एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. आमच्या घरात त्याचे आगमन झाले तेव्हा आम्ही विशेष दखल घेतली नाही. आमच्या साध्या स्वभावाचा फायदा घेत त्याने आमच्या फ्लॅटमध्ये चांगला जम बसवला. त्याचे मुख्य कार्यालय आमचे स्वयंपाकघर असले तरी त्याचा वावर सर्वत्र होता. रात्री त्याला अति उत्साह यायचा. पीठ, मीठ, तेल, फळे जे मिळेल त्यावर ताव मारायचा. एकदा त्याने घट्ट झाकणाचे दोन डबे उघडले व आतले पदार्थ फरशीवर सांडून खूप पसारा केला तेव्हा त्याचा खूपच राग आला, पण करामतीचे कौतुकही वाटले. मग मी सर्व डबे काळजीपूर्वक बंद कपाटात ठेवणे सुरू केले. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा प्लॅस्टिकच्या पिशव्या, फर्निचर इकडे वळवला रात्री त्याच्या खुडबुडीने आमची झोपमोड व्हायची.दिवसभर मात्र तो शांत असायचा.कुठे निवांत झोपा काढायचा ते कळायचेही नाही. आता मात्र या परप्रांतीयाचे दखल घेणे भाग होते.घरामध्ये त्याचे आणि त्याच्याच विषयावरील एका पुस्तकाचे आगमन एकदमच झाले होते स्पेन्सर जॉन्सन यांचे माझे चीज कोणी हलवले हे ते अनुवादित सुंदर पुस्तक होय.जीवनातील बदलांना माणूस व उंदीर कसे सामोरे जातात याविषयीचे ते एक विलक्षण सुंदर असे रूपकात्मक कथानक आहे. संकटे व बदलांकडे सकारात्मक भूमिकेतून पाहण्यास शिकवणारे ते पुस्तक वाचून मी भारावले होते. तेव्हाच नेमके हे उंदीर महाशय आमच्या घरात यावे हा एक विलक्षण योगायोग होता. त्या कथानकात माणूस व उंदीर दोघांवरही सारखेच संकट येते. तेव्हा उंदीर हा माणसाच्या आधी त्यातून मार्ग काढतो व माणूस मात्र दुःख आणि भावनांच्या आहारी जाऊन क्रिया शून्य बनतो.त्याच्याकडे भावना मन असे काही विषय नसतात. जगणे हेच त्यांच्या जीवनाचे प्रयोजन व त्यासाठी काहीही करून, कसेही करून पोट भरणे एवढेच त्यांना कळते. मी त्रस्त झाले होते तरीही घरातील या पाहुण्या बद्दल कुतुहलाने विचार करत होते. त्याच्यासाठी मी पिंजरा आणला. त्यात भजी बिस्किटे टाकली. त्याशिवाय विषारी वड्याही आणल्या आणि तो जिथे जिथे लपून राहतो असे वाटायचे तिथे तिथे त्या पसरवून ठेवल्या. जणू काही एखाद्या वाघाला पिंजऱ्यात पकडायचे आहे असा माझा आवेश होता पण त्याचे सुदैव व माझे दुर्दैव त्याने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. औषधांप्रमाणे विषातही भेसळ असते की काय असेही वाटून गेले. कधी दारे,खिडक्या सगळे बंद करून त्याची कोंडी केली तर कधी मुद्दाम उघडे ठेवून त्याला बाहेर जाण्यास वाव ठेवला पण त्याने सगळीकडेच साफ दुर्लक्ष केले. तो त्याच्या थाटात वावरत होता. त्याचा तोरा बघून राजा भिकारी उंदराची टोपी घेतली या गोष्टीतला उंदीर मला आठवला. हा विषय लवकरच शेजारीपाजारी पसरला. जितकी माणसे तितके सल्ले सुरू झाले. नुकतेच गणेशविसर्जन झाले होते. दहा दिवसांचा गणपती मी दीड दिवसांवर आणला होता. त्यामुळे माझ्यावर गणपतीचा कोप झाला असावा अशी शंका शेजारच्या आजींनी बोलून दाखवली. दुसऱ्या काकू म्हणाल्या की काही झाले तरी त्याला मारायचं नाही. गणेशाचे वाहन आहे ते, पाप लागेल.तिसऱ्या मावशी म्हणाल्या की आता गणपतीलाच साकडे घाल. हा सल्ला मात्र जरा अतीच वाटला मला. आपल्या घरातील उंदीर घालवण्यासाठी प्रत्यक्ष देवाला बोलवायचे? ते काही साप पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलण्यासारखे नव्हते. हा येतो कुठून, जातो कुठे, राहतो कुठे, दिवसभर जराही चाहूल लागू देत नाही! असं तर माणसालाही वागता येत नाही. आमच्या लपंडावात असेच आठ-दहा दिवस गेले. मग एके दिवशी तो अचानक आला तसा निघून गेला म्हणजे गायबच झाला. औषधे, पिंजरा, भजी या सगळ्यांकडे पाठ फिरवून तो निघून गेला. कदाचित त्यालाच माझी दया आली असावी किंवा आमच्या कपाटांमुळे त्याची उपासमार होऊ लागली असावी किंवा त्याला असुरक्षिततेची जाणीव झाली असावी. कदाचित त्यानेही ते पुस्तक वाचले की काय असेही वाटले.कारण काहीही असो तो गेला व मीही जीवहत्येचे पातक कळल्याचा समाधानाचा सुस्कारा सोडला.
आता मी विचार करते आहे की काय बरं शिकता येईल त्याच्याकडून? संकटावर मात करायची खरं तर त्याची कुवत नव्हती. पण संकटांना चुकण्याची चतुराई त्याने दाखवली. विशेष म्हणजे त्याची लढाई अगदी एकाकी आणि स्वबळावर चालू होती. आईवडील, भावंड, मित्र, नातलग कोणाचीही त्याला मदत नव्हती. अणकुचीदार दात सोडले तर इतर कोणतेही शस्त्र नव्हते. तो एकटाच परिस्थितीला तोंड देत होता. त्याला कोणाचा पाठिंबा नव्हता, ना आतून ना बाहेरून. आहे ना बरंच काही घेण्यासारखं त्याच्याकडून? आपलं आयुष्य आपलं आहे. त्यातले संघर्षही आपलेच आहेत. एकला चालो रे!
आराधना कुलकर्णी
Leave a Reply