रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून.
बरोबर आहे, आपल्या देशात तेव्हा मोटारकार हे श्रीमंतीचे लक्षण होते. फक्त आमच्या लहानपणी गणपतीच्या दिवसात गावातल्या चौकाचौकात मुलामुलींच्या नाचगाण्यांचे मेळे असायचे त्यात मधून मधून लांब आंध्र, तामिळनाडूमधून आलेला एखादा काळा माणूस मंचावर साहसाचे प्रयोग करून दाखवायचा. हा प्रयोग म्हणजे खूप खिळे असलेल्या पाटावर उघड्या अंगाने झोपून दाखवायचे आणि नंतर सर्वांसमक्ष रेझरचे ब्लेड हातांनी तोडून खायचा. मग
सिनेमात आणि श्रीमंतांच्या बंगल्यापुढे ती दिसायची. अशी मोटरकार खाणे ही चैन आपल्याकडच्यांना परवडणे शक्यच नव्हते, त्यामुळे ते फक्त गेलेले बल्ब, गंजलेले खिळे आणि वापरलेली ब्लेड्सच खाऊ शकत. हे लोक इतके सगळे भयानक खायचे, पण ते दिवसातून निदान एक वेळ तरी साधे जेवण खाता यावे म्हणून! – हे या लोकांचा अवतार पाहून लक्षात यायचे.
बिचाऱ्यांना ‘पोटा’साठी काय काय खावे लागायचे!
अलीकडे असले प्रयोग कोणी करतात असे ऐकले नाही. मात्र वर्तमानपत्रात कोणी गुरांचा चारा खाल्ल्या तर कोणी लाखो करोडोंचा कोळसा खाल्ला कोणी अंतराळातल्या टू जी स्पेक्ट्रम नावाच्या लहरी खाल्ल्या तर कोणी हजारो किलोमीटर लांब टेलिफोनची वायर खाल्ली असे वाचायला मिळते. कर्नाटक, आसाम आणि गोव्यात खनिजाचे डोंगरच्या डोंगर फस्त केल्याचे गेली काही वर्षे वाचनात येत होते. लहान मुलांचा माध्यान्ह आहार, खडू फळा, सिमेंट अशा शुल्लक गोष्टीच नव्हे तर लष्करातल्या तोफा, हॅलीकॉप्टर, शवपेट्या या गोष्टीही खाल्ल्याचे वाचलेले आठवले.
सगळ्यात खायला हलके आणि स्वादिष्ट म्हणजे भूखंड हा पदार्थ असे कळते, त्यामुळे बहुसंख्य राजकारणी हे आवडीने खातात. हल्ली हल्ली पर्यंत हा पदार्थ गुपचूप खाता येत होता. पण हल्ली आरतीआई नावाच्या कुठल्यातरी बाईला याचा सुगावा लागू शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. जितका मोक्याच्या जागी असेल तितका हा पदार्थ जास्त स्वादिष्ट असतो. सासू किंवा सासरा राजकारणात असलेल्या जावयांची या पदार्थास खास पसंती असते. त्यामुळे ते चोरून खायला जातात, आणि कुणाला कळलेच तर बिचाऱ्या सासू किंवा सासऱ्याला अपचन होते. काही दिवसापूर्वी ‘रॉबर्ट’ नावाचा एक जावई गुपचूप हरियाणात हे खायला गेला तर सुळे नावाचा जावई भर पुण्यात मिलिट्री एरियात हे खायला बसला. काही उपाशी लोकांनी आरडा ओरडा करायचा प्रयत्न केला पण इतका स्वादिष्ट पदार्थ जावई नाही खाणार तर तर कोण? हे कसे लक्षात येत नाही यांच्या.
अशा सर्व ‘भारी भारी’ खाण्यापुढे आपले ‘ब्लेड आणि बल्ब’ खाण्याचे प्रयोग ‘किस पेड कि पत्ती’! असे वाटून त्या बिचाऱ्या तामिळी कलाकारांनी आपले प्रयोग करण्याचे हल्ली सोडून दिले असावे असे वाटते. ते तेव्हा घरात खायला काही नसल्याने या गोष्टी खायचे पण हल्लीचे राजकारणी तीन्ही त्रिकाळ पंच पक्वानात लोळत असूनही त्यांचे पोट भरत नाही आणि असले पदार्थ खायच्या नादाला लागलेले असतात. कितीही वय झालेले असो, आपल्यावर अवलंबून बायकामुले असोत किंवा नसोत, जे काय मिळेल ते खात सुटायची खा खा यांना लागलेली असते. कुठलेही खाते असो, कुठलाही पदार्थ असो. आपल्या बगलबच्च्यांना सोबत घेऊन कित्येक हजार करोड हे लोक बघता बघता खातात असे वाचनात येते.
एक ‘आम आदमी’ (खरोखरीचा, केजरीवालचा नव्हे.) या नात्याने मी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात काय काय खाल्ले, किंवा खाऊ शकलो, याची आठवण काढायचा प्रयत्न केला. तेव्हा सगळ्यात प्रथम, बालपणी मोठ्या भावंडाकडून पाठीवर खाल्लेले धपाटे आठवले. त्यानंतर बापाचा मार नंतर प्राथमिक शाळेत मास्तरांनी डोक्यावर मारलेल्या टपल्या मग हलक्याशा चापट्या. त्यानंतर जसजसा वाढत गेलो म्हणजे पाचवीत गेल्यावर छड्या, रट्टे, सातवी नंतर गुद्दे, दणके, कानपिळे इत्यादी प्रकार खाण्यात आले. त्यानंतर उपदेश खात खात कसाबसा थोडेफार शिकून नोकरीला लागल्यावर साहेबाचे फायरिंग खाऊ लागलो.
यथावकाश लग्न झाल्यावर तिच्या माहेरच्यांचे टोमणे व त्यानंतर बायकोची बोलणी खाऊ लागलो. लग्नानांतर तीन दिवस बेळगावला हनिमूनला गेलो तेवढे तीनच दिवस थोडा फार भाव खायला मिळाला, त्यानंतर मात्र आयुष्यभर कामावर वरिष्ठांकडून फायरिंग आणि घरात बायकोची बोलणी खाल्ली. ऑफिसमध्ये भ्रष्टाचार करायचा एकदाच प्रयत्न केला म्हणजे ऑफिसच्या स्टेशनरीच्या खरेदीचे काम एकदाच माझ्यावर आले, त्यात मी पन्नास रुपये जादा दाखविले, म्हणजे पन्नास रुपये खाल्ले!, पण पुढच्या आठवडा भर माझेच मन मला खात होते. मग पगाराच्या दिवशी मी पन्नासची नोट वाटेवरच्या देवळात दान केली तेव्हा बरे वाटले.
हल्ली जेव्हा जेव्हा पेपरमध्ये भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचतो, लोक कोटीच्या कोटी खातात, काही काही न ऐकलेले खातात. न शिकलेले, आपल्या पेक्षाही कमी शिकलेले भरपूर खाऊन बायकापोरांसह परिदेशी जातात, भारी भारी गाड्या उडवितात, मोठ मोठ्या बंगल्यात राहतात असे वाचतो तेव्हा ते मला काही पचत नाही, पोटात दुखायला लागते. हे लोक खातात त्यांना काहीही होत नाही आणि आम्हाला मात्र नुसती बातमी वाचून पोटदुखी सुरू! हल्ली म्हातारपणी साधे डाळ भात खाल्ले तरी पचत नाही. परवा असेच काही खाल्ल्याचे निमित्त झाले आणि नेमकी त्याच दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली होती की कुणी राजकारण्याने बोटीच्या खरेदीत गफला केला, कित्येक कोटींची बोट खाल्ली होती! त्यामुळे मला स्वप्न पडले कि माझ्या पोटात भली मोठी बोट डुचमळते आहे आणि माझ्या घशात कोळसा अडकला आहे.
वासुदेव कारांजकर, फोंडा.
अमृत मे 2014
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply