नवीन लेखन...

वर्तनशैली – मोबाईल वापरताना !!

Etiquette - A social responsibility

पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांची जीवनशैली आणि राहणीमान, ही सोपी आणि सुटसुटीत आणि एकसंध अशी होती. एकत्र कुटुंबामध्ये सर्वप्रकारचे सण, कार्ये उत्सव साजरे व्हायचे. शेती, नोकरीधंदा तत्सम उद्योगामध्ये घरची मंडळी व्यस्त असायची. त्यामुळे जगण्याला फारसे पदर नसायचे वा सार्वजनिक वावर हा क्वचित प्रसंगी असायचा. आजच्या गतिमान युगात मात्र बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे सर्वांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला आहे. ह्या अनुषंगाने सार्वजनिक वर्तनशैलीचाही विचार होणे गरजेचे वाटते. सार्वजनिक परिघातील या गोष्टी तशा म्हटलं तर लहानच पण त्यातच खूप महत्वाच्या, आपल्या दैनंदिन जगण्याला स्पर्श करणार्‍या खूप प्रवृत्ती दडलेल्या असतात ज्याचा व्यक्तीव्यक्तींच्या पर्यायाने सर्वांच्या वागणुकीशी संबंध येतो. प्रत्येकाच सामाजिक विश्व विस्तारतांना ते अधिक चांगलं परिपूर्ण व्हावं यासाठी हे एक मुक्त चिंतन अन् म्हटलं तर उद्बोधन !

वर्तनशैली – मोबाईल (चलभाष्य/भ्रमणध्वनी) etiquette

आजच्या आधी काही वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं ही मर्यादित होती. आप्तस्वकीयांशी गाठीभेटी या ज्या संपर्कातून होत ते म्हणजे पत्र, ते ही जास्त करून पोस्टकार्ड. त्याच्यावरील अंदाजपंची अपुर्‍या पत्त्यावरून माणसं एकमेकांच्या घरी जात. अनेकदा आम्ही गावी येत आहोत अशा आशयाची पत्रं तो माणूस गावी असतांना स्वत:च पोस्टमनकडून पत्राचा स्विकार करीत असे एवढ्या उशीराने ते पत्र त्या पत्त्यावर पोहोचत असे. लग्नकार्य, बारसं, अभिनंदन वा मयत – तेरावा अशा सार्‍याचा मामला त्या पत्रावर अवलंबून राही. मात्र आज आत्ता ताबडतोब संपर्क साधण्यासाठी मोबाईल अवतरले अन् जगाच्या पाठीवर क्षणार्धात पोहोचण्यासाठी जादूचे युग सुरू झाले अन् बघताबघता सारे सारेजण कानाला मोबाईल लावीत इकडे तिकडे रेल्वे, बस, रस्ता, घर, कार्यालय की सांस्कृतिक ठिकाण काहीकाही वर्ज्य न राहता कुणानाकुणाची मोबाईल रिंग ऐकू येणे सुरू झाले.

वास्तवात फारच कमीवेळा व्यक्ती कामासाठी याचा उपयोग करतात. बहुतांशीवेळा असून अडचण नसून खोळंबा धर्तीवर आता तुम्ही कुठे आहात, काय करता, अमुक येता येता घेऊन या वगैरे फालतु गोष्टींसाठी कॉल होतात. बरेचदा काहीजण आहेत त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडेच आहोत अशा थापाही मारतात अन् काम करणार्‍याच्या कामाला शह देतात. काहीजण मोठमोठयांनी रेडीओवर गाणी ऐकतात. क्रिकेटच्या मोसमात (आजकाल हा बारमाही सीझनच झालाय) स्कोअर ऐकतात. गेम खेळतात अन् ते बिनदिक्कत इतरजण ठार बहिरे आहेत वा आपल्या या मोबाईल ध्वनीने होतील अशा मग्रुरीत टाइमपास करतात. रिंगटोनचा आवाज मर्यादित असावा. महत्वाच्या ठिकाणी ते व्हायब्रेटर वा सायलेंट मोडवर ठेवावेत. जसं शाळा, शिक्षणसंस्था,हॉस्पिटल, सार्वजनिक ठिकाण, चित्रपट/नाट्यगृहात हे भान ठेवणे गरजेचे. अन्यथा रिंगटोन वाजण्याने अन् त्यावर इकडम् तिकडम् भाष्य केल्याने इतरांच्या एकाग्रतेचा भंग होतोच पण रंगमंचावरील कलाकारांना डिस्टर्ब होणे, नाटकात तत्सम सांस्कृतिक कार्यक्रमात व्यत्यय येणे, भूमिकेची लिंक तुटणे यासारखे तापदायक प्रसंग घडतात अन् रसिकांचा खोळंबा होतो. यासाठी मोबाईल ऑफ करणे श्रेयस्कर वा कॉल आला की नाट्य/सिनेमागृहाबाहेर जाऊन बोलावं. आपण कुठे आहोत अन् काय बडबड करतोय याची जाण मोबाईल धारकाने ठेवायलाच हवी. कॉलेजमध्ये अभ्यास करताना, लेक्चर चालू असताना मोबाईल बंद ठेवावा. या ठिकाणी विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनी आपला बहुमोल वेळ हा विद्यार्जनासाठी आहे हे जाणावे.

हॉस्पिटलमध्ये पेशंटना, डॉक्टरना भेटताना मोठ्या आवाजात बोलू नये. मंदिरात देवाशी तादात्म्य पावावे तेव्हा मोबाईल ऑन कशाला हवा? हीच गोष्ट अंत्ययात्रेत लागू होते. फ्युनरल तत्सम धार्मिक विधी अतिशय दु:खात, प्रियजनांच्या वियोगात चालू असताना काही महाभाग प्रसंगाचे गांभिर्य न ठेवता मोठ्याने हास्यविनोद, शिंच्या, लेका असे काही समोरच्याला संबोधित मोबाईल भाष्य करतात ते मॅनर्सला मानीत नाहीत हे तर दिसतेच पण त्यांचा इथला सहभाग किती फसवा आहे याची बोचणी त्रासाची असते.

मोबाईल करताना प्रथम समोरच्याला आपण आता फ्री आहात की बिझी? आपणास थोडा वेळ आहे का? हे विचारावे. आपल्या बोलण्याचा टोन हा नेहमी हळू, संयमी, सुस्पष्ट हवा. सॉरी आणि थक्यू संवादात सुयोग्यवेळी वापरावेत. कामाच्यावेळा विचारून त्यावेळी फोन करणे वा एस् एम् एस् सुविधेचा वापर करणे जास्त चांगले. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. स्वत:च्या आणि अन्य पादचार्‍यांच्या जीवाला जपावे. अपघात टाळावेत.

स्वत:च्या घरी कुणी नातलग, स्नेही असतांना वा आपण कुणाकडे गेलो असतांना मोबाईलवरच बोलत राहणे असभ्यपणाचे आहे. यात आपण वेळेचा अपव्यय करतोच, सर्वांचा खोळंबाही होतो अन् सर्वात महत्वाचे, प्रत्यक्ष हजर असलेल्या जवळच्या लोकांना दुर्लक्षित करतो. यात धावपळीच्या जगात एकत्र ठरवून केलेल्या भेटीत सुयोग्य संवादाचा अभाव होऊन चर्चा, गप्पा, नात्याचा आपलेपणा या हेतूलाच फुलस्टॉप मिळतो. परस्परांशी भेटल्यावरही न बोलणे, संवाद हरवणे हे घातक ठरते. खूपच महत्वाचं, कामाचा मोबाईल असेल तर तशी उपस्थितांना जाणीव करून देत मोबाईल कॉल घ्यावा. थोडक्यात बोलून कॉल करणार्‍या व्यक्तीलाही घरगुती भेटीचे कारण सांगून गैरसमज दूर सारावा.

अनेकदा कौटुंबिक नातेसंबंधात येणार्‍या व्यक्तिगत कौतुकाला अभिनंदन करताना वा वाढदिवस, बाळाचे आगमन, वास्तुशांत, वाहन खरेदी, विवाह, वाढदिवस यासारख्या अनेक कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नसते. अशा वेळी सर्रास एस् एम् एस् पाठवले जातात ते योग्यही ठरते, मात्र जेव्हा त्या व्यक्तिशी तुमचे जवळचे, कुटुंबातील एक सदस्य म्हणून नाते असते जसे मुलगा-वडील, आइ-लेक, जावई- सासू, मावशा-भाची, बहीण-भाऊ असे अनेक नात्यांचे कडबोळे. तेव्हा एस् एम् एस् पुरेसा नाही. त्यावेळी त्या त्या व्यक्तीशी समक्ष बोलून दिलेल्या शुभेच्छा या अवर्णनीय ठरतात अन् एस् एम् एस् द्वारे साधलेला संपर्क ड्राय विसंवादाची सुरवात करतो. पाश्चिमात्य आणि भारतीय यांच्यात हा मोठा फरक आहे की आपण कोणाच्या कोणालाही आपलेसे मानतो निभावतो. मग रक्ताच्या नात्यात हा वेस्टर्न फॉरम्युला फेल जातो. शुभेच्छांची देवघेव ही खुलेआम मोकळ्या संवादातून जास्त परिणामकारक ठरते अन् प्रसंगी ती जिवलग भेटीचा प्रत्यय आणते. जो खूप बोलका जिव्हाळ्याचा अन् म्हणूनच अनमोल असतो. म्हणूनच केव्हाही कुठेही एस् एम् एस् पाठवणे कधी कधी अडचणीचे होते.
 

समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..