![p-20443-Abhinandan](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2015/11/p-20443-Abhinandan.jpg)
माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक प्रसंग स्वत:सह आपल्या परिचित स्नेहीजनात, कुटुंबात अन् या संपूर्ण विश्वात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये अभिनंदन या शब्दानी साऱ्यासाऱ्यांना आपलेसे करता येते. अन् सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.
अभिनंदन या एका शब्दानी दोन अनोळखी माणसांमध्ये मैत्रीचे सुरेल नाते गुंफले जाते. प्रत्येकाला, तो लहान असो की मोठा आपल्याला मिळालेली शाबासकी भावतेच.
आजच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. कुठलेही यश मिळवताना अपार कष्ट, जिद्द धरून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लागतो. मात्र काही वेळेला पालक आपल्या इच्छा आकांक्षासाठी मुलांचा कल न बघता आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना दहावीत गुणवत्ता मिळाली का? बारावीत काय दिवे लावणार? अपेक्षित गुणवत्ता मिळूनही जर हव्या त्या शाखेत, कोर्सला प्रवेश मिळण्यात अडचणी आल्या की कुणी या मुलांचे कौतुक केले अभिनंदन काय मस्त टक्के मिळवलेत? वगैरे, की हे पालक सुतकी चेहरा करून म्हणतात, अहो कसलं काय, सीईटीत बघू मग करू तोंड गोड याचे अन् तुमचेही.
यात आपण मुलांचा हिरमोड करत आहोत, त्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी टाकत आहोत, एवढेच नव्हे तर त्याचे कौतुक न करता त्याच्या छोट्या छोट्या भावनांना गालबोट लावतो हे लक्षातच घेत नाहीत.
वास्तवात पालकांनी त्याच्या गुणवत्तेचे भरपूर कौतुक करून त्याला छानशी भेट, सिनेमा, कुठेतरी पर्यटन अशा स्वरूपात त्याच्या प्रयत्नांची दखल ही घ्यायलाच हवी. त्याच्या गुणांची इतरांशी तुलना टाळावी. आपण आज त्याच्या यशाने भरून पावलोत याची दिलखुलास कबुली त्याने मुलांना द्यावी. स्नेही, नातलग, त्याचा मित्रपरिवार, शिक्षक या साऱ्यांचा सहभाग, त्यांची शाबासकी याला स्वीकृती द्यावी. ज्यात मुलांना पालक आपल्या यशाची कदर करतात ही भावना मुलांचे आत्मबळ वाढवून पुढील स्पर्धात्मक युगासाठी त्यांना अधिक सक्षम करते, मुलांचा आत्मविश्वास वाढवते.
बरेचदा मोठ्यांना अभिनंदन म्हणणे शक्य होत नाही. अशावेळी बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक छान छान आशयाच्या शुभेच्छापत्रांनी तुम्ही तुमच्या बोलक्या भावना व्यक्त करू शकता. नव्या युगात मोबाईलद्वारे एस् एम् एस् करून तुम्ही संवाद साधू शकता.
अभिनंदन हा एक छोटासा पण अत्यंत परिणामकारक शब्द आहे.
बाळाचे आगमन, आजीआजोबांचे अभिनंदन, नोकरी लागली, लग्न ठरलं, झालं, प्रमोशन, खेळात प्राविण्य, स्पर्धेतील यश, एखादं वर्ल्ड रेकॉर्ड, सेंच्युरी, गाठलेले लक्ष्य, प्रकाशित झालेले पुस्तक, सामाजिक कार्य, वास्तुप्रवेश, वाहन खरेदी, प्रसंगानुरुप केलेली मदत, मतभेद दूर सारण्यात घेतलेला पुढाकार यासारख्या अगणित गोष्टींच्या विश्वात कृती छोटीशीच पण मोठ्या आनंदाची असते. अभिनंदन हा एकच शब्द पण सार्या भावना त्यात व्यक्त करत राहतो. व्यक्ती कुठल्याही वयोगटातली असली तरी तिला तिच्याविषयीच्या कौतुकभर्या शब्दांचे आगळेच ममत्व वाटते अन् म्हणूनच कुणाचेही, कुठेही, केव्हाही खुल्या दिलाने अभिनंदन करणे म्हणजे दोन व्यक्तींचे मनोमिलन आहे. यासाठी फक्त मनमोकळेपणा, कौतुकाची दाद अन् शाब्दिक श्रीमंती हवी अन् ती देण्यासाठी उत्सुकता! जेथे कौतुक आहे तिथे शाबासकी आहे अन् कुतुहलही आहे. जे व्यक्तीव्यक्तींना अभिनंदन करण्यासाठी उद्युक्त करते. यासाठी कुठलेही व्यापताप, ताटकळणे, वाट पाहणे यासारखे बोअरिंग काहीच नसते. उलट आपण जेव्हा अभिनंदन! हा शब्द उच्चारतो तेव्हाच एक अधीरता ओठाशी रेंगाळते ज्यातून, दोघांनाही, अभिनंदन करणार्याला आणि स्वीकारणार्याला आनंदाचा एक असा अवखळ स्त्रोत मिळतो की ज्याच्या अनुभूतीतून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते अन् त्या दृष्टीतून सकारात्मकतेचा, अधिक काहीतरी चांगले करायचा जोम मिळतो जो उसळत्या उर्जेला अनोखे बळ देत माणसामाणसात ओळखीचे बीज पेरीत प्रेमरज्जुंचे अपूर्व बंध बांधतो. अभिनंदन म्हणजे अनमोल भावभावनांचा शुभारंभ… चला तर मग करुया अभिनंदन…..
समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१
Leave a Reply