एकूणच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला जात असल्याचे आपण पहात आहोत. एकत्र कुटुंब व्यवस्थेचं एका जमान्यात मानाचं स्थान होतं. गांवा-गावांतून खेडयापाडयापासून ते शहरापर्यंत जे लोक एकत्र कुटुंबामध्ये रहात होते, त्या कुटुंबाकडे कोणी वाकडया नजरेने पाहात नव्हतं, किंबहूना अशा कुटुंबाकडे तिरक्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. भारतीय संस्कृती ही मूळातच पुरुष प्रधान संस्कृती आहे. सध्या काळ झपाटयाने बदलत आहे.
पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
असा आमचा भारत खंडप्राय देशातील एकत्र कुटूंब पध्दतीचा वेगाने हास होत आहे. एकत्र कुटूंब पध्दती संपुष्टांत येण्याची तशी अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे खेडयापाडयातील लोकांचा लोंढा शहराकडे निघाला आहे. शहरातील इमारती गगनाला गवसणी घालू लागल्या आहेत आणि खेडयापाडयातील गावागावांतील एकत्रित कुटुंब पध्दतीत आयुष्य घालविणारे मोठाले वाडे आणि गढया ओस पडू लागल्या आहेत. एकत्र कुटुंब पध्दती लयाला जाऊ लागली, तसा आमचा आजीबाईचा
बटवा हरवला आहे. एकत्र कुटूंब पध्दतीच जिथे शिल्लक राहिलेली नाही, तेथे आजी कुठली आणि तिचा बटवा तरी कसा मिळणार?
एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये कुटुंबातील सदस्यांवर विशेषत: मुलांवर चांगले संस्कार होतांना दिसतात. वयस्कर व थोरांना योग्य मान दिला जातो. कुटुंबावर वडिलधाऱ्या व्यक्तींचे वर्चस्व दिसून येते. घरातील सर्व व्यवहार, विचार विनिमयातून केले जात असंत. घरातील वयोवृध्दांचा यथोचित आदर होत असे. किंबहून त्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत दिली जात होती. एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रत्येक सदस्याला सुरक्षा कवच होतं. ज्या प्रमाणे दगड जोपर्यंत डोंगराबरोबर आहे, तोपर्यंत तो सुरक्षित असतो, जशी झाडाची पानं, झाडाबरोबर असतांना सुरक्षित असतात, तसा एकत्र कुटुंब व्यवस्थेतील प्रत्येक सदस्य एकत्र कुटुंबाबरोबर सुरक्षित असतो. परंतु आजकाल एकत्र कुटुंब पध्दती किंवा ती संस्कृतीच कोणाच्या पचनी पडत नाही.
सध्या प्रत्येकजण जीवनात यश मिळविण्यासाठी समाज, नातेवाईक तर सोडाच पण आपल्या आई-वडिलांना विसरून धन संपत्तीच्या मागे धावतांना दिसत आहे, आणि त्यामुळे एकत्र कुटुंबाचा -हास होवून स्वतंत्र/ विभक्त कुटुंब पध्दती अस्तित्वात आली आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरीक, आई-वडिल आपल्या मुलांपासून दुरावले आहेत. खेडयातील तरूणवर्ग शहरांकडे, तर शहरातील तरूणवर्ग स्वतःचे करीअर घडविण्यासाठी परदेशात स्थलांतरीत होत आहे. परिणामी आई-वडिल हे वृध्दापकाळी एकाकी जीवन जगत आहेत.
काही कुटुंबामध्ये अनेक मुलगे असतांना सुध्दा काही वृध्दांना वृध्दाश्रमाचा किंवा अनाथ-आश्रमाचा आसरा घ्यावा लागत आहे. काही लोकांना आई-वडील हे कुटुंबातील अडगळ वाटू लागली आहे. यश मिळविण्याच्या आणि धनसंपत्ती मिळविण्याचा नादात लोकांना आई-वडील दिसू नयेत खरंच खेदाची
गोष्ट आहे. काही लोकांना वयस्कर आई-वडिलांसोबत राहतांना कमीपणा किंवा अपमानास्पद वाटतं, त्यांचचं राहणीमान त्यांना रूचत नाही. आणि मग अशा ज्येष्ठांचा, वृध्दांचा नमस्कार आई-वडिलांचा एकाकीपणा चालू होतो. त्याच्या व्यथा ऐकण्यासाठी कोणी नसतं, त्यामुळे त्यांचं जीवन खडतर होऊन जातं. एक आई चार मुलांचा, त्यांच्या जन्मापासून स्वतःच्या मृत्यूपर्यंत सांभाळ करत असते, परंतु त्या चार मुलांना एक आईचा सांभाळ करणे जीवावर येतांना दिसते.
“आई, आपल्या जन्माच्या वेळी आपल्याबरोबर असते, मग आईच्या अखेरच्या प्रवासात आपण का तीच्याजवळ का नको?”
हा विचारच कोणी करीत नाही. आणि मग अशा ज्येष्ठ नागरिकांची, वृध्दांच्या जीवनाची संध्याकाळ मात्र मध्यान्हीच्या सूर्याच्या उन्हानं भाजून निघत असतं.
आज महाराष्ट्र राज्यात दहा लाखांच्यावर, तर भारतात करोडोंच्या वर ज्येष्ठ नागरीक एकाकी जीवन जगत आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरीकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. काही सेवाभावी संस्था पुढे येवून ज्येष्ठ नागरीकांसाठी वृध्दाश्रम काढून त्यांची सेवा करीत आहेत. शासनाने प्रवास सवलत योजना तयार केली आहे. शासनाने पोलीस खात्यामार्फत वृध्द लोकांना त्वरित मदत मिळावी, त्यांना अडचणीच्या वेळी जलद सुविधा मिळण्यासाठी १०९० ही हेल्प लाईन सुरू केली आहे.
त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे एकाकी ज्येष्ठ नागरीक किती राहतात याबाबत परिक्षण केले आहे. जे ज्येष्ठ नागरीक एकटे राहतात, त्यांची स्वतंत्र माहिती पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर अद्ययावत तयार करून ठेवली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बिट सिस्टीम किंवा विभागवार अधिकारी व पोलीस अंमलदार हे नियमितपणे ज्येष्ठ नागरीकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडिअडचणी समजावून घेतात. त्यांच्या लहानसहान समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एकलेपणाची जाणीव होऊ न देण्याचा अल्पसा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
या मागचा उद्देश आणखी एक आहे आणि तो खूपच महत्वाचा आहे आणि तो म्हणजे वृध्द नागरीकांची सुरक्षा करणे. आजकाल आपण वर्तमानपत्र उघडलं की नेहमीच एक-दोन बातम्या ज्येष्ठ नागरीकांबद्दल असतात. कुठे चोरी, तर कुठे एकटया वृध्द नागरीकांना लुटण्याच्या घटना घडतांना दिसतात.
या सर्व घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व वृध्द नागरीकांना एकटेपणा वाटू नये यासाठी पोलीस खात्यामार्फत शासन अनेक उपक्रम राबवित आहे.
पोलिसांना त्यांच्या नियमित कर्तव्यातून त्यास घरी जायला मिळो अगर न मिळो, पोलिसांना मात्र ज्येष्ठ नागरीकांना भेटण्यासाठी जावंच लागतं. पोलिसांच्या या उपक्रमामुळे अनेक एकाकी जीवन जगणाऱ्या वृध्दांना, ज्येष्ठ नागरीकांना स्वत:च्या मुलांकडून जरी अपेक्षाभंग झाला असला, तरीही पोलिसांकडून त्यांना एक आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे अशा अनेक वृध्द नागरीकांना एकाकी व रूक्ष जीवनाच्या वाळवंटात एक माणुसकीचा झरा लाभला आहे.
पोलीस सुध्दा त्यांचे हे कर्तव्य बिनतक्रार करीत असतात. काही पोलीस अधिकारी, अंमलदार त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनाथ आश्रम किंवा वृध्दाश्रमांना भेटी देवून वृध्द माता-पित्यांना भेटून त्यांना त्यांची मुले भेटल्याचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
अनेक वृध्दाश्रमांना भेटी दिल्यानंतर अनेकांची दु:खे समजली. कोणाची मुलं परदेशात असल्याने एकाकी जीवन जगावं लागत आहे, तर काहींची मुलं देशात असून सुध्दा आई-वडिलांपासून वेगळी रहात आहेत. काहींच्या बाबतीत तर मुलांना घरात म्हाताऱ्या माणसांची अडगळ वाटू लागल्याने त्यांना आश्रमात दाखल केलं आहे. काही वृध्दांची मुलं त्यांना भेटण्यासाठी सुध्दा येत नाहीत. केवळ मनिऑर्डर करून आश्रमात पैसे पाठवून आपल्या कर्तव्यपुर्तीचा आनंद साजरा करतात. परंतु त्या आपल्या माता-पित्यांवर एकटेपणाच्या उन्हाची धग किती लागत असेल, याचा ते विचार सुध्दा करीत नाहीत.
एका वृध्दाश्रमात तर अंगावर शहारे आणणारी हकिगत पहावयास मिळाली. त्या आश्रमात एक वृध्द जोडपे गेल्या दोन वर्षांपासून रहात आहे. मुलगा – सुन परदेशात नोकरी करतात. नित्यनेमाने पैसे पाठवतात. अनेक वेळा त्यांना आई-वडिलांना भेटण्यास येण्यासाठी कळवूनही त्यांना आई-वडिलांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. त्या आश्रमातील एक अधिकाऱ्याने तर अशी माहिती दिली की, त्या वृध्द माता-पित्याच्या मुलाने स्पष्ट कळविले आहे की, “आई वडिलांचे काही बरे-वाईट झाल्यास आम्हास कळविण्याची तसदी न घेता, कार्य उरकून घ्यावं.”
हे ऐकून तर अंगावर शहारा आला. अशीही मुलं जन्माला येतात, ज्यांनी आयुष्यभर त्यांच्या मुलांसाठी खस्ता काढून लहानाचं मोठं केलं, त्याने अशा एका वाक्यात त्या उपकारांची परतफेड करावी. खरंच कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, हेच कळत नाही.
पोलीसखात्यात काम करतांना अनेक अनुभव आले. परंतु ज्येष्ठ नागरीकांची व्यथ आणि त्यांचा एकाकीपणा पाहून मात्र मन हेलावून गेलं. लोकांना जे समजत नाही किंवा आपण सुध्दा त्याच चाकोरीतून जाणार आहोत, प्रत्येकाच्या जीवनात संध्याकाळ ही येणारच आहे. आपण सुध्दा वृध्द होणार आहोत.
काय सांगावं, कोणाला आणि कोणत्या शब्दांत समजावून सांगावं हेच कळत नाही. समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. आज त्या एकाकी जगणाऱ्या वृध्दांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीमध्ये मुलांची काळजी दिसते. परंतु मुलांना त्यांच्या कामातून आई-वडिलांना भेटायला वेळ नाही.
प्रत्येकालाच जीवनातून जायचे आहे. जन्म हा नेहमीच मृत्यूला सोबत घेवूनच येत असतो. जिथे जन्म आहे, तिथे मृत्यूही अटळ आहे. कोणीही चिरंजीव नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जिथे आपण राहतो, ती पृथ्वी म्हणजे एक मृत्यूभूमी आहे. मला माहित आहे, माझाही एक दिवस मृत्यू होणार आहे. तर मग हा संसार, धन, संपत्ती, घर माझे आहे, असे म्हणण्यात काय अर्थ आहे?
धन संपत्तीच्या मागे लागून भगवंतस्वरूप अशा आई-वडिलांना विसरून काय साध्य होणार आहे. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. तेव्हा वृध्दांची सेवा करून त्यांचा एकाकीपणा घालवून त्यांची व्यथा दूर करता आली तर त्यासारखे पुण्यकर्म नाही !
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply