नवीन लेखन...

इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणजेच ई टी ओ ही रँक पूर्वी इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा ई ओ अशी होती. हल्ली नवीन जहाजांवर आधुनिकीकरणामुळे ऑटोमेशन, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड सिस्टीम आल्यामुळे इलेक्ट्रिकल ऑफिसर्स ना सुद्धा सक्षमता परीक्षा किंवा कॉम्पेटँसी एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा सुरु झाल्यापासून इलेक्ट्रिकल ऑफिसर हे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून जहाजावर जॉईन होत आहेत.

परंतु ज्या ज्या जहाजांवर भारतीय अधिकारी किंवा खलाशी असतात तिथे इलेक्ट्रिकल ऑफिसरना बत्ती साब म्हणून ओळखले जाते. जहाजावरील प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये तसेच प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथे जिथे इलेक्ट्रिकल वायर्स आणि कनेक्शन्स असतात तिथे तिथे ज्या एकमेव व्यक्तीची गरज असते ती व्यक्ती म्हणजे बत्ती साब.

बत्ती साब ही जहाजावरील अत्यंत महत्वाची आणि जवाबदारीची रँक आहे. जहाजावर कॅप्टन नसेल तर चीफ ऑफिसर त्याच्या ऐवजी काम करू शकतो, सेकंड इंजिनियर चीफ इंजिनियरचे काम करू शकतो पण बत्ती साब चे काम कोणीही करू शकत नाही. इलेक्ट्रिकल डायग्रॅम्स आणि फॉल्ट फाइंडिंग हे फक्त तोच करू शकतो. एखाद्या वायरचा लूज कॉन्टॅक्ट संपूर्ण मशिनरी किंवा जहाजाचे इंजिन बंद पडायला कारणीभूत ठरते, डोळ्यांनी न दिसणारे हे प्रॉब्लेम्स शोधून सॉल्व करण्यासाठी बत्ती साब शिवाय दुसरा पर्यायच नसतो.

मर्चंट नेव्ही मध्ये आपल्या इंडियन नेव्हीतून शॉर्ट सर्विस कमिशन नुसार इलेक्ट्रिकल विभागातून रिटायर्ड झालेले बरेचसे अधिकारी बत्ती साब म्हणून काम करत आहेत.

इंडियन नेव्हीतून रिटायर्ड झालेले बहुतांश इलेक्ट्रिकल ऑफिसर हे सरदार असतात, असा माझा तरी अनुभव आहे कारण माझ्या कंपनीत असे बरेचसे बत्ती साब हे सरदार आहेत. तसं पाहिले तर बत्ती साब हे इंजिन डिपार्टमेंट मध्ये चीफ इंजिनियर आणि सेकंड इंजिनियर यांना रिपोर्ट करतात आणि त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे काम करतात.

जुने बत्ती साब इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे डिग्री किंवा डिप्लोमा धारक असायचे परंतु आता बहुतांश बत्ती साब हे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची डिग्री घेतलेले असतात शिवाय आता त्यांच्यासाठी नेव्हीगेशनल आणि इंजिनियर ऑफिसर्स प्रमाणे कॉम्पेटँसी एक्झाम देणे अनिवार्य केले गेले आहे.

मी सेकंड इंजिनियर म्हणून पहिल्यांदाच माझ्या कंपनीतील पस्तीस वर्ष जुन्या जहाजावर जॉईन झालो होतो. तेवढ्या जुन्या जहाजावर दोन लिफ्ट होत्या एक मेन डेक पासून अकोमोडेशन मधील पाच मजल्यांसाठी आणि दुसरी मेन डेक पासून खाली इंजिन रूम मधील पाच मजल्यांसाठी.

सुरवातीचा एक महिनाभर तामिळनाडू आणि केरळ च्या बॉर्डर वर राहणारा साऊथ इंडियन बत्ती साब होता, त्याच्यासोबत वसईचा एक ख्रिश्चन ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर होता. ते दोघे जण, मी सेकंड इंजिनियर म्हणून, चीफ इंजिनियर आणि कॅप्टन असे आम्ही फक्त पाचच भारतीय आणि बाकीचे पन्नास जण इंडोनेशियन.

आमच्या पाच जणांसह कंपनीचे इतर अधिकारी आणि खलाशी सुद्धा हे स्थानिक इंडोनेशियन असे एकूण पंचवीस जण आणि उरलेल्या तीस जणांत कॅटरिंग आणि ऑइल फिल्डचे कर्मचारी आणि अधिकारी.

सेकंड इंजिनियर म्हणून पहिल्यांदा जॉईन झाल्यावर पस्तीस वर्ष जुन्या जहाजावर पहिल्यांदाच आल्याने सर्व मशिनरी आणि सिस्टीम जाणून घेताना आणि एकूणच कामात रूळताना पंधरा दिवस उलटून गेले.

ट्रेनी बत्ती वसईचा असल्याने अस्खलित मराठी बोलायचा आणि माझी नेहमी खेचायचा, की आता दोन आठवड्यात सरदार बत्ती येणार आहे, तो आल्यावर कोई नही जी देख लेंगे आणि कर लेंगे अशा प्रकारे कामं करावी लागतील त्याची तयारी ठेवावी लागेल. महिनाभरात सरदारजी बत्ती साब जॉईन झाला, माझ्या पेक्षा वयाने वीस वर्ष मोठा आणि याच जहाजावर मागील पंधरा वर्षांपासून वर्षातले कमीत कमी सहा महिने काम करत होता. जेवढे माझे वय होते त्याच्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वी पासून त्याने जहाजांवर काम करायला सुरुवात केली होती.

मला जहाजांवर भेटलेल्या सरदारांची नांव दविंदर पाल सिंग , इंदर पाल सिंग , सुखविंदर पाल सिंग , जतींदर पाल सिंग, दर्शनपाल सिंग, रविंदर सिंग, तिरलोचन सिंग, दलजीत सिंग अशी होती, आता जॉईन झालेल्या बत्ती साबचे नांव करमजीत सिंग असे होते. साऊथ इंडियन बत्ती साबने महिनाभरात जहाजविषयी बरीच माहिती दिली होती, जहाज पस्तीस वर्ष जुने झाल्यामुळे वायर शॉर्ट होऊन जळणे आणि त्यातून आग लागण्याचा संभाव्य धोका वगैरे वगैरे सगळ अगोदरच सांगितले.

सरदार बत्ती साब जॉईन झाल्यावर चारच दिवसांनी लिफ्ट मध्ये प्रॉब्लेम सुरु झाले. तसं पाहिले तर लिफ्ट चे काम करण्याची आम्हाला फारशी माहिती नव्हती आणि त्यासाठी प्रोफेशनल टेक्निशियनची आवश्यकता होती. पण बत्ती साब ने सांगितलं आपण प्रयत्न करून बघू, लिफ्टच्या मोटर वर असलेले ब्रेक पॅड घासले गेले होते, सेटींग करून आठवडाभर व्यवस्थित चालली पण पुन्हा तसेच. शेवटी आम्ही दुसऱ्या मशिनरी साठी असलेले ब्रेक पॅड मॉडिफाय करून बदलले आणि लिफ्ट सुरु केली.

