
काल ल्युसर्न लेकच्या क्रूझवर सर्वांनी खूप धमाल केली आणि उद्या चेकौट असल्याने हॉटेलवर जाउन सामानाची अवराआवर करुन सगळे झोपी गेले. आज सकाळी 8च्या सुमारास झुगपासुन दीड तासाच्या अंतरावरच्या liechtenstein, (अंंदाजे उच्चार लिंच्यटेनस्टाईन) कडे, निघालो. ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड देशांना जोडणारा आणि भरपूर निसर्गसौंदर्य लाभलेला हा छोटासा देश पर्यटकांच खास आकर्षण आहे. पांढ-या शुभ्र वीरळ ढगांच्या मागुन डोकावणा-या पर्वतराशी, उंचावरुन कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, टुमदार उतरत्या छपरांची घर, वाहते ओढे अस कमालीच नेत्रसुख घेत घेत आम्ही वडूज या राजधानीकडे निघालो. दीडएकशे स्क्वेअर किमी क्षेत्रफळाच्या या देशाची राजधानी ‘ वडूज ‘ नावामुळे आपलीशी वाटली. ग्रुपमधले सातारकर जास्तच खुश झाले!
वडुज गावाची ट्रामने 35 मिनीटाची चक्कर झाली; ट्रामच्या कँपटननी वाटेत दोन तीन ठिकाणी फोटोसाठी ट्राम स्वतःहून थांबवली.
पर्यटकांची बरीच गर्दी दिसली. द्राक्षाचे मळे दिसले आणि द्राक्षापासुन तयार होणारी वाईन 37000 लोकसंखेच्या वडूज गावातले लोकच संपवतात अशी माहीतीही मिळाली. या श्रीमंत देशाचा राजा 25 संदसीय मंडळाच्या सल्याने येथील सरकार चालवतो. ऑस्ट्रिया आणि स्विस या दोन्हीही देशांची चलन येथे वापरात आहेत.
वडूजहून ऑस्ट्रिया मार्गावर प्रत्येकी दोन ते चार किलोमीटर लांबीचे 8 – 10 बोगदे पार करत आम्ही वाट्टेन्सच्या दिशेनी निघालो जिथे स्वोरोस्की कंपनीला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून बांधलेले स्वोरोस्की क्रिस्टल म्युझिअम आहे. म्युझिअम बाहेरच हिरवळीने तयार केलेल्या मानवी चेह-याला नाक, डोळे, तोंड असुन तोंडातून पांढरे शुभ्र पाणी बाहेर पडत असत. सर्व पर्यटकांचा इथे फोटोस्पॉट असतो.
स्वोरोस्कीच्या प्रदर्शनातील झुंबर आणि नेकलैस, कानातली, अंगठ्या वगैरे दागिने स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचा विषय होता. बरेच पर्यटक येथे खरेदी करायच ठरवुन आले असावेत पण प्रत्यक्षात फार थोड्यांनीच खरेदी केली.
पुढच डेस्टीनेशन होत इन्सब्रुक. पायी सफर करुन “गोल्डन रूफ” या चार शतकापूर्वी दोन हजार पाचशे तांब्यांच्या टाईल्सनी बांधलेल्या सोनेरी बाल्कनीजवळ फोटो काढले. पंधराव्या शतकात मॅक्समिलन राजाने ते बांधले आहे. बाल्कनीचे सोनेरी छत आणि त्याभोवती असलेल्या प्रेमकथेससाठी ही बाल्कनी कुतुहलानी पर्यटक बघतात.
या नंतर आल्पसची प्रसन्न पार्श्वभूमी लाभलेल्या हॉटेल ऑलिंपियामधे आम्ही रात्री मुक्काम केला.
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply