इंग्रजीतले सर्वश्रेष्ठ मानले जाणारे इंग्लिश लेखक पी जी वुडहाऊस यांचा जन्म १५ ऑक्टोबर १८८१ रोजी झाला.
सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस उर्फ प्लम म्हणजेच पी. जी. वुडहाउस हे निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील बर्टी वूस्टर आणि त्याचा हरकाम्या नोकर जीव्ह्ज़ या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. त्या काळातील इंग्लंडमधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात/कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ यांमुळेच विनोद घडतो.
कथा-कादंबरी लेखनाखेरीज पी. जी. वुडहाउस यांनी अनेक संगीत प्रहसनं-म्युझिकलं कॉमेडीज – लिहिल्या. काही एकट्यानं तर काही गाय बोल्टन या त्यांच्या मित्रासोबत. या प्रहसनांमध्ये वापरण्यासाठी त्यांनी अनेक गीतंही लिहिली होती. या सर्वांनी पी. जी. वुडहाउस यांना पैसा, नाव आणि मुख्य म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांसाठी कथानकं मिळवून दिली. पी. जी. वुडहाउस यांच्या लिखाणावर खूश होऊन हॉलिवुडच्या एम.जी.एम्. या बड्या कंपनीने. १९३० मध्ये त्यांना पटकथा लेखनासाठी खास कॉन्ट्रॅक्टवर तेथे आमंत्रित केलं. दर आठवड्याला दोन हजार डॉलर्स एवढा लठ्ठ पगार त्यांना मिळत होता. आपल्या नाट्य व चित्रपट जीवनातील आठवणींवर पी. जी. वुडहाउस यांनी ‘ब्रिंग ऑन द गर्ल्स’ आणि ‘ओव्हर सेव्हन्टी’ अशी दोन पुस्तकं लिहिली आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पी. जी. वुडहाऊस यांनी केलेल्या बर्लिन रेडिओवरील कार्यक्रमांनी मोठाच वादंग निर्माण झाला होता.
पी. जी. वुडहाऊस यांचे १४ फेब्रुवारी १९७५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply