काल एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात. मग विद्यार्थी (बहुधा माजी ) त्यांवर लाईक्स/कंमेंटस चा पाऊस पाडताना दिसतात. साहजिकच आहे, माजी मनांमध्ये कायम “जाने कहाँ ——- ” ची धून वाजत असते. आजी विद्यार्थी व्यक्तिगत आणि संस्थेशी संबंधित अशा बऱ्याच कारणांमुळे फटकून असतात आणि हातभर अंतर राखून असतात. असो.
फोटो होता, महाविद्यालयाच्या आवारात नव्याने स्थानापन्न झालेल्या- सेल्फी पॉईंटचा ! महाविद्यालयातील यच्चयावत महानुभाव त्यांत सामील होते आणि पार्श्वभूमीला ” I (बदाम= लव्ह) …. ”
ही उकरून काढलेल्या आणि नसलेल्या प्रेमाची प्रतीके आत्ता आत्ता शहरांना (आणि उपनगरांना), गावांना, उद्यानांना, ओढ्यांना लागू झालेली आहेत. पण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दर्शनी भागात असे “प्रदर्शन”?
कोण करतंय या महाविद्यालयावर लव्ह?- फोटोत असलेले/नसलेले शिक्षक, विद्यार्थी, सेवक, पालक, सरकारी कर्मचारी की शहरवासीय? आणि त्यांचं प्रेम अशा प्रतिकांमधून व्यक्त होतंय की प्रतिकांपुरतं मर्यादित राहिलंय ? असं प्रदर्शन केलं की नव्या विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणार आहेत, की जागतिक/नोबेल विजेते शिक्षक या संस्थेकडे आकर्षित होणार आहेत? AICTE/NBA /NAAC/ NIRF ( नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) मध्ये वरचे रेटींग मिळणार आहे? अधिक नामवंत कंपन्या आकर्षित होऊन विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळणार आहे? सरकारी/निमसरकारी ग्रॅण्टस वाढणार आहेत?
असल्या सेल्फी पॉइंटचे “बालिशपणा ” यापलीकडे काही विशेष वर्णन होऊ शकत नाही.
खूप वर्षांपूर्वी साधारण ९०-९१ मध्ये “इक डॉक्टर की मौत ” नामक पंकज कपूर, शबाना आणि (अगदी अलीकडच्या) इरफान खान असलेला चित्रपट पाहिल्याचे आठवते. एका नवसर्जनी डॉक्टरची आमच्या सरकारी व्यवस्थेत “मौत ” कशी होते याचे विदारक,विषण्ण करणारे चित्र होते त्यांत ! त्यांही आधी डॉ अरुण लिमयेंनी १९७८ मध्ये आमच्या वैद्यकीय व्यवस्थेच्या चिंध्या उडविणारी “क्लोरोफॉर्म ” ही कादंबरी लिहिली होती.
आता अभियांत्रिकी क्षेत्राने मागे कां राहावे? “कोटा फॅक्टरी ” किंवा ” क्रॅश कोर्स “सारख्या वेब मालिकांनी काळेकुट्ट होत चाललेले अभियांत्रिकी शिक्षणाचे दालन सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी खुले केले आहेच.(मागील आठवड्यात कोटा येथे तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे आणि त्यातील एकाने सरकारच्या नांवाने चिट्ठी लिहून ठेवीत टाहो फोडल्याचे ताजे वृत्त आलेच आहे).
“डॉक्टर की मौत ” सारखे आमच्या “शिक्षणसंस्थेचा /शिक्षण व्यवस्थेचा मृत्यू ” असा शब्दप्रयोग मी या पोस्टच्या शीर्षकात टाळला.
सेल्फीमग्न मंडळींना काय फरक पडतो म्हणा?
हळूहळू प्रत्येक शाळेत/बालवाडीत हे लोण पसरेल. आणि आपले “प्रेम” असे अनंत ठिकाणी सार्वजनिक रित्या विभागले जाईल.
हे वृत्त मी माझ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिने एक मार्मिक भाष्य केले- ” एकूणच समाजाचा collective wisdom निर्देशांक कमी होत चाललाय.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply