सर्वच दैनिक,’सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक’ असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,’गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते.
‘आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव
नेता ‘ असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. ‘पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी’ अशा हजारों कंपन्या असतांना
निर्धास्तपणे लिहिले जाते.
तसेच ‘थंड रस मिळण्याचे एकमेव ठिकाण’
सगळ्याच ठिकाणी असतात. एखाद्या माणसाचा गौरव करतांना अतिशयोक्ती केली जाते.रिटायर कर्मचाऱ्याच्या बाबतीत,’आपल्या सेवेत एकही रजा न घेणारा एकमेव कर्मचारी .’ लोक दबक्या टाळ्या वाजवतात कारण रजा न घेता गायब रहाणारा तो ख्यातीप्राप्त कर्मचारी असतो.
‘एकमेव’चे फार कौतुक असते. गावामध्ये असे
खुप एकमेव असतात. फक्त अमुककडे बुलेट आहे. तो एकटाच पास झाला. तो एकमेव निवडून आला.त्याच्या एकट्याच्या विहिरीला पाणी आहे.तो एकमेव माणूस कुणालाच भित
नाही. अनेक गावात’एकमेव’ बस असते. गावात जाण्याचा एकमेव रस्ता असतो.कुठे
एकमेव दुकान असते.
एकमेव असले की जास्त महत्त्व असते. पर्याय असला की महत्त्व कमी होते. अनेक
असले तरी एकमेव अशी जाहिरात करावी लागते.क्लासेसवाले शुद्धा ,’आपल्या पाल्याच्या यशाची खात्री देणारे एकमेव ‘ अशी जाहिरात करतात.’ खात्रीचे सोने मिळण्याचे एकमेव ठिकाण’ पण काही केल्या
ते एकमेव दुकान सापडत नाही. एका ठिकाणी,’ताजा खवा मिळण्याचे एकमेव ठिकाण’असे लिहिलेले होते. बघतो तर काय
चांगला महिनाभराचा शिळा खवा त्याने आमच्या माथी मारला.
‘शेती औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण’ त्या
ठिकाणी गेलो.कोणतीही वस्तू मागितली की
आताच संपली,उद्या नवा माल येणार आहे,सध्या तुडवडा आहे, नोकराने कुठे ठेवली त्यालाच माहीत. ती चांगली नाही, आता ती बंद झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो आम्हाला कटवतो.जातांना
‘एकमेव ठिकाण’ फलक बघण्याचा मोह मला आवरत नाही.
‘आमच्या गावातील शिकलेला एकमेव माणूस’ लगेच छाती फुगते. अनेकांना एकमेव
असल्याचे भाग्य लाभलेले आहे. ज्यांना नाही
लाभले तेही एकमेव असल्याचा प्रचार करत
आहेत. प्रेमी देखील एकमेकांना ,’माझ्या जीवनात तु एकमेव आहे.’ अशी खात्री दिली
जाते. तशी ती अनेकांना दिलेली असते. पण
हे उभयतांना माहीत असल्याने त्या खात्रीची
कुणी खात्री बाळगत नाही.
एकमेव असल्याचा तोरा वेगळाच असतो.मग
तो शिरा हलवायचा चाटू की असेना.
कौशल्याच्या बाबतीतही एकमेव असल्याचा
गाजावाजा असतो.खंब्यावर चढणारा एकमेव
माणूस,दाताने लाकूड उचलणारा वगैरे. किंवा
संचालन किंवा भाषण करणारा एकमेव व्यक्ती. उर्दू जाणणारा एकमेव व्यक्ती. खेड्यात असे एकमेव अनेक असतात. शहरात मात्र खुप पर्याय असतात.खेड्यात
एकमेव दवाखाना असतो.एकमेव शाळा असते. जिथे एकच आहे तिथे एकमेव लिहिले
जात नाही ,त्याची गरज नसते कारण ते खरेच
असते. परंतु अनेक असतांना ‘एकमेव’असा प्रचार करणे हास्यास्पद आहे.
-ना.रा.खरा
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
Leave a Reply