नवीन लेखन...

एका शर्तीच्या जीवनाची..

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी  यांनी लिहिलेला हा लेख


माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म झाला. व्हर्नाक्युलर (म्हणजे सातवीची) परीक्षा पास झाल्यावर वडिलांची अशी इच्छा होती की, जळगावच्या जवळ असलेल्या ममुराबाद येथील शेतकी फार्मवर नोकरीसाठी जावे. त्यांचा तसा आग्रह होता. तसे नोकरीबाबतचे पत्र देखील मला मिळाले होते. परंतु माझी इच्छा पुढे शिक्षण चालू ठेवण्याची होती. म्हणून मी नोकरी न स्विकारता एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात वाहातुकीची साधने उपलब्ध नव्हती.

त्यामुळे डोक्यावर पेटी घेऊन मी माझ्या गावापासून ८ कि.मी. अंतरावरील भुसावळला पोहोचलो. तिथून जळगावला. एस.एस.सी. च्या परीक्षेसाठी रेल्वेने गेलो. शिक्षणासाठी संघर्षमय जीवनाचा शेवट इथेच संपत नाही.  कॉलेजची शिक्षण घेण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि वडील गावाचे मुलकी पाटील असल्यामुळे व त्यांचा संपर्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी येत असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की, आपल्या मुलाने महसूल विभागात नोकरी धरावी. म्हणजे त्याला पुढे परिक्षा देऊन मामलेदार होता येईल व प्रांत ऑफिसरची जागा त्याला मिळू शकेल. कारण मामलेदार व प्रांत ऑफिसर म्हणजेच केवळ ‘साहेब’ अशी त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती. आणि तेच खरे अधिकारी समजले जात होते. कारण ग्रामीण भागातील लोकांचा केवळ या अधिकाऱ्यांशीच संबंध येतो त्यामुळे त्यांना ते देवासमान मानतात. त्यांचे बोलणे म्हणजे जणू देववाणीच समजतात. त्यामुळे वडील कॉलेज शिक्षणाला परवानगी देईनात कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी श्री. डमरी (नंतर वित्त विभागात सचिव होते.) नाशिकला कलेक्टर होते. त्यांचा व वडिलांचा संबंध येत असे. वडिलांनी त्यांना सल्ला विचारला. त्यांनी मला नाशिकला एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, असा वडिलांकडे आग्रह धरला. एवढेच नव्हे तर माझे नाशिकमधील ते गार्डियन म्हणून राहणार असे वडिलांना सांगितले. मला पुणे किंवा नाशिकला कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही.

माझे काका नडियाद (गुजरात) येथे इंजिनियर होते. त्यांनी मला कॉलेज शिक्षणासाठी नडियादला येण्याचा आग्रह धरला. वडिलांचा विरोध सहन करून मी गुजराथ  विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. लगेच माझा विवाह झाला. त्यानंतर नोकरी करून एल.एल.बी. ची पदवी मिळवली. अकाऊंटस् मध्ये क्लार्कची नोकरी करीतच माझं वकिली शिक्षण पूर्ण झाले. मी वकिली सुरू केली. वकिलीतून बऱ्यापैकी पैसे मिळू लागलेत. परंतु जळगावसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहात असल्यामुळे आजारपणासाठी अथवा अन्य कारणासाठी जळगावला येणाऱ्या असंख्य नातेवाईकांमुळे माझे घर रेल्वेचे वेटिंग रूम झाले व माझ्या पत्नीला दवाखान्यात नातेवाईकांना डबे पोहोचविणे, आल्यागेलेल्यांसाठी चहा करीत बसणे हाच मुख्य व्यवसाय झाला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. हे मला आवडले नाही. म्हणून मी सरकारी नोकरी स्विकारली व अकोल्यात असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पुणे व मुंबईत काम केले. त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट ड्राफ्टसमन कम अवर सचिव व डेप्युटी ड्राफ्टसमन कम डेप्युटी सेक्रेटरी या मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी जाहिरात आली. मी सुरुवातीला अवर सचिव म्हणून रुजू झालो. परंतु लगेच ४ महिन्यात उपसचिव पदासाठी झालेल्या निवडीमुळे उपसचिव झालो. पुढे ४ वर्षांत मला सहसचिवाचे पदी बढती मिळाली. पुन्हा पुढील ४ वर्षांनंतर माझी सचिवपदी पदोन्नती झाली. पुढील दोन वर्षात मी प्रधान सचिव झालो तर त्यापुढील २ वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर शासनाने प्रधान सचिव, पार्लमेंटरी अफेअर्स या विभगात माझी प्रधान सचिव म्हणून पुर्ननियुक्ती केली. शासनाने तिथून माझा सेवा कालावधी संपायच्या आतच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र राज्य लॉ कमिशनचे चेअरमन म्हणून ३१ मे २००५ पासून नियुक्त केले. मी तिथून निवृत्त झालो. विधि आयोगाचे प्रामुख्याने काम म्हणजे आयोगाने राज्याचे विद्यमान कायदे व संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत मोडणारे कायदे तपासणे, त्याखाली केलेले नियम व अधिनियम हे संविधानातील तरतुदींशी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी न्यायदान पद्धतीत सुधारणा सुचविणे, संपुष्टात आलेले कायदे तपासून आवश्यक असल्यास ते निरसित करणेविषयी सुचविणे, समान विषयासंबंधीचे कायद्यांच्या एकत्रीकरणाबाबत शिफारस करणे, एखाद्या विषयावर नवीन विधिविधान करण्यासाठी शिफारस करणे, वगैरे बाबींचा त्यात समावेश होतो.

जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं मिळत जातात व ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. शाळेत असताना मी अतिशय व्रात्य होतो परंतु त्यावेळी श्री.एल.एन. सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि त्या विषयाबद्दल माझ्यात निर्माण केलेली आवड माझ्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरली. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले नसते तर माझे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न हे पहाटे पडलेले स्वप्न न होता मध्यरात्री पडलेले स्वप्न ठरले असते. त्यांनी मला जीवन कसे जगावे, त्यात प्रामाणिकपण असावा व सतत इतरांना मदत करीत राहावे ही शिकवण दिली व तसे वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला. तर वकिली करीत असताना मला वकील म्हणून घडविण्यात श्री. डी. डी. चौधरी या प्रथितयश वकिलांचा मोठा हात आहे. त्यामुळे मला वकिली करताना खूपच मदत झाली. तर मंत्रालयात विधी व न्याय विभागात रुजू झाल्यावर यशस्वी प्रारूपकार कसे होता येईल याचे धडे व मार्गदर्शन माझे वरिष्ठ अधिकारी श्री. धुरंधर व श्री. धोत्रे यांचे लाभले. त्याचा मला आयुष्यभर उपयोग होत राहिला. एवढंच नव्हे तर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर विविध नियुक्त्या झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रेरकच ठरल्यात. माझ्या आयुष्यात मला लोकांचे सतत प्रेमच मिळत राहिले. म्हणूनच मी वयाची ८८ वर्षे आनंदाने पार करून अजूनही उत्साहाने कार्यरत आहे. शासकीय सेवेत असताना विशेषत्वाने बॅ. अंतुले, श्री. शंकरराव चव्हाण, श्री. शरद पवार, श्री. सुधाकरराव नाईक, श्री. विलासराव देशमुख व श्री. सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले व माझा कामातील उत्साह वाढवत ठेवला. तसेच विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक यांचेही भरपूर सहकार्य लाभले.

माझ्या यशस्वी जीवनाचा पाया हा माझ्या पत्नीने रचलेला आहे. तिची मला मिळालेली आयुष्यभराची साथ ही केवळ भावनिकच नसून कणखर व्यक्तिमत्त्वाची लाभली व त्यामुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. संस्काराच्या मंदिराला रूप देऊन घर उभं करणारी ही गृहकर्तव्यदक्ष गृहिणी म्हणजे माझी खरी मार्गदर्शिकाच आहे. आपल्यावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आक्रसून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे जाऊन भूतकाळात जास्त न रमता भविष्याकडे नजर ठेवून वर्तमानाला जास्त महत्त्व देणारी ही समयसूचक गृहिणी म्हणजे लेवा परिवारातील एक आदर्श महिला आहे. तिने मुलांवर बालवयात केलेले सुसंस्कार आणि घडविलेला बौद्धिक विकास यामुळेच मी यशस्वी झालो. ती म्हणजे माझ्या यशोदायी जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या मुलांचा, सूनांचा सहवास हा आनंददायी आहे. कदाचित माझ्या ठणठणीत प्रकृतीचे तेच रहस्य असू शकते.

या यशस्वी जीवनात शासकीय सेवेत असताना कटु अनुभव देखील आलेत. मला पुर्ननियुक्ती मिळाल्यावर काहींना ते आवडले नाही. मला मात्र वेदना झाल्यात. पण मी मनात काही ठेवीत नसतो. मी विसरलो. कारण आयुष्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही आहे. त्या कटु आठवणी विसरूनच मार्गक्रमणा चालू ठेवली.

डेप्युटी ड्राफ्टसमन असताना मला शासनाने (केंद्र व राज्य शासनाच्या शिफारशीनंतर) लंडनला ‘Course for Govt. Legal Officers from Overseas, London’ साठी पाठविण्यात आले. हा अनुभव भावी जीवनात खूप उपयुक्त ठरला. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलक्युअलस् यांच्यामार्फत The great son of the soil हा पुरस्कार मला नवी दिल्लीला A Prominent social worker म्हणून दिला होता.

आपल्या जीवनाच्या प्रवासात आईवडील, शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा जसा हातभार लागत असतो तसाच मी ज्या लेवा पाटीदार समाजात जन्माला आलो त्या समाजातील धुरीणांचा मी आभारी आहे. आमचा समाज बहुसंख्येने खानदेशात राहात असला तरी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. अशा समाजाला एकत्र आणून सामाजिक जाण निर्माण करून समजा सेवा करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने लेवा पाटीदार महासंघ स्थापन केला. त्या महासंघाचा मी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. माझ्या या समाजकार्याची जाण ठेवून ठिकठिकाणच्या शाखांनी माझा बहुमान केला व मला ‘समाजभूषण’ म्हणून गौरविले.

मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी १ डिसेंबर १९५९ पासून दरवर्षी १ डिसेंबरला कायम न चुकता शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शन, पूजा व आरतीसाठी जात असतो.

काळ बदलतो तशा वृत्ती बदलतात आयुष्यात जी मानसिकता जपली तशी आताच्या पिढीत दिसत नाही. शासकीय सेवेत सेवाभावी वृत्ती हरपत चालली आहे. हे बघून मात्र खूप वाईट वाटते.

-दे. ना. चौधरी

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..