एअर कंडिशन सिस्टीम, मीट आणि फिश रूम साठीची रेफ्रिजरेशन सिस्टीम, मोठमोठ्या पंप्सच्या मोटार, टॅन्क लेव्हल अलार्म, ऑटोमेशन, फायर सेन्सर्स आणि अलार्म अशी बरीचशी कामे बत्ती साब त्यांच्या पद्धतीने यशस्वी पणे करत होते. त्यांना कामं सांगण्यापेक्षा ते सांगतील त्याप्रमाणे करत गेल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा होत गेला. तीन वर्षांपूर्वी सेकंड इंजिनियर म्हणून जॉईन झाल्यावर त्याच जहाजावर तीन वर्षातील एकूण सोळा महिने काम केल्यावर कंपनीने मला चीफ इंजिनियर म्हणून प्रमोशन दिले. तीन वर्षांपूर्वी आम्ही पाच भारतीय होतो, पण चीफ इंजिनियर म्हणून पहिल्यांदा जॉईन झालो तेव्हा फक्त बत्ती साबच भारतीय होता. मी सेकंड इंजिनियरचा चीफ इंजिनियर झाल्याने माझ्या ऐवजी स्थानिक इंडोनेशियन सेकंड इंजिनियर आला, ट्रेनी इलेक्ट्रिक ऑफिसर आणि कॅप्टन सुद्धा इंडोनेशियन.

जेव्हा मी पहिल्यांदा चीफ इंजिनियर म्हणून जॉईन झालो त्यावेळेस करमजीत सिंग यांना जहाजावर येऊन दहा महिने पूर्ण झाले होते. त्याचे असे झाले होते की, मी एक जानेवारी 2020 ला जहाजावर सेकंड इंजिनियर म्हणून जॉईन झालेले आणि 27 जानेवारी 2020 मध्ये करमजीत सिंग जॉईन झाले. 2020 च्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोना मुळे हाहाकार माजला आणि मी तीन महिन्यांनी घरी जाण्याऐवजी पाच महिन्यानी वंदे भारत मिशन नुसार जकार्ता मुंबई स्पेशल फ्लाईट ने घरी आलो. घरी आल्यावर पुन्हा विजा आणि वर्क परमिट वगैरे होता होता सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर मध्ये मी जहाजावर जॉईन करायला गेलो पण यावेळेस मला चीफ इंजिनियर म्हणून पाठवले गेले. जहाज जॉईन करण्यापूर्वी चौदा दिवस जकार्ता मध्ये हॉटेल क्वारंटाईन केले गेले होते. 8 नोव्हेंबर ला घरातून निघाल्यावर प्रत्यक्ष जहाजावर पोहचायला 23 नोव्हेंबर उजाडले होते.

जहाज जॉईन केल्यावर पहिले बत्ती साबला दहा महिने होऊन गेले असल्याने त्यांच्या रिलिव्हर साठी बॉस आणि ऑफिसला कळवले. पण 23 नोव्हेंबर 2020 ते 2 एप्रिल 2021 ला मी जहाजावरुन पुन्हा घरी यायला निघालो तरीही बत्ती साब करमजीत सिंग जाहजावरच. त्यांचा रिलिव्हर काही जॉईन झालाच नाही. कारण नोव्हेंबर एन्ड आणि डिसेंबर मध्ये त्यांच्या रिलीव्हर च्या मिसेस ची डिलीव्हरी असल्याने त्याने नकार दिला आणि त्यानंतर जानेवारी पासून इंडोनेशियात लॉक डाऊन मुळे परदेशी नागरिकांना यायला बंदी घातली.

जहाजावर जॉईन होऊन एक वर्ष झाल्याने त्यांची एक वर्षासाठी व्हॅलिडिटी असलेली मेडिकल एक्सपायर झालेली. कंपनीने त्यांची मेडिकल करण्यासाठी सात दिवसांसाठी त्यांना जकार्ताला पाठवले आणि मेडिकल क्लियर झाल्यावर पुन्हा जहाजावर परत पाठवले.

वयाची पंचावन्न वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा जहाजावर सलग तेरा महिने काम करणाऱ्या बत्ती साब बद्दल काय आणि किती सांगावे असा प्रश्न पडतो. मी जॉईन झाल्यावर दीड महिन्यात भारतीय कॅप्टन सुद्धा जॉईन झाला. आम्हा दोघां सोबत आणखी एक जण वाढला होता त्यामुळे टी टाईम आणि डिनरच्या वेळी तिघे एकत्र असायचो.
पण सकाळी आठ पासून दुपारी चार पर्यंत करमजीत सिंग आणि मी दोघेच एकमेकांशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करायचो.

त्यांना विचारले बत्ती साब, सरदार लोकं हातात कडे का घालतात, तर त्यावर त्यांनी सांगितले की हातात कडे असल्याने हातातून दुष्कृत्य होण्यापासून मनाला रोखले जाते. खंजीर हा केवळ स्वतःच्या बचवासाठीच नसून, एखादयावर होणाऱ्या अन्यायाला थांबविण्याच्या हेतूने जास्त करून बाळगला जातो. पगडीचे सुद्धा तसेच डोक्याची सुरक्षा हे दुय्यम कारण पण त्याच पगडीच्या कापडाने दोरीसारखे कोणाला बांधायला, मदत करायला किंवा वेळ आल्यास निर्वस्त्राला अंग झाकायला देण्यासाठी उपयोगी पडेल हा हेतू असतो. लंगर मध्ये दिला जाणारा प्रसाद किंवा जेवण हे कोणाला उपाशी पोटी झोपायला लागू नये किंवा भीक मागायला लागू नये यासाठी दिले जाते. सगळेच जण गरीब श्रीमंत हा भेदभाव आणि आपापसातले वैर विसरून लंगरचा लाभ घेत असतात. दाढी आणि पगडी यामुळे सरदार ओळखला जातो आणि त्याहीपेक्षा एकवटला जातो.

चौदा महिन्यात बत्ती साबच्या घरात जवळच्या नात्यातली तीन लग्ने झाली. नॉर्मली बत्ती साब जहाजावर पगडी ऐवजी डोक्यावर केसांना झाकण्यासाठी एक लहान टोपी घालतात आणि टी शर्ट व शॉर्ट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट पण एकदा दुपारी बत्ती साब मॅचिंग शर्ट आणि पगडी बांधून केबिन बाहेर दिसले, त्यांना विचारले बत्ती साब आज जहाज पर किधर घुमने चले? त्यावर त्यांनी सांगितले, व्हाट्सअप और फेसबुक लाईव्ह पर शादी अटेंड कर रहा हूं, कम से कम इतना तो मौका मिल रहा हैं.

कोरोना आणि लॉक डाऊन मुळे संपूर्ण जगभरात सगळ्यांनाच त्रास झाला कोणाच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे उद्योग व्यवसाय बुडाले. जहाजांवर कामं करणाऱ्यांना सहा महिन्यांपासून अठरा महिन्यांपर्यंत घरापासून कुटुंबापासून लांब अडकून राहायला लागले. पण कोरोना किंवा लॉक डाऊन नसताना सुद्धा एका जहाजावर सलग चार वर्षे काम केलेला एक पम्पमन सुद्धा मला बघायला मिळाला आहे. पैशांची एवढी गरज एखाद्याला एवढी असू शकते की स्वतःच्या घरापासून आणि कुटुंबापासून लांब राहून ते वर्ष वर्ष नॉर्मल कामं करू शकतात.

जुन्या पिढीतील लोकं हे खरोखरच दर्यावर्दी होते पण आता आमच्या पिढीतील नव्या लोकांना कधी एकदा दर्यातून बाहेर पडतो असं होऊन जाते. कंपन्यांना सुद्धा जहाजावर चढल्यावर जास्त दिवस कामं करणारे लोकं पाहिजे असतात कारण जहाजावर एखाद्याला जहाजावर पाठवणे आणि जहाजावरुन त्याला पुन्हा घरी पाठवणे हल्ली एवढं किचकट आणि गैरसोयीचे झाले आहे की कधी कोणाला कुठल्या देशात मनाई होईल किंवा लॉक डाऊन होईल ते सांगता येत नाही.

© प्रथम रामदास म्हात्रे. 

मरीन इंजिनियर.

B. E. (Mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..