भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी ‘अनमॅन्ड एरिअल व्हीइकल’ (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले आहेत. या उपकरणाच्या मदतीने हत्तींच्या कळपांची हालचाल ‘सेंट्रल रेल ट्रॅक कंट्रोल सिस्टिम’ला कळवली जाईल. तिथून इंजिन ड्रायव्हरला ती माहिती वॉकी-टॉकीवर कळवली जाईल. खबर मिळताच ते गाडीचा वेग कमी करतील व हत्तींच्या बळी पडण्याची शक्यता कमी होईल. ज्या विशिष्ट जंगलातील भागांतून हत्तींची हालचाल जास्त असते, त्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून रस्ते काढण्यात आले आहेत. ज्यावरून हत्ती पलीकडील बाजूला जाऊ शकतील.
सौराष्ट्रातील गीर जंगलाच्या बाजूनं जाणाऱ्या रेल्वेमार्गाजवळून गाडी जात असताना सिंहांची कुटुंबं दिसू शकतात. हा रेल्वेमार्ग पिपाव्ह बंदराकडे जातो. एकदा एका मालगाडीच्या धक्क्याने दोन सिंहिणी तत्काळ मरण पावल्या व त्या मालगाडीबरोबर खेचल्या जाऊन पुढे मार्गाजवळ पडलेल्या आढळल्या. त्यांच्याबरोबर असलेले सिंहाचे ३ बछडे मात्र वाचले होते.
गीर जंगल सिंहांकरता जगप्रसिद्ध आहे. त्या जंगलाच्या बाजूनं एक रेल्वेमार्ग जातो. काही वेळा रात्रीच्या अंधारात सिंह आणि त्यांचे बछडे थेट रेल्वेमार्गावर येतात व त्यावेळी येणाऱ्या गाडीच्या धक्क्याने मरण पावतात. अशा घटना ३ ते ४ वेळा घडल्या आहेत. अशा घटनेत सिंहांचा बळी जाणे योग्य नाही हे लक्षात घेऊन या मार्गावर रात्री ७ ते सकाळी ७ या काळात गस्त घालण्याकरता जवळच्याच खेड्यातील दोन सिंहप्रेमी तरुण काठ्या, टॉर्च व वॉकीटॉकी घेऊन रेल्वेमार्गावर गस्त घालतात. तिथेच आडवे होण्याकरता एक छोटे मचाण बांधण्यात आले आहे. रात्रभरात ५ ते ६ मालगाड्या जात असतात. या वेळात जर सिंहाची डरकाळी ऐकू आली किंवा त्यांची हालचाल दिसली तर जवळच्या स्टेशनमास्तरला ताबडतोब कळविलं जातं, जरूर पडल्यास टॉर्चच्या उजेडाने इंजिन थांबविलं जातं व योग्य तो सल्ला इंजिनड्रायव्हरला दिला जातो. या तरुणांना अंदाजे प्रत्येकी ६०००रु. महिना असा भत्ता दिला जातो. सिंहांवरील प्रेमापोटी रात्रभर जागत राहण्याचं हे काम ते तरुण मनापासून आवडीने करत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply