संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते.
असंख्य सकारात्मक -नकारात्मक , काळ्या -पांढऱ्या , रंगीत जाणिवांनी मानवी भावनांचे विश्व विणलेले असते. हे भावविश्व जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या समवेत असते. हा लांबलचक पट आपण कसा हाताळतो यावर आपले भावनिक आरोग्य अवलंबून असते. मानवी भावभावनांचे हे किचकट जग काही व्यक्ती लीलया पेलताना आढळतात तर काहींची मात्र दमछाक होताना दिसते. मात्र इथे पडझड झाली की स्वास्थ्य बिघडायला सुरुवात होते.
बदलांच्या आणि आव्हानांच्या कालखंडात स्वतःच्या भावना समर्थपणे हाताळता येणे हे सुस्थितीतल्या भावनिक आरोग्याचे लक्षण असते.
मानवी स्वास्थ्यामध्ये शारीरिक , बौद्धिक,मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि भावनिक घटक समाविष्ट असतात. त्यांच्यात समन्वय आणि एकजूट असली की ती व्यक्ती यशस्वी होते. यातल्या प्रत्येक घटकाचा इतरांवर प्रभाव पडत असतो.
भावनिक आरोग्यात भावनामयी प्रज्ञा आणि भावनांवर नियंत्रण अभिप्रेत असते.
मात्र यासाठी मानसिक आरोग्याची संकल्पनाही समजून घ्यायला हवी. भावना विरहित असणे म्हणजे भावनिक आरोग्य नाही (जसे मानसिक आजार नसणे म्हणजे मानसिक आरोग्य चांगले आहे असे समजणे ) बालपणापासून काही कारणाने एखादी व्यक्ती सतत भावनांचे दमन करीत असेल तर तिच्यापेक्षा घडाघडा बोलून मोकळे होणाऱ्याचे भावनिक आरोग्य चांगले असण्याची शक्यता अधिक !
रोजच्या दिनक्रमात चढउतार अनुभवायला येत असतातच. सागरातल्या लाटांप्रमाणे आपणही भावनांची भरती-ओहोटी झेलत असतो. मात्र भावनिक आरोग्य चांगले असणारी व्यक्ती त्यावर सहज मांड टाकून आरूढ होऊ शकते.
आर्थिक स्वायत्तता, जीवनातील पूर्वानुभव आणि भोवतालचे वातावरण हे तिन्ही घटक भावनिक आरोग्याला हातभार लावतात. भावना दुखावल्या की शारीरिक कुरबुरींना सुरुवात होते.
भावनिक आरोग्याची लक्षणे –
१) स्व–भान – लहानपणापासून ही कला विकसित केली की प्रौढपणी त्यात प्राविण्य मिळविता येते. यातूनच पुढे स्व-स्वीकार येतो. एकदा स्वतःचा “आहे तसा ” स्वीकार केला की अवघड प्रसंग सहज हाताळता येतात. अशी व्यक्ती दुस्तर घटनांमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. शरीराबद्दल आस्था असणे हे निरोगीपणाचे लक्षण आहे. मात्र ती जाणीवपूर्वक जोपासायला हवी आणि नियमितपणे हाताळता यायला हवी. त्याद्वारे सजगता संभवते. मग अशी व्यक्ती पडझडीला अथवा विपरीत परिस्थितीला घाबरत नाही. उलट उघड्या डोळ्यांनी आणि जाणीवपूर्वक ह्या व्यक्ती अशा प्रसंगांना सामोऱ्या जातात.
२) परिस्थितीशी समझोता – चढउतारांमध्ये आतील स्थितिस्थापकत्व स्थिर ठेवलं की दीर्घकालीन लढ्यासाठी तयारी करता येते. अडचणी नसताना भावनांच्या बँकेत भरपूर डिपॉझिट करून साठा केला की विपरीत परिस्थितीशी दोन हात करण्यात अडचणी येत नाहीत.
३) आस्था आणि कृतज्ञता बाळगणे – परतफेडीची इच्छा न बाळगता इतरांबद्दल आस्था आणि कृतज्ञता बाळगणे याचा कळत-नकळत खूप फायदा होत असतो. त्यातून सुसंवाद स्थापित करणे , सगळ्यांना समजून घेणे सोपे जाते.
४) जगण्याचे ध्येय–
ध्येयाचा वेध घेत असताना अंतर्गत अनुभवांचा लाभ इतरांना कसा होऊ शकतो हे तर बघायचेच पण भावनांनी पोच देत मोठ्या कॅनव्हासवर लक्ष केंद्रित करायचे हे भावनिक दृष्ट्या सुदृढ व्यक्तीचे लक्षण मानले जाते.
५) ताण तणाव व्यवस्थापन-
ताणांचे स्थान स्वीकारत त्यांच्यासह जगण्याचे तत्वज्ञान ही मंडळी अवलंबितात . विपरीत परिस्थितीचा शांतपणे , तोल न ढासळू देता स्वीकार कसा करायचा याचा वस्तुपाठ भावनिक स्वास्थ्य जपणारी माणसे सादर करीत असतात.
खरे तर भावनिक आरोग्य सहज सांभाळता येण्याजोगे आहे आणि त्यासाठी स्वतःला वेळ देणे अग्रक्रमाचे ठरते. हातात असलेली संसाधने आणि समस्या यांच्यात ताळमेळ हवा असेल तर भावनिक समतोल मदतीला येतो.
शेअर बाजारात काम करणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण घेऊ या. घडीघडीला बाजार बदलत असतो, गुंतवणुकीचे निर्णय कासावीस करणारे असतात. चढउतार कायमचे वाट्याला ! अशा धरसोड परिस्थितीत पाय रोवून ठेवण्यासाठी पहिली गरज म्हणजे – भावनिक स्वास्थ्य चांगले हवे, स्वतःची काळजी घ्यायला हवी, कुटुंबियांना वेळ द्यायला हवा आणि तरीही नफा कमावून घर सुस्थिर ठेवायला हवे. ते नसेल तर व्यसनाधीनता हा सोप्पा पर्याय वाटू शकतो. निर्णय घेताना कसोटी लागेल.
दुसरे उदाहरण एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचे पाहू या. दिवसरात्र रुग्णांच्या व्यथा -वेदनांना आस्थापूर्वक ऐकून घेत त्यांना समजावणे , त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या शंकांना उत्तरे देणे हे किती त्रासदायक असेल. तरीही घरी आल्यावर तो थर काढून टाकत सामान्य बाप, पती होणे आणि कुटुंबीयांबरोबर रममाण होणे याचा ताण समजण्याच्या पलीकडचा असतो. सगळ्यांच्या दुःखाचे ओझे शिरी बाळगत वर गोड हसत धीर देणे हे सामान्य काम नाही. भावनिक स्वास्थ्य चांगली असलेली व्यक्तीचं हे ” इतरांना समजून घेण्याचे ओझे ” पेलू शकते.
सामाजिक देवाणघेवाण आणि विचारांचे आदान -प्रदान यातून “सहन करणे ” हा दैनंदिनीचा अटळ भाग होऊन बसतो. त्यापासून सुटका नाही. मात्र भावनांवर नियंत्रण असेल तर यातूनही मार्ग निघतो. अन्यथा शरीराबरोबर मनही विस्कळीत होते. आणि पाऊस पडत नाही तोवर छत्री उघडायची नाही ही आपली मानसिकता ! जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत आपण उपचारासाठी डॉ.कडे जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचा २०१८ सालचा एक अहवाल भावनिक अस्वास्थ्याची दाहक परिस्थिती समोर आणतो. आजच्या घडीला जगभरात ३० कोटींहून अधिक रुग्ण औदासिन्याचे बळी आहेत. सकारात्मक पद्धतीने भावना व्यक्त करता येणे ही संशोधनातून मांडली गेलेली पहिली गरज आहे. मात्र भावनांचे दमन शारीरिक आणि मानसिक ताणांना आमंत्रण देते.
अशा विस्कळीत भावना फार काळ दाबून धरल्या तर एकुणातच स्वास्थ्याची घसरण होते. अति नियंत्रणही धोकादायक ठरू शकते. भावना व्यक्त करण्याची माध्यमे जर उपलब्ध नसतील तर सगळं आतल्या आत दाबून ठेवण्याची प्रवृत्ती उफाळते आणि कुढत राहण्याचीही जी जीवघेणी असू शकते. नैराश्य आणि औदासिन्य यासारख्या तक्रारींमध्ये होत चाललेली वाढ दुर्लक्षून चालण्यासारखी नाही.
२००९ मधील एका संशोधनानुसार अध्यात्मिक व्यक्ती अधिक सकारात्मक असतात आणि सामान्यतः दीर्घायुषी असतात. अध्यात्मिकतेबरोबर त्यांच्यात भावनांचा समतोल ठळकपणे आढळतो. एकूणच आरोग्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सहृदय आणि सर्वसमावेशक असतो.वेळ हे आपल्याजवळ उपलब्ध असणारे मर्यादित साधन आहे. त्याच्या अभावी ताण उद्भवतात आणि मग आपण भावनिक स्वास्थ्य हरवून बसतो. वेळेचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती सहसा भावनिक दृष्ट्या अस्थिर नसते.
भावनिक आरोग्य आणि मनःस्वास्थ्य या संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहे मात्र त्यांचा समानार्थी वापर करण्याकडे आपला कल असतो.
जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची व्याख्या करण्याचे काम हाती घेतलेले आहे. मानवाचा अंतर्गत समतोल जेव्हा समाजाच्या नीतिनियमांशी जुळवून घेतो तेव्हा मानसिक आरोग्य चांगले असते असं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे. अर्थात ही जुळवाजुळव स्थिर नसून सतत बदलती असते आणि व्यक्ती स्वतःच्या क्षमता निर्विवादपणे सामाजिक क्षमतांशी सांधून घेऊ शकते.
स्वतःच्या भावनांचा परिचय, त्यांचे व्यक्त होणे, त्यावर नियंत्रण आणि त्याचवेळी इतरांविषयी समानुभूती, परीक्षा घेणाऱ्या घटनांना तोंड देणे, सामाजिक उत्तरदायित्व निभावणे हे सारे मानसिक आरोग्याचे घटक असतात. मन आणि शरीरातील सुसंवाद चांगला असेल तर शरीरांतर्गत स्वास्थ्यचक्र निरोगी असते.
जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर मानसिक आरोग्याचे फायदे दिसायला लागतात. अगदी असंच भावनिक आरोग्याबाबत म्हणता येईल. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भावनांचे प्रत्यय आपणास येत असतात. मात्र त्यात गुरफटून न जाता आपण वाटचाल करणे अभिप्रेत असते. त्या जरूर अनुभवाव्यात, ते अनुभव इतरांना सांगावेत फक्त त्यातच अडकून पडू नये.
बालवयातच मुलांना भावनांबद्दल उघडपणे (काही न लपवता) बोलण्यासाठी प्रोत्साहित करावे. भावनांवर प्रक्रिया करून त्यांचा उर्वरित जीवनभर कौशल्याने वापर करण्यासाठी हे आवश्यक आहे. सतत कोणीच आनंदी राहू शकत नाही पण सर्वप्रकारच्या भावना हाताळण्याचे कसब लहानपणीच अंगी बाणवता आले पाहिजे.
भावनिक आरोग्य वादळात सापडलं की मदत मागण्यासाठी हात पसरले जातात. अशावेळी समुपदेशनाने सुरुवात करणे केव्हाही चांगले. प्रशिक्षित समुपदेशक आपल्या अव्यक्त भावनांचा मूक साक्षीदार बनू शकतो.
मनानुभूती हा भावनिक आयुष्याचा राजमार्ग आहे. त्यातून स्थितिस्थापकत्वाला इंधन पुरविले जाते आणि अंतर्गत ऊर्जा बळकट होते. समाजातील नाती जोपासणे हाही मार्ग उत्तम ! मैत्री -कट्टा, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरीक संघ, रोटरी /लायन्स सारखे क्लब्स हे अशा सामाजिक अभिसरणातील यशस्वी कलाकार ! घटकाभर मन मोकळं करण्याचे हे आधुनिक पर्याय ! पूर्वी कीर्तन -प्रवचन या निमित्ताने संसारात गोठलेल्या स्त्रियांना एक संभाषणाचे / सुख-दुःख वाटण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध असायचे. कालौघात त्याची जागा भिशी, किटी-पार्टीने घेतली पण मूळ हेतू तोच – व्यक्त होणे ! बोलणे आणि त्यातून मनावरील भार हलका करणे.
आताचा अर्वाचीन अवतार म्हणजे – हेल्प लाईन !
सामाजिक संबंध अस्तित्वात नसतील तर सिगारेट किंवा मेदवृद्धी पेक्षा अधिक घातक परिणाम होऊ शकतात. भावनिक,सामाजिक आणि मानसिक भावबंध निर्माण झाले तर अनेक अनारोग्याच्या समस्या सुटू शकतात. चांगल्या मित्रांच्या सहवासात खूप सकारात्मक घटना घडवून आणण्याचे सामर्थ्य असते.
शारीरिक व्यायाम, वेळेचे प्रभावी नियोजन आणि व्यवस्थापन यातून तणाव कमी होण्यास मदत होते. आपल्या परिघाबाहेर अनेक गोष्टी असतात ज्यावर आपला काही वचक असू शकत नाही आणि हे सत्य एकदा स्वीकारले की मनःशांती मिळते.
जे टाळणे अशक्य , दे शक्ती ते सहाया
जे शक्यसाध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय?
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
या ओळी एकदा आत्मसात केल्या की भावनिक आरोग्य आपोआप सुधारते.
भावना व्यक्त कशा करायच्या?
काहींना पत्रकारिता हे माध्यम आवडते, काही पत्र लेखनातून अधिक चांगले व्यक्त होतात ( सुनीताबाई देशपांडे आणि जी ए कुळकर्णी यांनी एकमेकांना न भेटताच निर्व्याज पत्रमैत्री केली). कोणाला चॅट भावते, तर काहीजण समाज माध्यमातून व्यक्त होतात. साहित्याचे काव्य, कथा, कादंबरी, ललित लेख असे प्रांत पूर्वापार संपन्न आहेत. काहीजण काव्य वाचन, कथा कथन, वक्तृत्व, वादविवाद अशा मार्गांनी जातात. शाळेतील निबंध, पत्रलेखन हेही अभिव्यक्तीचे संस्कारच असायचे. अधिक निर्मिती क्षम मार्ग म्हणजे – चित्र कला, मूर्ति कला, शिल्प कला, संगीत (गायन, वादन).
स्व-जागरूकता एकदा जाणवायला लागली की नकारात्मक विचारांपासून सुरुवात करणे इष्ट ! असं अंतर्मुख झालं की भावनामयी प्रज्ञा आणि भावना नियंत्रण दोन्हीही साधतं.
खालील प्रश्न स्वतःला विचारावेत म्हणजे स्वतःच्या भावनिक स्वास्थ्याचा मागोवा घेता येईल –
१) मी भावना कशा व्यक्त करतो?
२) मला कोणाचा (सामाजिक) आधार आहे?
३) सकारात्मकतेची माझ्या दिनक्रमातील भूमिका काय असते आणि किती वाटा असतो?
४) ती सकारात्मकता हातातून निसटून जाऊ नये म्हणून मी काय प्रयत्न करतो?
५) वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल मी काय करतो?
६) “क्रोध ” या भावनेबरोबर माझे असलेले नाते मला सहज विशद करून सांगता येईल कां ?
७) कठीणप्रसंगी जुळवून घेण्याची हातोटी मला अवगत आहे कां ?
भावनिक स्वास्थ्य सुधारण्याबाबत काही सूचना –
१) स्वतःला वेळ देणे
एका रात्रीतून जादूच्या कांडीने भावनिक आरोग्य सुधारणार नाही. भावनांचे अनुभव समजून घेण्यासाठी खूप काळ कदाचित द्यावा लागेल. भावनामयी प्रज्ञा विकसित होण्यासाठी थोडे थांबावे लागेल.
२) चुकांमधून शिकणे
भावनिक प्रतिसाद काहीवेळा आगंतुक आणि विध्वसंकही असू शकतो. त्यामधून मिळणारे डोळसपण जपून ठेवा आणि भविष्यात असा भावनिक उद्रेक होण्याची पाळी आलीच तर हा गाठीला असलेला अनुभव वापरावा.
३) आस्था विकसित करणे
आपल्याप्रमाणेच इतरजण ही बऱ्या वाईट भावना सतत अनुभवत असतात. तेव्हा इतरांशी बोलताना याची नोंद घ्या , समोरच्याची मनःस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपण मानव आहोत ही गोष्ट कायम लक्षात राहते.
४) इतरांना क्षमा करायला शिकणे
समोरची व्यक्ती दरवेळी जाणून बुजून चुकत नसते, काहीवेळा अजाणतेपणी ती आपल्याला दुखावत असते. इतरांना क्षमा करायला शिकण्याआधी स्वतःला क्षमा करता येणे अधिक कठीण पण आवश्यक असते. त्यातून रुद्ध झालेले भावनांचे प्रवाह मोकळे होतात.
भावनांना बांध घालणे जमायला हवे. आवश्यक असेल तेव्हाच धरणाचे दरवाजे उघडून अडवलेल्या , ओथंबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणे ज्यांना जमते तेच भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. आनंदी असोत वा दुःखी, भावनांचे प्रदर्शन केव्हा, कोठे, कोणासमोर आणि किती प्रमाणात करायचे हे ठरविता आले पाहिजे. तसेच भावना व्यक्त करण्याच्या पद्धती परिस्थितीनुसार बदलतात हेही महत्वाचे ! खूप वर्षांनी तुमचा जिवलग मित्र ध्यानी मनी नसताना अचानक तुमच्या घरी आला तर दार उघडताच तुम्ही उत्स्फूर्तपणे त्याला मिठी मारणार हे गृहीत आहे. मात्र एखाद्या दुःखद प्रसंगी भावनावेग आवरत तुम्ही त्याच मित्राच्या पाठीवर हात ठेऊन त्याला धीर देता, हेही तितकेच स्वाभाविक आहे.
भावनिक आरोग्य असे अनेक धाग्यांचे बनलेले वस्त्र आहे आणि ते निरामय ठेवणे आपल्या हाती असते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply