सजग पालकांना समर्पित !
( वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी .)
— उघड्या दारातून समशेर आत आला , तेव्हा रात्रीचे साडेचार वाजले होते .
आल्या आल्या हायहिल्स कोपऱ्यात भिरकावून अंगावरची साडी ओरबाडून काढून ती बेडवर फेकली . कानातल्या रींग्ज , नाकातली नथ , नेकलेस आणि हातातल्या ओबडधोबड बांगड्या काढून त्या पर्स मध्ये व्यवस्थित ठेवल्या . लिपस्टिक पुसून टाकली . उरलेली व्होडका संपवली आणि तसाच बेडवर अस्ताव्यस्त पडला .
रतीच्या डोळ्यात पाणी आणि घशात हुंदका दाटला .
मात्र रवीच्या डोळ्यात अंगार फुलला होता .
समशेर त्यांचा एकुलता एक मुलगा होता .
मोठ्या हौसेनं समशेर असं नाव ठेवलं होतं . अत्यंत हुषार , देखणा आणि मनमिळावू समशेर पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत गेला .
आणि आठच दिवसांनी त्यानं सगळे कपडे एकत्र करून बॅगेत ठेवले .
दुसऱ्याच दिवशी त्यानं बॉम्बगोळा टाकला .
” हे कपडे कुणाला तरी देऊन टाका . मला नको आहेत ते .”
त्यानं सांगून टाकलं .
” म्हणजे ? तुला का नकोत कपडे समशेर ? ” आईनं विचारलं .
” एक मिनिट . मी आता समशेर नाही . माझं नवं नाव समशेरनी आहे . आणि मला कपडे नकोत असं कसं होईल . मी आणलेत मला हवे तसे . ”
तो उठला आणि समोरच्या सॅक मधून आठ दहा साड्या काढल्या . परकर , ब्लाऊज आणि बायकांचे दागिने असं सगळं सोफ्यावर टाकलं .
” आजपासून मी आणि आमचा ऑल टाईम जेंडिज ( जेंट्स अँड लेडीज) ग्रुप , अशाच साड्या नेसणार आहोत . ही युनिव्हर्सिटीत आलेली नवी फॅशन आहे . इट्स जस्ट स्टेटस सिम्बॉल . ”
” तू काय हिजडा होतोय का ? की एलजीबीटी वाला ? काय चाललंय तुझं ? शिक्षण सोडून कसले धंदे चाललेत तुमचे ? पुरुषा सारखा पुरूष आहेस ना तू ? आणि विद्यापीठाला हे चालतं ? अरे आमचे काही संस्कार आहेत की नाही ? आमची काही गुणसूत्र आहेत की नाही तुझ्यात ? आपला धर्म , आपली संस्कृती , आपले आचारविचार , आपलं राहणीमान , भविष्याबद्दलचा विचार , शिक्षणाचा स्वतःला आणि देशाला होणारा उपयोग , नोकरी , धंदा याचा काही विचार केलास का ? आणि साड्या नेसायला तू काय …”
रवी संतापानं थरथरत होता . काय करावं हेच त्याला कळत नव्हतं .
कुटुंबाच्या , समाजाच्या संस्कारापेक्षा हा उठवळपणा समशेरला महत्वाचा वाटतो ?
रवीचा संताप अनावर झाला . तो आत गेला आणि पँटचा बेल्ट आणला . समशेरवर हात उचलणार इतक्यात रती पुढं झाली .
” मोठा झालाय तो . त्याला मारून काही उपयोग होणार नाही .”
कसंबसं बोलून ती तिथेच उभी राहिली . आतून रडू फुटत होतं .
कळत नव्हतं तिला काही . पण काहीतरी वेगळं घडतंय हे जाणवत होतं .
तिनं रवीकडे पाहिलं . तो अंगार फुललेल्या डोळ्यांनी समशेर कडे पाहत होता .
समशेर शांतपणे साडीच्या निऱ्या काढत होता . साडी , दागिने , मेकअप झाल्यावर त्यानं पर्स खांद्याला लटकवली . आणि हायहिल्स घालून तो पाठी वळला .
” थांब . माझ्या एकाही प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाहीस . ”
कमालीच्या शांतपणे रवीनं विचारलं .
समशेर पाठी वळला आणि सोफ्यावर बसला .
” ओके . याचा अर्थ तुम्हाला सगळं सांगायलाच हवं . कारण तुम्ही मला जन्म दिलाय . वाढवलंय . तुम्ही संस्कार केले आहेत . शिक्षण देताय .भरभक्कम पॉकेट मनी देताय . नो प्रॉब्लेम ! तुमच्या भाषेत आणि संस्कारात सांगायचं तर मी त्याबद्दल कृतज्ञ आहे . पण …”
तो थांबला .
” मला काही तरी वेगळं सांगायचं आहे पप्पा . मी साडी नेसलो म्हणजे हिजडा नाही झालो . मी गे नाही . लेस्बियन नाही . एल जी बी टी चा सदस्यही नाही . मी पुरूष आहे आणि पुरुषच राहणार आहे . शिक्षण , नोकरी , लग्न , मुलंबाळं हे सगळं होतच राहणार आहे . पण पप्पा , मम्मी हे दोन हजार चाळीस साल सुरू आहे . आणि नव्या काळानुसार तुमची सगळीच विचारसरणी प्रतिगामी आहे . बुरसटलेली आहे . आम्ही आता निसर्गाच्या विरोधात जगायचं ठरवत आहोत . प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार आहोत . आम्ही साड्या नेसणार . दागदागिने घालणार . शरीर उघडं टाकणार . सगळी व्यसनं करणार . स्वतःपुरतं जगणार .स्वतःचाच विचार करणार . देश धर्म परंपरा गेल्या खड्ड्यात . मी , माझं माझ्यापुरतं ही आमची जगण्याची वृत्ती असेल . जेव्हा पैसे लागतील तेव्हा आम्ही सगळ्यांकडून ओरबाडून घेऊ . नीती नियम कायदे फाट्यावर मारू . त्यासाठी जाती जातीत भांडणे लावू . माझं ते माझंच पण तुझं तेही माझं अशी मस्त लाईफस्टाईल आणणार आहोत . अर्थात यासाठी अनेक देश स्पॉन्सरर होत आहेत . जगभरातला सर्व प्रकारचा मीडिया आम्हाला सहज उपलब्ध आहे . मूव्ही , वेब सिरीज आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही असे प्लॅटफॉर्म निर्माण होत आहेत .साड्या हे सिंबॉलिक आहे .आम्ही कृत्रिमपणे जगणार नाही . आम्ही स्त्रीपुरूष असा भेदभाव ठेवणार नाही . म्हणजे बलात्कार , अत्याचार खून खराबा होणारच नाही . उद्या माझ्यावर कुणी बलात्कार केला तर करणाऱ्यावर , आमच्यातला दुसरा कुणी बलात्कार करील . ही अशी एक छान लिंक लागेल . मग खऱ्या अर्थानं समान व्यवस्था आकाराला येईल . आणि तेच तर आमचं उद्दिष्ट आहे .मनाला येईल तसे आणि त्याचं पद्धतीने आम्ही जगणार आहोत . सगळं जग आमच्या विचाराने चालेल असा विश्वास आहे . बाय द वे माझ्याकरता जेवण शिजवून ठेवू नका . वाट बघू नका , माझ्याकडे किल्ली आहे . नो प्रॉब्लेम ! बाय . ”
समशेर हिल्स वाजवत निघून गेला .
रवी आणि रती त्याच्या जाण्याकडे बघत राहिली .
हा आपलाच मुलगा ना ?
काय होणारेय याचं ?
त्याहीपेक्षा या काळातल्या तरुण पिढीसमोर काय वाढून ठेवलंय ?
सगळी सिस्टीम उद्ध्वस्त करून यांना काय मिळणार आहे ?
ही तरुण पिढी कुणाच्या हातची कठपुतळी झाली आहे ?
कुठले विचार यांच्या मेंदूत घुसलेत ?
कुणी घुसवलेत ?
हे विचार प्रत्येक विद्यापीठात पसरत गेले तर …?
रवी विचार करून थकला . गांगरला आणि म्लान चेहऱ्यानं खाली बसला .
रती डोळे पुसून उठली .
बेडवरची समशेरची साडी व्यवस्थित घडी करून ठेवली .
आणि त्याच्या दुसऱ्या साडीला इस्त्री करू लागली .
भर दिवसा अंधार दाटला होता .
आणि सूर्योदय दृष्टिपथात नव्हता…!
( वास्तव वाटावी अशी भविष्यात घडू शकणारी काल्पनिक कथा)
— श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
थोडक्यांत म्हणजे २०४० साली आम्ही ढोंग्रेस, लिब्रान्डु किंवा तत्सम पक्षांत प्रवेश करू.