
हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात.
हृदयाच्या ठोक्यांचे हे प्रमाण हृदयातील काही पेशींचा समूह ठरवत असतो. त्याला सायनोट्रियल किंवा सायनस नोड असे म्हणतात. तो हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर असतो. अट्रियम या भागात तो असतो. त्यातील पेशी सूक्ष्म विद्युत प्रेरणा तयार करतो. हा विद्युत संदेश हृदयाची स्पंदने त्यामुळे नियंत्रित करत असतो. यातील काही विद्युत प्रवाह हा शरीराच्या बाहेरच्या भागापर्यंत जात असतो.
याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.
जर रुग्णाचे हृदय योग्य प्रकारे काम करीत असेल तर कागदावर उमटणारे तरंग हे पुनरावर्ती असतात. जर हे तरंग विस्कटले तर त्याचा अर्थ हृदय योग्य प्रकारे काम करीत नाही. इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये आपल्याला पी वेव्हज, क्यूआरएस वेव्हज, टी वेव्हज असे तीन प्रकारचे तरंग दिसतात. इलेक्ट्रोडला शरीराकडून विद्युत संदेश मिळाल्यानंतर तो ॲम्प्लिफायर कडे जातो. नंतर तो चुंबका जवळील कॉइलकडे जातो. तेथे चुंबकीय क्षेत्राशी संबंध आल्यानंतर एक असे बळ निर्माण होते, ज्यामुळे रेकॉर्डिंग पेन चालू लागतो व कागदावर स्पंदनांचा आलेख उतरतो.
पहिल्यांदा अलेक्झांडर मुईरहेड याने एका ताप आलेल्या रुग्णाच्या मनगटाला इलेक्ट्रोड च्या वायर जोडल्या व त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा अभ्यास केला. त्यानंतर १९०३ मध्ये नेदरलँडमधील लीडेन येथे विलेम आईनथोवेन याने १८९३ मध्ये गॅल्व्हनोमीटरचा वापर करून अधिक प्रगत अशा इलेक्ट्रोकार्डिओग्राफची निर्मिती केली. या शोधासाठी त्याला १९२४ मध्ये वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ वापरताना एकूण १२ ठिकाणी इलेक्ट्रोडच्या वायर्स शरीराला लावल्या.
ईसीजी काढण्यापूर्वी खूप गार पाणी पिऊ नये किंवा व्यायामही करू नये. काही औषधे घेत असल्यास ते डॉक्टरांना सांगावे. चाळीशीनंतर ज्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात त्यात ईसीजीचा समावेश नेहमीच असतो. पण ही प्रारंभिक चाचणी असते. असे असले तरी त्यातून हृदयाच्या अनेक व्याधींचे निदान केले जाऊ शकते.
आता इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या स्वरुपात बरीच प्रगती झाली असून ईसीजी संगणकावर दिसू शकतो.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply