मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला, पाला पाचोळ्यापासून वस्त्र तयार करू लागला, वाहत्या नदीतले पाणी अडवून उन्हाळ्यातली तूट भरू लागला…..आणि हजारो वर्षांपासून संघर्ष करत, नवे शोध लावत तो आज चंद्रावरही पोहोचला.
आजच्या डिजिटल युगात ‘दुनिया अपनी मुठ्ठी मे’ आहे. छोट्याशा मोबाईलमध्ये आख्खं जग सामावलेले आहे. माहिती मिळवणे सोपे झाले आहे. परंतु शंभर दिडशे वर्षांपूर्वी सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या झापाटलेल्या जन्मजात अभियंत्याने भारतवर्षात असे काही काम करून ठेवले आहे की भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी ठरले आहे.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (१५ स्प्टेंबर १८६० ते १४ एप्रिल १९६२) आधुनिक भारताचे पहिले इंजिनिअर. बेंगलोरपासून जवळ असलेल्या मुद्देनहळ्ळी या गावी मोक्षगुंडम श्रीवासा शास्त्री आणि वेंकटालक्ष्मीअम्मा या दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. चिकबल्लूरला त्यांचे प्राथमिक शिक्षण अन शालेय शिक्षण बेंगलरुला झाले. मैसूर येथून १८८० साली त्यांनी बी.ए. केले.
महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यातील COEP कॉलेजमधून १८८३ साली पूर्ण केले.
स्थापत्य अभियंता ही पदवी प्राप्त झाल्यावर मुंबई येथे सर्वप्रथम ते पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटला रूजू झाले. नंतर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये गेले. १९०३ साली खडकवासला धरणावर त्याकाळी अॅटोमॅटिक गेट बसवण्याचे डिझाईन करुन त्यांनी बसवले. पूरापासून संरक्षण देणार्या या गेट्सची महती कळून तसेच गेट ग्वाल्हेरच्या टिग्रा डॅमवर आणि मैसूरच्या कृष्णासागर डॅमवर त्यांच्याकडूनच बसवून घेण्यात आले.
हैद्राबादचे उस्मान सागर आणि हिमायत सागर डॅम्स, विशाखापट्टनम येथील डॉकयार्डला समुद्रापासून बचाव करण्यासाठी बांधलेली संरक्षक भींत, मैसूरचे कृष्णसागर राजा डॅम, मैसूर सोप फ़ॅक्टरी, मैसूर आयर्न अँड स्टील (आता विश्वेश्वरैया आयर्न अँड स्टील लि.), मैसूर पॉलेटेक्निक, मैसूर स्टेट बँक, बेंगलोर अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, बेंगलोर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (आता विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), द सेंचूरी क्लब, मैसूर चेंबर ऑफ कॉमर्स अशा अनेक इंस्टीट्युट्स ची निर्मिती केली. १९१२ ते १९१९ या काळात मैसूरचे दिवाण असतांना त्यांनी इंडस्ट्रीज मध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला चालना दिली होती.
१८८३ ते १९६२ या काळात त्यांनी संपूर्ण भारतभर केलेल्या कामांची यादी बरीच मोठी आहे. कितीही लिहिले तरी कमी पडेल असे त्यांचे कार्य आहे, तेही अशा काळात जेंव्हा काँप्युटर नव्हते! अशा या महान अभियंत्याच्या जन्म दिनी अभियंता दिन साजरा केला जातो याचा सर्व अभियंत्यांना तसेच तमाम भारतीयांना अभिमान आहे.
-नितीन म. कंधारकर
Leave a Reply