नवीन लेखन...

वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

Etiquette - Cleanliness

कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे ‘विश्वची माझे घर’ म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला की त्यात राहाणारे सारे लोक त्यांच्या रीती भाती याचबरोबरीने घरासारखाच देश मानणारी प्रवृत्ती अशा अनेकविध मानवी प्रवृत्तीतून कचरा आणि आपण, स्वच्छता आणि तिचे व्यवस्थापन यांचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे. भारतीय मनोवृत्तीचे हे एक मोठे लक्षण आहे की त्यांना अमेरिका, सिंगापूर, चीन, जपान अशा अनेक देशांचे अतिशय कौतुक आहे. अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात त्यांचा पुढाकार असतो. एवढेच नव्हे तर तिथल्या क्लीन सिटीचे, पद्धतीचे भरभरून कौतुक करताना ते मागे हटत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भारतात किती कचरा, अस्वच्छता हे ते टीका करण्यात या लोकांना काहीच गैर वाटत नाही.

काही अपवाद वगळता हाच भारतीय माणूस त्याच्या दिनक्रमात बिनदिक्कत रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनात भरपूर कचरा करून कुठेही फेकताना दिसतो. यात त्याच्या समोर असलेली लहान मुलं तेच अनुकरण करतात. कारण त्यांच्यापुढे पालकांचे, मोठ्यांचे हेच वागणे असते.

अशी मंडळी रेल्वे, बस, बगीचे, मैदाने अन्य सार्वजनिक ठिकाणे, स्वत:च्या वाहनातून प्रवास करतांना खिडक्यांतून रस्त्यावर कचरा टाकण्यात अग्रेसर असतात. एवढंच कशाला तोंडातील पानाचा, गुटख्याचा तोबरा रस्त्यांवर टाकणे, थुंकणे, पिचकारी मारणे, कुठल्याही कार्यालयाच्या, भिंतीवर असलेले घाण नक्षीकाम म्हणजे भारतीयांचा वावर ही जगभरात भारतीयांची ओळख ठरते म्हटलं तर चुकीचे ठरू नये.

सार्वजनिक स्वच्छतागृहाचा शोध न घेता कुठेही लघवी सोडणे अन् परिसर घाण करणे याची लाज का वाटत नाही हा प्रश्न पडतो.स्वच्छतागृहाचा वापर करणारे फारच थोडे अन् तेही पाणी टाकतील, फ्लश ओढतील असे दृश्य विरळच.

त्यामुळेच बहुतेक ठिकाणी नाकावर रुमाल धरूनच प्रवेश करायला लागतो अन् तेथील अस्वच्छता पाहून मळमळायला लागते. महिलांची तर एवढी कुचंबणा होते की टॉयलेटला जायचं म्हटलंकीच धस्स होतं. प्रवासात वेफर्स, बिस्किट्स, स्नॅक्स, टॉफी अस काहीही खाल्लं की त्याची वेष्टनं, पिशव्या, चांद्या, पाण्याच्या, पेयाच्या रिकाम्या बाटल्या खिडकीतून सरळ बाहेर फेकल्या जातात. काही महाभाग सार्वजनिक वाहनाने प्रवास करतांना बसल्या ठिकाणीच पायाने कचरा सीटखाली ढकलतात. यात फळ खाताना तर बघायलाच नको. केळी, संत्री, चिक्कू, आंबे, जांभळ यांची सालं, बिया कोठेही फेकताना, ढकलताना आपल्या या बेशिस्त वर्तनाने इतरांच्या अपघाताला, अपंगत्वाला या गोष्टी कारणीभूत होतील याची पर्वा न करता कुठेही कसेही खाणे यांचे आपले चालूच. शेंगांची टरफलं तर नेहमीचीच. शेंगा या अशाच खायच्या असतात जणू!

वास्तवात प्रवास करताना प्रत्येकाने लांब अंतराचा की जवळचा हा विचार करून सरसकट कागदाची, प्लॅस्टिकची कचराबॅग बरोबर घेणे जरूरीचे आहे. व्यक्तिगत वा एकत्र कचरा या पिशवीत टाकावा. जो मुक्कामाच्या ठिकाणी, घरी, अन्यत्र कचराकुंडीत टाकणे सहज शक्य आहे. ज्यामुळे रस्त्यावरचा कचरा कमी होऊन रस्ते, पर्यायाने परिसर स्वच्छ राहील. त्याच बरोबर सफाई कामगारांचे काम कमी होईल. तेही आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांच्या स्वच्छतेच्या कामालाही मर्यादा आहेत ही एक माणूस म्हणून सर्वांनी जाणीव ठेवावी.

मुंबापुरीत खास करून फेरीवाल्यांचे रस्ता आक्रमण आणि त्यावरील विक्री यातून निर्माण झालेला कचरा हा रस्त्यांवरच टाकला जातो. यात भाज्या, फळांमुळे कुबट ओला कचरा तयार होतो जो दुर्गंधीयुक्त अनारोग्य देतो. रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते, या सर्वांनी एक कचरा डबा ठेवून त्यातच दिवसभराचा कचरा जमा करून व्यवसाय बंद झाल्यावर कचराकुंडीत कचरा टाकणे गरजेचे आहे.

फ्लायओव्हर, पदपथावरच्या झोपड्या यातून जो कचरा निर्माण होतो तो तर वाढता वाढे ढीग स्वरूपात असतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांना कचराडबे पुरवण्यात यावे. घंटागाडी या परिसरापर्यंत नेण्यात यावी. कचरा त्यातच टाकण्याची समज द्यावी, तशी सक्ती करावी अन्यथा नाममात्र एक रुपया वा तत्सम दंड आकारावा.

मुंबापुरीत काही विभागात काहींचे बंगले, बैठी घरं आहेत त्यांनी आवारातील वृक्षांचा पडणारा पालापाचोळा वेळी अवेळी जाळून धूर, प्रदुषण करू नये.त्याऐवजी हा कचरा आवारात खड्डा करून त्यात टाकून कचर्‍यातून खत निर्मिती करावी. वा कचरा गोळा करून घंटागाडीत कचरा डब्यात द्यावा. अनेक सोसायट्या, इमारती, चाळी या दर्शनी भागात पॉश, साफसुफ असतात मात्र यांची मागील पाठची बाजू म्हणजे कचऱ्याचे उकीरडे असतात म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्यांची सांपत्रिक स्थिती उत्तम, उच्चभ्रू,सुशिक्षित कुटुंबही याला अपवाद नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. अशा बर्‍याच सोसायट्यांच्या सभासदांमध्ये काही सदस्य हे दाराशी येणार्‍या कचर्‍यावाल्याकडे घरातील कचरा न देता मागील बाजूस घरातूनच डस्टबीन उपडी करतात. यात आपल्या खालील मजल्यावरच्या लोकांना त्रास होतोय, हे गैर आहे याची जाण नसेल का? पण जडलेल्या गलिच्छ सवयी. यात सॅनेटरी नॅपकिन्सपासून केसांच्या गुंतवळीपर्यंत सारं, काहीच यांना वर्ज्य नसतं अशा बेतालांना काही दंड वा सजा करण्याची मुभा सर्वांना हवी असे म्हणावे वाटते.

कचरा उचलणार्‍या सफाई कामगारांचे आरोग्य आणि माणुसकीचा दृष्टीकोन बाळगून सर्व फ्लॅटधारकांनी घराघरात ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा करून दोन डस्टबीन कटाक्षाने घरात ठेवाव्यात.

अलीकडे सण समारंभ हे भरपूर आणि दणक्यात साजरे होतांना फटाके मस्ट् झालेत. पुन्हा हे फटाके अत्यंत जलदगतीने टायमरने उडवले जातात. या फटाक्यांपासून खूपच कागद, कपटे, कचरा रस्त्यांवर पडत राहतो अशावेळी संबंधित उत्सव प्रेमींना संयोजकांनी, सरकारनी तो कचरा त्वरित उचलण्यासाठी आग्रही असावे. एवढ्या भफबाज समारंभात तो कचरा झाडून एकत्र गोळा करण्यासाठी काही माणसं रीतसर त्यांना पैसे/पगार देऊन कामाला लावणे त्यावर खर्च करणे अशक्य नाही. कुठल्याही कामाची, कार्यक्रमाची शोभा ही व्यक्तिगत स्तरावर वा लोकांसाठी करतांना सामाजिक स्वच्छतेची जाण हवीच. हिच गोष्ट सर्व रिअॅलिटी शो, वाढदिवस, बक्षिस समारंभ, कुठलेही इव्हेंट यांच्या झिरमिळ्या सदृश्य रंगीत कागदी पावसाला स्वच्छतेचा अंकुश हवाच जेणेकरून त्या कार्यक्रमानंतर तिथे कचरा कुंडीचे रूप येणार नाही.

अलीकडे शुभेच्छांपासून श्रद्धांजलीपर्यंत सर्वत्र फ्लेक्सचा जमाना आला आहे. पहिले नेतेमंडळींचे जन्मदिवस वा निधन, उद्घाटन, निवडणुका, स्वागत अशावेळी ब्लॅकबोर्डचा वापर केला जाई जो कार्यक्रम झाल्यानंतर पुसला जाऊन बोर्डवर नवनव्या बातम्यांचे लेखन होई त्या उलट अलिकडे फ्लेक्सचे झालल आगमन यामुळे ठिकठिकाणी समारंभ झाल्यावरही कित्येक दिवस किंबहुना कायमच हा फ्लेक्सचा टांगलेला कचरा सर्वत्र लोंबकळत राहतो. याच धर्तीवर जाहिराती, पोस्टर, बॅनर, स्टिकर यांनी रेल्वे, बस, भिंती विद्रूप तर होतातच पण हा कायमस्वरूपी कचरा ठाम मांडून बसतो. अन् मग कुठेही, कसेही, केव्हाही मसाजापासून बाबा बंगालीपर्यंत सर्वांना अवाजवी महत्व देऊ केले जाते. ज्यातून अनेक भोंदू अनैतिक गोष्टींचे पेव फुटते ते निराळेच. सर्वांचा वाईट, चुकीचा उद्देश नसतो. आकर्षकपणा, सुबकपणा यांचे आकर्षण असावेच पण हा नीटनेटकेपणा समारंभ पूर्ण झाल्यावर गुंडाळून व घडी करून ठेवणे अन् पुढच्या अनेकांसाठी स्वच्छतेचे पालन करणे, त्या अन्यांसाठी या जागेचा सुयोग्य वापर करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आधुनिकतेचा अंत जपतांना या प्रवृत्तीचा सर्वत्र प्रसार होईल अन् कुणीच नेता वा कार्यकर्ता वा सर्वसामान्य नागरिक अस्वच्छता करण्यास धजावणार नाही. पर्यायाने क्लीनसिटीचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

थोडक्यात आपण प्रत्येकाने आपल्या देशाचा सदस्य या नात्याने आपली जबाबदारी समजून वर्तणूक ठेवली पाहिजे. टीका करणे सोपे असते पण आपल्या कल्पनेतील देश जगाच्या पाठीवर साकारताना आपण सर्वांनी केलेले प्रयत्न, वर्तन, आणि देश म्हणजे आपले घरच ही भावना जपायला हवी. आपण आपल्या घरात घरभर फळांच्या साली, खाद्यपदार्थांची वेष्टन अन्य कचरा करतो का? त्यासाठी नियोजित केलेल्या कचऱ्याच्या डब्यात तो टाकणे हे प्रत्येकजण अगदी लहान मुलंही करत त्यामुळेच आपला गाव, शहर, परिसर देश सर्वत्र आपलं घर समजून स्वच्छतेचे सुयोग्य पालन केले तर कचरा समस्या दूर होईल. पर्यायाने भारतात परदेशाकडे बोट दाखवण्याची जरुरी न उरता आपल्या देशाप्रमाणेच सर्वत्र स्वच्छता दिसली अशा आशयाची विधान आपण खुलेआम करून भारताची क्लीन नेशन ही अभिमानास्पद प्रतिमा सन्मानाने मिरवू शकू.

समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..