
इंग्रजांनी भारतात केवळ राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनच घडवून आणले नाही तर आर्थिक क्षेत्रात देखील अनेक बदल घडवून आणल्याचे दिसून येते. इंग्रजी सत्तेचा उदयकाल हा भारतीय सावकारांच्या वैभवाचा अस्त करणारा ठरला. मध्ययुगीन व मोघलकाळात सावकारांना मोठ्या प्रमाणात राजमान्यता व लोकमान्यता मिळालेली होती. तत्कालीन सावकार स्वतःच्या व्यावसायीक चातुर्याबद्दल, संपन्नतेबद्दल व प्रामाणिकते बद्दल फार प्रसिद्ध होते. प्रसिद्ध यात्री ‘टेवनियर यांच्या मते युरोपातील यहुदी जगात सर्वोत्तम सावकार मानले जातात परंतु यहूदी सावकार भारतीय श्रेष्ठीच्या (सावकार) शिष्यत्त्वाच्या योग्यतेचे देखील नाहीत. इंग्रजांच्या सत्तेमुळे या सावकारांचे पतन होऊन भारतात आधुनिक अधिकोषणाचा प्रभाव हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये आधुनिक बँकेची सुरुवात इंग्रज कालखंडामध्येच झाली. इ.स.१७७० मध्ये ‘अलेक्झांडर ॲन्ड कंपनी (Alexander & Company) या ब्रिटीश कंपनीने ‘बॅक ऑफ हिंदुस्थान’ या नावाने कलकत्ता येथे भारतातील पहिल्या आधुनिक बँकेची स्थापना केली. ही बॅक ज्या इंग्लीश एजन्सी हाऊसने सुरु केली होती ते एजन्सी हाऊस बंद पडल्यामुळे ही बॅक इ.स. १७८२ मध्ये बंद पडली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या प्रमुख तीन भागांमध्ये ‘बॅक ऑफ बंगाल’, ‘बॅक ऑफ बॉम्बे’ आणि ‘बॅक ऑफ मद्रास’ या तीन मोठ्या बँकेची स्थापना अनुक्रमे १८०९, १८४० आणि १८४३ मध्ये केली. या तिन्ही बँकांचे कार्य १९२० पर्यंत सुरुळीत स्वरूपात चालू होते. त्यानंतर या बँकांचे एकत्रीकरण करून २७ जानेवारी १९२१ मध्ये त्यांचे ‘इम्पीरियल बॅक ऑफ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. या इम्पीरियल बॅक ऑफ इंडियाचे १ जुलै १९५५ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयीकरण करून तिचे नामकरण ‘स्टेट बॅक ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. या बैंकेची यशस्वी वाटचाल आजतागायत सुरु असून वर्तमान स्थितीत स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या देशभरांत आज २०,००० पेक्षा जादा शाखा देशाच्या सर्व काना कोपऱ्यांत कार्यरत आहेत, सरकारचे रिझ्व्ह बँकेचे समाशोधन सारखे व्यवहार स्टेट बँकेमार्फत होतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply