नवीन लेखन...

एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
छोटी बदके बाजूच्या तळ्यांत आईबरोबर पोहत होती.
ती त्यांना पाण्यात खेळ खेळायला शिकवत होती पण त्यांना कांही ते जमत नव्हतं.
तीं इकडे तिकडे भरकटत होती.
उंदीरमामा म्हणाला, “किती द्वाड मुलं आहेत ! त्यांना कडक शिक्षा कर.”
बदकांची आई म्हणाली, “त्याची गरज नाही. पालकांनी संयम ठेवायला हवा.”
उंदीर मामा म्हणाला, “माझं कुटुंबच नाही.
मी आपला एकटा जीव सदाशिव.
तेच बरं असतं. मी कधी लग्न करणार नाही.
ते प्रेम वगैरे ठीक आहे पण मैत्री त्यापेक्षा मोठी असते.
ह्या जगांत निरपेक्ष मैत्रीसारखं कांहीच नाही.”
जवळच्याच झाडावरून तो संवाद ऐकणारी मैना खाली येऊन म्हणाली, “तुझ्या मते निरपेक्ष मित्राची कर्तव्य काय असावीत, ते तरी ऐकू दे.”
बदकांच्या आईने तिला दुजोरा दिला.
उंदीरमामा म्हणाला, “हा काय प्रश्न आहे. माझा मित्र माझ्याशी एकनिष्ठ असावा.”
मैना म्हणाली, “आणि तू मित्रासाठी काय करणार ?”
उंदीरमामा म्हणाला, “मला तुझं बोलणं कळतच नाही.”
मैना म्हणाली, “ऐक, मी तुला दोन मित्रांची एक गोष्ट सांगते.”
उंदीरमामा म्हणाला, “गोष्टी मला आवडतात. माझा कांही संबंध आहे कां गोष्टीशी ?”
मैना म्हणाली, “तुझ्यासाठीच ही गोष्ट आहे.”
असं म्हणत तिने एकनिष्ठ मित्राची गोष्ट सांगितली, ती अशी –
‘कोणे एके काळी गोपाळ गाजरे नावाचा साधा भोळा, प्रामाणिक, छोट्या चणीचा माणूस एका गांवात रहात होता.
तो दयाळू होता. तो एका खोपटात एकटाच राही.
स्वतःच्या मळ्यात खूप काम करत असे.
त्याच्यासारखी सुंदर फुलबाग संपूर्ण जिल्ह्यांत कोणाचीही नसेल.
सर्व प्रकारचे, सर्व रंगांचे गुलाब होते.
जाई, जुई, मोगरा, होती. शेवंती होती, चमेली होती.
मनमोहक फुले होती.
सतत कुठली ना कुठली फुले बहरलेली असत.
बागेत नेहमी सुवास दरवळत असे.’
‘गोपाळचे अनेक मित्र होते पण घट्ट मैत्री असलेला एकनिष्ठ मित्र एकच होता, तो म्हणजे दादा गिरिधर.
श्रीमंत दादा गिरिधर एवढा एकनिष्ठ होता की रोज गोपाळच्या भिंतीवरून बागेमध्ये येऊन थोडी थोडी सर्व प्रकारची सुवासिक फुले नेल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नसे.
फळांचा हंगाम असेल तर तो छान छान फळं घेऊन जाई.
दादा गिरिधर म्हणे, “मित्रांमधे आपलं, दुसऱ्याचं असं नसतं. खऱ्या मित्रांनी सर्व वाटून घ्यावं.”
गोपाळ हसून मान हलवत असे आणि अशा उदात्त विचारांचा मित्र आपल्याला लाभला आहे, ह्याचा त्याला खूप आनंद वाटे.
शेजाऱ्या-पाजाऱ्यांना मात्र आश्चर्य वाटे की श्रीमंत दादा गिरिधर गोपाळला कांहीच भेट देत नसे.
त्याच्याकडे गव्हाची शंभर तरी पोती भरलेली होती, सहा दूध देणाऱ्या गाई होत्या आणि अंगावर भरपूर लोकर असणाऱ्या खूप साऱ्या मेंढ्या होत्या.
गोपाळने मात्र असा विचार करून आपला माथा शिणवला नाही.
दादा गिरिधर आदर्श मैत्रीतील निरपेक्षतेबद्दल जे सांगत असे, तें ऐकण्यात त्याला खूप आनंद वाटे.’
‘तो आपल्या मळ्यात काम करण्यात मग्न असे परंतु हे सर्व हिंवाळा येईपर्यंत चाले.
त्या भागांतील हिंवाळा खूप कठीण जाई.
त्या दिवसांत ना फळ मिळे, ना फूल.
तो बाजारात विकायला कांही नेऊ शकत नसे.
त्या दिवसांत तो भूक व थंडी यांनी त्रस्त होई.
कित्येक रात्री फक्त एखादे फळ खाऊन झोपी जाई.
हिवाळ्यात तो एकटाही पडे कारण दादा गिरिधर हिवाळयात त्याला भेटायला एकदाही येत नसे.
दादा गिरिधर हिवाळ्यात आपल्या पत्नीला म्हणे, “ह्या दिवसात मी गोपाळला भेटायला न गेलेलंच बरे.
कारण माणूस जेव्हां वाईट परिस्थितीत असतो, तेव्हां कोणी मित्र भेटल्याने त्याला वाईट वाटते.
निदान मला तरी मैत्रीबद्दल असे वाटते.
तेव्हां मी हिंवाळा संपल्यावर आणि वसंत ऋतु सुरू झाल्यावरच भेटायला जाईन.
तेव्हा तो मला सुंदर गुलाबांची टोपलीच भेट देऊ शकेल व खूप आनंदीत होईल.”’
‘त्याची घरांतील धगधगणाऱ्या शेकोटीच्या बाजूला आरामखुर्चीवर रेलून त्याची पत्नी म्हणाली, “खरंच, तुम्ही मैत्रीबद्दल किती छान विचार मांडतां !
मोठमोठे प्रवचनकार सुध्दा मैत्रीवर इतकं छान बोलू शकत नाहीत.”
दादा गिरिधरांचा तिथे बसलेला लहान मुलगा म्हणाला, “गोपाळकाका जर इतके अडचणीत आहेत तर आपण गोपाळ काकांना इकडे कां बोलावत नाही ?
मी त्यांना माझी अर्धी न्याहरी व अर्ध्या भाकऱ्या देईन व मी पाळलेले ससे दाखवीन.”
गिरिधर दादा म्हणाले, “किती मूर्ख आहेस रे तू !
तुला शाळेत पाठवून कांही उपयोग झाला नाही.
जर आपण गोपाळकाकाला इथे बोलावलं, तो इथे आला व त्याने आपल्याकडली ही गरम ठेवणारी शेकोटी, आपलं चांगलं जेवण, आपल्याकडला वाईनचा साठा, इ. पाहिलं तर त्याला मत्सर वाटेल.
मत्सरासारखं वाईट कांहीच नाही.
त्याने गोपाळचा स्वभावच बदलून जाईल.
मला गोपाळचा स्वभाव खराब व्हावा, असं बिलकूल वाटत नाही.
मी त्याचा चांगला मित्र आहे आणि तो वाईट गोष्टीकडे वळू नये ह्यासाठी माझं नेहमीच त्याच्यावर लक्ष राहिलं.
तो इथे आला तर आपल्याकडे भाकरीच पीठ उधारीने मागेल आणि मी ते त्याला देऊ शकणार नाही.
पीठ वगैरे गोष्टी वेगळ्या आणि मैत्री वेगळी.
अतिशय स्पष्ट गोष्ट आहे ही.”’
‘दादा गिरिधरची पत्नी म्हणाली,
“किती छान बोलतां तुम्ही !
मला तर गुंगी येऊ लागली.
किर्तन ऐकतांना असंच होतं.”
असे म्हणत तिने गरम काॅफीचा कप रिकामा केला.
दादा गिरिधर म्हणाला, “अनेक लोक कामे योग्य करतात पण बोलण्यात कमी पडतात.
ह्यावरून असंच दिसून येतं की दोन्हीमधे बोलणं हेच काम करण्यापेक्षा कठीण आहे आणि दोन्हीत श्रेष्ठ आहे.”
असं म्हणून त्याने रागाने आपल्या मुलाकडे पाहिलं.
मुलाने आपलं बोलणं चुकलं असं समजून शरमेने मान खाली घातली व तो रडू लागला.’
इथे उंदीरमामाने विचारले, “संपली गोष्ट ?”
मैना म्हणाली, “नाही. आता गोष्ट सुरू झाली आहे.”
उंदीरमामा म्हणाला, “हल्ली कथा सांगण्याची पध्दत बदलली, हे तुला माहित नाही तर !
हल्ली शेवट प्रथम सांगतात, मग सुरूवातीकडे जातात आणि शेवटी मधला भाग सांगतात.
परवा एक समीक्षक एका तरूणाला ह्या बद्दल सांगताना मी ऐकलं आहे.
तो खूप वेळ बोलत होता आणि मला वाटते तो योग्यच बोलत होता.
तरूणाने कांही म्हटले तर तो त्याला “ह्य:” करून हंसत होता.
पण तू तुझी गोष्ट चालू ठेव.
मला दादा गिरीधर खूप आवडला.
माझेही विचार कांहीसे असेच आहेत, त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप सहानुभूती वाटत्येय.”
मैना ह्या पायावरून त्या पायावर अशी नाचत म्हणाली, ‘मग काय ! हिंवाळा संपला, पुन्हा वसंत ऋतु जवळ आला.
गावठी गुलाब फुलण्याचे दिवस आले.
तेव्हा दादा गिरिधर म्हणाला, “मी जरा गोपाळला भेटायला जाऊन येतो.”
त्याची पत्नी म्हणाली, “तुम्ही नेहमी किती विचार करतां मित्राचा ?
आणि हो, जातांना बरोबर फुलांसाठी मोठी करंडी घेऊन
जा.”
मग दादा गिरिधरने एक मोठी करंडी घेतली व तो गोपाळला
भेटायला टेकडीवरून खाली गेला.”
“राम राम गोपाळ.” गोपाळला मळ्यात काम करतांना पाहून तो म्हणाला.
“राम राम, दादा.” गोपाळ खूप खुशीने हंसत म्हणाला.
गिरिधरने विचारले, “गोपाळ, हा हिवाळा कसा गेला तुझा ?”
गोपाळ म्हणाला, “किती चांगला आहेस तू दादा !
आल्या आल्या प्रथम माझी काळजी व्यक्त करतोयसं !
हा हिवाळा मला जरा कठीणच गेला पण आता ठीक आहे.
खूप फुले आली आहेत.
मी खूप आनंदात आहे.”
”गोपाळ, हिवाळयात आम्ही घरी तुझी अनेकदा आठवण काढली आणि तुझे दिवस कसे जात असतील, ह्याबद्दल चिंताही केली.” गिरिधर दादा म्हणाला.
गोपाळ म्हणाला, “दादा, हा तुझा चांगुलपणा झाला.
मला मधेच वाटे, तू मला विसरला तर नाहीस ना !”
गिरिधर दादा म्हणाला, “गोपाळ, कमाल करतोस तू !
मैत्री अशी विसरायची असते कां ?
हीच तर मैत्रीची सर्वात मोठी खूण आहे पण तुला जीवनातील काव्यमयता कळत नाही. असो.
ह्या वर्षी गावठी गुलाब खूप आलेले दिसतात.”
गोपाळ म्हणाला, “ह्या वर्षी गावठी गुलाब छानच फुललेत.
मी भाग्यवान आहे की ह्या वर्षी खूप फुलं येतील व मी ती नेऊन बाजारांत विकीन.
ती विकून आलेल्या पैशांतून मी माझी एकचाकी गाडी विकलीय, ती परत आणिन.”
गिरिधरदादा म्हणाला, “काय तू ती विकलीस ? किती मूर्खपणा !”
गोपाळ म्हणाला, “मला हा हिवाळा खूपच वाईट गेला.
पाव विकत घ्यायला पैसे नव्हते.
प्रथम मी माझ्या कोटाची चांदीची बटणे विकली.
मग माझी चांदीची सांखळी विकली, मग गाडी विकली.
पण आता मी त्या सर्व गोष्टी परत विकत घेईन.”
“गोपाळ, त्यापेक्षा मी माझी एकचाकी गाडी तुला देईन.
थोडीशी दुरूस्ती करावी लागेल तुला.
त्याची एक बाजू निखळलीय, चाकाचे कांही आरे पण गेलेत. पण मी देईन तुला !
अनेक लोक मी ती तुला दिली म्हणून मला मूर्ख म्हणतील.
पण मी इतरांसारखा नाही, उदार आहे आणि औदार्य ही सच्च्या मैत्रीची खूण आहे.
शिवाय मी माझ्यासाठी नवी गाडी घेतली आहे.
तू चिंता करू नकोस मी माझी एकचाकी गाडी तुला देईन.
गोपाळ म्हणाला, “खरंच तू उदार आहेस.”
त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.
तो पुढे म्हणाला, “ मी ती गाडी दुरूस्त करून घेईन. माझ्याकडे लाकडाची एक फळी आहे.”
“लाकडाची फळी. अरे, मला नेमकी लाकडाच्या फळीचीच गरज आहे, माझ्या कोठारावर लावायला.
सध्याच्या छपराला मोठं भोक पडलय व त्यांतून पाणी येऊन माझं सर्व धान्य खराब होण्याची शक्यता आहे.
बरं झालं तू फळीबद्दल मला बोललास.
बघ एका चांगल्या गोष्टीतून दुसरी चांगली गोष्ट कशी होते ते.
मी तुला गाडी देणार आहे आणि तू मला फळी देणार आहेस.
अर्थात गाडीची किंमत बरीच जास्त असते पण खरी मैत्री कधी अशा क्षुल्लक गोष्टी पहात नाही.
दे ती फळी मला दे, मी आजच माझ्या कोठाराचे छप्पर ठीक करतो.”
गोपाळने आणलेल्या फळीकडे पहात गिरिधर दादा म्हणाला, “गोपाळ, ही कांही मोठी नाही.
माझ्या छप्पराला वापरल्यावर तुझ्या गाडीसाठी पुरेशी नाही रहाणार पण ती कांही माझी चूक नाही.
मी तुला माझी गाडीच देतोय तर तू मला थोडी ही गुलाबाची फुलंही देशील.
ही बघ मी छोटी करंडी आणलीय.
तू ती पूर्ण भरून देशीलच.”
गोपाळ म्हणाला, “पूर्ण भरून हवी ?
करंडीकडे पहात गोपाळ विचार करत होता.
ही भरून फुले दिली तर बाजारात काय नेणार ?
फुले विकायला नसली तर चांदीची बटणे कशी परत आणणार ?
गिरिधर दादा म्हणाला, “गोपाळ, मी तुला गाडीच दिली आहे आणि थोडीच फुले मागितली आहेत.
मी चुकलो असेन पण मी विचार केला की खऱ्या मैत्रीत स्वार्थाचा लवलेशही नसतो.”
गोपाळ कळवळून म्हणाला, “असं बोलू नकोस माझ्या मित्रा.
तुझं माझ्या मळ्यात नेहमीच स्वागत आहे.
चांदीच्या बटणांपेक्षा तुझं मत मला मौल्यवान आहे.”
असं म्हणून गिरिधर दादाची करंडी घेऊन तो धावतच बागेत गेला आणि फुले तोडून त्याने ती गच्च भरली.”
गिरिधर दादा म्हणाला, “बरंय गोपाळ, मी निघतो.”
आणि एका हातात फुलांनी भरलेली करंडी आणि दुसऱ्या हातात लाकडाची फळी घेऊन तो गेला.
दुसऱ्या दिवशी गोपाळ बागेत काम करत असतांना पाठीवर एक भरलेलं पोतं घेऊन गिरिधर दादा तिथे आला व म्हणाला, “गोपाळ, हे पोतं बाजारापर्यंत घेऊन जाशील ?”
गोपाळ म्हणाला, “मला बागेत आज खूपच कामं आहेत.
वेली बांधायच्या आहेत, फुलझाडांना पाणी घालायलाच हवं, गवत कापायचय. आज नाही जमणार !”
गिरिधर म्हणाला, “ठीक आहे पण मी तुला एकचाकी गाडीच देणार आहे, हे लक्षात घेता, एक पोतं बाजारात न्यायला मदत करायला नाही म्हणणं, ही खरी मैत्री नव्हे.”
गोपाळ म्हणाला, “असं नको बोलू दादा, मैत्रीपुढे मला सारं जग तुच्छ आहे.”
तो आत जाऊन टोपी घालून आला आणि पोतं पाठीवर घेऊन बाजारला निघाला.
त्यादिवशी फार गरम होत होते.
रस्ता धुळीचा होता.
गोपाळ इतका थकला की त्याला वाटे, थोडा विसावा घ्यावा पण तो तसाच चालत राहिला.
शेवटी तो बाजारात पोहोचला.
त्याने ते पीठाचं पोतं चांगल्या किंमतीला विकलं.
मग तो लागलीच घरी आला.
संध्याकाळनंतर वाटेत चोरांनी लुटायची शक्यता होती.
गोपाळ विचार करत होता की दिवसभर श्रम झाले होते पण मी माझ्या खास मित्राचे काम केले.
तो मला एकचाकी गाडीही देणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच गिरिधर दादा त्याच्याकडे आला.
आदल्या दिवशी दमलेला गोपाळ अजून उठला नव्हता.
गिरिधर दादा म्हणाला, “गोपाळ, किती आळशी आहेस तू ?
आता उठतोयस ?
मी तुला एकचाकी गाडी देणार आहे हे लक्षात ठेऊन जरा जास्त मेहनत कर.
आळशीपणा हे मोठं पाप आहे.
माझे मित्र आळशी झालेले मला अजिबात आवडणार नाही.
मी स्पष्ट बोलतो म्हणून तुला कदाचित राग येईल.
माणसाला गोड पण खोट बोलणारे खूप मित्र भेटतात पण त्याच्या हिताचं परखड बोलणारा एखादाच असतो.
मी मित्राच्या भल्यासाठी खरं तेंच सांगणं पसंत करतो.”
गोपाळ म्हणाला, “माझी चूक झाली.
काल फार थकलो होतो मी.
म्हणून जाग आल्यावर पक्षांची किलबिल ऐकत पडून राहिलो.
पक्षांची किलबिल ऐकली की माझा दिवस छान जातो.”
गोपाळच्या पाठीवर थाप मारत गिरिधर दादा म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे.
आता कपडे कर आणि माझ्याकडे चल.
आज जरा तू माझ्या कोठाराचं छप्पर दुरूस्त करून देशील ना !”
गोपाळला खरं तर स्वतःच्या बागेत खूप कामं करायची होती.
त्याच्या बागेतल्या फुलांना दोन दिवस पाणी मिळालं नव्हतं.
गिरिधरदादाला नाही म्हणणं मात्र त्याला जमणार नव्हतं कारण गिरिधरदादा त्याचा सच्चा मित्र होता.
त्याने विचारलं, “मी कामांत आहे असं सांगण हे मैत्रीला धरून होणार नाही ?”
गिरिधर दादा म्हणाला, “मला विचारशील तर मी तुला एकचाकी गाडी देणार आहे, हे लक्षात घेतल्यास मी होय म्हणेन पण असू दे.
तू नाही म्हणत असशील तर मी स्वतःच करीन.”
गोपाळ म्हणाला, “छे ! छे ! असं कधीच होणार नाही. आलोच मी.”
तो कपडे करून आला व गिरिधर दादाच्या घराकडे जाऊन त्याच्या कोठाराचं छप्पर दुरूस्त करू लागला.
तिथे त्याने दिवसभर काम केलं व गिरिधर दादाच्या कोठाराचं छप्पर ठीक केलं.
संध्याकाळी गिरिधर काम कुठवर आलंय ते पहायला आला.
त्याने विचारलं, “गोपाळ, झालं कां छप्पर ठीक.”
गोपाळ म्हणाला, “झालंच आतां !” पांच मिनिटांनी तो खाली आला.
गिरिधर म्हणाला, “दुसऱ्यासाठी काम करण्यासारखा आनंद इतर कशांतही नाही.”
गोपाळ घाम पुसत म्हणाला, “तुझं बोलणं नेहमीच किती छान असतं.
मला असं कधीच बोलता येणार नाही, असं मला वाटतं.”
गिरिधर दादा म्हणाला, “येईल.
मैत्रीबद्दलच्या अशा कल्पना, शब्द तुलाही सुचतील.
त्यासाठी तू जास्त मेहनत करायला हवी.
सध्या तू मैत्रीचा सराव करतो आहेस.
एक दिवस तुला मैत्रीचे तत्त्वज्ञानही कळेल.”
गोपाळ म्हणाला, “खरंच मला जमेल ते ?”
गिरिधर दादा म्हणाला, “मला त्याबद्दल संशयच नाही.
पण आता आजचं काम झालं आहे तर तू घरी जाऊन आराम कर.
उद्या तुला जरा माझ्या शेळ्यांना चरायला डोंगरावर न्यायचयं.”
बिचारा गोपाळ ह्यावर काही बोलायलाही घाबरला.
दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिधरने शेळ्यांचा कळप गोपाळच्या स्वाधीन केला आणि गोपाळ शेळ्यांना घेऊन डोंगरावर गेला.
त्याचा पूर्ण दिवस त्यात गेला.
शेळ्या गिरिधर दादाकडे पोचवून संध्याकाळी आला व थकून खुर्चीतच झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दिवस वर येईपर्यंत जाग आली नाही.
तो उठल्यावर स्वतःच्या बागेत काम करायला गेला.
मनांत तो विचार करत होता की स्वतःच्या बागेत काम करण्यात किती आनंद आहे ना !
परंतु कांही ना कांही कारणाने त्याला स्वतःच्या बागेकडे नीट लक्ष देतां येईना कारण त्याचा मित्र गिरिधर दादा नेहमीच येऊन त्याला कांही ना कांही कामावर पाठवत राहिला.
गोपाळला भीती वाटे की त्याच्या फुलांना वाटत असेल की तो त्यांना विसरला.
मग तो असाही विचार करी की गिरिधर हा त्याचा सर्वोत्तम मित्र आहे आणि तो त्याची एकचाकी गाडी मला फुकट देणार आहे.
किती औदार्य आहे त्याचं !
अशा तऱ्हेने गोपाळ गिरिधर दादासाठी साठी काम करत राहिला आणि गिरिधर दादा त्याला मैत्रीसंबंधी उदात्त विचार सांगत राहिला.
गोपाळला ते विचार इतके प्रभावित करत की तो ते एका वहीत टिपून ठेऊ लागला व रोज रात्री वाचू लागला.
एका संध्याकाळी अचानक वादळ आले.
गोपाळ त्याच्या लहान घरांत आराम करत असतांना दारावर ‘खट खट’ आवाज आला.
ती रात्र वादळी होती.
प्रथम गोपाळला वाटले की वाऱ्यानेच दार वाजलं पण पुन्हा दोनदा तसाच आवाज आला.
तेव्हा त्याने विचार केला कुणी चुकलेला प्रवासी दारी आला असावा.
त्याने उठून दार उघडलं तर बाहेर गिरिधर दादा एका हातात कंदील व एका हातात काठी घेऊन उभा होता.
“मित्रा गोपाळ, मी अत्यंत अडचणीत आहे.
माझा मुलगा शिडीवरून खाली पडला. त्याला जखम झाली आहे.
कोणीतरी शेजारच्या गांवच्या डाॅक्टरना बोलावणे गरजेचे आहे.
मीच जाणार होतो पण अशा बिकट रात्री तिथे जायला वेळ लागेल.
मग मला आठवलं की मी तुला एकचाकी गाडी देणारच आहे तर हे काम तू करणे अतिशय योग्यच आहे.
जाशील ना !”
गोपाळ म्हणाला, “नक्की जाईन.
मी तर ही तू माझ्या मैत्रीला दिलेली दादच समजेन.
मी तात्काळ निघतो पण तू तुझा कंदील मला दे रात्र फार अंधारी आहे मला भीती वाटते की मी चुकून एखाद्या खड्ड्यात पडेन.”
गिरिधर दादा म्हणाला, “माफ कर मित्रा पण माझा कंदील अगदी नवा आहे आणि अशा रात्री एवढ्या दूर तू तो घेऊन गेलास आणि त्याला कांही झालं तर माझं खूप नुकसान होईल.”
गोपाळ म्हणाला, “ठीक आहे, राहू दे तो तुझ्याकडेच.”
गोपाळने चटकन् लांब रेनकोट घातला, गरम टोपी घातली, गळ्याभोवती मफलर गुंडाळला व तो त्या वादळात डाॅक्टरकडे जायला बाहेर पडला.
वादळ भयानक होते.
गोपाळला रस्ता नीट दिसत नव्हता.
गोपाळला चालणंही कठीण जात होतं पण तो खूप धाडसी होता.
तीन तास सतत चालत तो डॉक्टरांकडे येऊन पोहोचला व त्याने दार वाजवले.
डॉक्टरनी दार उघडले, “कोण आहे ?
अरे, गोपाळ ! काय झालं तुला ?”
गोपाळ म्हणाला, “डॉक्टर , मला कांही झालेलं नाही पण आमच्या गावातील गिरिधर दादाचा मुलगा शिडीवरून पडला व त्याला जखम झाली आहे.
गिरिधरने तुम्हाला लवकर बोलावले आहे.
डॉक्टर म्हणाले, “ठीक आहे. मी आलोच.”
त्यांनी त्यांचा घोडा मागवला.
बूट चढवले.
औषधांची पेटी मागे बांधली व ते घोड्यावर बसून गिरिधरकडे जायला निघाले.
मागून गोपाळ रखडत चालत होता.
परंतु वादळ वाढत गेलं.
पाऊस जोरांत पडू लागला.
गोपाळ घोड्याच्या बराच मागे राहिला.
नंतर त्याला आपण कुठे जात आहोत ती दिशाच कळेना.
तो भरकटला व चूकून मोठे खोल खळगे असणाऱ्या खाचरांत गेला आणि एका अशा खळग्यांत पडून बुडाला.
त्याचा देह दुसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगताना मिळाला.
लोकांनी त्याला गांवात आणले.
त्याचे दहन केले.
गोपाळला श्रध्दांजली वहायला सर्व गांव जमा झाला होता.
तिथेच एक शोकसभा झाली.
गोपाळचा खास मित्र म्हणून गिरिधर दादानेच श्रध्दांजलीचे भाषण केले व आपण दोघे कसे चांगले मित्र होतो, हे सांगितले.
परतल्यानंतर सर्वजण बसले असतांना गांवचा लोहार म्हणाला, “गोपाळचं असं जाणं सगळ्या गांवाला चटका लावून गेलं.
त्याच्या जाण्याने सर्वांचच मोठ नुकसान झालंय.”
गिरिधर दादा म्हणाला, “माझी तर खरंच मोठी हानी झालीय. मी त्याला माझी एकचाकी गाडी दिलीच होती म्हणा ना !
आता तिचं काय करायचं मला कळत नाही. ती माझ्या घरात अडगळच आहे.
ती दुरूस्त करणं खूपच कठीण आणि खर्चिक काम आहे आणि कुणीही विकत सुध्दा घेणार नाही.
कुणाला कांही देण्यात अर्थ नसतो.
ह्यापुढे कांही देणारच नाही.
दान करून, औदार्य दाखवून माणसाचं नुकसानच होतं.”
इतकी गोष्ट सांगून मैना थांबली.
उंदीरमामा म्हणाला, “पुढे ?”
मैना म्हणाली, “पुढे काय गोष्ट संपली इथे !”
उंदीरमामा म्हणाला, “पण गिरिधरचं पुढे काय झालं ?”
मैना म्हणाली, “तें मला माहित नाही आणि माझ्या दृष्टीने तें महत्त्वाचं नाही.”
उंदीरमामा म्हणाला, “म्हणजे तुझ्या स्वभावात संवेदनशीलता नाही. दुसऱ्यासाठी करूणा नाही.”
मैना म्हणाली, “उंदीरमामा, तुम्हाला कदाचित गोष्टीचं तात्पर्यच कळलं नाही.”
उंदीरमामा म्हणाला, “म्हणजे ! ह्या गोष्टीला तात्पर्य आहे ?”
मैना म्हणाली, “हो, नक्कीच !”
उंदीरमामा म्हणाला, “बाप रे ! बोधकथा !
मग तू हे आधी सांगायला पाहिजे होतं. मग मी ही गोष्ट ऐकलीच नसती !
त्या समीक्षकाप्रमाणे फक्त “ह्य:, ह्य:!..” केलं असतं. बरं तेंच आता करतो. ह्य:!”
आणि उंदीरमामा परत बिळांत निघून गेला.
मैनेने बदकांच्या आईला विचारलं, “कसा वाटला उंदीरमामा तुला ?”
बदकांची आई म्हणाली, “त्याच्या कांही गोष्टी चांगल्या आहेत पण माझ्यातल्या आईला त्या ब्रम्हचाऱ्याची काळजी वाटते.”
मैना म्हणाली, “मला वाटते मी त्याला उगीचच भडकावले. मी त्याला बोधकथा ऐकवली ना !”
बदक म्हणाले, “एखाद्याला बोधकथा ऐकवणे हे भयानक काम ठरू शकतं.”
ह्या मताशी मी अगदी सहमत आहे.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द डीव्होटेड फ्रेंड

मूळ लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..