![Velankar-Prabhat-Cinema-New](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2022/07/Velankar-Prabhat-Cinema-New.jpeg)
प्रभात चित्र मंडळ’ संस्थेची स्थापना ५ जुलै १९६८ रोजी झाला. त्या निमित्ताने दिनकर गांगल यांचा जुना लेख.
‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना १९६८ साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे. आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला सिनेमा पाहण्याचा सोस होताच. आम्ही हिंदी सिनेमा तिन्ही त्रिकाळ पाहत होतो. देव आनंद, राजकपूर, दिलीपकुमार यांच्याबद्दल हिरिरीने बोलत होतो. एस.डी. बर्मन, नौशाद, शंकर जयकिशन यांच्या फिल्मी गाण्यांत रमून जात होतो. त्यास प्रथम थोडा छेद दिला तो गुरुदत्तच्या ‘प्यासा’ने. त्यात गाणी वगैरे तशीच उत्कट होती, पण कथा व दृश्यं चक्रावून टाकणारी होती. बिमल रॉयचे चित्रपटही तसा परिणाम साधतात की काय असे वाटत होते. आम्ही त्याच प्रकारच्या ओढीने ‘फिल्म फोरम’, ‘आनंदम्’ या सोसायट्यांच्या दक्षिण मुंबईतील खेळांना जाऊ लागलो. तेथे वेगवेगळे सिनेमा पाहू लागलो. पण ते विश्व आणखीच वेगळे होते. चित्रपट सहसा दुसऱ्या महायुद्धाच्या काळावर आधारलेले असत. आम्हाला त्या युद्धाचा फार पत्ता नव्हता. आम्हाला युद्ध म्हणजे रोमहर्षक कथा एवढेच ठाऊक होते. पण आम्ही पाहू लागलो त्या चित्रपटांतील युद्ध मानवी संवेदनेला भिडणारे होते.
आमच्यापैकी सुधीर नांदगावकर एकटा साहित्यशास्त्र शिकलेला, त्यामुळे (कला)समीक्षा – त्यामधील संज्ञा जाणणारा. शिवाय, तो सिनेपत्रकार. त्यामुळे सिनेमाच्या जगात वावरणारा. मी, नांदगावकर, वसंत सोपारकर, आम्ही मित्र कुर्ल्याला नेहरूनगरात जवळ जवळ राहायचो. ‘फिल्म फोरम’चा शो संपवून रात्री नऊ नंतर घरी परतताना लोकलमध्ये त्याच गप्पा चालत. त्यामधून सोसायटीचे कार्य मराठी विशेषत: नाट्यरसिकांपर्यंत नेले पाहिजे- त्या मंडळींनी आम्ही पाहत होतो ते सिनेमा पाहिले पाहिजेत, असे तीव्रतेने वाटू लागले. नांदगावकरचा नाझ बिल्डिंगमध्ये नित्य वावर होता. त्याने दादरच्या चित्रा सिनेमातील मिनी थिएटरचा शोध लावला. सुदैवाने, त्याचा मॅनेजर एल.जी. सोनेजी हा स्वत: चोखंदळ चित्रपट रसिक होता. त्याने ‘चित्रा’त मॉर्निंग शोजना सत्यजित राय वगैरेंचे बंगाली चित्रपट दाखवणे सुरू केले होते. त्याने सहकार्य केले. तो ‘प्रभात’चा नांदगावकरसोबत जॉइंट सेक्रेटरीच झाला.
‘प्रभात’चे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट लेखक-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या हस्ते ५ जुलै १९६८ रोजी झाले. त्यावेळी चित्रपट दाखवला तो सत्यजित राय यांचा ‘चिडिया खाना’. ‘प्रभात चित्रपट मंडळा’ची संघटनात्मक आखणीच पक्क्या पायावर झाली होती. तोपर्यंत आम्ही सर्व मुख्यत: साहित्याचे चाहते होतो आणि चित्रपटांकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहत होतो. ‘प्रभात’मध्ये आमचा ‘अॅप्रोच’ बदलला. आम्हाला प्रिय जो सिनेमा तो आमच्या जीवनहेतूचा भाग बनला. ‘प्रभात’चे पहिले कार्यकारिणी सभासद मुख्यत: पत्रकार होते. तर सल्लागार मंडळ साहित्यिकांचे होते. त्यामध्ये अनंत काणेकरांपासून रमेश तेंडुलकरांपर्यंत विविध मंडळी होती. किंबहुना, मराठी साहित्यातील व्यक्तींना चित्रपट माध्यमाकडे खेचावे हा एक ध्यास ‘प्रभात’चा सतत राहिलेला आहे. विजया राजाध्यक्ष या बराच काळ आमच्या सदस्य होत्या. त्या ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्सना हजर असत. तशाच एका मीटिंगमध्ये ‘रूपवाणी’ या ‘प्रभात’च्या मासिकाची कल्पना निघाली. प्रथम नांदगावकर व आता अभिजित देशपांडे यांच्या संपादकत्वाखाली ते मराठीतील महत्त्वाचे नियतकालिक होऊन गेले आहे.
आम्हाला आमचा म्हणजे फिल्म सोसायटीचा प्रेक्षक घडवण्याचे काम योग्य दिशेने पुढे जात असल्याचे समाधान ‘प्रभात’च्या पहिल्या काही महिन्यांतच लाभले. तो प्रेक्षक म्हणजे उत्सुक, जिज्ञासू व संवेदनाशील व्यक्ती. त्याला हिंदी सिनेमा आणि झेक, पोलिश, रशियन व फ्रेंच सिनेमा यांतील फरक कळू लागला.
आमच्या कार्यकारी मंडळास शोभा आली ती चित्रपट प्रसिद्धीकुशल पत्रकार वसंत साठे यांनी आमच्या मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा! त्यांची चित्रपटविषयक अभिरूची ते हिंदी चित्रपटांमध्ये इतके मुरलेले असूनसुद्धा छान विकसित झाली होती. ते जगातील अनेक चित्रपट महोत्सवांना जाऊन तेथे चित्रपट पाहून येत. मग तत्संबंधी येथील इंग्रजी-मराठी वर्तमानपत्रांत लेखन करत.
‘प्रभात’चा प्रवास एका अर्थाने काळाच्या विरूद्ध दिशेने होता. मूळात मराठी समाजात चित्रपटकलेला मान्यता नाही. १९३० च्या दशकातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल वगैरे मंडळींचे सामाजिक आशयाचे महत्त्वाचे चित्रपट, त्यानंतर, १९५० च्या दशकातील माडगुळकर-परांजपे-फडके यांचे भावरम्य हलकेफुलके चित्रपट आणि त्यानंतरचा एक मोठा कालखंड तमाशापटांचा – त्यातच दादा कोंडके यांचा चित्रपट-चमत्कार! … असे इतिहासाचे टप्पे पार करत असताना चोखंदळ मराठी प्रेक्षकाने कला म्हणून मराठी चित्रपटांचा कधी विचारच केला नाही. त्यामुळे तेथे जो होता तो सारा भाबडेपणा व बाळबोधपणा. चित्रपटकर्त्या मंडळींमध्ये सुशिक्षित लोक कमी होते. जे शिकलेले होते त्यांना जगाचे भान-अवधान नव्हते. दरम्यान, बंगालमध्ये सत्यजित राय आणि त्यांच्या पाठोपाठ लहानमोठे चित्रपट दिग्दर्शक झाले होते. त्यांच्या कलाकृती बंगालमध्येच नव्हे तर भारतभर चोखंदळ प्रेक्षकांना खुणावू लागल्या होत्या. लोकांना वेगवेगळ्या देशांतील उत्तमोत्तम कृती आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून पाहण्यास मिळत होत्या. परंतु मराठी प्रेक्षक मात्र अशा सर्व घटनांबद्दल उदास होता.
‘प्रभात’चे स्पेशल शोज रविवारी सकाळी बरेच असत, महोत्सव असत. त्यांची निमंत्रणे वेगळी, तयारी वेगळी. कल्पकता असे ती कार्यक्रमाच्या संयोजनात. ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज’कडून आणि अर्काइव्हकडून देश-विदेशांतील पारितोषिक विजेते चित्रपट मिळवायचे, त्यांच्या त्यांच्या तारखा ठरवायच्या. त्याला जोड द्यायची ती स्थानिक अभिनव चित्रपटांची आणि त्याबाबत योजलेल्या अभ्यासचर्चेची अथवा सामाजिक महत्त्वाच्या परिसंवादाची. दोन उदाहरणे द्यावीशी वाटतात. विजय तेंडुलकरांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकावर सत्यदेव दुबे याने चित्रपट बनवला. त्यावर तो चित्रपट दाखवून ‘मिनी चित्रा’मध्येच रविवारी दिवसभर विविधांगांनी चर्चा योजली. दुबे एरवीही कळकळीने व आवेगाने बोलायचा; परंतु त्याने बेणारेबार्इंचे शेवटचे स्वगतपर आक्रंदन चित्रपटात, ते व्हिज्युअल मिडियम म्हणून बेणारे बाईंच्या समुद्रकाठच्या वाळूतील घुसमटत लोळण्यातून दाखवले होते. ते प्रेक्षकांना पटले नव्हते. शेवटी शब्दांची ताकद दृश्याहून वेगळीच, ते स्वगत गाळले गेल्याने प्रेक्षक नाराज. उलट, दुबे त्यांना परोपरीने पटवत राहिला व शेवटी हतबल झाला! दुबेची ती आकृती अजून आठवते. तर त्याच सुमारास बेळगावच्या एका ‘ऑफबीट’ निर्मात्याने यल्लमा देवी आणि देवदासी या प्रश्नावर एक सुबोध चित्रपट निर्माण केला होता. समाजाला स्त्रीमुक्तीची – त्यांतील गुंतागुंतीची जाणीव नव्याने होत होती. त्याचे सामाजिक महत्त्व जाणून, आम्ही तशी चर्चा एका संध्याकाळी संग्रहालयाच्या सभागृहात योजली. हाऊसफुल्ल गर्दी झाली. वक्ते होते सुशिलकुमार शिंदे, स्मिता पाटील आणि बाबा आढाव. केवढी वादळी चर्चा झाली होती! त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही चित्रपट माध्यम – त्याचे वेगळेपण – त्यातील जाणकारीची गरज याबद्दल बोलायचोच.
तो काळच नव्या जाणिवांचा होता. ‘प्रभात चित्र मंडळा’चे स्टडी सर्कल आम्ही काही वर्षें पूर्ण गांभीर्याने चालवले. त्यामध्ये चित्रपट तंत्रज्ञ, लेखक आणि समीक्षक असे सर्व सहभागी होत. ‘प्रभात’ला पन्नास वर्षें होत असताना प्रकट होत असलेली ही जाणीव! त्याच वेळी नवनवीन तंत्रे पुढे येऊन, आमच्यादेखत प्रगत होत गेलेले चित्रपट नावाचे दृक् माध्यम! ते पुढे कोठे जाऊन पोचणार आहे याची अचंबित करणारी भावना कधी कधी मनात दाटते. वाटते, मानवाला अक्षरभाषेचा शोध ‘कम्युनिकेशन’साठी कित्येक हजार वर्षांपूर्वी लागला; त्याच्या पुढील चित्रभाषेच्या संशोधनाचे साक्षीदार आपण आहोत की काय!
‘प्रभात’मधून रूजलेली दुसरी संस्था म्हणजे ‘एशियन फिल्म फाउंडेशन’. सिनेमा माध्यमाचा जगभर प्रसार झाला, जागतिकीकरण बळावले तशी स्थानिक-प्रादेशिक ओढही प्रकर्षाने जाणवू लागली. त्या काळात नांदगावकरने ‘एशियन फिल्म फाउंडेशन’ची कल्पना मांडली व त्या मार्फत या भौगोलिक खंडातील चित्रपटांचे महोत्सव सुरू झाले.
तरुण मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांनीदेखील चित्रपट संस्कृतीतील वातावरणास अनुरूप असाच प्रतिसाद दिला. त्यामधून मराठी नाटकांत पंचवीस फुटाच्या रंगमंचावर रमलेली मंडळी तो कोष भेदून उघड्यावर आली. जब्बार पटेल याचे ‘सामना’, ‘सिंहासन’ असे चित्रपट निर्माण झाले, तर अमोल पालेकरने ‘आक्रीत’सारख्या कृती सादर केल्या. त्यांच्या पाठोपाठ आणखीही काही दिग्दर्शक, कलावंत त्या क्षेत्रात प्रयोग करू लागले. उलट ‘प्रभात’ने नाटकाच्या प्रेक्षकाला चित्रपटाभिमुख करण्याच्या दृष्टीने अमोल पालेकर, महेश एलकुंचवार यांच्या साहाय्याने ‘रविंद्र’सारख्या थिएटरांमध्ये नव्या जाणिवांचे नाट्यप्रयोगसुद्धा घडवून आणले आणि आधुनिक दृष्टी व्यक्त केली.
अमोल पालेकर ‘प्रभात चित्रमंडळा’चा काही वर्षें अध्यक्ष होता. त्याच्या कारकिर्दीत सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मोठा महोत्सव होऊन मंडळात आलेली मरगळ नाहीशी करण्यात आली होती. त्या मरगळीचे कारण त्या वेळी स्पष्ट झाले नाही, तरी नंतर प्रखरपणे जाणवत गेले. ते म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने मानवी मनाचा कब्जा घेतला आहे व ते लोण मराठी प्रेक्षकांपर्यंतही पोचले आहे.
किरण शांताराम हे अमोल पालेकरनंतर ‘प्रभात’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांना व्ही. शांताराम यांच्या प्रदीर्घ कलाकारकिर्दीचा वारसा लाभलेला. त्यांनी ‘प्रभात’च्या कामात हसरे-खेळकरपणा आणला. त्यांची निरगाठीची सुरगाठ कशी करायची ही हातोटी विलक्षण. शिवाय, त्यांचा सार्वजनिक सभासमारंभात दृश्यमान वावर. त्यामुळे ‘प्रभात’चे संपर्क क्षेत्र वाढले. नांदगावकर यांनी जवळजवळ एक हाती ‘प्रभात’ची सूत्रे सांभाळली होती. त्यांना त्यात अशोक राणेची साथ अनेक वर्षें लाभली. राणे प्रोग्रामिंगसारखी कामे स्वतंत्रपणे पाहू लागला, परंतु राणेला स्वत:ची उर्मी होती. तो तरुणपणापासून लेखन करायचाच. त्याची आमच्या मागोमागची पिढी, त्यामुळे तोही हिंदी चित्रपटांच्या वातावरणात वाढला होता. त्याची दृष्टीही तो फिल्म सोसायटीमध्ये आल्यावर बदलली होती. त्याने ‘प्रभात’मध्ये काही चांगल्या प्रथा रूढ केल्या आणि संतोष पाठारे या तरुणासाठी ‘प्रभात’चे सेक्रेटरीपद मोकळे करून दिले. पाठारे हा विज्ञानाचा प्राध्यापक, पण त्यालाही चित्रपट माध्यमाची ओढ आहे. त्याला स्वत:ची कार्यक्रम संयोजनाची दृष्टी आहे. तो किरण यांच्या साहाय्याने ‘प्रभात’ची गाडी झोकात हाकत असतो. त्याला श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, अमित चव्हाण अशांचे सहकार्य असते. त्यांच्या टीमकडून ‘प्रभात’ नवीन वाटा चोखाळत असते.
मी यापूर्वी एकदोन वेळा मांडलेला मुद्दा येथे पुन्हा नमूद करावासा वाटतो. टाटा कंपनीने सायरस मिस्त्री नावाचा वारस निवडला, तो यशस्वी-अयशस्वी ठरला, त्याची चर्चा सर्वत्र होत राहिली. ‘प्रभात चित्र मंडळ’ भले अगदी छोटे असेल तथापि तेथील ज्येष्ठांनी निवृत्त होऊन नव्या पिढीच्या हाती सूत्रे दिली आणि नवी पिढी त्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करू पाहत आहे, ही सध्याच्या अस्थिर काळात सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी घटना आहे. तिची यथार्थ नोंद संस्कृतिकारणाच्या इतिहासात व्हायला हवी!
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply