प्रमुखांचे उपकार

त्यानंतर पुतळ्याचे अनावरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व्हावे असे मी सूचवले. त्यावर नवलकर म्हणाले, ‘त्यांना तुम्हीच आमंत्रण द्या आणि ते येतील असे पहा,‘ त्यानुसार मी मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो. ते म्हणाले, मला येता येणार नाही कारण तेरा तारखेला सकाळी माझ्या हस्ते पुण्यात अण्णा हजारेंचा सत्कार आहे. मी म्हणालो की, तुम्ही आलात तर बरे होईल कारण अत्रे – ठाकरे वाद आहे असा समज अजूनही लोकांच्या मनात आहे. हा समज दूर करण्याची ही संधी आहे आणि साहित्य विश्वात या ऐतिहासीक घटनेची नोंद कायमस्वरूपी राहिल. बाळासाहेब दोन मिनीटे विचारात पडले. आणि त्यांनी पुण्याला फोन करून आपण कार्यक्रमाला येत नसल्याचे कळवले व आ. अत्रे स्मारक समितीचे आमंत्रण स्वीकारल्याची नोंद आपल्या डायरीत केली.

ऑगस्ट महिन्याचे पावसाचे दिवस असल्याने पावसात उभे राहून अनावरण करणे अशक्यच होते. त्यामुळे शेजारच्या गीता टॉकीजमध्ये सभा ठेवली आणि तेथूनच रिमोट कंट्रोलने पुतळ्याचे अनावरण झाल्याचे थिएटरमध्ये लावलेल्या टी.व्ही. वरून सर्वांना दिसले. अशा रीतीने आ. अत्रे स्मारक समितीने बाळासाहेबांच्या हातात पहिल्यांदाच रिमोट दिला. त्यानंतर सुमारे दीड तास बाळासाहेबांनी अत्रे आणि ठाकरे घराण्याचे संबंध कीती जवळचे होते ते सांगितले आणि मी तो सगळा जूना इतिहास विसरलो आहे असे जाहिरपणे सांगितले. या समारंभाचे अध्यक्षस्थान त्या वेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्वीकारले होते. सुरूवातीला प्रमोद नवलकर यांनीही आ. अत्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. आ. अत्रे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा कार्यक्रम झाला.

आर. आर. आबांची प्रेरणा

युतीचे राज्य गेल्यानंतर काँग्रस आणि राष्ट्रवादीचे राज्य आले. एका जयंतीच्या दिवशी तात्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे उपस्थित होते. ते म्हणाले, ज्या महान व्यक्तीमत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला त्या महान व्यक्तीच्या पुतळ्याच्या आजूबाजूला चोवीस मजली इमारती उभ्या आहेत आणि हा पुतळा मात्र एवढासाच आहे. पुढील वर्षी मी हार घालायला आलो तर पूर्णाकृती पुतळ्यालाच हार घालायला येईन. गृहमंत्र्यांचा हा आदेश शिरसावंद्य मानून आ. सचिन अहिर, आत्माराम कामथे, संभाजीराव झेंडे, शिवाजी पवार, जगन्नाथ जगताप हे जोमाने कामाला लागले. पुतळ्याचा निधी सहज उभा राहिला आणि अखेर चार फूट उंचीचा चौथरा व त्यावर दहा फूट उंचीचा पुतळा असे प्रचंड काम अंधेरी येथील शिरगांवकरांच्या स्टुडीओत सुरू होऊन पुतळा पूर्ण झाला.

भव्य वास्तूत स्थलांतर

शिवसेना प्रमुखांच्या हस्ते स्थापन झालेल्या पुतळ्याचे काय करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला. सासवड नगरपालिकेचे तात्कालीन अध्यक्ष चंदूकाका जगताप यांनी सासवड येथे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून आ. अत्रे सांस्कृतिक भवन नावाची एक भव्य वास्तू उभी केली आहे. या प्रचंड वास्तूत आ. अत्रे यांचा पुतळा नाही. त्यामुळे सदर पुतळा या वास्तूत उभा करावा असा निर्णय घेण्यात झाला. त्यानुसार तो पुतळा जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष व प्रसिध्द विनोदी कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते बसवण्यात येत आहे. आ. अत्रे यांचा भव्य पुतळा उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले की समाज जीवनातून निवृत्त व्हायचे असे मी ठरवले आहे. त्यानुसार, माझ्या आयुष्यातला हा माझा शेवटचाच लेख आहे. आ. अत्रे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी सर्व सहकार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

काकासाहेब पुरंदरे
अध्यक्ष – आचार्य अत्रे स्मारक समिती

(महावृत्त – च्या सौजन्याने साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..