अनेक संस्था पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांत सातत्याने विचारलेला प्रश्न म्हणजे अधिमंडळाच्या सभेस उपस्थिती किंवा संस्थेच्या इलेक्शन वेळी सदस्य कोणाला म्हणावे? कायदा सर्वसामान्यांना माहित असतोच असे नाही. तेव्हा काही पदाधिकारी गोंधळून जातो. त्यामुळे सभेतील विषयांचे वाचन होण्याआधीच वातावरण तापलेले असते. काही कुटुंबातील व्यक्ती मूळ सदस्याचे पत्र घेऊन किंवा कुलमुखत्यार घेऊन येतात. जे पूर्णपणे चुकीचे असते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, संस्थेचा सदस्य म्हणून कोण पात्र असतात आणि कोणत्या शर्ती त्या व्यक्तींना पूर्ण कराव्या लागतात.
प्रश्न क्र. ८१) संस्थेचा सदस्य कोणत्या व्यक्तींना म्हणावे?
उत्तर: ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सहभागी असलेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती आणि जिने मालमत्तेचे हक्क, मालकीहक्क व हितसंबंध व्यक्तिशः किंवा संयुक्तरित्या धारण केले आहेत अशी व्यक्ती संस्थेची सदस्य असते.
प्रश्न क्र. ८२) कुटंब या व्याख्येत कोणाचा समावेश होतो?
उत्तर: कुटुंब या व्याख्येत, पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, जावई, मेहुणा (बायकोचा भाऊ), मेहुणी (पत्नीची बहिण), सून, नातू, नात, बहिणीचा पती यांचा समावेश होतो.
प्रश्न क्र. ८३) संस्थेच्या सदस्यत्वासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतात?
उत्तर: खाली उल्लेख केलेल्या व्यक्तीच संस्थेच्या सदस्यत्वासाठी पात्र असतात:-
भारतीय संविदा अधिनियम १८७२ अन्वये संविदा करण्यास सक्षम असलेली अशी व्यक्ती अथवा; संस्था नोंदणी अधिनियम १८६० खालील नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, कंपनी किंवा त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली प्रस्थापित कोणताही इतर निगम निकाय; महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये नोंदणीकृत केलेली किंवा नोंदणीकृत करावयाची मानण्यात येणारी सहकारी संस्था; राज्य शासन किंवा केंद्र सरकार; स्थानिक प्राधिकरण; सार्वजनिक विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली नोंदणीकृत केलेले असे विश्वस्त मंडळ.
प्रश्न क्र. ८४) संस्थेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तींनी कोणत्या शर्ती पूर्ण करावयाच्या असतात?
उत्तर: सदस्य होण्यास पात्र असलेल्या व विहित नमुन्यात सदस्यत्वासाठी अर्ज करणाऱ्या कोणाही व्यक्तीस तिने खालील शर्तीची पूर्तता केल्यास समितीकडून तिला सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात येईल.
१) तिने सदस्यत्वासाठी करावयाच्या अर्जासोबत कमीत कमी दहा भागांची रक्कम पूर्णपणे भरली पाहिजे.
२) तिने सदस्यत्वासाठी विहित अर्जासोबत १००/- रुपये प्रवेश फी भरली पाहिजे.
३) संस्थेच्या कार्यक्षेत्रांमध्ये अन्यत्र कोठेही त्याच्या अगर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मालकीचे घर, भूखंड अथवा सदनिका असल्यास त्या बाबतचा तपशील विहित नमुन्यातील अर्जात व प्रतिज्ञापत्रात त्याने दिलेला आहे.
४) ज्या कारणासाठी सदनिका खरेदी केली आहे त्याच कारणासाठी ती वापरण्यात येईल. अशा अर्थाचे (लीज डिडमध्ये दिलेल्या मुदतीत) विहित नमुन्यात त्याने हमीपत्र दिले आहे.
५) त्याचे स्वतंत्र उत्पन्नाचे साधन नसेल तर, त्याने त्याबाबत नमुन्यात हमीपत्र सादर केले आहे.
६) संस्थेच्या सदस्यत्वासाठी त्याने सादर केलेल्या अर्जासोबत त्याने महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम याच्या कलम ४ अन्वये प्रवर्तका (बांधकाम व्यवसायी) बरोबर किंवा हस्तांतरकाबरोबर केलेल्या करारपत्राचे योग्य मुद्रांक शुल्क भरल्याची प्रमाणित प्रत सादर केली आहे.
७) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक असल्याप्रमाणे विहित नमुन्यात हमीपत्रे, घोषणापत्रे आणि संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक असलेली अन्य माहिती सदस्यत्वाच्या अर्जासोबत त्याने सादर केली आहे.
८) सिडको/म्हाडा/एसआरए/एमएमआरडीए या विशिष्ट नियोजन प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्राखाली नोंदविण्यात आलेल्या संस्थांच्या बाबतीत अर्जदार हा संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार आणि (असल्यास) शासन/नियोजन प्राधिकरण यांच्या निर्देशक तत्वाखाली पात्र असला पाहिजे.
प्रश्न क्र. ८५) सदस्यत्वाचे अर्ज निकाली काढण्याची पद्धत संस्थेत काय असते?
उत्तर: संस्थेच्या सदस्यत्वासाठी आलेला अर्ज निकालात काढण्यासाठी, संस्थेचे सचिव व समिती यांच्याकडून उपविधी मध्ये घालून दिलेली पद्धत अनुसरण्यात येते.
– अॅड. विशाल लांजेकर.
Leave a Reply